पौराणिक कथा (भाग ४) - बुध आणि इला

अवंती करंदीकर

मैत्रच्या जानेवारी २०२१ च्या अंकामध्ये पौराणिक कथा हे सदर आपण चालू केले आणि त्या सदरांतर्गत आपण पौराणिक कथा क्रमश: प्रकशित करत आहोत. त्यातील पहिले तीन लेख अनुक्रमे पुढील दुव्यांवर वाचता येतील.
पौराणिक कथा भाग १ - पुराणांची माहिती
पौराणिक कथा भाग २ - अष्टवसूंची कथा.
पौराणिक कथा भाग ३ - सूर्य आणि संज्ञा.
त्याच सदरामधील ह्या तिसऱ्या भागामध्ये आपण सूर्य आणि संज्ञा ह्यांची कथा ऐकू.

बुध आणि इलेच्या कथेमध्ये पुराणांनुसार तफावती आढळतात. पुढील कथा ही मुख्यत्वे लिंग पुराणातील संदर्भ, भागवत व विष्णूपुराणातील संदर्भ, अमर चित्रकथा, महाभारतातील काही कथा व माझ्या आजीने लहानपणी सांगितलेल्या कथांचा आधार घेऊन लिहिलेली आहे, तरी ह्यात त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपण मागच्या कथेमध्ये वाचले की सूर्य आणि संज्ञेचा पहिला पुत्र म्हणजे वैवस्वत मनू. ह्या वैवस्वत मनूचा विवाह श्रद्धेशी होतो. अनेक पुराणांमध्ये श्रद्धा कोणाची मुलगी होती ह्याबद्दल तफावत आढळते. भागवतपुराण आणि विष्णूपुराणांमधील संदर्भांनुसार श्रद्धा ही ब्रह्मदेवाची मुलगी. अनेक दिवस श्रद्धा आणि वैवस्वत मनू ह्यांना मूल होत नाही. आपला वंश चालू राहावा या हेतूने वैवस्वत मनू वसिष्ठ ऋषींची मदत मागतो. वसिष्ठ ऋषी, मित्र आणि वरुण ह्यांच्या मदतीने यज्ञ करतात आणि त्यातून वैवस्वत मनूला मुलगी होते. तिचे नाव इला. परंतु वैवस्वत मनूला आपला वंश चालविण्यासाठी मुलगा हवा असतो म्हणून तो वसिष्ठ ऋषींना मुलीचे लिंग बदलून मुलगा करण्याची विनंती करतो. त्याच्या विनंतीला मान देऊन वसिष्ठ ऋषी आपल्या योगसामर्थ्याने इलाला मुलगा करतात. त्याचे नाव सुद्युम्न. सुद्युम्ननंतर वैवस्वत मनूला अजून ९ मुले होतात, त्यापैकी इश्वाकू हा सूर्यवंशाचा संस्थापक म्हणून सगळ्यांना माहीत आहेच.

सुद्युम्न पुढे बाह्लिक राज्याचा राजा होतो आणि सुखाने राज्य करू लागतो. एकदा मृगयेसाठी सुद्युम्न एका हरिणाचा पाठलाग करत असताना चुकून सुकर्मा (दुसरे नाव श्रवण) वृक्षवाटिकेमध्ये शिरतो. लिंग पुराणातील संदर्भानुसार शंकराने पार्वतीसोबत एकांत मिळावा ह्यासाठी ही वृक्षवाटिका बनवलेली असते व त्यांचा एकांत भंग पावू नये म्हणून शापित केलेली असते. शंकराचा अपवाद वगळता जर इतर पुरुषाने त्यात प्रवेश केला तर त्याचे स्त्रीमध्ये रूपांतर होईल असा हा शाप असतो. त्यामुळे सुद्युम्न, त्याच्याबरोबर आलेले सर्व पुरुष सैनिक आणि नर घोड्यांचे स्त्रीरूपात परिवर्तन होते.

ह्या परिवर्तनामुळे सुद्युम्न आपले पूर्वायुष्य विसरतो आणि आपले नाव इला ठेवतो. इला रानोरानी भटकू लागते. ह्याच दरम्यान इला आणि बुध (चंद्राचा मुलगा) ह्यांची भेट होते आणि ते प्रेमात पडून लग्न करतात. त्यांना पुढे मुलगा होतो ज्याचे नाव पुरुरवा. पुरुरवा हा अशाप्रकारे चंद्रवंशाचा संस्थापक म्हणून ओळखला जातो.

इकडे सुद्युम्न परतला नाही म्हणून शोध चालू होतो आणि वसिष्ठ ऋषींना पाचारण केले जाते. वसिष्ठ ऋषी आपल्या योगसामर्थ्याने झालेला प्रकार ओळखतात आणि शंकराकडे याचना करतात. तेव्हा शंकर म्हणतात, “माझा शाप खोटा होणार नाही. पण मी उ:शाप देतो की इला प्रत्येक महिन्याला स्वतःचे लिंग बदलून स्त्री आणि पुरुष म्हणून वावरू शकते. मात्र तिला स्त्री असताना पुरुषाचे आणि पुरुष असताना स्त्रीचे आयुष्य मात्र तिच्या/त्याच्या लक्षात राहणार नाही.“

ह्यावर आनंदित होऊन वसिष्ठ ऋषी बुधाकडे जाऊन घडलेला सर्व वृत्तांत सांगतात. बुधाला इलेची दया येते आणि तो अतिशय आनंदाने तिला एक महिना आपली पत्नी तर एक महिना जेव्हा ती इलेची सुद्युम्न होते तेव्हा आपला शिष्य मानतो. सुद्युम्न पुढे पुरुरव्यासमवेत स्वदेशी परततो आणि परत लग्न करतो. त्याला उत्कल, गया, विनिताश्व (दुसरे नाव हरिताश्व) अशी तीन मुले होतात. नित्यक्रमाने महिना संपत आला की सुद्युम्न स्वतःला खोलीत बंद करत असे आणि इला होऊन बुधाबरोबर स्त्रीचे आयुष्य जगत असे. ह्या अशा दर महिन्याच्या बदलामुळे राज्यकारभारावर ताण पडू लागतो. ते पाहून सुद्युम्न शेवटी आपल्या चार मुलांना चार प्रांत देऊन वानप्रस्थाश्रमी प्रयाण करतो. काही पुराणांमध्ये ह्या संदर्भातही तफावत आढळते. काही पुराणे पुरुरव्याकडे सर्व राज्यकारभार सोपवला असे सांगतात तर काही पुराणे चार मुलांना चार प्रांत दिले असे सांगतात. काही पुराणांमध्ये सुद्युम्नाच्या शापमुक्ततेबद्दल संदर्भ दिले आहेत. सुद्युम्नला, सुद्युम्न आणि इला अशी दोन आयुष्ये जगण्याचा कंटाळा येतो आणि तो शंकराची याचना करतो. त्यावर शंकराला हसू येते मात्र पार्वतीला त्याची खूप दया येते आणि ती त्याला त्या शापातून मुक्त करते असेही संदर्भ आढळतात. शापातून पूर्णपणे मुक्त झालेला सुद्युम्न परत राज्यकारभाराला लागतो आणि बुध स्वर्गात परततो असे संदर्भही सापडतात.

तर मंडळी अशी ही बुध आणि इलेची कथा. तुम्हाला ती आवडली असेल. अशी आशा आहे. अशाच आणखी कथा पुढील भागांमधून पाहू.

Comments

Popular posts from this blog