संपादकीय


जुलै २०२३
अंक ३

मैत्र संपादक मंडळ २०२३ 

वरदा वैद्य 

विदुला कोल्हटकर 

रोहित कोल्हटकर 

कपिल धाकड 

मधुर पुरोहित 

दीप्ती जोशी 

 

बाममं कार्यकारिणी २०२३ 

अध्यक्ष 

अनीश पाटील 

उपाध्यक्ष 

सम्राज्ञी शिंदे  

 उपाध्यक्ष- विपणन 

पंकज शिवपुजे  

चिटणीस 

केतन शहापुरे 

खजिनदार 

योगेश खैरनार 

सह-खजिनदार 

स्मितेश लोकरे

मुलांच्या कार्यक्रमांचे आयोजन-
वैशाली खैरनार

ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन-
सुषमा भोसले

बृहन्महाराष्ट्र मंडळ प्रतिनिधी -
राजेंद्र मोडक

नमस्कार मंडळी,

चंद्रावरती महाल बांधू, नको अम्हाला जीर्ण गढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी


वसंत बापटांची ही कविता आठवण्याचे कारण म्हणजे चंद्रयान-३. १४ जुलैला भारताचे चंद्रयान-३ चंद्राकडे झेपावले. २३ ऑगस्टला यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरावे अशी योजना आहे. ही योजना प्रत्यक्षात उतरली तर चंद्रावर पोहोचणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या प्रदेशाचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. २००८मध्ये भारताच्या चंद्रयान-१ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या भागात पाणी असल्याचा शोध लावला होता. आता चंद्रयान-३ तिथे जाऊन चंद्राचा अभ्यास करणार आहे. अवकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या भारतीयांसाठी ही मोहीम महत्त्वाची आणि अभिमानाचीही आहे.

तर मंडळी, यंदा तुमचे उन्हाळी सुट्ट्यांचे बेत काय आहेत? जागतिक हवामान बदलामुळे संपूर्ण अमेरिकाभर आणि जगभरही यंदाचा उन्हाळा अगदी कडक आहे. एकापाठोपाठ एक उष्णतेच्या लाटा येत आहेत. सर्वाधिक तापमानाचा गेल्या वर्षीचा उच्चांक ह्यावर्षी मोडीत निघाला आहे. गेल्या वर्षीही त्याआधीच्या वर्षीचा उच्चांक मोडीत निघाला होता. अशी शब्दश: चढती भाजणी आहे. तरीही तुमचे प्रवासाचे बेत ठरले असतीलच. मंडळाने गणेशोत्सव आणि दिवाळीच्या तारखा जाहीर केल्या आहेत, त्याच्या तयारीला आता सुरुवात होईल. ह्या गणेशोत्सवात तुमचा सहभाग कसा असणार आहे?

२०२३ वर्षातला हा तिसरा अंक वाचकांच्या हाती ठेवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ह्या अंकासाठी भरभरून लेखन पाठवलेल्या सर्वांचे मन:पूर्वक आभार. पुढील अंकांसाठीही तुम्ही लेखन पाठवत राहाल अशी आशा करतो. नुकत्याच पार पडलेल्या मैत्री मेळाव्याला तुम्ही गेला होता का? ह्या मैत्री मेळाव्यातील बाल्टिमोर मराठी मंडळाच्या सहभागाविषयी ह्या अंकात वाचता येईल. मैत्री मेळाव्यात सहभागी झालेल्या आणि कलाविभागामध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलेल्या योगिनीने काढलेल्या काही चित्रांबद्दल जाणून घ्या, तसेच मैत्री मेळाव्यानिमित्त घेतलेल्या महिला क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या ‘स्त्रीदेवीकट्टा डीएमव्ही चार्जर्स’ संघाबद्दल जाणून घ्या.

ह्याशिवाय कविता, वैदिक ज्योतिष विषयावरील लेख,शताक्षरी कथा, पहिल्यांदा अमेरिकेत आलेल्या आईचे मनोगत ह्या अंकात वाचता येईल. मंगला नारळीकरांच्या आठवणी जागवणारा लेखही ह्या अंकात आहे. नेहमीप्रमाणे ‘कवितेचं पान’ आणि ‘भाषाविचार’ सदरांतर्गत लेख ह्या अंकात प्रकाशित करत आहोत. सदरांतर्गत भागांचे लेखन पाठवणाऱ्यांचे आभार. तुम्हालाही एखाद्या विषयावर सदर चालवण्याची इच्छा असेल तर आम्हाला जरूर कळवा.

मैत्राचा पुढचा अंक ऑक्टोबर महिन्याअखेरीस प्रकाशित होईल. त्या अंकासाठी तुम्ही भरभरून साहित्य पाठवाल अशी आशा करतो. अंकासाठीचे साहित्य १५ ऑक्टोबरपर्यंत editor@baltimoremarathimandal.org ह्या पत्त्यावर पाठवायचे आहे. नेहमीप्रमाणे कथा, कविता, लेख, अनुभव, पाककृती, कला/छायाचित्रे, छंद, प्रवासवर्णन, मुलाखत, वगैरे सर्व साहित्यप्रकारांचे स्वागतच आहे. तसेच, मैत्र संपादक मंडळामध्ये सहभागी होण्याची तुमची इच्छा असल्यास आम्हाला जरूर कळवा.

सर्वांना लेखन शुभेच्छा!
कळावे,
संपादक मंडळ

मुखपृष्ठ -
छायाचित्रकार - मधुर पुरोहित

Comments

Popular posts from this blog

संपादकीय

आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे