गुढीपाडवा
पद्मा लोटके |
उन्हाळ्याची सुरुवात झाल्याची चाहूल लागते, तेव्हा कडुलिंबाच्या मोहोराचा सुवास हवेत दरवळत असतो. ह्याच दरम्यान म्हणजे मार्च/एप्रिल महिन्यांमध्ये गुढीपाडवा हा सण येतो. मराठी दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे मराठी नव वर्ष दिन.
ह्या दिवशी घराबाहेर गुढी उभारली जाते. ही गुढी म्हणजे एका काठीला काठापदराची साडी निऱ्या घालून बांधली जाते. त्यावर गडू ठेवला जातो. त्यावर कडुलिंबाचा ढगळा, झेंडूच्या फुलांचा हार, गाठीचा हार घातला जातो. ही झाली गुढी तयार. ही गुढी घराबाहेर किंवा सज्जामध्ये ठेवली जाते. त्यानंतर तिची पूजा केली जाते. गुढीच्या पूजेच्या वेळी लागणाऱ्या प्रसादामध्ये चिंच, गूळ, खोबरे, थोडा कडुलिंबाचा मोहोर आणि मीठ असे सर्व जिन्नस घातले जातात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा प्रसाद आरोग्यदायी असतो आणि खूपच चविष्ट लागतो. जेवणासाठी खास श्रीखंड पुरीचा बेत असतो.
गुढी पाडव्याची एक खास आठवण आहे माझ्याकडे. एका संध्याकाळी मी आणि माझी बहीण गप्पा मारत बसलो होतो. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. आम्ही विचार केला की ३१ डिसेंबरच्या रात्री सर्वजण जागून १२ वाजता नवीन वर्षाचे स्वागत करतात तसे गुढीपाडव्याच्या दिवशी कोणी करत नाही. तेव्हा आज आपण रात्री १२ वाजेपर्यंत जागायचे आणि १२ वाजता फटाके वाजवायचे. सगळ्या कॉलनीमध्ये आपण सर्वात पहिले फटाके वाजवणारे असलो पाहिजे. झालं, ठरलं तर मग. दिवाळीचे उरलेले फटाके काढून ठेवले. सगळे जण रोजच्यासारखे झोपी गेले.
मी आणि माझी बहीण आमच्या अभ्यासाच्या खोलीत काही वाचत १२ वाजण्याची वाट बघत बसलो. शेवटी १२ वाजले. फटाके म्हणजे चांगला सुतळी बॉम्ब घेऊन आम्ही बाहेर अंगणात आलो. प्रचंड शांतता होती आणि काळं कुत्रंही नव्हतं! आम्ही विचार केला की पटकन बॉम्ब फोडू आणि घरात जाऊ. वात पेटवली आणि कान बंद करून बाजूला झालो. धडाम आवाज झाला. त्या रात्रीच्या शांततेत तो आवाज जास्तच घुमला. पुढच्याच मिनिटाला वडील उठून बाहेर आले. “काय झालं? कसला आवाज झाला?” एका मागून एक प्रश्न आले. “आज मराठी नवं वर्ष सुरु झालं ना? कोणीच फटाके वाजवत नाही आजच्या दिवशी म्हणून आम्ही फटाके वाजवायचे ठरवले,”आम्ही म्हणालो. आधी घरात जाऊया असे म्हणून वडील आम्हाला घेऊन घरात आले. त्या नंतर त्यांनी आठवण करून दिली कि हिंदू धर्मानुसार नवीन दिवस हा सूर्योदयानंतर सुरु होतो. त्यामुळे नवीन वर्ष हे सूर्योदयानंतर सुरु होईल. इंग्लिश कॅलेंडरनुसार नवीन दिवस हा रात्री १२ वाजता सुरु होतो म्हणून ३१ डिसेंबरला १२ वाजेनंतर नंतर फटाके उडवतात.
अरेच्या, खरंच की! तरीच गुढी पाडव्याचा आदल्या रात्री १२ नंतर फटाके ऐकू नाही येत. मग आम्ही पण झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी छान श्रीखंड पुरी खाऊन गुढीपाडवा साजरा केला.
गुढीपाडवा चे प्रास्ताविक छानच केलेस आणि आठवण तर फारच धमाल आहे... असेच छान छान लेख आणि आठवणी आम्हाला वाचायला मिळोत.
ReplyDeleteमराठी नव वर्षाची माहिती देणारा लेख खुपच छान. गुडी उभारणे, नैवेद्य म्हणून गुळ खोबर, कडुलिंबाची फुले,चिंच ईत्यादी एकत्रित करुन
ReplyDeleteअसेच माहितीपूर्ण लेखन
तयार केलेला औषधीयुक्त प्रसाद. अतिशय सुंदर मंगलमय वातावरणात नव वर्षाचे स्वागत खुप छान रेखाटले आहे.
सोबत गुडीचा फोटो. संपूर्ण महाराष्ट्रीय वेशात
एक ग्रुहिणी अप्रतिम.
आपल्या बालपणीच्या आठवणीतून
भारतीय दिवसाची सुरुवात सूर्योदयापासून होते ही माहिती वाचकांपर्यंत पोहचविण्यात आपण पुर्ण यशस्वी झाला आहात. अभिनंदन.