मनातला गणपती

भाग्यश्री साने

गणपती आणि गौरींचे दिवस म्हणजे आठवणींचा खजिना आणि प्रसन्न, मंगलमय दिवसांची सुरुवात. मराठी सणांमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान असलेला गणेशोत्सव लहान, थोर अश्या सगळ्यांनाच आपलासा वाटतो. माझ्या माहेरी एकत्र कुटुंब पद्धती. आमच्याकडे गणपती बसवण्याची प्रथा नव्हती, परंतु गौराई अतिशय थाटामाटात साजरी व्हायची.

आजही गौरी-गणपतीचे दिवस म्हटले की मला आठवते ते म्हणजे आई, काकू यांनी मिळून केलेली घराची साफसफाई, फराळाचे वेगवेगळे पदार्थ, बाबा-काका यांनी मिळून केलेली घराची रंग-रंगोटी, आम्हा मुलांनी केलेली गौराईची सजावट, आजी-आजोबांची पूजेची तयारी, आजीने निगुतीने केलेले फुलांचे हार व देवीचे दागिने, गौराईंना चापून -चोपून साडी नेसवण्याचे आई-काकूंचे कसब, ज्येष्ठा कोण; कनिष्ठा कोण याची चर्चा, घरात दरवळणारा महाराष्ट्री पद्धतीच्या स्वयंपाकाचा घमघमाट, टाळ, चिपळ्या, झांजा वाजवून जोरजोरात म्हणलेली सकाळ-संध्याकाळची आरती, रोजच्या वेगळ्या रांगोळ्या आणि असंख्य माणसांची ये-जा. एवढे असूनही आम्हाला मुलांना कशाची कमतरता वाटत असेल तर ती गणपती बाप्पाची. बाबा म्हणायचे 'अगं, आपण कसब्यात राहतो ना !! म्हणुन कसबा गणपती हाच आपला घरचा गणपती !!' अशा तऱ्हेने पुण्यातला मानाचा पहिला गणपती हा माझा घरचा गणपती असे मी अभिमानाने सांगत असे. आता आठवले तरी हसू येते पण तेव्हा खरोखरच घरचा गणपती असल्यासारखे आम्ही दर्शनाला रोज जात असू. कसबा गणपती पासून अगदी २ मिनिटांच्या अंतरावर आमचा वाडा असल्याने या दिवसांमधली पुण्यातली धामधुम अजूनही कानात घुमत आहे.


लाऊडस्पीकर्सच्या भिंती आणि त्यावर वाजणारी सिनेमातली गाणी, मंडळांचे तऱ्हेतऱ्हेचे देखावे, ते बघण्यासाठी लागलेल्या लांबलचक रांगा, मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग, रंगीबेरंगी वस्तू विकणारे फेरी-विक्रेते, खाण्या-पिण्याचे स्टॉल्स, फुलांचे सुवास, उदबत्त्यांचा सुगंध, गणपती अथर्वशीर्षाचे पठण अशा एक ना अनेक आठवणी आजही मनात तशाच ताज्या आहेत. तसे बघितले तर पुण्याचे गणपती आणि त्या दिवसातले वातावरण या विषयावर स्वतंत्र लेख होऊ शकतो. अजुनही हे दिवस आले कि वाटतं की पळत जाऊन आईने केलेला बेसनाचा लाडू तोंडात टाकावा. पण त्याच क्षणी डोळे खाडकन उघडतात आणि वर्तमानातले गणपती दिसायला लागतात आणि त्याच आईची जागा मी घेते.


माझ्या सासरी गौरी नसल्या तरी गणपती असतो. मूळ गणपती कोकणातल्या घरी बसवतात. तरी इथे मी मुलांसाठी प्रतिकात्मक हौसेचा गणपती बसवते. या वर्षी लहानपणीच्या आठवणींना उजाळा म्हणून भातुकली आणि आजीच्या साडीच्या उबेची आठवण करून देणारे खण कापड अशी मी थिम केली होती. भातुकलीच्या निमित्ताने मुलांना बंब, कळशी, विळी, गॅस सिलेंडर, दाणे पाखडायचे सुप, पिंप, फिरकीच्या झाकणांचे डबे, ठोक्यांची पातेली, मांडणी अशा जुन्या घरातल्या अनेक गोष्टींची ओळख झाली. पुण्यातल्या एका ओळखीच्या काकूंना मदत म्हणून त्यांच्याकडून खणांचे तोरण, बैठक, उशांचे आभ्रे शिवून घेतले होते. त्या काकूंनी सुचवल्याप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृती मधली सगळी शुभ चिन्हे - शंख, सरस्वती, कमळ, गोपद्म, गौराईची पावले, स्वस्तिक- अशी त्यावर रंगवून घेतली. बाप्पासाठी यावेळेस प्रसाद म्हणून मी विड्याची पाने वापरून मोदक केले होते. त्याची कृती खाली देत आहे. नक्की करून बघा आणि मला कळवा कसे झाले ते.

हे सगळे ऐकून तुम्ही म्हणाल हौसेला मोल नसते हेच खरे. खरेच आहे ते. घरापासून इतके दूर राहून आपल्या संस्कृतीचा हात धरून ठेवायचा आणि मुलांना त्या संस्कृतीची ओळख करून द्यायचा हा एक छोटासा प्रयत्न. वयाने कितीही मोठे झालो तरी सणांच्या दिवसांमध्ये परत लहान व्हावेसे वाटते. मनाला माहेरची ओढ लागते आणि हातातल्या पणतीला आईने दिलेल्या तुळशीच्या कुंडीत एक छोटीशी जागा मिळते.

पानाचे मोदक:

पारीसाठी:
१ कप सुक्या खोबऱ्याची पावडर
२ विड्याची पाने
१ कप कंडेन्सड मिल्क
२ थेंब खाण्याचा हिरवा रंग

सारणासाठी:
गुलकंद
घरात असेल त्या सुकामेव्याची भरड पूड (बदाम, काजू, पिस्ता इत्यादि)
गुलाबाच्या सुक्या पाकळ्या


कृती:
एका भांड्यात सुक्या खोबऱ्याची पावडर घेऊन त्यात २ थेंब हिरवा रंग घालणे. विड्याची पाने देठे काढून बारीक चिरून घेऊन भांड्यात एकत्र करणे. या मिश्रणामध्ये थोडे थोडे कंडेन्स्ड मिल्क घालून हाताने एकत्र करणे. घट्ट गोळा तयार होईपर्यंत कंडेन्स्ड मिल्क घालत राहणे. दुसऱ्या भांड्यात गुलकंद, सुकामेव्याची भरड पूड आणि गुलाबाच्या पाकळ्या चुरडून एकत्र करून सारण तयार ठेवणे.

सर्वप्रथम मोदकाच्या साच्याला तूप लावून घेणे. बंद साच्यामध्ये खोबऱ्याच्या मिश्रणाचा छोटा गोळा घालून व्यवस्थित आकार देऊन घेणे. गुलकंदाच्या मिश्रणाचा छोटा गोळा साच्यात आत घालणे. वरून खोबऱ्याच्या मिश्रणाने मोदक बंद करणे. अलगद साचा उघडून मोदक बाहेर काढणे.

समस्या निवारण:
मोदक व्यवस्थित आकार घेत नसेल किंवा तुटत असेल तर कंडेन्सड मिल्कचे प्रमाण कमी-जास्त करा. पारीचे मिश्रण योग्य चिकट झाले कि मोदकाचा आकार व्यवस्थित येईल. प्रत्येक मोदकाच्या आधी साच्याला नव्याने तुपाचे बोट लावायला विसरू नका.

Comments

Popular posts from this blog

गाईड