उकडीचे मोदक

सविता शिंदे

नमस्कार मंडळी! मैत्रच्या अंकामध्ये मला पाककृती शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल, सर्वप्रथम, मैत्रचे खूप खूप आभार. आज मी आपल्याला गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकांची पाककृती सांगणार आहे.

माझे नाव सौं सविता शिंदे. वास्तव्य, जर्मन टाऊन, मेरीलँड. भारतात, वसई कलाक्रीडा महोत्सव पाककृती स्पर्धेच्या, ३ वेगळ्या विभागांमध्ये सलग सात वर्षे प्रथम क्रमांक व आठव्या वर्षी परीक्षक म्हणून नेमणूक. ‘इ टीव्ही मराठी’च्या मेजवानी व ‘साम’च्या सुगरण ह्या कुकिंग शोमध्ये गेस्ट शेफ म्हणून आमंत्रित, अमेरिकेमध्ये सात्त्विक पदार्थांचे कुकिंग युटूब चॅनेल: व्हेजी गुडनेस
(https://www.youtube.com/channel/UC2w4xeXdYr7MIzgiZYJve1w)

तशी मी मूळची सोलापूरची. त्यामुळे, लहानपणापासूनच सुक्या खोबऱ्याच्या मोदकांची सवय. मग ते गव्हाच्या पिठाचे तळणीचे असोत वा उकडीचे. दर महिन्याच्या चतुर्थीला आईला मदत करण्यासाठी आम्ही भावंडे वाट पाहात असू. आई, अनुपमा केत, मूळची सुगरण असल्याने तिने ते मोदक अगदी निगुतीने आम्हाला शिकविले. लग्नानंतर खरंतर तांदळाच्या उकडीच्या सुबक मोदकांची ओळख झाली. आमच्या शेजारच्या जोश्यांकडे तर दर गणपतीला पंक्तीत बसलेल्या सर्वांची मोदक खाण्याची जणू स्पर्धाच असे. ते ताटातले गरम गरम मोदक त्यावर साजूक तुपाची धार घालून, पोटाचा रस्ता कधी धरायचे, ते पोट तुडुंब भरेपर्यंत समजतच नसे. नवराही खवैय्या आणि लेकही तितकीच चवीचे खाणारी असल्याने, तळणीचे मोदक मागे पडून तांदळाच्या सुबक मोदकांनी दर चतुर्थीला आमच्या गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये जागा पटकावली!

साहित्य:
२ कप तांदळाचे (आंबेमोहर) पीठ
१ कप पाणी
१ कप दूध
१ कप कोल्हापुरी (केशरी) गूळ
२ कप खवलेला ओला नारळ
३ टेबल स्पून तूप
१ टेबल स्पून काजू, बदाम (प्रत्येकी)
१ टेबल स्पून खसखस
१/२ टी स्पून वेलची पूड
१/२ टी स्पून जायफळ पूड
२ केळीची पाने (किंवा मलमलचे कापड)
५-६ केशर काड्या (१ चमचा दुधात भिजवावे)

कृती:
१. सारण - एका फ्रायिंग पॅनमध्ये २ टेबल स्पून तुपामध्ये, काजू, बदाम, खसखस व खवलेला ओला नारळ घालून २ मिनिटे परतावे. त्यामध्ये किसलेला गूळ व दूध घालावे. सारण ओलसर होईल. ते मध्यम आचेवर हलवत राहावे. सारण सुके होत आल्यावर गॅस बंद करून जायफळ, वेलची पूड, व दुधामध्ये भिजवलेले केशर घालावे.
२. पीठ - एका भांड्यात दूध व पाणी एकत्र उकळल्यावर त्यामध्ये पीठ घालून ते न हलवता तसेच तरंगू देणे व गॅस बंद करणे. ७-८ मिनिटे तसेच ठेवून त्यानंतर पळीच्या दांड्याने ढवळून ५ मिनिटे झाकून ठेवणे. नंतर, पाणी लावून छान मळून घेणे.
३. छोटा गोळा घेऊन हाताने पिठाची पारी करून त्यामध्ये १ टेबलस्पून सारण भरून, पाकळ्या दुमडून मोदक करावा.
४. उकडीच्या भांड्यात, १ १/२ कप . पाणी घेऊन, त्यावर चाळणी ठेवावी. चाळणीवर मलमलचे कापड किंवा केळीचे पान ठेवावे. पानावर तुपाचा हात फिरवून त्यावर मोदक ठेवावे. वर झाकण ठेवून ५ मिनिटे मोठ्या आचेवर व नंतर मध्यम आचेवर १० मिनिटे ठेवावे. नंतर गॅस बंद करावा.
५. झाकण उघडून, हाताला पाणी लाऊन, एक एक मोदक, नाजूकपणे काढावा. तबकामध्ये छान रचून, त्यावर तुळशीचे पान ठेवून नेवैद्य दाखवावा.

हे झाले बाप्पाचे मोदक तयार!

Comments

Popular posts from this blog

गाईड

कोविड विषाणू : नवा ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंट