संपादकीय


ऑक्टोबर २०२३
अंक ४

मैत्र संपादक मंडळ २०२३ 

वरदा वैद्य 

विदुला कोल्हटकर 

रोहित कोल्हटकर 

कपिल धाकड 

मधुर पुरोहित 

दीप्ती जोशी 

 

बाममं कार्यकारिणी २०२३ 

अध्यक्ष 

अनीश पाटील 

उपाध्यक्ष 

सम्राज्ञी शिंदे  

 उपाध्यक्ष- विपणन 

पंकज शिवपुजे  

चिटणीस 

केतन शहापुरे 

खजिनदार 

योगेश खैरनार 

सह-खजिनदार 

स्मितेश लोकरे

मुलांच्या कार्यक्रमांचे आयोजन-
वैशाली खैरनार

ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन-
सुषमा भोसले

बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रतिनिधी -
राजेंद्र मोडक



या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||

नमस्कार मंडळी,

आसुरी शक्तींचा नाश करणाऱ्या देवीचे स्मरण करत मैत्रच्या ह्यावर्षीचा शेवटचा अंक तुमच्या हाती सोपवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. तुम्ही सगळ्यांनी नवरात्रीचा उत्सव जोरदार साजरा केला असेलच. ह्यावर्षी अधिक श्रावण असल्यामुळे गणपती उशिरा आले आणि त्यानंतर लगेच नवरात्र आल्यामुळे गेल्या महिनाभर मराठी घरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भरीस भर म्हणजे भारतीय क्रिकेट संघाची विश्वचषक स्पर्धेमध्ये अश्वमेध यज्ञातील न थांबणाऱ्या घोड्याप्रमाणे घोडदौड चालू आहे. किवींच्या संघावर मात करून भारतीय संघाने न्यूझीलंडला हरवण्याचा २० वर्षांचा दुष्काळ संपवला आणि आपला आवडता भारतीय संघ उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला. २०११ ची पुनरावृत्ती करत भारत पुन्हा एकदा विश्वचषक जिंकेल आणि सर्व भारतीयांना दिवाळीची छानशी भेट मिळेल अशी आशा करूया.

यंदाचा बाल्टिमोर मंडळाचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम आयत्यावेळी राज्यपालांनी आपत्कालीन परिस्थिती जाहीर केल्यामुळे पुढे ढकलावा लागला आणि अनेकांचा विरस झाला. त्यातून कार्यक्रम तर रद्द झाला, मात्र नियोजित दिवशी पाऊस किंवा वादळ असे काहीच झाले नाही. त्यामुळे आणखीच हिरमोड झाला. अर्थात ह्या परिस्थितीत झटपट हालचाली करून, एका आठवड्यात नवीन जागा शोधून कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडल्याबद्दल आपल्या कार्यकारिणी समितीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ह्यावर्षीच्या भारताच्या यशस्वी चंद्रयान मोहिमेवर आधारित सजावट फारच छान होती. गणपतीच्या कार्यक्रमाच्या वेळी होणाऱ्या आवर्तन ह्या ढोल-ताशा समूहाचा जोर वर्षागणिक वाढतच चालला आहे. ह्या समूहाची दोन-तीन महिने जोरदार तयारी चालू असते. अर्थातच त्यांनी कसून केलेल्या मेहनतीमुळे आपल्याला आपल्या गावातील गणपती मिरवणुकीची आठवण आल्यावाचून राहात नाही. त्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून आभार. गणपती बाप्पा मोरया !!

दसरा झाल्यावर एका आठवड्यात हॅलोविन आणि म्हणता म्हणता दिवाळी येईलच. आपल्या मंडळाने ह्यावर्षीच्या दिवाळीच्या कार्यक्रमाची तारीख जाहीर केलेली आहे. नोव्हेंबर १८ला दिवाळीचा कार्यक्रम असणार आहे. त्यावेळी अनेकांशी प्रत्यक्ष भेटी होतील. तुम्ही दिवाळीबद्दल, तुमचे घर कसे सजवता त्याबद्दल लेख किंवा सजावटीचे फोटो, फराळ करतानाच्या गमती जमती, अनुभव, पाककृती अशा गोष्टी आम्हाला पाठवायला विसरू नका. दिवाळी आली की वर्ष संपत आल्याची चाहूल लागते आणि ह्या वर्षभराचा आढावा घेण्यास सुरुवात होते. कसे गेले हे वर्ष? काय काय केले? काय करणे बाकी आहे? पुढच्या वर्षीसाठी कोणते संकल्प करायचे वगैरे विचार सुरू होतात. मैत्र ह्या आपल्या त्रैमासिकाचा आढावा घ्यायचा म्हटल्यास, ह्यावर्षी जवळपास ५० लेख/कविता प्रकाशित झाल्या. ह्यासाठी जवळपास ३० लेखक/लेखिकांनी त्यांचे साहित्य पाठवले. ह्या लेखकांमधील बरेचसे स्थानिक म्हणजेच अर्थात बाल्टिमोर किंवा आसपासच्या परिसरातील आहेत. एकूण लेखांमध्ये हलक्या फुलक्या गोष्टीपासून, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र ह्या विषयांवरचे माहितीपर लेख, भारतातील सद्य परिस्थितीच्या अनुषंगाने माहिती देणारे लेख प्रकाशित झाले. गेली दोन वर्षे चालू असलेल्या ‘चित्रसाहित्य’ सदराला पूर्णविराम मिळाला, पण त्याबरोबरच काही नवी सदरे (कवितेचं पान, पौराणिक कथा, भाषाविचार, भगवान विष्णूची २४ नावे) सुरू झाली. एक शतशब्द कथाही प्रकाशित झाली. मराठी कथा लिहिण्याची इच्छा आहे पण किती लिहावे ते कळत नाही अशांसाठी शतशब्द कथा लिहिण्याचा मार्ग सोपा ठरू शकतो. मैत्रासाठी लेखन पाठवल्याबद्दल सर्व लेखकांचे मनापासून आभार.

