चूल वर पिझ्झा

सुनील खाडिलकर

मराठी कला मंडळ व बाममं दरम्यान होणाऱ्या साहित्याची देवाणघेवाण उपक्रमाअंतर्गत हा लेख हितगुजच्या होळी २०२१ अंकातून घेतला आहे.

आजकाल करोनामुळे सर्वच गोष्टी व्हर्चुअल चालू आहेत. मध्ये मला थोडा ताप आला होता म्हणून डॉक्टरांना कॉल केला तर रिसेप्शनने व्हर्चुअल अपॉइंटमेंट घ्यायला सांगितले. वेबसाइट वर जाणे म्हणजे मोठं आव्हान होतं. हल्ली लॉग इन करणे जास्तच अवघड झाले आहे.

मी रोबॉट नाही हे सिद्ध करण्यासाठी खूप परीक्षा दिल्या तरी ती साईट मला रोबॉटच समजत होती. आधी ट्रॅफिक लाइटची चित्रे खूप वेळा ओळखली. मग आले फायर हायड्रंट. मला कळत नाही की, जर रोबॉटिक सॉफ्टवेर सेल्फ ड्रायव्हिंग गाड्या चालविणार असेल तर रोबॉटला ट्रॅफिक लाईट किंवा फायर हायड्रंट दिसायला नको का? सर्वात शेवटी एकदम खराब हस्ताक्षरात लिहिलेला शब्द ओळखायला लावला. असो, बऱ्याच प्रयत्नानंतर ती वेबसाइट उघडली एकदाची!

माझ्या मेहनतीचे फळ की काय म्हणा, एका देखण्या नर्सचे चित्र समोर आले. पुढे लिहिले होते, “माझ्याशी बोलायचे असेल तर इथे दाबा”, अजिबात दिरंगाई न करता मी बटण दाबले. “मी भेटते तुला थोड्या वेळात … ” असा मेसेज आला व तिची आतुरतेने वाट पाहत मी थांबलो. अंगात ताप असूनही कपडे ठीकठाक केले व चेहऱ्यावर थोडे उसने हास्य आणले.

थोड्याच वेळात खरी नर्स बाई स्क्रीनवर अवतरली व मला ‘मैंने चाँद और सितारों की तमन्ना की थी’ गाणे आठवले. पण माझ्या चेहऱ्यावरचे थिजलेले स्मित पाहून मी सिरीयस नाही हे कळल्यावर तिने मलाच माझे तपमान, वजन व रक्तदाब घ्यायला लावले व टायलेनॉल घे असे सांगितले. मलाही ताप तसा साधाच वाटत होता, तिने सांगितल्यावर खात्री झाली. व्हर्च्युअल विझिटमध्ये काही मजा नाही ते मात्र कळले.

दुपारच्या जेवणानंतर थोडी गुंगी आली होती तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आत्ता काय कटकट असा विचार करीत दार उघडले तर दाराशी ३-४ मुलांचा घोळका. ती कुठल्यातरी कॉन्सर्टला जाण्यासाठी पैसे जमवीत होती. त्यांनी मला एक फ्लायर दिले, त्यावर ‘चूल वर पिझ्झा’ बघून आश्चर्य वाटले. कोणीतरी ‘देशी’ पैसे जमवीत असावा. त्यांना बहुधा ‘येथे काही खपणार नाही’ अशी अपेक्षा होती. त्यातच बायकोचे “काही घेऊ नका, फ्रिजमध्ये जागा नाही,” असे मागून चालले होते.


खाली धगधगणारी शेगडी व त्यावर डोश्याच्या मोठ्या तव्यावर चीजमध्ये बुडबुडे येत आहेत असे पिझ्झाचे चित्र बघून तोंडाला पाणी सुटले. माझ्यातील ‘दानशूर कर्ण’ जागा झाला व मी त्यांना चक्क ४० डॉलर्स दिले. “जा बाळांनो, मनसोक्त गा, इटलीला जा, कॉन्सर्ट करा. मी इथे बसून गरमागरम पिझ्झा खातो,” असे म्हणत दार लोटले. मुले उड्या मारत पुढच्या घरी गेली.

फ्लायर घेऊन सोफ्यावर बसलो तर समोरचा टीव्ही आपोआप सुरू झाला व त्यावर फ्लायरमधील तोच पिझ्झा तव्यावर दिसला. पिझ्झ्याभोवती चूल आणि वर असे शब्द गोलगोल फिरत होते. नंतर ते एकत्र आले ‘वर-चूल’, अरे म्हणजे ते चूलवर नव्हते तर वर-चूल (व्हर्चुअल) होते आणि आपण फसलो $४० देऊन. टीव्हीवर पिझ्झा कसा करायचा ते दाखवू लागले. म्हणजे तो पिझ्झा आपणच करायचा होता? कर्म माझं!

तेवढ्यात, मगाशी दाराशी आलेली मुले पण दिसू लागली TV वर! पिझ्झा तयार झाल्यावर त्यांनी मला एक स्लाईस आणून दिली. अचानक कोणीतरी माझे हात ओढू लागले आणि मला जाग आली. मला डुलकी लागली होती तर! समोर माझ्या नाती माझ्या हातात दिलेली खोट्या पिझ्झाची बशी परत मागत होत्या. त्यांच्या भातुकलीच्या किचन मध्ये खोटा-खोटा पिझ्झा बनवून त्यांनी मला दिला होता. तो ‘virtual ‘ पिझ्झा संपविल्यावर त्यांना बशी परत हवी होती व माझ्या नाती मला विचारत होत्या, “आबो, तुला आईस्क्रिम पाहिजे?”

एवढी चविष्ट ‘virtual’ स्लाईस खाल्ल्यानंतर मी आईस्क्रीम कसे नाकारणार? फक्त समोर काय येते याचा विचार करत होतो तेवढ्यात नात एका प्लेटमध्ये थोडी माती म्हणजे बहुधा आईस्क्रिम व गवताची पात म्हणजे टॉपिंग्स घेऊन आली. एकंदरीत virtual जग कसे असणार याची कल्पना मला येऊ लागली.

Comments

Popular posts from this blog

गाईड

कोविड विषाणू : नवा ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंट