आमचे विठ्ठल मंदिर

शर्मिली सिन्नरकर-कुलकर्णी

उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा |
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा ||

या माझ्या आजी, आई आणि दोन्ही काकूंच्या सुमधुर आवाजाने माझ्यावर संस्कार होतच मी लहानाची मोठी झाले, याला कारण माझ्या माहेरचे (आमचे) नारायण पेठ, पुणे येथील खाजगी विठ्ठल मंदिर. ह्या विठ्ठल मंदिरातील माझ्या आई-वडिलांची ७वी पिढी.

आमचे पूर्वज वारकरी होते. न चुकता ते पंढरीची वारी करायचे. साधारणतः १७९३-९४ च्या आसपास आमच्या पूर्वजांपैकी एक ९० वर्षांचे झाल्यावर मात्र त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाला, ‘नको देवराया अंत आता पाहू!’ अशी कळकळीची विनंती केली. म्हणाले, आता माझ्याच्याने वारी होणार नाही ही शेवटची वारी मी आता थकलो. तेव्हा पंढरीनाथाने स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितले, उद्या सकाळी पुंडलिकाच्या डोहात तू स्नानाला जाशील तेव्हा मी तुला भेटेन. त्या प्रमाणे सकाळी त्यांनी डोहात पहिली डुबकी मारताच रुख्मिणी माता हाताशी आली व दुसऱ्या डुबकीमध्ये पांडुरंगाची मूर्ती मिळाली. त्यावेळी ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग!’ अशी त्यांची अवस्था झाली. आषाढी एकादशी ते पौर्णिमा पंढरपुरात राहून त्यांनी मूर्तीची षोडशोपचारे पूजा केली आणि नंतर त्याच परमानंदात हत्तीवरून, वाजत गाजत त्यांनी दोन्ही मूर्ती पंढरपूरहून पुण्यात आणल्या. नंतर १७९४ साली एकादशीला आज जेथे आहेत तेथे मूर्तींची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून आमच्या मंदिरात पंढरपूरसारखा आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा असा पाच दिवसांचा उत्सव सुरु झाला.


आषाढी एकादशीला आमच्या रुख्मिणी-पांडुरंगाला षोडशोपचारे अभिषेक केला जातो. माझे बाबा श्री. दिनानाथ मोठ्या आवडीने व प्रेमाने रुख्मिणी पांडुरंगाचा साजशृंगार करतात. त्या दिवसापासून सायंकाळी मंदिरात कीर्तन सुरु होते व नाम गजरात मंदिर दुमदुमून जाते. काल्याचे कीर्तन गुरुपौर्णिमेला असते. ते झाल्यावर ‘राधा-कृष्ण गोपालकृष्ण’च्या गजरात देवाला लोणी साखर भरवली जाते. त्याच गजरात सर्वजण गंगापूजन म्हणजेच नदीवर पूजनाला जातात व येताना सर्वांना प्रसाद वाटप करत येतात. नंतर दहीहंडी फोडली जाते व दहीकाल्याचा प्रसाद सर्वांना दिला जातो. कीर्तन झाले की मंत्रजागर व भजन होते. ते पहाटेपर्यंत चालते.

या उत्सवाच्या दरम्यान विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्तींचे तेज अलौकिक असते, म्हणून सर्व कार्यक्रम झाल्यावर त्यांची दृष्ट काढली जाते.

पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली |
ओवाळीते तुला रे देवा संतमंडळी, देवा भक्तमंडळी ||


१९६१ साली पुण्यात पानशेत धरण फुटून जो प्रलय झाला त्यावेळी आमच्या राहत्या जागेतील सर्व संसार वाहून गेला. माझे बाबा तेव्हा खूप लहान होते. आजोबा व काकांनी छातीएवढ्या पाण्यातून चालत जाऊन आमच्या गायींना मोकळे सोडले. डोळ्यांदेखत पिढ्यानपिढ्यांची सोने-चांदी, सर्व संसार वाहून जाताना पाहून आजीने पांडुरंगाला विनवले ‘तुजविण नाही दुजा आधार!’ त्याच पंढरीरायाच्या कृपेने गाभारा व मूर्ती मात्र तसूभरही हलल्या नाहीत. इतकंच काय पण जेव्हा पुराचे पाणी ओसरले तेव्हा सगळीकडे चिखल होता पण गाभारा स्वच्छ होता. दोन्ही मूर्ती, रुख्मिणीचा पोहे हार, कुंकू सर्व कोरडे होते. पुरानंतर केवळ ८ दिवसांत उत्सव होता, तरी सुद्धा पंढरीरायाने विटा-बाजा टाकवून कीर्तन करवून घेतले. त्या वेळचे कीर्तनकार ह. भ. प. श्री जुन्नरकरबुवा यांनी बिदागी न घेता कीर्तन केले. अशा अनेक अडचणीत सुद्धा ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती!’ ही उक्ती यथार्थ करत पंढरीनाथाने सिन्नरकरवाडा पुन्हा दिमाखात उभा केला.

कोजागरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा अशी महिनाभर काकडआरती चालते. ती मजा काही औरच. रोज देवाला पंचामृताने स्नान, नवनवीन कपडे, हार-तुरे, निरनिराळ्या रांगोळ्या, सुमधुर आवाजातील पहाटेची गाणी, निरनिराळ्या पक्वान्नांचे जेवण, विडा, आरसा, चौरी, वेगवेगळे गंध अशाप्रकारचा साजशृंगार केला जातो. शेवटच्या दिवशी, कार्तिकी पौर्णिमेला, अन्नकोट साजरा होतो. त्यावेळी नारायण पेठेतील आजूबाजूच्या स्त्रिया पांडुरंगासाठी वेगवेगळे पदार्थ आणून देतात आणि आरती होऊन काकडा समाप्ती होते.

असा हा उपक्रम माझे थोरले काका श्री. द्वारकानाथ मोठ्या जबाबदारीने पार पाडत. माझे बाबा व काका त्यांना सर्व प्रकारे सहकार्य करत. आता ही जबाबदारी माझा चुलतभाऊ श्री. धनंजय मोठ्या उत्साहाने पार पाडतो. माझे मधले काका श्री. विजयकुमार ह्यांनी वारीचा वारसा पुढे चालवला, पण आता वयोमानाप्रमाणे त्यांना जमत नाही. तरी त्यांचा मुलगा श्री. विश्वास ही वारी जमेल तशी करतो.

अशा प्रकारे २२७ वर्षे झाली आणि आता आमची ८वी पिढी - श्री. धनंजय व श्री. विश्वास हे कार्य अविरत करत आहेत. तो पंढरीनाथ स्वतः हे सर्व कौतुकाने करवून घेत आहे, असे म्हणणे जास्त यथार्थ ठरेल. म्हणून म्हणावेसे वाटते,

सुदिन हा आज पातला, मंदिरी आमुच्या मोह दाटला |
मंगल तोरण दारी बांधुनी, पानाफुलांची नक्षी काढुनी, सुसज्य केले प्रांगण सजवुनी ||
स्वागत करण्या पंढरीनाथा, सानथोर हे मनापासूनी |
आनंदाने मोहित होऊनी, नाती जपती एक होऊनी ||
एक दिलाने, एक मनाने, वसा घेतल्या आठव्या पिढीने|
वळणावरती अनेक वळणे आली आयुष्यात, तरीही सिन्नरकरांचे विठ्ठल मंदिर उभे दिमाखात ||

मंदिराबाहेरचे एक वैशिष्ट्य म्हणजे ३०० वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड व त्याच्या खाली दक्षिणमुखी मारुतीराया उभे आहेत. त्यांची माहिती पुन्हा कधीतरी.

Comments

Popular posts from this blog

गाईड

कोविड विषाणू : नवा ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंट