अ...अमेरिकेचा...?

शुभदा जोशी-पारखी

शुभदा जोशी मूळच्या सांगलीच्या. व्यवसायाने आर्किटेक्ट असून सांगलीला प्रॅक्टिस होती. सध्या कोलंबिया, मेरीलँडमध्ये वास्तव्य. गायनाची आवड आहे. सांगलीत असताना शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे.

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ज्याला आपण “अमेरिका”या संक्षिप्त नावाने संबोधित करतो, तिथे प्रत्यक्ष जाण्याचा योग हा असा जुळून येईल, असं कधीच वाटलं नव्हतं.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या, तसेच मानवनिर्मित आश्चर्यांनी भरलेल्या आणि आर्थिक महासत्ता असलेले विकसित राष्ट्र म्हणून ज्याने जगावर आपली छाप उमटवली आहे, अशा अमेरिकेत पर्यटक म्हणून कधीतरी एकदा जाण्याची इच्छा, इतर अनेकजणांप्रमाणे मलाही होती.पण तिथे फक्त पर्यटक म्हणून नाही तर, अनिवासी भारतीय म्हणून राहण्याचा योग जुळून आला, तो अमेरिकेत सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून कार्यरत असणाऱ्या माझ्या पतीसोबत, साधारण पावणेदोन वर्षांपूर्वी माझी लग्नगाठ बांधली गेली, तेव्हा…!

लग्नानंतर १०-१२ दिवसांनी माझे पती कामावर रुजू होण्यासाठी अमेरिकेत परतले. मी अमेरिकेत जाण्यासाठीचे व्हिसाचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर प्रवासाची तारीख निश्चित करून विमानाचं तिकीट काढलं. हे सगळं होईपर्यंत तीन महिन्यांचा काळ उलटून गेला होता. प्रवासाची तारीख जसजशी जवळ येत होती, तसतशी प्रवासाबाबतची उत्कंठा वाढत होती. अखेर प्रवासाचा दिवस येऊन ठेपला. घरचे तसेच आप्तेष्टांचा जड अंतःकरणाने निरोप घेऊन मी निघाले आणि ठरल्या वेळेनुसार विमानतळावर पोहोचले. विमानतळाच्या आत प्रवेश केल्यानंतर तेथील आवश्यक गोष्टी म्हणजे चेक-इन, सिक्युरिटी चेक इत्यादी झाल्यावर, बोर्डिंगसाठीच्या ठिकाणी येऊन मी स्थिरावले. साधारण तासाभरानंतर विमानात आम्ही प्रवासी जाऊन बसण्यास सुरुवात झाली. प्रस्थान वेळेनुसार विमानाने उड्डाण केलं आणि माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर शिक्कामोर्तब झालं…!

माझा हा विमानप्रवास अबुधाबीमार्गे होणार होता. तेथील विमानतळावर पोहोचल्यानंतर ६ तासांच्या अंतराने विमान बदलून पुढील अमेरिकेपर्यंतच्या प्रवासासाठी मी सज्ज झाले. हा प्रवास जास्त वेळाचा होता, पण विमानातील खाणे-पिणे आणि मनोरंजनाच्या सुविधांमुळे हा प्रवास सुखकर होण्यास मदत झाली. विमान उतरण्याची वेळ जवळ येत होती तसं माझ्या मनातलं अमेरिकेबद्दलचं कुतुहल वाढत होतं. जवळपास चौदा तासांच्या प्रवासानंतर विमान उतरलं आणि अमेरिकेच्या भूमीवर मी पहिल्यांदा पाऊल ठेवलं. अर्थातच, विमानतळावर मला घ्यायला माझा नवरा आला होता. तीन महिन्यांनंतर आम्ही प्रत्यक्ष एकमेकांसोबत असण्याचा आनंद शब्दात मावणारा नव्हता...!

आम्ही विमानतळावरून घरी जायला निघालो. गुळगुळीत रस्त्यावरून रहदारीचे नियम धाब्यावर न बसवता, त्याचे काटेकोरपणे पालन करत प्रवास करणारे लोक हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता. स्वतःच्या गाडीतून घरापर्यंतचा हा पहिला छोटा प्रवास माझ्यासाठी बर्‍याच नवीन गोष्टींची ओळख करुन देणारा ठरला. त्या दिवसापासून माझ्या अमेरिकेतील वास्तव्यास सुरुवात झाली.

इथले लोक, त्यांची भाषा, राहणीमान, संस्कृती अशा अनेकविध गोष्टींबरोबरच सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या हवामानाशी जुळवून घेत माझी दिनचर्या सुरु झाली. अर्थातच, सुरुवातीला हे थोडं कठीण गेलं. पण आता हळूहळू अंगवळणी पडतंय. इथली स्वावलंबी जीवनपद्धती हा आपल्यासाठी एका अर्थाने महत्त्वाचा आणि चांगला बदल म्हणावा लागेल. पण, तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या या देशात बहुतेक सर्व कामांकरिता अत्याधुनिक यंत्रांची उपलब्धता देखील तेवढीच आहे. प्रशासकीय स्तरावरील गोष्टींमध्ये असणारी सुसूत्रता आणि पारदर्शकता नक्कीच प्रशंसनीय आहे. पायाभूत सोयीसुविधांनी परिपूर्ण असल्यामुळे या देशात राहणे ही निश्चितच एक समाधानकारक बाब ठरते. अर्थातच, इथली लोकसंख्या भारताच्या तुलनेत बर्‍यापैकी कमी असल्याने ते सहजसाध्य होणारे आहे. तुलनेनं कमी असणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण इथलं जीवनमान अधिक सुकर करतं. नैसर्गिक साधनसंपत्तीचं जतन आणि संवर्धनाबाबत अधिक जागरूक असणारे लोक आणि प्रशासन ह्यांचादेखील आवर्जून उल्लेख करावा लागेल. इथले नॅशनल पार्क्स आणि स्टेट पार्क्स यांची संख्या जणू त्याचीच प्रचिती देतात. मुळातच, निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या या देशात प्रेक्षणीय स्थळांची यादी न संपणारी आहे..!

पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसंच प्रत्येक गोष्टीला देखील एक चांगली आणि दुसरी न रुचणारी बाजू असते. इथे राहाताना अशा अनेक न रुचणार्‍या गोष्टी आपल्या भोवती फेर धरून असतात. आपल्या पालकांची आणि भारतातील आप्तेष्ट तसेच मित्रपरिवाराची वर्षातून होणारी एखाद-दुसरी भेट, त्यांच्यासमवेत दरवर्षी साजरे न करता येणारे सण-समारंभ, इथे सहजासहजी न मिळणारे पारंपरिक खाद्यपदार्थ आणि पेहराव. न परवडणारे घरगुती किंवा इतर कामांसाठीचे मदतनीस. तुलनेनं खूपच मर्यादित असणारं ‘सोशल-लाईफ’आणि त्यामुळे जाणवत राहणारं एकाकीपण. अशा अनेक गोष्टींबरोबर जुळवून घेत आपल्याला पुढे जावं लागतं. अर्थात, प्रत्येक व्यक्तीचा या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. पण, आयुष्यात काही मिळवायचं असेल तर काही गमवावं ही लागतं, हे इथं तंतोतंत लागू होतं...!

शिक्षण आणि गुणवत्तेनुसार डॉलरमध्ये कमावण्याची संधी देणाऱ्या अमेरिकेत नक्कीच ते सगळं आहे, जे सुखवस्तू जीवन जगण्यासाठी आवश्यक असतं. ज्याला लोक,”Living American Dream”असंही म्हणतात. पण,सुख म्हणजे नक्की काय असतं?....हे मात्र ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं..!

Comments

  1. Shubhada, nice blog. It definitely took me 25 yrs back when I came to USA

    ReplyDelete
  2. शुभदा खूप छान. आपल्या प्रत्येकाला साधारणपणे हेच अनुभव आले आहेत पण तू ते फार सुन्दर शब्दबद्ध केले आहेत. अशीच लिहीत रहा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog