अग्निकंकण

वरदा वैद्य

१४ ऑक्टोबर २०२३ ला होणारं कंकणाकृती सूर्यग्रहण अमेरिकेतून दिसणार आहे ह्याचा सुगावा आम्हाला लागताच ते बघायला जाण्याचं आम्ही नक्की केलं.

कंकणाकृती सूर्यग्रहण तसं पाहता फार दुर्मिळ नसलं आणि दर वर्षा दोन वर्षातून एकदा तरी ते घडत असलं तरी ते आपल्या आसपास, आपल्याला सहज जाता येईल अशा ठिकाणांहून दिसायला हवं. अमेरिकेतून दिसू शकेल असं पुढचं कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे जून २०३९ मध्ये. तेव्हाचं कोणी पाहिलं आहे? त्यामुळे आत्ता संधी चालून आली आहे तर ती न चुकवणं क्रमप्राप्तच होतं. हे सूर्यग्रहण अमेरिकेच्या वायव्य (उत्तर-पश्चिम), मध्य आणि आणि दक्षिण भागांतून दिसणार होतं (खाली नकाशा पाहा). आम्ही ते पाहण्यासाठी टेक्ससमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आमचे काही नातेवाईक तिथे असल्यामुळे ग्रहणाच्या निमित्ताने त्यांची भेटही शक्य होणार होती.

अमावास्येला सूर्य आणि पृथ्वीदरम्यान एका रेषेत चंद्र आला की सूर्यग्रहण होतं. काही वेळा चंद्र सूर्याला अर्धवट झाकतो, ज्याला आपण खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतो, तर काही वेळा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होतं. आकाशात आपल्याला सूर्य आणि चंद्राचा आकार साधारण सारखाच दिसतो. त्यामुळेच खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्याला पूर्ण झाकू शकतो. चंद्र पृथ्वीभोवती अंडाकृती किंवा लंबवर्तुळाकार (Oval) कक्षेमध्ये फिरतो. त्यामुळे चंद्र काही वेळा पृथ्वीपासून लांब तर काही वेळा जवळ असतो. चंद्र पृथ्वीपासून लांब असला की त्याचा आकार सूर्यापेक्षा थोडा कमी असतो. अशावेळी सूर्य-चंद्र-पृथ्वी एका रेषेत आले की चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही आणि चंद्रामुळे सूर्याचा मध्यभाग झाकला जाऊन चंद्राभोवती सूर्याचं कंकण दिसतं. म्हणूनच आपण त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतो.

ग्रहणाचा दिवस उजाडला तेव्हा पहाटेच आम्ही डॅलसहून सॅन अँटोनियोला कारने प्रयाण केलं. पाच तासांचा तो प्रवास पहाटे पाचला सुरू झाला. ग्रहण लागायला स्थानिक वेळेनुसार १० वाजून ४ मिनिटांनी सुरुवात होणार होती. कंकण स्थिती येईपर्यंत पावणेअकरा वाजून जाणार होते. पहाटे आकाश निरभ्र होतं. सॅन अंटोनिओच्या दिशेने जाऊ लागलो तसतसे क्षितिजावर ढग दिसायला लागले. ग्रहणाच्या वेळी ढग नसणं फार महत्त्वाचं होतं. दहा वाजेपर्यंत सॅन अंटोनिओत पोहोचलो तेव्हा आकाश चांगल्या दाट ढगांनी झाकलेलं होतं. आमचा विरस झाला. ज्यासाठी केला होता अट्टाहास तेच बघायला मिळेल की नाही शंका होती.

सॅन अंटोनिओतून कुठूनही ग्रहण बघता येणं शक्य होतं. आम्ही एका होम डीपोच्या पार्किंगमध्ये थांबलो होतो. आमचे एक नातेवाईक कुटुंबही डॅलसहून आलं होतं. आमच्या पाठोपाठ पंधरा-वीस मिनिटांत तेही पोहोचले. दहा वाजून चार मिनिटांनी चंद्राने सूर्य ओलांडायला सुरुवात केली. सुदैवाने वारा सुटला होता आणि ढगांना वाहून नेत होता. अधूनमधून ढगांआडून सूर्य डोकावला की आम्ही लगेच ग्रहणाचे चष्मे लावून त्याला पाहात होतो. खंडग्रास ग्रहणाचा कालावधी मोठा होता. दरम्यान वाऱ्याने ढगांना पळवून लावावं अशी इच्छा मनोमनी करत आम्ही संधी मिळताच सूर्यदर्शन करत होतो.

