माझे माहेर देवमाने ते अमेरिका

सौ.हेमांगी राजेश पाटील

'माझे माहेर देवमाने ते अमेरिका' असे म्हटले तर वाटते की सर्वच जगच माहेर आहे की काय? पण खरे तर माहेर ते माहेरच असते.

आजकाल तर माहेर - सासर काही वेगळे वाटतच नाही कारण सर्वांना मिळालेली मोकळीक आणि समाजात झालेले बदल. म्हणून वाटले की ‘माहेर’ या विषयावर काही लिहावे. त्याचाच एक छोटासा प्रयत्न.
माझे माहेर म्हणजे मला भगवंताकडून मिळालेला एकत्र कुटुंबाचा आहेर. आजी, आजोबा, काका, मामा, आत्या, आई, वडील, सर्व भावंडे यांच्या सहवासातून मिळणारा आनंद खरोखर वेगळा असतो. घरात सतत कुठल्यातरी गोष्टींवर चर्चा चालू असते, सल्लामसलत चालू असते. मुली असल्यावर सतत पैंजणांची छुमछुम घरात ऐकू येत असते. मुलांची वेगळीच धांदल चाललेली असते. त्यालाच घराचे घरपण म्हटले जाते.

माझे माहेर देवमाने - महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील एक छोटे, पण स्वाध्यायी विचारांतील एक गाव. खरोखर देवाचे अस्तित्व तिथे वृक्षमंदिर - अमृतालयम्, लोकांची श्रमशक्ती यात पाहायला मिळते. पारंपरिक पद्धतीने दिवाळी - अक्षय तृतीया याचा आनंद आम्ही सर्व मुली आजही घेतो. नेहमीच्या धावपळीतून बाहेर पडत शांततेत एकत्र येण्याची जागा म्हणजे देवभाने. एकत्र कुटूंबात काय मजा असते हे फक्त आमच्याच पिढीने अनुभवले. एकत्र वाढलेल्या आम्ही ११ मुली आणि १० मुलगे. आजोबांची चाललेली प्रत्येकीच्या लग्नाची घाई, एका पाठोपाठ एक मुलगी सासरी गेल्या. बहिणाबाई म्हणतात ना, 'मुलीच्या माहेरासाठी लेक सासरी नांदते’, अगदी तसा आमचा संसार सुरु झाला. एक - एक नवीन सुनबाई घरात येऊ लागली. सोबत अनेक सुख-दुःखे अनुभवली. आजी- आजोबांच्या आशीर्वादाने सर्वच संसाराला लागलो. देवमाने आमची जन्मभूमी आहे. आपआपली कर्मभूमी मात्र प्रत्येकाने कोकण, पुणे, नाशिक, मुंबई, एवढेच नाही तर सातासमुद्रापार अमेरिकेपर्यंत निवडली. खरोखर आमच्या प्रगतीने आमचे आई-आप्पा सुखावले.

कधी तरी आपण माहेरपणासाठी अमेरिकेत जावे हा विचार केला. भाचा पायलट प्रशिक्षणासाठी अमेरिकेला जाणार होताच, शिवाय मुलगा, सुनबाई, नातू यांना भेटायची ओढ होती आणि यासाठी पहिल्यांदाच अमेरिका दर्शन घडले. ही भूमी देवभाने गावासारखी वाटली - सर्वत्र हिरवीगार झाडे, जी मी वृक्षमंदीरात पाहीली आहेत, पाणी, जे मी देवभान्याच्या धरणात पाहीले आहे, अपूर्ण राहिलेले काकांचे पायलट प्रशिक्षण जे मी भाच्याला पूर्ण करताना पाहिले, घरातील शिस्त जी रस्त्यावरच्या वाहतुकीमध्ये पाहीली. देवभान्यात कोंबड्याच्या आवाजाने सकाळी उठणारे आम्ही, येथे आल्यावर खरोखर माहेरवाशीणीसारखे सकाळी १०-११ वाजता उठायला लागलो, कारण वेळ कसा - कुठे जातो ते कळतच नाही.

विषुववृत्त - कर्कवृत्त वगैरे अभ्यासात शिकलो होतो पण देवभाने ते अमेरिकेच्या विमान प्रवासात ते प्रत्यक्ष अनुभवले. म्हणून म्हणतात ना, ‘Sky is the limit’, तसा हा माहेरवासाचा अनुभव.



Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय