देस-परदेस

बाळकृष्ण पाडळकर

सध्या वास्तव्य ट्रॉय, मिशिगन येथे. त्यांनी भाषांतरित केलेल्या ‘ओवीस्वरूप श्रीमद्भगवद्गीते’चा विडिओ युट्युबवर उपलब्ध आहे- www.youtube.com/channel/UCKDIFeXQt1KAEhZfuvR6OcQ

सुवर्णपुरी हे गोदावरी नदीच्या काठी वसलेले एक लहान गाव. सुवर्णपुरीची लोकसंख्या केवळ चार हजार. गावात मुख्यत्वे करून ब्राह्मण समाज असल्यामुळे वर्षभर धार्मिक विधी चालत. गोदावरीच्या काठावर एक अतिप्राचीन असे शंकराचे मंदिर असल्यामुळे गावात नेहमी भाविकांची वर्दळ असायची. धार्मिक विधींसोबत श्राद्ध, अस्थिविसर्जन, अंत्यसंस्कार यासारखी क्रियाकर्मे करण्यासाठी लांबून लोक इथे येत.

या परिसरातल्या लोकांची अशी दृढ श्रद्धा होती की “वृद्ध-गंगा“ गोदावरीमध्ये अस्थिविसर्जन केल्यास मोक्ष मिळतो. प्रभू रामचंद्र सीतेबरोबर वनवासात असतांना बराच काळ येथे थांबले अशी आख्यायिका आहे. शंकराचे अतिप्राचीन मंदिर कलिंग संस्कृतीचा उत्कृष्ट नमुना होते. सूर्योदयापूर्वीपासून मंदिरात पूजापाठ, आरती, स्तोत्रपठणाची फार जुनी प्रथा होती. मंदिरावर ध्वनिक्षेपक असल्यामुळे संपूर्ण सुवर्णपुरीमध्ये मंदिरातील विधी ऐकू येत असत.

अभाअण्णाचे घर मंदिरापासून हाकेच्या अंतरावर होते. मंदिरामध्ये घंटा वाजली की त्याच्या आवाजाने अभाअण्णा जागा होई, हे नित्याचेच होते. मात्र त्याची बायको अहिल्या त्याच्या खूप अगोदर उठून घरात झाडझूड, सडा रांगोळी करीत असे. लहान आरती या दोघानंतर बऱ्याच वेळाने उठून बसे. अभाअण्णाचे रेल्वे लाइनच्या पलीकडे शेत होते. तो सकाळीच बायकोबरोबर लहान्या आरतीला घेऊन शेतावर जात असे. त्यामुळे अहिल्याला बरोबर दुपारचे खाण्यापिण्याचे घेऊनच निघावे लागे. आरती बरोबर असल्यामुळे तिच्यासाठीही दुपारच्या वेळी खायला चीज वस्तू घ्यावी लागे.

अभाअण्णाच्या या कार्यक्रमात सहसा फरक पडत नसे. शेतात आरती एकतर स्वतःच स्वतःशी खेळत बसे किंवा खेळाचा कंटाळा आला तर ती तिच्या आईबापाच्या मागे मागे शेतभर फिरत असे. संध्याकाळी घरी आल्यावर अभाअण्णा हात पाय धुतल्यानंतर न चुकता मंदिरात जाई. एखादे वेळी आरतीही त्याचे बरोबर मंदिरात जाई पण आरतीला घेऊन जाण्याचा अभाअण्णाला भारी कंटाळा येई. आरती बरोबर असल्यामुळे थोडे अंतर चालून जाण्यासाठी त्याला बराच वेळ लागे. आरतीला घेऊन मंदिरात जायचे म्हणजे अभाअण्णासाठी ती एक मोठी कंटाळवाणी बाब होती. आरती नेहमी मंदिरात जायला उत्सुक नसायची. मंदिरात गेल्यावर शेजारी राहणाऱ्या मंडळींबरोबर थोडा वेळ गप्पा मारल्यावर अभाअण्णाला बरे वाटे. अंधार पडायच्या आत तो घरी परत फिरे. दुसऱ्या दिवसाच्या शेतीकामाची थोडीफार तयारी झाल्यानंतर, जेवणखाण आटोपल्यानंतर अभाअण्णा देवाची दोनचार भजने म्हणत असे. त्यानंतर सगळे झोपी जात.

अभाअण्णाचे कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते. गावात हे कुटुंब फार श्रीमंतही नव्हते आणि गरीबही नव्हते. शेताला गोदावरीचे पाणी मिळत असल्यामुळे अभाअण्णाला शेतीचे उत्पन्न भरपूर होत असे. तो वर्षभराचे धान्य साठवून ठेवून बाकीचे धान्य जवळच असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी विकून टाकी. तसे शेतीचे उत्पन्न त्याच्याकरता भरपूर असल्यामुळे त्याला नातेवाईक अथवा शेजाऱ्या पाजार्यांच्या जास्त संपर्कात राहण्याची गरज नव्हती.

दरवर्षी शिवरात्रीला सुवर्णपुरीमध्ये यात्रा भरत असे. ही यात्रा चांगली आठ दिवस चाले. यात्रेच्यावेळी अभाअण्णा, त्याची बायको शेतावर न जाता यात्रेमध्ये सामील होत. बहुतेक वेळा यात्रेत सामील होण्यासाठी अभाअण्णाकडे त्याचे नातेवाईक परगावातून येत. त्यामुळे अभाअण्णाला शेतावर जाणे शक्य होत नसे. आरतीही तिच्या घरी पाहुणे आल्यामुळे खुश असायची. अहिल्याला वाटे एकदा का आरतीची शाळा सुरु झाली की मग तिला असे बाहेर भटकायला मिळणार नाही. त्यामुळे अहिल्या तिला तिच्या बापाबरोबर तालुक्याच्या ठिकाणीही पाठवी.

असेच एका उन्हाळ्यात शिवरात्रीच्या यात्रेकरता अभाअण्णाकडे त्याचे लांबचे नातेवाईक आले. आरतीला त्यामुळे आनंद झाला. रोज यात्रेत फिरणे, खाणेपिणे यामुळे आरतीची चंगळ झाली. आरती खुश होती. भर उन्हात ती पाहुण्यांबरोबर यात्रेत भटकत होती. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आईने तिला यात्रेत रोज रोज जाण्यास मज्जाव केला परंतु अभाअण्णाच्या आग्रहाखातर अहिल्याने तिला यात्रेत पाठवले. त्यादिवशी यात्रेत पाहुण्यांबरोबर आरती खूप भटकली. त्यांना घरी यायला संध्याकाळ झाली. बाहेर भरपूर खाल्यामुळे आरती न जेवताच आल्या आल्या झोपी गेली.

रात्री अहिल्याचा हात आरतीच्या अंगावर पडला आणि तिला आरती तापाने फणफणली असल्याचे जाणवले. तिने अभाअण्णाला उठवले. आरती खूप तापलेली पाहून अभाअण्णाही घाबरला. त्याने लगेचच थंड पाण्याच्या पट्ट्या तिच्या डोक्यावर ठेवायला सुरवात केली. बराच वेळ अभाअण्णा, अहिल्या आरतीच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवीत होते. सकाळ होईपर्यंत आरतीचा ताप उतरला नाही त्यामुळे अभाअण्णाने आरतीला दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला. दवाखान्यात जातांना आरती डोळे उघडायला तयार नव्हती. अभाअण्णाने तिला अलगद आपल्या हातावर घेतले होते. दवाखान्यात डॉक्टरांनी आरतीला तपासले आणि अभाअण्णाला विचारून दोन इंजेक्शने दिली. आरती रडत होती तिची आई परोपरीने तिची समजूत घालीत होती परंतु छोट्या आरतीचे रडणे थांबत नव्हते.

अहिल्या दिवसभर आरती जवळ बसून होती. तिचा ताप उतरत नव्हता. मध्ये थोडा कमी झाल्यासारखा वाटला परंतु आरती पुन्हा तापाने फणफणली. अभाअण्णाला, अहिल्याला काळजी वाटू लागली. त्यांच्याकडे आलेल्या नातेवाईकांनाही अपराध्यासारखे वाटू लागले, त्यांना असे वाटले की आपण यात्रेकरता आलो म्हणूनच आरती बाहेर निघाली आणि आजारी पडली. त्यामुळे त्यांनी आपला गाशा गुंडाळला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपल्या गावी निघून गेले. दोन दिवस ताप उतरला नाही तर आरतीला परत दवाखान्यात घेऊन या अश्या सूचना डॉक्टरांनी दिल्या होत्या त्यामुळे संध्याकाळी आरतीला दवाखान्यात नेणे भाग होते.

डॉक्टरांनी आरतीला तपासले अन अजून एक इंजेक्शन दिले. अभाअण्णाला रात्री बर्फाच्या पट्ट्या देखील ठेवायला डॉक्टरांनी सांगितले. अभाअण्णा बायकोला व आरतीला घरी सोडून धावतच यात्रेच्या ठिकाणी गेला, त्याने यात्रेत बर्फगोळा विकणाऱ्या हातगाडीवाल्याला गाठले आणि त्याच्याकडून भुश्यात गुंढाळलेला बर्फाचा भला मोठा खडा विकत घेतला. अभाअण्णा घरी येताच त्याने बर्फाच्या पट्ट्या आरतीच्या कपाळावर ठेवण्यास सुरवात केली. आरती ग्लानी आल्यामुळे डोळे उघडायच्या अवस्थेत नव्हती. ती अंथरुणावर निपचित पडून होती. अहिल्या संध्याकाळचा स्वयंपाक करीत होती, पण तिचे मन स्थिर नव्हते. ती सारखी आरतीला जवळ येऊन पाहत होती.

रात्र नवरा-बायकोने जागून काढली त्यांच्या डोळ्याला डोळा नव्हता. आरती धड झोपेतही नव्हती आणि धड जागीही नव्हती. ती सारखे कण्हत होती. त्यामुळे तिच्या आईला जास्त काळजी वाटू लागली. सकाळी सकाळी अभाअण्णाला डोळा लागला पण मंदिराची घंटा वाजल्याबरोबर त्याला जाग आली. अहिल्या अद्याप आरती जवळ बसून होती. अभाअण्णाला वाटले आज आरतीला जिल्हा हॉस्पिटलमध्ये नेलेच पाहिजे. त्याने अहिल्याजवळ त्याला काय वाटते ते बोलून दाखवले, ते आरतीने ऐकले आणि तो मोठ्याने ओरडली,”नाही!” अन गप्प झाली. अभाअण्णाला आरतीची अवस्था पाहवत नव्हती. तो सरळ उठला आणि डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांची भेट घेऊन त्याने त्याला आरती विषयी वाटत असलेली चिंता डॉक्टरांना सांगितली. डॉक्टरही त्याच्या म्हणण्याला राजी झाले, पण त्यांनी अजून एक दिवस वाट पाहायला सांगितले. डॉक्टरांना याची कल्पना होती की आरती गोळ्या घेणार नाही तरीही त्यांनी अभाअण्णाला गोळ्या लिहीन दिल्या आणि पाण्यातून अथवा दुधातून त्या आरतीला देण्यास सांगितले. अभाअण्णा गोळ्या घेऊन घरी आला व त्याने आरतीला गोळ्या पाण्यातून बारीक करून देण्याचा प्रयत्न केला पण एक घोट घेताच आरतीने गोळी असलेले पाणी थुंकून टाकले. यामुळे अभाअण्णाची चिंता वाढली.

अभाअण्णा, अहिल्याने सकाळी उठून जिल्हा हॉस्पिटलची वाट धरली. हॉस्पिटलमधें दाखल होताच डॉक्टरांनी आरतीला तपासले आणि आयसीयूमध्ये दाखल करून घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे अभाअण्णाची पाचावर धारण बसली. आरती कण्हत होती, तिच्या आईचा चेहरा मलूल झाला होता. तिच्या तोंडातून शब्द निघणे मुश्किल होते.

मुख्य डॉक्टर पुन्हा आले, त्यांनी आरतीला बराच वेळ तपासले. तिला दोन इंजेक्शनेही दिली आणि निघून गेले. नर्स आरतीच्या कपाळावर बर्फाच्या पट्ट्या ठेवीत होती. दुपार टळून गेल्यावर ताप थोडा कमी झाल्यासारखा वाटला, डॉक्टरांनीही त्याला दुजोरा दिला. संध्याकाळी ताप बराच कमी झाला होता. डॉक्टरांनी एक दिवसानंतर आरतीला सोडण्याचे सूतोवाच केले आणि ते निघून गेले.

दुसरे दिवशी आरतीने डोळे उघडले पण ती काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. अभाअण्णाला वाटले कदाचित अशक्तपणामुळे आरती बोलत नसावी. आरती संध्याकाळी घरी परतणार होती. डॉक्टर आले, त्यांनी आरतीला तपासले. त्यावेळी अभाअण्णाने डॉक्टरांना सांगितले की आरती बोलण्याचा प्रयत्न करते पण तिच्या तोंडातून शब्द निघत नाही. डॉक्टरांनी त्यांच्याच हॉस्पिटलमधील दुसऱ्या डॉक्टरांना बोलावले. त्यांनी आरतीची तपासणी केली आणि मुख्य डॉक्टरांना बाजूला घेऊन इंग्रजी भाषेत काहीतरी सांगितले. मुख्य डॉक्टरांनी आरतीला डिस्चार्ज देण्याचे रहित केले आणि अभाअण्णाला “आपण सकाळी बोलू” एवढे सांगून निघून गेले.

अभाअण्णाची, अहिल्याची चिंता पुन्हा वाढली. रात्रभर थांबून डॉक्टर सकाळी काय सांगतात हे ऐकणे त्यांना भाग होते. दुसऱ्या दिवशी डॉक्टर सकाळीच हॉस्पिटलमध्ये आले आणि तडक आरतीच्या बेडजवळ गेले. त्यांनी अभाअण्णाला सांगितले की ताप भयंकर वाढल्यामुळे कदाचित आरतीला बोलता येत नसावे. तिचे उपचार या हॉस्पिटलमध्ये होणार नाहीत, त्याकरता त्यांना आरतीला घेऊन हैद्राबादला जावे लागेल. हे ऐकताच अभाअण्णाची, अहिल्याची बोबडी वळली, त्यांना काय करावे सुचेना. उपचारासाठी तातडीने हैद्राबादला जाणे आवश्यक होते. आरतीला अहिल्याजवळ सोडून अभाअण्णा सुवर्णपुरीला आला. त्याने बँकेतून पैसे काढले आणि पुन्हा जिल्ह्याच्या ठिकाणी परतला. दुसरे दिवशी आरतीला घेऊन अभाअण्णा, अहिल्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. दुपारी डॉक्टरांनी आरतीला तपासले आणि सांगितले की त्यांना बराच काळ आरतीवर उपचार करावे लागतील. दोन दिवस आरतीवर उपचार करून डॉक्टर त्यांना गावी जाण्यासाठी परवानगी देणार होते.

अजूनही बोलता न येणाऱ्या आरतीला घेऊन अभाअण्णा, अहिल्या सुवर्णपुरीला परतले. हैद्राबादच्या डॉक्टरांनी सुचविलेले औषधोपचार आणि तोंडाचे व्यायाम अभाअण्णाने आरतीकडून करून घ्यायला सुरवात केली. परंतु आरतीला अद्याप गुण येत नव्हता. एक महिना झाला तरी आरती बोलू शकत नव्हती. तिच्यावर अभाअण्णा, अहिल्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे उपचार करीत होते. एक दिवस अभाअण्णा तालुक्याच्या गावी जाऊन डॉक्टरांना भेटला आणि आरती केव्हा बरी होईल असे विचारले. डॉक्टरांचा चेहरा काळवंडला. ते म्हणाले, “आरतीला म्युटिझम नावाच्या व्याधीने ग्रासले आहे. मेंदूला इजा झाल्यामुळे माणसाची वाचा जाऊ शकते. फारच थोड्या केसेसमध्ये वाचा परत येऊन पेशंट पुन्हा बोलू शकतो. आरतीच्या बाबतीत सुदैवाने तसे घडो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.” हे ऐकताच अभाअण्णाच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला. अभाअण्णाचे पाय गळून गेले, तो अत्यंत दुःखी मनाने घरी परतला.

आरती आता बरीच सावरली होती, पण तिच्या तोंडून शब्द फुटण्याची क्रिया अजूनही घडत नव्हती. अहिल्याला आरतीकडे पाहून रडू कोसळत असे. असहाय्य आरती केवळ हावभाव करून तिला काय हवे-नको ते सांगे. बऱ्याच वेळा तिने केलेल्या हावभावाचा चुकीचा अर्थ अहिल्या, अभाअण्णा लावीत, त्यामुळे बराच गोंधळ उडे. परंतु काही दिवसांनंतर दोघांनाही तिच्या खाणाखुणा समजायला लागल्या.

आरती आता बरीच मोठी झाली होती. तिला शाळेत प्रवेश मिळणे दुरापास्त झाले होते. शाळेतल्या मुख्याध्यापकांनी आरतीला नांदेडमधल्या मूकबधिर शाळेत पाठविण्याचा सल्ला अभाअण्णाला दिला. परंतु अहिल्या आरतीला तिच्यापासून लांब जाऊ द्यायला तयार नव्हती. आरती परावलंबी असल्यामुळे अहिल्याला तिची काळजी वाटत होती. त्यामुळे जरी अभाअण्णा आरतीला नांदेडला पाठविण्याच्या मनःस्थितीत होता तरी अहिल्याचा त्याला विरोध होता. या वाद-विवादात वर्ष निघून गेले. अहिल्या आपल्या म्हणण्यावर ठाम होती. अभाअण्णाची अहिल्यासमोर डाळ शिजेना. आरती मोठी होऊ लागली, तिला अक्षरओळख होणेही शक्य नव्हते. अभाअण्णाला आरतीच्या भवितव्याची मोठी काळजी वाटत होती. लिहिता वाचता न येणाऱ्या आरतीला आपले उर्वरित आयुष्य कसे घालवता येईल या चिंतेने अभाअण्णा खूप अस्वस्थ होत होता. त्याचे, अहिल्याचे या विषयावर रोज वादविवाद होऊ लागले. शेवटी एक दिवस अहिल्याने अभाअण्णाला आरतीला नांदेडला पाठविण्याचासाठी संमती दिली.

आरतीला घेऊन अभाअण्णा नांदेडच्या शाळेत गेला. त्याने आरतीला शाळेत प्रवेश मिळवून दिला. शाळेतच खाण्या-पिण्याची सोय असल्यामुळे अभाअण्णाला बरे वाटले. भावनांचा बांध आवरून अभाअण्णाने आरतीला निरोप दिला आणि तो पुन्हा सुवर्णपुरीला आला. अहिल्याने रडून रडून तिची अवस्था भयंकर करून ठेवली होती. अभाअण्णा आल्यावर ती थोडी सावरली. तिने आरतीच्या शाळेविषयी, राहण्याविषयी अनेक प्रश्न विचारून अभाअण्णाला बेजार केले, परंतु अभाअण्णाला अहिल्याचे मन कळत होते. त्याने डोके शांत ठेवून तिच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामुळे अहिल्या बरीच शांत झाली.

एक बोलता न येण्याचे व्यंग सोडल्यास आरतीला अन्य काही अडचणी नव्हत्या. तिला खाणाखुणा करून तिच्या मैत्रिणींशी, शिक्षकांशी बोलावे लागे. शिक्षकांनीही तिला खाणाखुणांची शास्त्रोक्त पद्धती शिकवून तिचे इतरांशी होणारे संवाद सोपे केले. आरतीला नांदेडला येऊन वर्ष झाले होते. मध्यंतरी तिची आई तिला दोन वेळेस येऊन भेटून गेली होती. आरतीला तिच्या आईविषयी फार जिव्हाळा वाटे. परंतु दुर्दैवाने आईला ती आपल्या भावना बोलून दाखवू शकत नव्हती. बऱ्याच वेळा आरती डोळ्यातून अश्रू ढाळून भावनांना वाट करून देत असे. तिचे दुःख न सांगण्यासारखे होते. आरती आता बरीच मोठी झाली होती. ती फावल्या वेळात कधी शिक्षकांबरोबर, कधी मैत्रिणींबरोबर तर कधी एकटीच बाहेर पडत असे. शाळेपासून लांब जाण्याची परवानगी नसल्यामुळे ती शाळेच्या अवती-भोवतीच फिरे.

अभाअण्णाच्या एका दूरच्या नातेवाईकाने आग्रह केल्यामुळे येत्या काही दिवसात अभाअण्णाचे कुटुंब आणि त्याचे नातेवाईक पुष्करला भरणाऱ्या कार्तिक मेळ्याला जाण्याचे निश्चित करीत होते. अद्याप पुष्कर मेळ्याला जवळपास सहा महिन्यांचा अवधी होता. अभाअण्णाला वाटले तोपर्यंत शेतीची कामे उरकून घ्यावी म्हणजे यात्रेला गेल्यावर शेतीच्या कामांची काळजी नको. आरतीही तोपर्यंत सुट्टयांत येण्याची शक्यता होती. तिला सोबत घेऊन यात्रा करावी, यात्रा झाल्यावर आरती पुन्हा शाळेत जाऊ शकेल असा त्याने विचार केला. पुष्कर यात्रेसोबतच जोधपूरच्या अचलनाथ शिवालयाला जाण्याचा संकल्प अभाअण्णाने सोडला होता. शेतीची कामे शिल्लक राहू नये म्हणून अभाअण्णा, अहिल्या हल्ली सकाळीच लवकर उठून शेतावर जात आणि रात्री बरेच उशिरा घरी परतत.

अभाअण्णाने आरतीला घरी आणले. यात्रेला त्याच्या सोबत येणारे त्याचे नातेवाईक त्यांच्या पोराबाळांसह सुवर्णपुरीमध्ये येऊन दाखल झाले. दोन दिवसानंतर लहान मोठ्या आठ माणसांचा हा जथ्था यात्रेसाठी प्रस्थान ठेवणार होता. आरतीला नातेवाईकांमध्ये असलेली तिच्या बरोबरची जोडीदारीण भेटल्यामुळे आरती खुश होती. आरतीला आनंदी पाहून तिच्या आईला फार बरे वाटले.

दोन दिवसांचा प्रवास केल्यानंतर अभाअण्णा त्याच्या कुटुंबासह, नातेवाईकांसह पुष्करला पोहोचला. आरतीने आयुष्यात एवढी मोठी यात्रा पाहिली नव्हती. तिने पाहिलेल्या सुवर्णपुरीच्या यात्रेपेक्षा ही यात्रा कितीतरी मोठी होती. लहान मुलांना खेळण्याची, खाण्यापिण्याची, बागडण्याची, या यात्रेत चंगळ होती. अहिल्याने, अभाअण्णाने पवित्र तीर्थराज पुष्कर सरोवरात स्नान केले आणि जवळच असलेल्या ब्रम्हाच्या मंदिरात जाऊन अभिषेक केला. ठिकठिकाणी “अंडी, मांसभक्षण करण्यास मनाई आहे.“ अशा आशयाचे बोर्ड लावलेले त्याने पाहिले. पुष्कर सरोवराचे मनमोहक सौंदर्य पाहून सगळे खुश झाले. दुपारी पुन्हा एकदा सगळ्यांनी यात्रेत फेरफटका मारला आणि संध्याकाळचे जेवण उरकून मंडळी अजमेरला आली. अजमेरच्या अजमेर शरीफला चादर चढविण्याचा अभाअण्णाचा विचार होता, पण वेळेअभावी आणि जोधपूरला जाणारी रेल्वे पकडायची असल्यामुळे अभाअण्णाने नातेवाईकांसह अजमेर शरीफला धावती भेट देणे पसंत केले.

दुसरे दिवशी सकाळीच जोधपूरच्या स्टेशनवर सगळ्यांनी अंघोळी आटोपल्या आणि जोधपूरच्या प्रसिद्ध अचलनाथ मंदिराकडे कूच केले. शिवालयातल्या भव्य शिवलिंगाला पूजा अर्पण केली. मंदिरात बराच वेळ घालवल्यानंतर मंदिरातल्या अल्पदरातल्या जेवणाचा सगळ्यांनी लाभ घेतला. अभाअण्णा शिवभक्त होता, त्याला अचलनाथ शिवालय फार आवडले. शिवालय अतिभव्य होते. सोळाव्या शतकात त्याची निर्मिती झाली असे तेथील पुजाऱ्याने सांगितले. जवळच्या तीन चार किलोमीटर अंतरावरील कुंजबिहारी मंदिराला जाण्याचा सल्ला पुजाऱ्याने त्यांना दिला. कुंजबिहारी अर्थात घनःश्याम मंदिरही खूप मोठे होते. संत मीराबाईचा पूर्णाकृती पुतळा मंदिराच्या दर्शनी भागात आणि त्या पुतळ्यासमोर घनःश्याम अर्थात कृष्णाची पूर्णाकृती मूर्ती विराजमान होती. संत मीराबाईच्या पुतळ्या शेजारी संत नामदेवाचा अर्धपुतळा भाविकांचे लक्ष वेधून घेत होता.

दिवसभर बरीच पायपीट झाल्यामुळे सगळे थकले होते.अजून एक दिवस जोधपूरमधील प्रेक्षणीय स्थळे पाहून मंडळी सुवर्णपुरीला परतणार होती. सुवर्णपुरीला जाण्याकरता मंडळी जोधपूरच्या ‘भगत की कोठी ‘ या रेल्वे स्टेशनवर आले. अनेक पर्यटन स्थळांना भेटी दिल्यामुळे सगळेच थकले होते. केंव्हा एकदा गाडी फलाटावर लागते अन आपण अंग टाकतो असे सगळ्यांना झाले होते. थोड्याच वेळात गाडी फलाटावर लागली. अभाअण्णाकडे रिझर्वेशन नव्हते, त्यांनी जनरल बोगी गाठली आणि आपल्या बरोबर असणाऱ्यांना डब्यात बसायला सांगितले. गाडी फलाटावर लागता लागताच अभाअण्णासह सगळे डब्यात चढल्यामुळे जागा व्यवस्थित मिळाली. दिवसभराच्या धावपळीमुळे आरतीसकट लहान मंडळी बसल्या जागेवरच पेंगू लागली. मोठी माणसे सुस्तावली होती. त्यांनी बसल्या जागीच डोळे मिटले. अहिल्याने आरतीला बाकड्यावर झोपवले आणि ती स्वतःही पेंगू लागली. गाडीत गर्दी झाली. गाडी सुटायला थोडा अवकाश होता. शेजारच्या प्रवाशाने अभाअण्णाला विचारले, “कहाँ जाना हैं?” अभाअण्णा म्हणाला, “आंध्रा“. प्रश्न विचारणारा प्रवासी चमकून म्हणाला,”यह ट्रेन आंध्रा नही जायेगी, आंध्रा जानेवाली ट्रेन प्लॅटफॉर्म दो पर लगी हैं, और ट्रेन छुटनेका समय हो गया हैं“ हे ऐकताच अभाअण्णाची त्रेधा उडाली. लगबगीने त्याने, त्याच्या बायकोने, नातेवाईकांनी आपआपले सामान उचलले आणि पटापट गाडीतून उतरून दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मकडे धाव घेतली. गाडीत चढण्यापूर्वी अभाअण्णाने एकाला विचारले, ”यह ट्रेन काचीगुडा जायेगी?” त्या गृहस्थाने तोंडाने न बोलता होकारार्थी मान हलवली. अभाअण्णा, त्याच्या बरोबर असलेले नातेवाईक डब्यात शिरले. डबा गच्च भरला होता. कोणालाही बसायला जागा मिळाली नाही. सगळ्यांना कसेबसे सामान लावून उभे राहावे लागले आणि गाडी हलली.गाडी हले पर्यंत अभाअण्णाला किंवा अहिल्याला आरती सोबत आहे किंवा नाही याचे भान राहिले नव्हते. जवळपास अर्ध्या तासाने अहिल्याला आरती आपल्या जवळ नसल्याची जाणीव झाली. तिने अभाअण्णाला ओरडून विचारले, “आरती कुठे आहे?” या प्रश्नामुळे अभाअण्णा दचकला आणि अवती भोवती पाहू लागला, परंतु आरती कुठेही दिसेना. त्याने ओरडून आरतीला आवाज दिला परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. या दरम्यान अहिल्याला अचानक आठवण झाली, तिने झोपलेल्या आरतीला आपल्या सोबत घेतलेच नव्हते. आरतीला सोडून सगळे प्लॅटफॉर्म दोन कडे धावले. अहिल्याला वाटले अभाअण्णाच्या हाताशी आरती आहे आणि इथेच गफलत झाली. गाडीत चढताच गाडी सुरु झाली.

अभाअण्णाने गाडीची साखळी ओढली परंतु गाडी थांबण्याचे नाव घेईना. त्याने पुन्हा साखळी ओढली. गाडीचा वेग कमी झाला आणि थोड्या अंतरावर जाऊन गाडी थांबली. अहिल्या आरतीच्या नावाने टाहो फोडीत होती. गाडी पूर्णपणे थांबताच गार्ड डब्याजवळ आला, त्याने घुश्यातच विचारले, “चेन किसने खेचा?” गार्ड समोर येताच अभाअण्णाने त्याला आरती दुसऱ्या गाडीत राहिल्याचे सांगितले. गार्डच्या एकंदर परिस्थिती लक्ष्यात आली. त्याने अभाअण्णाला पुढच्या स्टेशनवर उतरून विरुद्ध बाजूला जाणारी गाडी पकडून जोधपूरला जाण्याचा सल्ला दिला. गार्डही जोधपूरच्या स्टेशन मास्तरला आरतीबाबत संदेश देणार होता. पुढचे स्टेशन येताच अभाअण्णा गार्ड दोघेही खाली उतरले. गार्डने जोधपूर स्टेशन मास्तरला आरती नावाची ८/१० वर्षाची मुलगी थार एक्सप्रेसमध्ये चुकून राहून गेली असल्याचे सांगून तिला ताब्यात घेण्याची विनंती केली. तिचे वडील जोधपूरला येणाऱ्या गाडीने येत आहेत हे सांगायला गार्ड विसरला नाही. जोधपूरकडे जाणारी गाडी बरीच उशिरा होती. थार एक्सप्रेस निघून जाण्यापूर्वी आरती गाडीच्या खाली उतरली तरच अभाअण्णाची तिची भेट होणार होती, अन्यथा नाही. स्टेशन मास्तर दयाळू होता. त्याने उलट दिशेने जाणाऱ्या एका थ्रू मालगाडीच्या गाडीच्या गार्डला थांबवून अभाअण्णाला जोधपूरला घेऊन जाण्याची विनंती केली. त्यामुळे अभाअण्णाला जोधपूरला लवकर पोहोचणे शक्य झाले. परंतु तो पोहोचेपर्यंत थार एक्सप्रेस कराचीकडे रवाना झाली होती. अभाअण्णाला जोधपूरला पोहोचण्यास तसा उशीरच झाला होता.

एव्हाना थार एक्सप्रेस भारतीय हद्द ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत शिरली होती. गाडीने झिरो पॉईंट स्टेशनही पार केले होते. झिरो पॉईंट रेल्वे स्टेशनवर तपासणीत पाकिस्तानी रेंजरला आरती गाडीच्या बाकावर बसलेली आढळली. त्यांनी तिच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्यांना काहीही प्रतिसाद मिळाला नाही. थोड्याच वेळात रेंजरच्या हे लक्ष्यात आले की त्या मुलीला बोलता येत नाही. ती खाणाखुणा करूनच संवाद साधू शकते. रेंजरने त्यांच्या कराची कॅन्टोमेंटच्या मुख्य कार्यालयात तिला नेण्याचे ठरवले. ते कराची स्टेशन येई पर्यंत तिच्या शेजारी बसून राहिले. आरती सारखी रडत होती. दोन दिवसांच्या दगदगीमुळे तिला पुन्हा ताप आला आणि ती आजारी झाली.

कराची स्टेशन येताच रेंजरनी आरतीला त्यांच्या कार्यालयात नेऊन अधिकाऱ्यांसमोर उभे केले . मध्यंतरीच्या काळात थेट जोधपूरच्या स्टेशन मास्तरचा संदेश आला. संदेशात त्यांनी नमूद केले की, “चुकून दहा वर्षांची मुलगी थार एक्सप्रेसमध्ये बसली आणि ती कदाचित कस्टम अधिकाऱ्याच्या हाती पडली असावी. मुलीजवळ कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नाहीत आणि तिला बोलता येत नाही. तिला परत जोधपूरला रवाना करावे. “परंतु रेंजरने अथवा अधिकाऱ्यांनी जोधपूरच्या स्टेशन मास्तरच्या म्हणण्याला मान्यता दिली नाही. आरती आजारी झाल्यामुळे तिला दवाखान्यात भरती करण्यात आले.

काही दिवसानंतर आरतीला बरे वाटले. कराचीमध्ये असणाऱ्या अपंग मुलांकरता काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेच्या संचालकाला बोलावून अधिकाऱ्यांनी आरतीला त्यांच्या हवाली केले आणि तिला भारतात कसे पाठवता येईल हे पाहण्याकरता सांगितले.

या सिंधी सामाजिक संस्थेने सरकार दरबारी आरती विषयी माहिती कळविली आणि तिला मायदेशी पाठविण्याकरता सहकार्य करण्याची विनंती केली परंतु त्यात त्या संस्थेला यश आले नाही. आरती सामाजिक संस्थेच्या अनाथगृहात राहत होती. आज ना उद्या आपल्याला आपल्या आईबापाकडे जाता येईल अशी भोळी आशा आरती बाळगून होती. परंतु धकाधकीच्या दुनियेत तिचे दुःख समजून तिला हिरीरीने मदत करण्याची कोणालाही इच्छा नव्हती.

आरती हळूहळू नवीन वातावरणात स्वतःला गुंतवून घेत होती. जरी बोलण्यास असमर्थ असली तरी लहान मोठी कामे करण्यात आरती तरबेज झाली होती. सामाजिक संस्थेमध्ये तिचे मन रमत नव्हते. परंतु ती जाणार तरी कुठे? आरती आता बारा तेरा वर्षाची झाली होती. तिने एका महिला डॉक्टरशी ओळख वाढवून तिच्या दवाखान्यात काम करण्याची तयारी दाखवली. परंतु आरती वयाने लहान असल्यामुळे डॉक्टर महिलेला तिला काम देणे योग्य वाटले नाही. त्याऐवजी डॉक्टरांच्या घरी असलेल्या दोन लहान मुलांकडे लक्ष देण्याची कामगिरी ती आरतीवर सोपवू शकत होती. तिने आरतीला आपल्या घरी बोलावून घेतले आणि दिवसभर लहान मुलांबरोबर खेळायचे काम दिले. आरतीला लहान मुलांचा लहानपणापासून लळा होता. तिने ते काम काम म्हणून न करता हौस म्हणू सुरु केले.

आरती पाहता पाहता बरीच मोठी झाली होती. ज्या डॉक्टर महिलेकडे ती राहत होती त्या महिलेला वाटले आता आपल्या मुलांना सांभाळण्याची गरज नाही, कारण दिवसभर ते शाळेत जातात. आरतीने दवाखान्यात नर्सच्या हाताखाली काम केल्यास नर्सला मदत होईल आणि आरतीलाही रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळेल. आरतीने घरी राहण्याऐवजी दवाखान्यात जाणे सुरु केले. रुग्णांची सेवा करताना तिला बऱ्याच वेळा तिच्या आईची आठवण येई. अशा वेळी आरती एखाद्या कोपऱ्यात जाऊन अश्रूंना वाट मोकळी करून देई. डॉक्टर महिलेला आरतीच्या या भावना समजत होत्या. डॉक्टरांनीसुद्धा सरकार दरबारी पत्रे पाठवून आरतीला मायदेशी पाठविण्याविषयी कार्यवाही करण्याची विनंती केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.

आरतीची परवड संपत नव्हती. वय वाढत होते. वाढत्या वयाबरोबर स्त्रियांना तोंड द्याव्या लागणाऱ्या अडचणीतून आरतीलाही जावे लागत होते. परंतु मन मोकळे करून सांगणार तरी कोणाला? डॉक्टर महिलेलाही अडचणी सांगण्याची मर्यादा होती. डॉक्टर महिला तिची आई नव्हत्या. आईजवळ मन मोकळे करणे वेगळे आणि परस्त्रीजवळ आपल्या अडचणी सांगणे वेगळे. आरती जरी मुकी होती तरी तिला स्त्रीसुलभ गोष्टींची जाणीव होती.

इकडे अभाअण्णा, अहिल्याने आरतीची आशा सोडली होती. आरतीची त्यांची ताटातूट होऊन बराच काळ लोटला होता. अभाअण्णाला आरतीचा शोध कसा ध्यावा याची माहितीही कोणाकडून मिळत नव्हती. आरती कुठे असेल, ती काय करीत असेल, ती या जगात तरी असेल का? असे विचार अहिल्याच्या मनात येऊन ती नाराज होई. तिच्या मनाची ही अवस्था कित्येक तास टिकून राही. मग तिला काही कामधंदा सुचत नसे. अभाअण्णा एकदा शेतात कामाला लागला की तो तहान भूक विसरत असे. त्याला आरतीची आठवण येत नव्हती असे नाही, पण केवळ आठवण येऊन आरती येणार नव्हती हे त्याला माहित होते.

आरतीच्या कामावर डॉक्टर खुश होती. परंतु आरतीकडे पाहून डॉक्टरांनाही अस्वस्थ वाटे. एक दिवस डॉक्टर महिलेला राजधानीत कुठल्याश्या परिसंवादाकरता जाण्याचा योग्य आला. राजधानीत तिचे अनेक मित्र होते, त्यापैकी काही निष्णात डॉक्टर तर काही प्रख्यात वकील होते. त्यापैकी एका जवळच्या वकील मित्राला भेटून तिने आरतीला तिच्या मायदेशी कसे पाठवता येईल याची चौकशी केली. वकील मित्राने पुढाकार घेऊन स्वतः भारतातल्या राजदूताला पत्र लिहिले. काही दिवसातच चौकशीची चक्रे फिरू लागली. कराचीस्थित डॉक्टरांना पत्र मिळाले की आरतीला मायदेशी पाठविण्यासाठी लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. या घटनेलाही सहा महिने उलटून गेले परंतु अद्याप आरतीच्या मायदेशी जाण्याविषयी काहीही झाले नाही. एक दिवस अचानक राजधानीतून पत्र आले आणि आरतीचे भाग्य उजळले. तिला भारतीय दूतावासाकडून बोलावणे आले होते. लवकरच तिला मायदेशी पाठविण्यासाठीची कार्यवाही होणार होती.

सर्व सोपस्कारांनंतर आरतीला भारतात रवाना करण्यात आले. तब्बल पंधरा सोळा वर्षानंतर आरतीचे पाय मायभूमीला लागले, परंतु आता नवीनच संकट उभे राहिले. आरती भारतात आली खरी पण तिच्या आई-बापाला शोधायचे कसे? मी मी म्हणणारे आईबाप खरोखरच तिचे आई बाप असतीलच कशावरून? तिचे खरेखुरे आईबाप शोधण्याची जबाबदारी एका सेवाभावी संस्थेने घेतली. अधिकाऱ्यांनी या संस्थेवर काम सोपवून आरतीचा दुवा घेतला. आरतीला अहिल्यामाता मिळेल तेव्हा मिळेल, आजतरी तिला विशाल हृदयाची कोट्यवधींना सामावून घेणारी भारत माता मिळाली होती.

सेवाभावी संस्था महाराष्ट्र , तेलंगणा प्रांतात आरतीच्या आईवडिलांचा शोध घेऊ लागली. परंतु अद्याप त्यांना त्यात यश येत नव्हते. यश येईल की नाही याचा अंदाज आज येऊ शकत नव्हता. आरतीच्या जीवनात अजून किती दिवस वनवास होता हे कोणी सांगू शकत नव्हते. तिला तिचे आईवडील भेटणार होते की नाही यावरच तिचे पुढील आयुष्य कसे जाणार हे अवलंबून होते. जर तिला तिच्या आईवडिलांचा आधार मिळाला नाही तर काय होणार ? आरतीचे उर्वरित आयुष्य असेच एकाकी हालापेष्टांमध्ये, कोणाच्या मायेची फुंकर न मिळता जाणार होते? या प्रश्नाचे उत्तर काळच देऊ शकणार होता.

Comments

Popular posts from this blog

गाईड

कोविड विषाणू : नवा ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंट