पौराणिक कथा (भाग ३) : सूर्य आणि संज्ञा

अवंती करंदीकर

मैत्रच्या जानेवारी २०२१ च्या अंकामध्ये पौराणिक कथा हे सदर आपण चालू केले आणि त्या सदरांतर्गत आपण पौराणिक कथा क्रमश: प्रकशित करत आहोत. त्यातील पहिले दोन लेख अनुक्रमे पुढील दुव्यांवर वाचता येतील.
“पौराणिक कथा भाग १ - पुराणांची माहिती”
पौराणिक कथा भाग २ - अष्टवसूंची कथा.
त्याच सदरामधील ह्या तिसऱ्या भागामध्ये आपण सूर्य आणि संज्ञा ह्यांची कथा ऐकू.

दररोज ज्याच्या उगवण्यामुळे आपल्याला प्रकाश मिळतो आणि ज्याच्या मावळण्याने अंधार होतो तो सूर्य. पौराणिक कथांनुसार सूर्य, अरुण ह्या त्याच्या सारथ्याने चालवलेल्या रथातून ‘उषा’ आणि ‘प्रत्युषेला’ म्हणजेच सकाळ आणि रात्रीला घेऊन येतो अशी धारणा आहे. पुराणातील संदर्भांनुसार सूर्य हा कश्यप आणि अदितीचा पुत्र. सूर्याला मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पूषन्, हिरण्यगर्भ, मरिच, आदित्य, सवितृ, अर्क व भास्कर ह्या नावांनीही ओळखले जाते. तुम्ही सूर्य नमस्कार घालत असाल तर सूर्याची ही नावे तुम्हाला परिचित असतीलच.

मुद्गल पुराणातील संदर्भानुसार विश्वकर्मा अनेक वर्षे तप करून योगमायेला (म्हणजेच आदिमायेला) प्रसन्न करून तू माझी सुता (मुलगी) हो असे वरदान मागतो. त्या वरदानामुळे विश्वकर्म्याला पुढे मुलगी होते, जिचे नाव संज्ञा. सूर्याचा विवाह ह्याच संज्ञेशी होतो. सूर्य आणि संज्ञेचे एकमेकांवर निस्सीम प्रेम असते व त्यांचा संसार अतिशय प्रेमाने आणि सुखाने चालू होतो. सूर्य आणि संज्ञेला तीन मुले होतात. वैवस्वत मनू ज्येष्ठ, तर यम (म्हणजेच धर्म, नरकाचा अधिपती यम) दुसरा व तिसरी मुलगी यमुना (म्हणजेच यमुना नदी). कालांतराने सूर्याच्या प्रखर उष्णेतेमुळे, तेजामुळे आणि ऊर्जेमुळे संज्ञा हळूहळू अशक्त आणि निस्तेज होऊ लागते. आपला पती रागावला तर ह्या भीतीने ती त्याला ही गोष्ट सांगत नाही.

शेवटी ह्या तेजाने अशक्त झालेली संज्ञा आपल्या प्रतिमेची म्हणजे छायेची निर्मिती करते व तिला आपल्या मुलांचे संगोपन करावयास सांगून, स्वतः आपल्या वडिलांकडे, म्हणजे विश्वकर्म्याकडे जाऊन राहाते. विश्वकर्मा तिला विनंती करतो की तिने सूर्याकडे परत जाऊन त्याला परिस्थितीची कल्पना द्यावी, म्हणजे काही मार्ग काढता येईल. संज्ञेला मात्र सूर्य रागावला तर पृथ्वीवर हाहाकार होण्याच्या भीतीने तसे करायचे धाडस होत नाही. विश्वकर्मा आपला आग्रह काही केल्या सोडत नाही. ह्या परिस्थितीला कंटाळून ती एका घोडीचे रूप घेऊन वनामध्ये गणपतीची आराधना करण्यासाठी निघून जाते, पण तिचे सूर्याबद्दलचे प्रेम मात्र तसूभरही कमी होत नाही. यथावकाश गणपती प्रसन्न होऊन संज्ञेला वर देतो की सूर्याचे तेज तिला सहन करता येण्याइतके कमी होईल आणि ती आनंदाने सूर्याशी परत संसार करू शकेल.

इकडे छाया जणू काही घडलेच नाही असे दाखवत सूर्याची पत्नी म्हणून वावरू लागते. अनभिज्ञ असलेला सूर्यही छायेलाच आपली पत्नी समजतो. यथावकाश छाया तीन मुलांना जन्म देते. सावर्णि मनू ज्येष्ठ, दुसरा शनी (म्हणजे शनी ग्रह) आणि तिसरी कन्या तापी (म्हणजे तापी नदी). छाया आपल्या तीन मुलांचे संगोपन करत असताना संज्ञेच्या तीन मुलांचा मात्र छळ करते. वैवस्वत मनू तो छळ सहन करतो, पण यम मात्र ह्या अन्यायाचा विरोध करू लागतो. एकदा ह्या त्रासाचा अतिरेक होऊन यम छायेला आपल्या पायाने आघात करून विरोध करू पाहातो, तेव्हा त्याचा हा क्रोध पाहून ती त्याला शाप देते की तुझा पाय गळून पृथ्वीवर पडेल. यम त्याक्षणी आपला क्रोध आवरून सूर्याला जाऊन सगळा वृत्तांत सांगतो. हा सगळा वृत्तांत ऐकल्यावर सूर्य विस्मित होऊन विचारांत पडतो की कुठली आई स्वतःच्याच मुलाशी असे वागेल? तेव्हा तो आपल्या योगसामर्थ्याने ओळखतो की ही आपली पत्नी संज्ञा नसून तिने निर्माण केलेली छाया आहे. सूर्य यमाला शांत करून त्याला पंचाक्षरी मंत्र देतो. छायाने दिलेला शाप हा फक्त गजाननाच्या साधनेनेच निष्फळ होणार असल्याने “तू नैमिषारण्यात जाऊन गणपतीची आराधना कर, तुला निश्चितच चांगले फळ मिळेल,” असे सांगतो.

नंतर क्रोधित सूर्य छायेपाशी जाऊन संज्ञा कुठे आहे, सत्य सांग असा जाब विचारतो. तेव्हा ती घाबरून झालेला सगळा प्रकार सांगून, संज्ञा विश्वकर्म्याकडे आहे असे सांगते. त्याबरोबर सूर्य संज्ञेला विश्वकर्म्याकडून आणण्यास जातो. सूर्याच्या ऊर्जेने आणि तेजाने संज्ञा कशी अशक्त, असहाय्य व शुष्क झाली होती व ती त्याच्याकडे नसून ती गुप्त रूपाने कुठे तरी राहात असावी असे विश्वकर्मा सूर्याला सांगतो. सूर्य विश्वकर्म्याला ह्यावर उपाय विचारतो. त्यावर विश्वकर्मा म्हणतो, “हे आदित्या, तू सौम्य हो, म्हणजे संज्ञा तुझ्या तेजाला सहन करू शकेल.” हे ऐकून सूर्य विश्वकर्म्यास सांगतो की “तुम्हीच माझे तेज आपल्या सौम्ययंत्रात घालून, माझी ऊर्जा कापून माझे तेज कमी करावे.” त्याच्या विनंतीला मान देऊन विश्वकर्मा सूर्याचे तेज कमी करतो.

नंतर संज्ञेचा शोध घेत असताना सूर्य एक वनात तिला घोडीच्या रूपामध्ये पाहतो. तिला बघितल्यावर हर्षित होऊन तोही घोड्याचे रूप घेऊन तिच्याशी संग करून आपले वीर्य तिच्या उदरात आदराने अर्पित करतो, परंतु संज्ञा सूर्याशी एकनिष्ठ असल्यामुळे ती चुकून त्याला परपुरुष समजून डावलते व त्याचे वीर्य आपल्या श्वासावाटे परत बाहेर टाकते. त्याचा धिक्कार करत ती गणपतीचा धावा करू लागते. संज्ञेची आपल्याबद्दलची दृढनिष्ठा पाहून सूर्याचे तिच्याबद्दलचे प्रेम आणखीच वाढते आणि तो आपले मूळ रूप तिच्यापुढे प्रकट करतो. सूर्याला पाहून व त्याचे तेज कमी झालेले पाहून संज्ञा हर्षित होते आणि आनंदाने स्वगृही परतते.

संज्ञेने आपल्या श्वासामार्गे बाहेर टाकलेल्या सूर्याच्या वीर्यापासून दोन सुत (मुलगे) जन्माला येतात आणि तेच पुढे देववैद्य अश्विनीकुमार म्हणून प्रसिद्ध होतात.

इकडे यम गणपतीची सहस्र वर्षे आराधना करून गणपतीला प्रसन्न करतो. यमाच्या तपश्चर्येने श्री गजानन प्रसन्न होऊन त्याला वर देतात की तो धर्माने वागेल आणि नरकाचा अधिपती होईल. त्याचबरोबर, “सावत्र मातेचा शाप निष्फळ होणार नाही पण त्याची मर्यादा कमी होईल. तुझ्या पायाला इजा होऊन तो सडेल आणि तो सडलेला भागच फक्त पृथ्वीवर पडून तुझ्या यातना कमी होतील,” असा उ:शाप देऊन श्री गजानन अंतर्धान पावतात.

तर मंडळी अशी ही सूर्य आणि संज्ञेची कथा. तुम्हाला ती आवडली असेल अशी आशा आहे. अशाच आणखी अनेक कथा पुढील भागांमधून पाहू.

टीप :- हा लेख मुख्यत्वेकरून मुद्गल पुराणातील कथेवर व सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आजीने लहानपणी सांगितलेल्या कथेचा आधार घेऊन लिहिलेला आहे, तरी ह्यात त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय