भाषाविचार - आपण बोलतो तसं लिहितो?

वरदा वैद्य

फेब्रुवारी महिना संपत आला होता. फोनवर व्हॉट्सऍप विद्यापीठात डोकावले तर नेहमीप्रमाणे प्रत्येक समूहात ढकलनिरोपांची रांग लागलेली.

समूह कोणत्याही विषयाशी/निमित्ताशी संबंधित असो, त्यावर असंबद्ध विषयांवरचे निरोप ढकलणाऱ्यांची मांदियाळी असतेच. त्यात फेब्रुवारी संपत आलेला म्हणजे मराठी दिन नुकताच होऊन गेलेला. मराठी भाषेचं कौतुक करताना अनेकांच्या लेखण्या भरभरून ओसंडत होत्या. आपल्याकडे अभिनिवेशाने जयजयकार करणाऱ्यांची अजिबात कमतरता नाही. ज्यात त्यात अस्मिता पाहणारे, भावना दुखावून घेणारे, अगदी किडूकमिडूक गोष्टींचा अभिमान बाळगणारे, सत्यासत्यतेचा विचार न करता बेधडक ठोकून देणारे असे अनेक लोक विविध विषयांवर पोस्टी पाडत असतात आणि बाकीचे त्यावर विचार न करता त्या पोस्टी पुढे ढकलत राहतात. इतरांना शहाणे करून सोडण्याची स्पर्धा सकळजनांमध्ये लागलेली दिसते.

नाही, म्हणजे मराठीचा अभिमान मला आहेच. न ठेऊन जाते कुठे? दहावीपर्यंत इंग्रजीसकट सर्व विषय मराठी माध्यमातून शिकलेल्या मला मराठीचा अभिमान वाटला नाही तरच विशेष. बाकी भाषा फार येतच कुठे होत्या? अजूनही येत नाहीत. शाळेत असताना हिंदी अगदीच एखाद दोन वर्षं शिकले. संस्कृत त्यामानाने जास्त वर्षं शिकले, पण अर्थात तेही मराठीतून. इंग्रजी पाचवीपासून शिकणं सुरू झालं, पण ते आजतागायत कधी आवडलं नाही. गरज म्हणून आता ते आत्मसात केलंय, पण इंग्रजी साहित्यावर कोणी गप्पा झोडू लागलं तर मला पुलंच्या भाषेत इंग्रजीत गप्प बसावं लागतं. इंग्रजी साहित्यावर - जे मी कधी आवडीने वाचलं नाही, त्यात शिक्षण घेतलं नसल्याने नावडीने, नाईलाजाने का होईना पण वाचावं लागलं अशी परिस्थिती माझ्यावर कधी आली नाही - मी बापडी काय बोलणार? मराठीत कुजबूज तरी करता येईल अशी परिस्थिती आहे. जरा बरं लिहिण्याची गरज पडल्यास लिहू शकेन तर ते मराठीतच. असं असताना मराठीचा अभिमान न बाळगण्याची माझी शामत नाहीच.

तर ह्या अभिमानी ढकलनिरोपांच्या रांगेत एकाहून एक वरचढ निरोप डोळ्यांखालून घालत होते. ‘ळ’ असलेली एकमेव भाषा म्हणजे मराठी म्हणे. हो? तेलुगू, कानडी आणि तमिळ लोक व्यवस्थित ळ म्हणतात तो कसा म्हणे मग? मराठी सोपी का तर म्हणजे आपण बोलतो तसं लिहितो. हो? मी तर बोलते तसं लिहीत नाही ब्वा! नाहीतर मी ‘बोल्ते तस ल्हील’ नसतं का? आता ‘तस’ हा शब्द तुम्ही ‘तस्’ असा वाचला की ‘स’चा पूर्ण उच्चार करत वाचला? ‘तसं’ लिहिलं तर त्याचा उच्चार तुम्ही ‘तसम्’ करता का? अहो पण आपण बाराखडी शिकलो तेव्हा काय शिकलो? व्यंजनांमध्ये स्वर मिसळून अक्षर तयार होतं. स्+अ = स. मग आपण ‘तस’ हे ‘तस्’ असं का उच्चारतो? ‘तसं’चा उच्चार ‘तसम्’ का करत नाही? मग आपण बोलतो तसं लिहितो म्हणजे काय? अगदी हिंदी भाषकांएवढं प्रमाण नसलं तरी शेवटच्या अक्षराचा पूर्ण उच्चार न करण्याची सवय मराठी माणसांना असते, पण लिहिताना आपण ते शब्द पाय मोडून लिहीत नाही. आपण ‘पाय’ लिहितो, पण ‘पाय्’ म्हणतो. जोडाक्षर नसतानाही जोडाक्षर असल्याप्रमाणे उच्चार करतो - ‘नसल्याप्रमाणे’ लिहितो, पण ‘नस्ल्याप्रमाणे’ म्हणतो. हल्ली राजकारणी लोक ‘जन्तेला’ उद्देशून भाषण करतात, जनतेला नव्हे. गाण्याचे कार्यक्रम ऐकताना निवेदक ‘गीतकारा’चं नव्हे तर ‘गित्कारा’चं नाव सांगत चित्कारतो.

‘तू काय करत आहेस’ हे वाक्य लिहिताना ‘बोलीत’ लिहिण्याच्या नादात लोक ते ‘तू काय करते/करतो आहेस?, ’‘तू काय करतीयस/करतोयस?’, ‘तू काय करतीयेस/करतोयेस?’, ‘तू काय करत्येस/करतीस/करतोस?’ अश्या विविध प्रकारे लिहितात. त्यात अजिबात एकवाक्यता नसते, प्रमाण नसतं. बोलतो तसं लिहिण्याच्या नादात कसंही लिहिलं जातं. मूळ ‘तू काय करत आहेस’ हे वाक्य लिंगनिरपेक्ष आहे, पण त्याची सगळी बोली रूपं मात्र लिंगसापेक्ष आहेत.

तर माझा मुद्दा असा की आपण बोलतो तसं अजिबात लिहीत नाही. भारताबाहेर वाढणाऱ्या मुलांना मराठी शिकवताना मला नेहमी प्रश्न पडतो की ह्यांना लेखी/मूळ उच्चार शिकवावेत की बोली? डोके शिकवावं की डोकं? होते, झाले, असे शिकवावं की होतं, झालं, असं? त्याचा उच्चार मुलांनी होतम्, झालम्, असम् असा करू नये, ह्यासाठी कोणता तर्क सांगावा? हे असं टिंब देऊन का लिहितात?- ह्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं? लेखी आणि बोली भाषा वेगवेगळी का? आधी बोललं गेलं आणि मग लेखनपद्धती निर्माण झाली तरी लेखी-बोलीत तफावत का आहे - ह्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं?

म्हणजे, आपण बोलतो तसं लिहीत नाही की लिहितो तसं बोलत नाही? जुन्या काळातलं मराठी ऐकलं तर ‘असे नव्हे, बरे का श्याम,’ वगैरे तत्सम बोली लोकांच्या तोंडी दिसते. म्हणजे आपण पूर्वी तसं बोलत होतो. तसं बोलत होतो म्हणून तसं लिहीत होतो. आता बोलण्याची पद्धत बदलली, पण लेखनपद्धती पूर्वीचीच राहिली. पूर्वी कातरी, खातरी असे शब्द बोलले आणि लिहिले जात होते. आता आपण ते कात्री, खात्री असे बोलतो आणि तसेच लिहितोही. मग आता आपण बोलतो तसं लिहितो हा दावा करण्यासाठी ‘ल्हीण बद्लायला’ हवं की आधी जसं बोलत होतो ‘तसे बोलायला हवे’?

Comments

  1. विचार करण्यासारखं आहे खरं 😀👌🏽👌🏽. Nilesh Malvankar

    ReplyDelete
  2. Very well written

    ReplyDelete
  3. छानच झालाय लेख... खुमासदार आणि नेमका

    ReplyDelete
  4. Replies
    1. वरदा तू खूप छान लिहिले आहेस. अभिनंदन

      Delete
  5. वरदा..अतिशय परखड लिखाण..शुद्ध बोलणंच हल्ली आवडत नाही आपल्या लोकांना,तर लिखाण कसं आवडेल अशी परिस्थिती आहे..आणि गंमत म्हणजे आपल्या आधीची पिढीही या अशुद्ध गटात सामील झाली आहे..😄
    माझी एक साठीची मैत्रीण आकडे इंग्रजीतच बोलते..मराठी वाक्यांमध्ये पेरून बरं का..हसू येतं फार..पण त्याचं गमतीशीर कारण सांगते ती,तिची दोघेही मुले परदेशात..🤣 नातवंडांची कसरत करून बोलते बिचारी😄

    ReplyDelete
  6. मस्त, हल्ली इतकं शुद्ध कुणालाही समजत नाही

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय