माझे व्हीगन प्रयोग

मुग्धा मुळे

दिवसा सॉफ़्टवेअर डेव्हलपर आणि रात्री फ़ॅशन डिझायनर.

पँडेमिकमुळे मला फेसबुक आणि इन्स्टा बघायला बराच वेळ मिळायला लागला. फेसबुकवर योगा, एरोबिक्स, झुंबा इत्यादी करून चवळीच्या शेंगा झालेल्या बायका फोटो टाकू लागल्या. निरनिराळ्या डाएटचे पेव फुटले. मग मला पण वाटले की आपण पण थोडे वजन घटवूया.

मी बराच शोध घेतला की कमीतकमी व्यायाम करून व जास्तीस्त जास्त खाऊन वजन कसे कमी करावे. बरयाच डाएट्सबद्दल वाचले. हाय फॅट, लो फॅट, हाय प्रोटीन, कलिंगड, फळे, २ चमचे भात वगैरे. खूप गुगलले की फक्त कांदा भजी असे काही डाएट आहे का ते. पण गूगलला काही जमले नाही. शेवटी व्हीगन डाएट करायचे ठरवले. आणि घरी जाहीर केले.

सकाळच्या चहापासून परीक्षा सुरु झाली. ओटमिल्क आणून चहात घातले व घोट घेतला. ठरवून मिटक्या मारायचा अविर्भाव केला, कारण नवरा व सासू बारीक लक्ष ठेवून होते. खूप मेहनत करून बरेच दिवस डाएट पाळले. अगदी चिकन, फिशकडे काणाडोळा केला. आणि सासूबाई अचानक सुगरण झाल्या. दुधाचे छान छान पदार्थ बनवायला लागल्या. खीर, बासुंदी, कढी, बर्फी आणून ठेवायच्या आणि मग म्हणायच्या, "अग विसरलेच! तू व्हीगन, नाही का?"

अश्यातऱ्हेने एक महिना झाला आणि माझ्या नवऱ्याने ‘मुंबईकर, पुणेकर अँड नागपूरकर’ आणि ‘खाद्ययात्रा’ असे २ लेख असलेली पुस्तके online मागवली. माझी बुद्धी सांगत होती, की पुस्तके उघडू नकोस (कारण मी ती आधी वाचली आहेत), पण मन बोलले, अग वाचते आहेस, काही खात नाहीस. मग 'दिल पे कोई जोर नाही' ह्या हिशेबाने मी ती वाचायला घेतली. रोज माझ्या स्वप्नात नवनवीन खाद्यपदार्थ यायला लागले. सलग चार दिवस स्वप्नात रसमलाई आली आणि विश्वामित्रांची तपस्या भंग पावली. सुरुवातीला हळूच चहात दूध घातले आणि अमृततुल्य प्यायल्याचा भास झाला. हळूहळू मेनकेने कब्जा करावा तसे माझ्या मनाने बुद्धीला हरवून मला पूर्णतः पूर्वपदावर आणले.

Comments

Popular posts from this blog

गाईड

कोविड विषाणू : नवा ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंट