ग्राम - गाव

सौ. श्रीया दीक्षित-नाचरे, पुणे

भारतीय विद्या पारंगत,
मोडी लिपी वाचक-शिक्षक व अभ्यासक
shreeyanachare@gmail.com

ग्राम म्हणजे गाव. ग्राम हा संस्कृत शब्द आहे. वैदिक काळातील ग्राम या शब्दाचा अर्थ 'काही काळ वास्तव्याचे ठिकाण' असा आहे. म्हणजे ग्राम या शब्दाचा अर्थ आपण आज ज्याअर्थाने गाव हा शब्द वापरतो त्यापेक्षा खूपच वेगळा आहे असं दिसतं.

आज गाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तर थोडी वस्ती आणि त्याभोवती शेती असं दृष्य. गावाचे दोन भाग असतात. पांढरी आणि काळी. पांढरी म्हणजे वस्तीचा भाग आणि काळी म्हणजे शेत जमीन. गाव म्हणजे; ज्या वस्ती भोवती शेतीयोग्य अशी भरपूर जमीन आणि शेती करणारे शेतकरी तसेच कुशल मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध असते असे ठिकाण. पांढरी आणि काळी या भागांमुळे त्यावर आकरल्या जाणार्या पट्ट्यांची नावंही तशीच पडली. 'मी अमुक इतकी पांढरी दिली, अमुक इतकी काळी दिली', असे उल्लेख कागदपत्रात लिहिलेले दिसतात.

शेतीसंदर्भात आणखी एक संज्ञा वापरली जाते. ती म्हणजे 'शिवार'. पण शिवार म्हणजे फक्त शेत असा नसून शिवार म्हणजे गावाच्या वस्तीचा भाग सोडून शिवेच्या आतील (हद्दीतील) सर्व जमीन. यामधे शेतं, चराईची कुरणं, बखळी, नद्या, नाले, मसणवाटा, माळरानं, मुरमाड जागा इ. सर्वांचा समावेश होतो.

अनेक मोडी कागदपत्रांत गावाला 'देह' असेही म्हटलेले दिसते.

गावासाठी आणखी एक शब्द वापरला जातो. तो म्हणजे खेडं. मग याचा अर्थ काय ? याचं स्पष्टीकरण असं देता येतं की, 'खेडणे' या शब्दाचा अर्थ जमीन कसणे असा आहे. त्यामुळे अर्थातच 'खेडू ' म्हणजे जमीन कसणारा होय. या खेडूंची संख्या जेथे जास्त ते खेडे होय (संस्कृत मधे 'खर ' हा धातू खरवडणे किंवा कोरणे यासाठी वापरला जातो हे इथे लक्षात ठेवले पाहिजे). आज आपण खेडू या शब्दाला 'त ' हा प्रत्यय लावून खेडूत हा शब्द फार वेगळ्या आणि चुकीच्या अर्थीही म्हणजे गावंढळ या अर्थीही वापरतो. ते योग्य नाही.

कधी कधी वस्तीपासून शेत दूरच्या अंतरावर असल्यामुळे शेतकऱ्यांना किंवा मजुरांना शेतावर रहाण्याची गरज पडत असे. त्यामुळे शेतावर घरे अथवा झोपड्या बांधाव्या लागत असत. अश्या दोन-चार घरे अथवा झोपड्या असलेल्या वस्तीला झाप/ आवसा/ गोठा/ पडळ इ. नावं आहेत. या वस्त्यांमध्ये वाढ होऊन २०-२५ घरं झाली की अश्या वस्त्यांना वाडी/ मजरे/ वाडा/ पाडा इ . नावांनी संबोधले जाते. हे आवसे, मजरे, पडळी, वाड्या गावाच्या अंतर्भूत वस्त्या असतात. 'अमुक गावाची ही वाडी', असे म्हटले जाते.

गावाची वस्ती वाढली आणि गावात उद्योगधंदे वाढले, हुन्नरी/कसबी लोकांची संख्या वाढली की अश्या गावाला शहर म्हटले जाते. थोडक्यात गावातील काळीपेक्षा पांढरी वाढली म्हणजे गावाचे शहर होते. शहरात/ गावात 'कसबा ' हा भाग आवर्जून असतो. कसबा म्हणजे जुनी वस्ती किंवा ज्या भागात कसबी/ हुन्नरी लोकांची वस्ती असलेला भाग होय. तसेच शहरात किंवा गावात जेथे बाजार किंवा दुकानं असतात अश्या भागाला पेठ असं म्हणतात. संदर्भ : गावगाडा - लेखक : त्रिंबक नारायण अत्रे

Comments

Popular posts from this blog

गाईड

कोविड विषाणू : नवा ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंट