मंगला मावशी

देवयानी नांद्रेकर-हाइनीस

काही भावना शब्दांत व्यक्त करणे अवघड असते. असेच काहीतरी १७ जुलै च्या सकाळी मला जाणवले. भारतातून त्या दिवशी मंगला मावशी गेल्याची बातमी आली, आणि गेली काही वर्षे डोळ्यांसमोर आली.

खरेतर आमची भेट आयुका (IUCAA ) आणि जयंत नारळीकर (JVN) यांच्यामुळे झाली पण हळुहळू ही ओळख एका सुंदरशा मैत्रीत रूपांतरित झाली. गेली अनेक वर्षे आमचे नियमित बोलणे होत होते. जेव्हा मी आणि सेबॅस्टियनने नवे घर घेतले तेव्हा त्यांना सांगितले होते आणि त्या घरातील पहिले पाहुणे JVN आणि मंगला मावशी होते. आमचे लग्न, मुलांचे जन्म आणि इतर अनेक महत्त्वाच्या टप्प्यांत मंगला मावशी सहभागी झाल्या. आईच्या ब्रेन अटॅकनंतर त्या नेहमी चौकशी करत. माझ्या भावाच्या लग्नानंतर त्यांनी सगळ्यांना अगत्याने घरी बोलावले होते आणि खास आईसाठी योग्य असे खाण्याचे पदार्थ केले होते.

माझ्या आणि सेबच्या आग्रहामुळे त्या आणि JVN आमच्याकडे राहायला आले, त्याला आता ९-१० वर्षे होऊन गेली. किती छान वाटले तेव्हा! सेबने केलेल्या सगळ्या फ्रेंच पाककृती त्यांनी आवडीने खाल्या. आमच्याबरोबर स्ट्रॉबेरीच्या शेतावर जाऊन त्या वेचल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सेबचे क्रेप आणि मंगल मावशीचे पॅनकेक यांच्यावर आम्ही मस्त ताव मारला. आम्ही त्यांना घेऊन बाल्टिमोर आणि वॉशिंग्टनमध्ये फिरायला गेलो होतो. एक दिवस घरी निवांत असताना त्या म्हणाल्या की आमच्या नवीन घरासाठी त्यांना आम्हाला काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे, त्यासाठी आपण बाहेर जाऊया. मंगला मावशीने तेव्हा तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे काहीतरी घेऊ (जे तुम्हाला उपयोगी असेल) असे म्हणत आम्हाला फर्निचरच्या दुकानात नेले आणि खास ४ खुर्च्या विकत घेतल्या. मला लिंबाच्या लोणच्याची एक खास रेसिपी शिकवली. मी त्या दोघांना जॉन्स हॉपकिन्समध्ये घेऊन गेले तेव्हा पाठीवर हात ठेवून ‘चांगले काम करत राहा’ असे आशीर्वाद मला दिले.

मंगला मावशी आणि सर दोघेही अतिशय व्यासंगी, पण त्या दोघांकडून मी काय शिकले तर नम्रता आणि समर्पण. फक्त जयंत नारळीकर यांची पत्नी नसून त्यांची स्वतःची गणितज्ञ म्हणून ओळख आहे आणि भरपूर काम आणि योगदान आहे. मंगला मावशीचे काम सगळ्यांना अवगत आहे. आजकाल आपण 'Women In science' बद्दल बोलतो, ऐकतो. पण ज्या काळात त्यांनी गणित विषयात शिक्षण घेतले आणि संशोधन केले, त्या काळात काही बोटांवर मोजण्याइतक्या स्त्रिया ह्या क्षेत्रात होत्या. गणित विषयात त्यांना महाविद्यालयात दोन वेळा सुवर्णपदक मिळाले होते. IUCAAसारखी संस्था उभारणे अर्थातच सोपे नव्हते. त्यांनी JVN आणि सहकाऱ्यांना अतिशय मोलाची साथ दिली. IUCAAचा त्या आधारस्तंभ होत्या. त्यांच्या कामाकडे बघून माझे काम किती क्षुल्लक आहे ह्याची जाणीव मला होते.

गेल्या काही वर्षांत त्या ‘सायंटिफिक थिंकिंग इन सोसायटी’वर माझ्याशी बोलत असत. काही वेळेस त्यांचे काही लेख किंवा विचार मला पाठवून, ‘हे कस वाटतंय जरा सांग मला’ म्हणत. प्रत्येक भारत भेटीत माझे त्यांच्याकडे जाणे होत असे. वर्ष-दीड वर्षापूर्वी त्यांनी मला कॅन्सरबद्दल सांगितले होते, त्यांचे कॅन्सरवरचे लेख आणि विडिओ मला पाठवले होते. गेल्या ऑगस्टमध्ये भेटले तेव्हा अजूनही ठणठणीत वाटत होत्या. पुढचे बेत आखत होत्या. JVN साठी कुणी योग्य मदतनीस मिळतो का पाहात होत्या, पुढेमागे गरज लागेल असे म्हणाल्या. मला थोडे कसेसेच वाटले पण त्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले. गेल्या काही महिन्यांत निरोप आणि फोन कमी झाले होते, निरोपांना त्यांचे उत्तर लगेच येत नव्हते. माहीत असूनही मन मानायला तयार होत नाही. मुलांना त्यांनी दिलेली पुस्तके आणि इतर भेटी कायम त्यांची आठवण करून देतात आणि देत राहतील. शतशः नमन !!

Comments

Popular posts from this blog

संपादकीय

आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे