टीम एम. एच. जे.- महाराष्ट्राची हास्य जत्रा

योगिनी दहिवदकर

तीन महिन्यांपूर्वी जेव्हा मैत्री मेळाव्यासंबंधी समजले आणि त्यात आणि महाराष्ट्राची हास्य जत्राचा (एम. एच. जे.) प्रत्यक्ष कार्यक्रम होणार आहे हे कळले तेव्हाच ठरवले की आपण हा कार्यक्रम बघायचाच. गेली तीन-चार वर्षे मी महाराष्ट्राची हास्य जत्रा यूट्यूबवर पाहात आहे. तो कार्यक्रम प्रत्यक्ष बघण्याची सुवर्णसंधी आपल्या बाल्टिमोरच्या लोकांना मिळावी हे आपले भाग्यच आहे.

फक्त महाराष्ट्रातच नाही तर सर्व जगभरात एम. एच. जे. घरोघरी प्रसिद्ध आहे. कोरोना काळात तर त्यांनी सर्वांना अफाट हसविले आहे. आमच्या घरी या एकाच मराठी सिरीयलने यूट्यूबचा वापर वाढवला. जसजशी मैत्री मेळाव्यासंबंधित अधिक माहिती मिळत गेली तसे लक्षात आले की हे तर ‘मिनी बी एम एम अधिवेशन! म्हणजेच बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासारखाच कार्यक्रम होणार आहे. माझा रस आणि कल चित्रकलेत असल्याने आणि मी MANA (महाराष्ट्रीयन आर्टिस्ट्स ऑफ नॉर्थ अमेरिका)ची सदस्य असल्याने मी ‘आर्ट गॅलरी इनिशिएटिव्ह’ साठी चौकशी केली आणि स्वयंसेवक (वॉलेंटीअर) म्हणून काम करण्याची इच्छा दर्शवली. मैत्री मेळाव्याच्या कोअर टीमने लगेच प्रोत्साहन दिले आणि माझ्या हाती आर्ट गॅलरीची जबाबदारी आली. इथल्या स्थानिक चित्रकारांना/कलाकारांना जमवले आणि मेळाव्यातल्या ‘आर्ट गॅलरी’ची सुरुवात झाली. जवळपास १५ कलाकारांनी (चित्रकार आणि छायाचित्रकारांनी) ह्यात सहभाग घेतला.

पंधरा-वीस दिवसांपूर्वी आपल्याला मैत्री मेळाव्यासंबंधी काय विशेष/वेगळे करता येईल अशी चर्चा राजन मोडक यांच्यासोबत चालू असताना सुचले की आपण एम. एच. जे. कलाकारांची व्यक्तिचित्रे (पोर्ट्रेट्स) काढू शकतो. वेळ कमी होता, पण विचार केला प्रयत्न करू, जितकी व्यक्तिचित्रे करून होतील तेवढी मांडू. व्यक्तिचित्रे झाल्यावर सहज वाटून गेले की ह्या कलाकारांसोबत फोटो काढता आला तर आपल्या कलाकृतीला दर्दी दाद मिळेल. कलाकारांची भेट तर झाली नाही, पण मराठी लोकांच्या सर्वदूर पसरलेल्या ओळखीपाळखींची (स्ट्रॉंग नेटवर्कची) कमाल अशी की, मेळाव्यानंतर एक-दोन दिवसांत दोन-चार ठिकाणांहून कळले की माझ्या मित्राचा मित्र हा अमक्या कलाकाराला ओळखतो वा ओळखते, आणि तो वा ती माझी चित्रे त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. सध्या मी त्यांच्या प्रतिसादांची वाट पाहात आहे.

ह्या कलाकारांच्या माझ्या मनांत असलेल्या प्रतिमांनुसार मी ही व्यक्तिचित्रे केली आहेत. माझ्या मनातील प्रतिमा चित्रांत उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पण एम. एच. जे.चे चाहते असाल तर चित्रांवरचा तुमचा अभिप्राय कळवा.

समीर चौगुले
हास्यमहारथी, सदैव स्फूर्तीचा आणि विनोदाचा झरा

गौरव मोरे
आपल्या बिनधास्त आणि दिलखुलास स्वभावामुळे सगळ्यांचा आवडता झालेला गौरव. त्याच्या रंगीबेरंगी भूमिका आणि हसऱ्या स्वभावाला साजेशी ही बहुरंगी भेट.

पृथ्विक प्रताप
भूमिकांतून मध्यमवर्गीय तरुणांशी नाळ जोडणारा, आवाजाच्या लकबी, पेहराव, केशभूषेतून अभिनयाचा अफलातून आवाका दाखविणारा पृथ्विक मुळात एकदम शांत आणि सोज्वळ असावा असे वाटते. ते दाखवण्याचा हा प्रयत्न.

शिवाली परब
शीतली ते मोना डार्लिंग सहजतेने हाताळणाऱ्या बहुरंगी शिवालीचे चेतनामय तारुण्य

Comments

  1. Amezing art work by Sneha! All the charector are perfectly painted. More important is the way u expressed your passion towards the show and the responsibility of art gallery.I wish you all the best for your dreams

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय