मणिपूर

ओंकार नातू

एप्रिल २०२३ पासून मणिपूर हा भारतातील उत्तरपूर्व (नॉर्थईस्ट) भाग सगळ्यांच्या चर्चेत आहे. अर्थात चर्चा करणारे सगळे तिकडे जाऊन आलेले नाहीत. काहींना तर एप्रिलमध्येच कळले तो भाग नकाशामध्ये कुठे आहे ते.

प्रथम आपण तिकडचा भूगोल आणि लोकसंख्या (डेमोग्राफी) जाणून घेऊ. मणिपूरमध्ये तीन मुख्य जमाती राहतात- मैतेई, कुकी, आणि नागा. त्यातील मैतेईंची लोकसंख्या ५३%, कुकींची २४% आणि नागांची १६% आहे. मैतेई लोक दरी क्षेत्रात राहतात तर कुकी आणी नागा डोंगर आणि जंगल क्षेत्रात राहतात. ह्या जमातींदरम्यान गेल्या २० वर्षांहून अधिक काळ आरक्षणाबाबत वाद चालू आहेत. मैतेई लोक दरी क्षेत्रामध्ये राहत असल्यामुळे त्यांना अर्थातच पिके घेता येतात, शेती करता येते. त्यांना डोंगर भागात जागा घेता येईल असा आदेश न्यायालयाने जाहीर केला आहे. डोंगर-जंगलामध्ये राहणाऱ्या समुदायाचा त्याला विरोध आहे. तोच विरोध आपल्याला पार हिंसक वाटेला घेऊन गेलेला दिसतो. जर आरक्षण रद्द झाले तर त्या समुदायाला राहायला घरे उरणार नाहीत आणि त्यांना स्थलांतरित व्हावे लागेल.

आंदोलन किंवा विरोध शांततेने व्हावा आणि चर्चा करून मार्ग काढावा हा उपाय सर्वात सोपा असला तरी तो अंमलात आणायला अवघड असतो. मणिपूरचे आंदोलन एका क्षणात हिंसक झाले. एका समुदायाविरुद्ध दुसरा समुदाय त्यांची दले, लष्करे तयार करू लागला. सध्या त्यांचे लक्ष्य एकच आहे की आपले गाव वाचवायचे, पलीकडच्या समुदायाचे गाव जाळायचे, सगळ्यांना मारून टाकायचे आणि पूर्ण भागावर कब्जा करायचा. त्यासाठी प्रत्येक गावातले युवक, युवती हत्यारे घेऊन उभे आहेत.

इथे खूप वर्षांपासून अस्थिरता आहे. सरकारने हवे तेवढे लक्ष दिलेले नाही. म्यानमारला लागून असलेल्या सीमेमुळे हा भाग महत्त्वाचा आहे. ही गोष्ट साधारण २०१४ पासून सरकारला माहिती आहे. तिथे विकास व्हायला लागला आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल, पण प्रगती नक्कीच होत आहे असे मला वाटते. अजूनही सरकारी नोकऱ्या उपलब्ध नाहीत. युवक/युवती जर थोडेफार शिकले तर ते शहरांत जातात, पण गाव मागेच राहते. जे राहतात त्यातले अनेक व्यसनी होतात आणि शस्त्रे घेऊन वाईट मार्गाला लागतात. डोंगरी भाग असल्याने अफूचे पीक पुष्कळ येते. राज्यसभेच्या २ जागा आहेत. त्या जागांवर मैतेईच निवडून येतात. एकूणच ह्या परिस्थितीसाठी अनेक कारणे आहेत.

पूर्ण जग/देश मणिपूरबद्दल बोलू लागला ते एका चित्रफितीमुळे (विडिओमुळे), सोशल मीडियामुळे. मग विडिओ कधीचा, कोण लोक होते, गृहमंत्र्याची भेट, वगैरे चर्चा सुरू झाल्या. या बाबतीत बातम्या कमी आणि अफवाच जास्त पसरू लागल्या. कोणी म्हणाले की सरकारने माफिया, अफू पीक असे बेकायदा धंदे बंद केले म्हणून असे चालू आहे, तर कोणी म्हणाले की सरकार काहीच करत नाही किंवा, काहींच्या मते केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असूनही विकृत राजकारण चालू आहे. सध्या काय खरे आणि काय खोटे हे तिथे जाऊन बघितल्याशिवाय कळणार नाही आणि तिथे जाणे आत्ता तरी शक्य नाही.

मी ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशन (JPF) आणि ज्ञानप्रबोधिनी (JP) संस्थांसाठी काम करतो. त्या भागात ज्ञानप्रबोधिनीचे काम अनेक वर्षांपासून चालू आहे. तिथे ३ शाळाही चालू आहेत. संस्थेचा मूळ उद्देश असा आहे की शिक्षण चांगले मिळाले की गाव,शहर, देश प्रगत होतो. त्यात राष्ट्रीय एकात्मता हाही एक संदर्भित (relevant) मुद्दा आहे. भारतातला ज्ञानप्रबोधिनीमधला एक दादा मणिपूर मधून १० मुले ज्ञानप्रबोधिनीमध्ये घेऊन आला. ही मुले आणताना प्रत्यक्ष घडलेल्या घटना त्याने सांगितल्या. त्यामुळे खरी परिस्थिती समजली. मुले इयत्ता ५ वी मधली आहेत. त्यांना चांगले शिक्षण देणे, राष्ट्रीय एकात्मता शिकवणे आणि भारताचा चांगला नागरिक घडवणे हा त्यामागचा हेतू आहे.

मुख्य म्हणजे एकात्मता भारतात सगळीकडे महत्त्वाची आहे. भारतात पंजाब, मणिपूर, अरुणाचल, तामिळनाडू, काश्मीर असे अशांतता असलेले प्रदेश आहेत. आपली विविधतेमध्ये एकता (unity in diversity) जगात प्रसिद्ध आहे. भारतात अनेक धर्म आहेत. सर्व भारतीय म्हणून राहण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. कुठलाच धर्म परिपूर्ण नाही. हिंदू धर्मातही जातपात आहेच. काही दिवसांपूर्वी कळाले की हिंदू धर्मात ३००० जाती आहेत. धर्म, जातपात करत बसलो तर असेच चित्र भारतभर दिसेल, जिथे अस्थिरता असेल, तिथे मतपेटीचे राजकारण केले जाईल, जो जिंकेल तो वाचेल आणि आपण ३००+वर्षे मागे जाऊ. मुद्दा हा आहे की, एकत्र राहण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता गरजेची आहे. हे जाणण्यासाठी शालेय जीवनापासून सुरुवात झाली पाहिजे. चांगले शिक्षणदेखील खूप महत्त्वाचे आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे तंत्रज्ञानाइतकेच महत्त्वाचे आहे.

सगळे जग भारतात यायला बघते आहे. आत्ता जर आपण एकत्र आलो नाही तर आलेली संधी गमावली असे होईल. ह्या सगळ्या आपल्याच लोकांना आपण भारतीय आहोत ही जाणीव करून द्यायला हवी. त्यांची मने जोडून घ्यायला हवीत. माझी संस्था -JPF/JP- अशा सर्व ठिकाणी अभ्यास दौरे काढणे, शाळा उभ्या करणे अशी महत्त्वाची कामे करते. तिथून आलेली दाही मुले एकदम हुशार आहेत. त्यांनी मराठीत अभंग म्हणून दाखवत अमेरिकेतील एका पाहुण्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांची फुटबॉलची (soccer) टीम सोलापूरमध्ये काही सामने जिंकली. त्यांना संगीताचीही आवड आहे. सध्या भाषेच्या मर्यादेमुळे ते सोलापूरला सेमी-इंग्लिश शाळेत शिकत आहेत. शाळेच्या तासांनंतर ते JP सोलापूरमध्ये क्रीडा, संगीत आणि राष्ट्रीय एकात्मतेबद्दल माहिती मिळवतात. आपण भारत दौऱ्यावर गेलात तर त्यांना नक्की भेटा. सध्या गुरु पौर्णिमेपासून आम्ही ‘LEARN INDIA’ अभियान सुरु केले आहे. त्यात आम्ही ह्या १० मुलांना शिक्षण, राहणे इत्यादिसाठी मदत करत आहोत. तुमची इच्छा असल्यास स्वयंसेवक म्हणून/आर्थिक देणगी देऊन तुम्हीही मदत करू शकता.

Comments

Popular posts from this blog