मैत्र ह्या मंडळाच्या मासिकाला पुनर्जीवित करून आता जवळपास ५ वर्ष पूर्ण होतील, म्हणजेच एकूण २० अंक आणि २५० पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. संपादक मंडळाच्या पुढाकाराने बरीच सदरेही चालवली जात आहेत - गड्या आपुला गाव बरा, साहित्याची देवाणघेवाण, विशिष्ट विषयांवरील लेख, चित्रसाहित्य, भाषाविचार, बालविभाग, वगैरे सर्व साहित्य बाल्टिमोर मंडळाच्या संकेतस्थळावर (www.baltimoremarathimandal.org) उपलब्ध आहे. २०२० आणि नंतरचे सर्व साहित्य ब्लॉगस्वरूपातही (www.maitrabmm.blogspot.com ) उपलब्ध आहे. हे काम गेली ५ वर्षे चालू असताना संपादक मंडळात मात्र फारसा बदल झालेला नाही. बरेचसे संपादक पहिल्यापासून (म्हणजे गेली ५ वर्षे) सातत्याने आणि आनंदाने हे काम करत आहेत आणि करत राहतील. पण तरीही तुमच्यापैकी कोणाला संपादक मंडळात सहभागी होण्याची इच्छा असेल तर आमचा आनंद द्विगुणित होईल. तेव्हा मैत्र संपादक मंडळामध्ये सहभागी होण्याबद्दल आम्हाला जरूर कळवा.

दर वेळेप्रमाणे ह्या अंकातसुद्धा विविध प्रकारच्या लेखांची रेलचेल आहे. वर्षाच्या सुरवातीला काही हिंसक घटनांमुळे चर्चेत आलेल्या मणिपूरबद्दल माहिती देणारा लेख, सैनिक टाकळी ह्या महाराष्ट्रातल्या गावाची माहिती देणारा लेख ह्या अंकात आहे. तसेच भारताच्या चंद्रयान मोहिमेमधून मिळालेल्या माहितीबद्दलचा लेख, नुकत्याच झालेल्या कंकणाकृती सूर्यग्रहणाबद्दलचा अनुभव ह्या अंकात वाचायला मिळेल. ह्याचबरोबर पौराणिक कथा, भगवान विष्णूची २४ नावे ह्या सदरांतर्गत लेखसुद्धा प्रकाशित करीत आहोत. ह्या अंकासाठी लेखन पाठवणाऱ्यांचे आभार. सदरांतर्गत भागांचे लेखन पाठवणाऱ्यांचेसुद्धा आभार. तुम्हाला एखाद्या विषयावर सदर चालवण्याची इच्छा असेल तर आम्हाला जरूर कळवा.

मैत्रचा पुढचा अंक पुढच्या वर्षी जानेवारी महिन्याअखेरीस प्रकाशित होईल. त्या अंकासाठी तुम्ही भरभरून साहित्य पाठवाल अशी आशा करतो. अंकासाठीचे साहित्य १५ जानेवारीपर्यंत editor@baltimoremarathimandal.org ह्या पत्त्यावर पाठवायचे आहे. नेहमीप्रमाणे कथा, कविता, लेख, अनुभव, पाककृती, कला/छायाचित्रे, छंद, प्रवासवर्णन, मुलाखत, वगैरे सर्व साहित्यप्रकारांचे स्वागतच आहे.

‘दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ ह्या समर्थ रामदासांच्या ओळींनी प्रेरित होऊन तुम्ही काहीतरी लिखाण कराल अशी आशा करतो. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
कळावे,

संपादक मंडळ

मुखपृष्ठ - ‘कंकणाकृती सूर्यग्रहण ’
१४ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या कंकणाकृती सूर्यग्रहणाचे हे छायाचित्र ब्लाण्डिंग, युटाह इथे टिपले.
छायाचित्रकार - डॉ. वायुजीत गोखले

Comments

Popular posts from this blog