वाऱ्याने ढगांना वेळेत पळवून लावले आणि कंकणाकृती ग्रहणाची वेळ जवळ येईपर्यंत ढग पांगले होते. चंद्राने झाकला गेलेला सूर्य आता नीट दिसत होता. चंद्राने हळू हळू सूर्याची ज्योत कमी करत नेल्यासारखा सूर्यप्रकाश कमी कमी होत चालला होता. आमच्या आजूबाजूला काही लोक कुतूहलाने आमच्या ग्रहण चष्म्यांकडे बघत होते. आम्ही त्यांनाही चष्मे दिले. अनेक लोकांना मात्र आकाशातल्या ह्या नाट्याची कल्पनाही नव्हती किंवा असली तरी त्यासाठी थांबून ते बघत बसण्यासाठी त्यांना वेळ नव्हता. अनेकजण त्यांच्या रोजच्या व्यवहारात व्यग्र होते. होम डीपोत आतबाहेर करताना ते कोणत्या गोष्टीला मुकताहेत त्याची त्या बिचाऱ्यांना कल्पनाही नव्हती.

सूर्याच्या वरच्या बाजूने चंद्राने सूर्याला झाकायला सुरुवात केली त्याला आता काही मिनिटं लोटली होती. आता सूर्याची अगदी बारीक कोर आकाशात दिसत होती. काही मिनिटांतच चंद्राने सूर्याचा मध्यभाग झाकला आणि चंद्राभोवती सूर्याचं कंकण झळकू लागलं. ही कंकणाकृती स्थिती साधारण तीन मिनिटांपर्यंत राहिली. हे सूर्यकंकण बघताना आमच्या डोळ्यांचं पारणं फिटत होतं. हे अलौकिक दृश्य पाहायला मिळाल्याचा आम्हाला फार फार आनंद झाला होता. मला आनंदाने हसू येत होतं, भरून येत होतं. ह्या आधी मी काही खंडग्रास सूर्यग्रहणं पाहिली आहेत. १९९५ साली भारतात मी खग्रास सूर्यग्रहण पाहायला खगोल मंडळाच्या चमूसोबत उत्तर प्रदेशात हमीरपूरला गेले होते. तिथे चंद्राने पूर्णपणे झाकलेला सूर्य बघताना, त्यानंतरची ‘हिऱ्याची अंगठी’ बघताना माझी जशी भारावलेली अवस्था झाली होती तशीच ती हे कंकणाकृती सूर्यग्रहण बघताना झाली. शब्दश: ‘जगावेगळा’ अनुभव! केवळ अलौकिक आणि अविस्मरणीय!

हळूहळू चंद्र पुढे सरकत गेला आणि पुन्हा खंडग्रास सूर्यग्रहण दिसू लागले. मग मात्र आम्ही पोटोबा करायला रवाना झालो ते ८ एप्रिल २०२४ला होणारं आणि अमेरिकेतून दिसू शकणारं खग्रास सूर्यग्रहण पाहायला जमवता येईल का ह्याचा विचार करतच. ८ एप्रिल २०२४ला होणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणाचा मार्गनकाशा वरच्या चित्रात आहे. खग्रास सूर्यग्रहण एप्रिलमध्ये अमेरिकेत कुठून बघता येईल ते ह्या नकाशात पाहायला मिळेल. ह्या खगोलीय घटना आपल्याला याची देहि याची डोळां पाहायला मिळाव्यात ह्यासारखे दुसरे भाग्य ते कोणते!

Comments

  1. खूप।सुंदर वर्णन लिहिलं आहे, खूप पूर्वी हा योग सुधाकर भालेराव सर आणि बाबांच्या सोबत एन्जॉय केला आहे

    ReplyDelete
  2. सुंदर!! अतिशय समग्र आणि फारसं भौगोलिक ज्ञान/कुतूहल नसलेल्यांना पण समजेल असं लिहिलंयस. 👏👏👏👏👏.
    छान !! कोणतही ग्रहण बघणं ही खूपच अलौकिक घटना आहे. मी पण इथून दिसणारी सगळी ग्रहणं बघतेच. अगदी पुन्हा पुन्हा...👌🏻👌🏻👌🏻😀

    ReplyDelete
  3. एक नंबर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog