स्त्रीदेवीकट्टा डीएमव्ही चार्जर्स संघ

प्राची हेन्द्रे
स्त्रीदेवीकट्टा डीएमव्ही चार्जर्स संघ खेळाडू व बाल्टिमोर मराठी मंडळ सदस्य

प्रिया जोशी
स्त्रीदेवीकट्टा डीएमव्ही चार्जर्स संघ खेळाडू व बाल्टिमोर मराठी मंडळ सदस्य

उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट् मंडळाच्या प्रादेशिक स्तरावरील महिला क्रिकेट स्पर्धा २०२३ चे विजेते

कधी काळी गल्ली क्रिकेटपासून सुरू झालेला आमचा प्रवास, उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट् मंडळाच्या महिला क्रिकेट स्पर्धेपर्यंत येऊन पोहचेल असे आम्हा कोणीलाही वाटले नव्हते. उत्तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे कार्यकारिणी सदस्य श्री. प्रसाद पानवलकर आणि अध्यक्ष श्री. संदीप दीक्षित यांच्या प्रतिनिधित्व आणि सहयोगाने ‘राष्ट्रव्यापी क्रिकेट लीग’ कार्यक्रमाची सुरुवात ह्या वर्षी ‘मैत्री मेळावा २०२३’ मध्ये झाली. प्रवासाची वाटचाल ‘स्त्रीदेवीकट्टा’ महिला ग्रुपाच्या संस्थापक प्रिया जोशी ह्यांच्या एका वॅाट्सॲप ग्रुपने सुरू झाली. महिलांचा क्रिकेट संघ ही कल्पना नवीन नाही, पण ती वास्तवात आणणे सोपे नव्हते. क्रिकेटची आवड असणाऱ्या आमच्यासारख्या काही सख्यांनी प्रतिसाद दिला आणि आमच्या “स्त्रीदेवीकट्टा डीएमव्ही चार्जर्स” संघाने आकार घ्यायला सुरूवात केली. नुसते खेळाडूच नव्हे, तर दोन अनुभवी प्रशिक्षकही मिळाले. सौ. माधवी आगाशे यांच्या नेतृत्वाखाली मराठी कला मंडळाने ह्या स्पर्धेचे आयोजन केले. मराठी कला मंडळ क्रिडा विभागाचे कार्यकारिणी सदस्य ऋषिकेश चव्हाण यांनी स्पर्धेचे संयोजन केले. सर्व खेळाडू क्लार्क्सबर्ग आणि बाल्टिमोर भागातील मेरीलँडर्स आहेत. त्यातले काही मराठी भाषक असून बाल्टिमोर मराठी मंडळाचे सदस्यही आहेत.

क्रिकेटला प्राधान्य देऊन सरावाच्या तारखा आणि मैदान ठरवले गेले. सराव करताना आम्हाला जाणवले की संघातली विविधता फक्त भाषेची नव्हती तर वय आणि नात्यात सुद्धा होती, अगदी वय वर्षे १८ पासून ते आजीच्या वयापर्यंत. ध्येय मात्र एकच होते - खेळाचा आनंद लुटणे आणि उत्तम बाजी खेळणे. सराव करताना आम्ही एकमेकींना अगदी मैत्रिणीसारखे पाठबळ देत होतो. सगळ्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. दिवस कमी असल्यामुळे आम्ही शक्य तेवढा सराव करत होतो. दोन्ही प्रशिक्षकांनी आमच्याकडून उत्कृष्ट सराव करुन घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा खेळ सुधारू लागला.

बघता बघता स्पर्धेचा दिवस उजाडला. आम्ही वेळेच्या आधी मैदानावर पोहचून थोडा सराव केला आणि प्रशिक्षकांच्या साहाय्याने खेळाच्या योजना आखल्या. मैदानात दोन्ही संघांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता.नाणेफेक हरुनही आमच्यातला उत्साह ओसरला नाही. पहिला बॅाल पडला, अँड इटस अ विकेट! कर्णधार मौनिकाच्या उत्तम गोलंदाजीने आम्हाला पहिल्या बॅालवर सफलता मिळवून दिली आणि आमच्या संघात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करुन आम्ही ‘एमकेएम सुपर क्विन्स’ संघाला १० ओवर्समध्ये ५ गडी बाद करुन, ४९ धावांवर रोखले. पन्नास धावांचे लक्ष्य डीएमव्ही चार्जर्सने अवघ्या ५.४ ओवर्समधे ९ गडी राखून पूर्ण केले. मौनिका (२५) आणि प्रिया (१९) यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या ४० धावांच्या भागीदारीने हा विजय सहजगत्या प्राप्त झाला. मौनिकाने २५ धावा आणि ४ गडी बाद करून ‘वु-मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार पटकावला. उपविजेतेपद ‘एमकेएम सुपर क्विन्स’ने पटकावले.

१४ जून, २०२३ ची ही आमची ग्रेट फादर्स डे अचिव्हमेंट! स्त्रीदेवीकट्टा डीएमव्ही चार्जर्स या संघाने उत्कृष्ट संघकौशल्य (विविधता-भाषा, देश, खंड, वयोगटातील १८ ते ६० वर्षे श्रेणी) दर्शविले आहे. त्याबद्दल आम्हाला आपल्या संघाचा अभिमान वाटतो.

व्हॉटसअँपच्या एका मेसेजने सुरू झालेली ही वाटचाल नुसते खेळून थांबली नाही, तर डीएमव्ही चार्जर्सने विजयी चषकही पटकवला. अमेरीकेत राहून महिला क्रिकेटचा वारसा चालू ठेवण्याचा प्रयत्न ‘स्त्रीदेवीकट्टा डीएमव्ही चार्जर्स’ आणि ‘एमकेएम सुपर क्विन्स’ ने सफल केला. ह्या स्पर्धेसाठी स्त्रीदेवीकट्टा डीएमव्ही चार्जर्स संघाचे प्रायोजक होते ‘मँगोपेटी’आणि ‘ब्राइट स्माईल’.

संघ - मौनिका बुदाला (कर्णधार), प्रिया जोशी, वीणा शेट्टी, फ्रेनी धवल, प्राची हेन्द्रे, अरुंधती सरपटवारी, मनिषा जाधव, पुर्वी जोशी, आसावरी केतकर, सारा वझीर, सानिया भलवानी

प्रशिक्षक - धवल जानी, मंगेश हेन्द्रे
वु-मॅन ऑफ द मॅच: मौनिका बुदाला (कर्णधार)
खेळाचा व्हिडीओ इथे पाहता येईल - https://youtu.be/E0fbfxStoHo

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय