प्रभा

विदुला कोल्हटकर

'दादासाहेब गायकवाड दवाखान्यात दाखल’
‘प्रकृती गंभीर तरी स्थिर डॉक्टरांनी दिला निर्वाळा’
‘पुढील ४८ तास महत्त्वाचे’

झटपट बातम्यांमध्ये पार्श्वसंगीतासोबत एकेक वाक्य पडद्यावर आदळत होते.
कल्पनाताईंनी प्रश्नार्थक नजरेने शिल्पाकडे पहिले.
"काय झालं कुणास ठाऊक. अर्थात कळेलच पुढच्या पाच मिनिटांत, अगदी माहिती नको असली तरी कळेल… ते केवळ लेखक म्हणून नाही पण एकंदरच या भागात प्रसिद्ध आहेत." शिल्पाच्या सांगण्यावर कल्पनाताईंनी मान डोलावली.

कल्पनाताई बऱ्याच वर्षांनी त्यांच्या फार्महाऊसवर राहायला आल्या होत्या. एरवी मुंबईला असताना एखाद्या दिवशी येऊन जात. या वेळी त्या मुद्दाम थोडे दिवस रहायचं ठरवून आल्या होत्या. शिल्पा देखरेखीसाठी फार्महाऊसवर यायची आणि कोणी राहायला आलं असेल तर घरातलं सगळं काम करायची. याच गावातली असल्याने तिला गावातली सगळी माहिती असायची.

वृत्तनिवेदकाने पुढची माहिती सांगायला सुरुवात केली "१५ दिवसांपूर्वीच दादासाहेबांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा झाला होता. अत्यंत शिस्तबद्ध, रोजचा व्यायाम, नियमित आहार, रोजच लेखन वाचन असा कोणालाही आदर्श वाटावा असा दिनक्रम असलेले दादासाहेब. काल दुपारी त्यांच्या राहत्या घरी जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळले. सध्या त्यांची शुद्ध हरपली आहे. मात्र ते स्थानिक तज्ज्ञांच्या देखरेखीत आहेत."

"काल सहलीनिमित्त तुम्ही त्यांच्याच वाड्याला भेट द्यायला गेला होतात ना?" शिल्पाने विचारले.
"हो हो, कालच तर तिथे होतो आम्ही." कल्पनाताई म्हणाल्या.
बातमीदार आता थेट हॉस्पिटलच्या दारापाशी होता. “आता आपण ऐकूया दादासाहेबांचे धाकटे सुपुत्र संजयजींची प्रतिक्रिया.” "काल नेहमीप्रमाणे जेवायच्या आधी त्यांचे लिखाणाचे काम चालू होते, किंवा असणार. ते वेळेचे पक्के आहेत. आणि नंतर जेवायला आले नाहीत म्हणून बघायला गेलो तर ते जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळले. आता ते स्वतःच पडले का त्यांना पाडण्यात आलं कुणास ठाऊक!" आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित भाव दाखवायला कॅमेरा जरा रेंगाळला.

‘दादासाहेब गायकवाड दवाखान्यात दाखल’
‘कुटुंबीयांनी व्यक्त केला घातपाताचा संशय’
“झालं आता यांना चांगलच कोलीत मिळालं. आता आठवडाभर हेच चालू राहील.” असं म्हणत शिल्पा चहा टाकायला स्वयंपाकघरात गेली आणि कल्पनाताई कालच्या सहलीच्या आठवणींत रमल्या.
गाडी थांबताच कल्पनाताई दार उघडून बाहेर पडल्या. त्यांच्या ग्रुपमधल्या बाकीच्या बायकाही एकेक करून गाडीतून बाहेर आल्या. वाड्याचा उंच आणि मजबूत दरवाजा पाहून त्यांना बर वाटलं. 'नाहीतर बाकीच्या किल्ल्यांची काय दुरवस्था झाली आहे' त्यांच्या मनात विचार आला. सगळ्याजणी बाहेर आल्यावर त्यांनी वाड्याकडे कूच केलं. त्यांनी आधीच वेळ ठरवलेली असल्याने त्यांच्या स्वागताला रायबा तयारच होता. आल्या आल्या त्यांचं स्वागत भीमाबाईने दिलेल्या वाळ्याच्या छान सरबताने झालं. रायबा आणि भीमाबाई दोघांनी जुन्या काळाला साजेसे कपडे घातले होते. दोघांच्या पोशाखांनी आणि वाड्यावरच्या त्या वातावरणाने सगळ्याजणी एकदम अठराव्या शतकात गेल्या.
रायबा आणि भीमाबाई त्यांना एकेक दालन दाखवत, प्रत्येक दालनाची खासियत, तिथे कोणते कार्यक्रम, बैठका झाल्या, त्यांचे इतिहासातले स्थान, आणि त्यांचं कौतुक सांगत होते. दोघांना भरपूर माहिती होती आणि ती कशी सांगावी याचं कसबही होतं. सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत देत त्यांची सफर चालू होती. तितक्यात वाड्याच्या सध्याच्या मालकांचा विषय सुरु झाला.
"आमचे मोठे मालक दादासाहेब वाड्याच्याच बाजूला राहतात. त्यांचा थोरला मुलगा म्हणजे आमचे थोरले मालक इथेच गावात असतात. त्यांचा धाकटा मुलगा म्हणजे धाकटे मालक दूर तिकडे दक्षिणेत होते बरीच वर्षं, पण मागच्या महिन्यात दादासाहेबांच्या सहस्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी का होईना पण इकडे परत आले. आता रोज संध्याकाळी येतात भेटायला," रायबा म्हणाला.
"हो ना, आमच्या मोठ्या मालकांचं आता वय झालंय. पंधरा दिवसापूर्वीच तर वाढदिवसाचा मोठा कार्यक्रम झाला!" भीमाबाईंनी मोठ्या अभिमानाने माहिती पुरवली.
"हो मी बघितलं बातम्यांमध्ये. दादासाहेब, त्यांचा मोठा मुलगा आणि मला वाटतं धाकटा मुलगा पण होता," सुनंदाताई म्हणाल्या. त्यावर आणखी तीन-चार जणींनी माना डोलावल्या.
"अं हो ना," जरासा चाचरत रायबा म्हणाला. मग सावरून म्हणाला "ते तिकडे दूर केरळला असतात. बऱ्याच वर्षांनी मोठ्या कार्यक्रमासाठी म्हणून मुद्दाम आले होते."
"तुला बरीच माहिती दिसते सगळ्याची," नीलिमाताई हसत हसत म्हणाल्या.
"हो पिढ्यानपिढ्या आम्ही या वाड्याचं काम बघतोय. मालकांच्या जितक्या पिढ्या इथे राहिल्या तितक्याच आमच्या पिढ्याही इथे सेवेत आहेत. मध्ये बरीच वर्षं वाड्याला उतरती कळा लागली होती. त्यावेळी मालकांनीच अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या शेतीवर आमची गुजराण चालू होती. मी पण कॉलेजमध्ये इतिहासाचा विद्यार्थी आहे. आठवड्यातले ३-४ दिवस इथे काम करतो. लोकांना वाड्याची, इतिहासाची माहिती देतो. ही भीमाबाई किंवा खरंतर भाविनी पण माझ्याच कॉलेजमध्ये शिकते. मालकांनी वाड्याची डागडुजी करून परत सगळं पाहिल्यासारखं केलं. माझ्या आजाला फार बरं वाटलं." रायबाच्या स्वरातला आनंद आणि अभिमान लपत नव्हता. या दोघांना असणारी माहिती आणि ती सांगण्यातल्या उत्साहाचा जरा उलगडा झाल्यासारखे सगळ्यांना वाटले.

सगळे फिरत फिरत वाड्यातल्या गणपतीच्या देवळात आले. देव्हाऱ्यातली मूर्ती छोटीशीच, पण पाहून प्रसन्न वाटावी अशी होती. छान सुबक शेवंतीचा हार, जास्वदाचं लाल फूल आणि हिरवीगार दुर्वांची जुडी. बघताच आपोआप सगळ्यांनी हात जोडले. देऊळ छोटेखानी पण सुंदर होते. खिडक्या आणि झरोके असलेलं मध्यम आकाराचं गर्भगृह, दगडी चौथऱ्यावर सागवानी लाकडाचे कोरीव काम केलेले खांब आणि महिरप, काचेच्या हंड्या असलेला मंडप. कल्पनाताई देऊळ बघून अगदी खूश झाल्या. तेवढ्यात "नमस्कार, नमस्कार," म्हणत एक उंच-निंच बलदंड गृहस्थ मंडपात त्यांच्या घोळक्याकडेच येत होते.
"नमस्कार धाकटे मालक," म्हणत रायबा पुढे झाला.
"अरे तुला किती वेळा सांगितलं मालक वगैरे नको, फारतर संजय दादा म्हण," संजयदादा हसून म्हणाले. रायबाच्या चेहरा मात्र निर्विकारच होता.

संजय साधारण ५०-५५ वर्षांचा असेल, चांगला उंच आणि देखणा. चेहऱ्यावरची मग्रुरी मात्र शोभून दिसते असे नाईलाजाने का होईना म्हणायला लागावे. गेल्या २-३ आठवड्यात संजय एकदम प्रसिद्धीच्या झोतात होता. तो आल्याबरोबर आजूबाजूचे सगळे त्याच्याबरोबर सेल्फी काढून घेत होते. कल्पनाताई मात्र त्याच्याकडे बघत होत्या.
‘हा दक्षिणेला गेला! म्हणजे खरतर मुंबईला चित्रपटात काम करायला निघून गेला असं म्हणाले असते लोक तर पटलं असतं. पण दक्षिणेला?’ इतक्यात संजयने सेल्फी काढताना मान वळवली आणि कानातली भिकबाळी एकदम चमकली. त्यातला लालबुंद माणिक आणि त्याची प्रभा संजयच्या कानशिलापाशी पडली होती. त्यातले मोती अगदी खुलून दिसत होते.
"तुमची भिकबाळी अगदी सुरेख आहे," कल्पनाताई पटकन म्हणाल्या.
"हो ना भिकबाळी नवीन असली तरी आमच्या राजघराण्यातले जुन्या काळातले अस्सल मोती आणि माणिक आहेत," संजयने तोऱ्यात सांगितलं. आणखी थोडे फोटो काढून झाल्यावर संजय देवळातून बाहेर पडून वाड्याच्या मागच्या बाजूला गेला. रायबाने हळूच मान कलती करून तिकडे बघितलं आणि चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पुसून टाकत "चला, आता आमचा जुना मुदपाकखाना बघू," म्हणत पुढे झाला. "नवीन किचन तिकडे मोठे मालक राहतात तिथे आहे, पण हे वाड्याचं जुनं वैभव!" भीमाबाईंनी माहिती पुरवली. मग पुढे खासगी दालनं, निवासस्थानं, तिथली बाग बघून सगळे परतीच्या वाटेला लागले.

जाता जाता परत एकदा ते गणपतीचे छोटेखानी देऊळ दिसले आणि सगळ्यांचे पाय तिकडे वळले. तिथे १०-१५ मिनिटे थांबून निघू असे सगळ्यांचे ठरले. मग काहीजणी सभामंडपातच बसल्या, नाही म्हटलं तरी बरंच चालणं झालं होतं. काही प्रसाधनगृहाकडे वळल्या, एक-दोन जणी मंदिराचं निरीक्षण करत होत्या. कल्पनाताई त्यातच होत्या. सागवानी लाकडावरचे कोरीव काम फारच सुरेख होतं. त्याचंच निरीक्षण करत होत्या. इतक्यात धापा टाकत संजय येताना दिसला. समोर कल्पनाताईंना बघून तो चमकला, पण त्याने पटकन त्याचे हुकुमी हास्य चेहऱ्यावर आणलं. "काय मग कसा काय वाटला आमचा वाडा?" संजयने विचारलं. "फारच आवडला. विशेषतः आपल्या इथल्या बाकीच्या ऐतिहासिक वाड्यांची, किल्ल्यांची दुरवस्था बघता आणखीच छान वाटलं. असाच कायम टिकून राहू दे," कल्पनाताई मनापासून दाद देत म्हणाल्या. पण संजयचं लक्ष मात्र त्यांच्या बोलण्याकडे नव्हतं. त्याचा चेहरा पण आधीसारखा दिसत नव्हता. 'काहीतरी खटकतंय!' कल्पनाताई मनात म्हणाल्या. इतक्यात "चला चला निघूया, नाहीतर पोचायला उशीर होईल," असं म्हणत निर्मलाताई आल्या आणि सगळ्याजणी गाडीकडे जायला निघाल्या.

'काहीतरी खटकतंय... पण काय?' उसासा टाकत कल्पनाताई मनातल्या मनात म्हणाल्या.
इतक्यात त्यांचा फोन वाजला आणि त्या वर्तमानात आल्या. "हां, बोल ग जयू, बरं, काय झालं सासऱ्यांना? आणि आता कसे आहेत? हो हो काही हरकत नाही. मी अजून आठवडाभर इथे आहे. दोन तीन दिवसांनी सुद्धा मला चालेल. तसे काही कार्यक्रम ठरले नाहीयेत आणि या खेपेला तुला भेटायचं ठरवूनच आले होते तर तू दोन तीन दिवसांनी कळवलंस तरी चालेल. फक्त मला तिकडे यायचं कसं ते बघावं लागेल. पण ते बघू. तुझ्या सासऱ्यांना बरं वाटू दे."

"काकू कोणाचा फोन होता?" म्हणत शिल्पा चहाचे कप घेऊन आली.
"अगं माझी ती शाळेतली मैत्रीण जयश्री पाटील, तिचा. सातवी ते दहावी मी आणि जयू एकाच बाकावर बसायचो. नंतर तिच्या वडलांची बदली नागपूरला झाली आणि तिचं पुढचं शिक्षण पण तिकडेच झालं. बरं, तेव्हा काही फोन नव्हते, त्यामुळे सुरुवातीला अधून-मधून पत्र पाठवायचो. मग ते पण थांबलं. २-३ वर्षांपूर्वी शाळेचा व्हाट्सअप ग्रुप तयार झाला तेव्हा परत सापडली. आता निदान मेसेज पाठवतो, पण त्यात भेटण्याची मजा नाही. मी रहायला इकडे येणार कळल्यावर मात्र आता भेटल्याशिवाय परत जायचं नाही असंच ठरवलंय. आमचं आज संध्याकाळी भेटायचं ठरलं होतं, पण तिच्या सासऱ्यांना दवाखान्यात ठेवलंय. त्यामुळे आजचा कार्यक्रम रद्द."
"काय झालं? आणि कुठल्या दवाखान्यात आहेत?"
"चक्कर येऊन पडले म्हणाली. तसं फारसं लागलं नाहीये, पण दवाखान्यात आहेत. कुठल्या ते विचारायचं मात्र राहिलं. तिने जरा घाईतच फोन ठेवला. करेन म्हणाली २-३ दिवसांनी."
"ठीक आहे. त्यांचा फोन आला आणि तुमचं ठरलं की सांगा".
आणि तो विषय तिथेच संपला.

दुसऱ्या दिवशी सकाळी कल्पनाताई पेपर वाचत होत्या. त्यात दादासाहेब गायकवाडांबद्दल माहिती आली होती. गायकवाड इथले राजे, खरंतर पूर्वापार वतनदार, पण मधल्या अनेक पिढ्या स्वतःला इथले राजे समजत. दादासाहेब इतिहासाचे हौशी अभ्यासक, लेखक, शिवाय नव्या तंत्रज्ञानाचे चाहते. पूर्वापार असलेल्या संपत्तीचा त्यांनी योग्य वापर करून गावात अनेक नवे कारखाने, नवे उद्योग सुरु केले. 'शिल्पा म्हणाली ते खरंच, इथल्या अनेकांना त्यांच्यामुळे रोजगार मिळाला असेल तर ते नक्कीच लोकप्रिय असणार.' काम काहीच नव्हतं, मग कल्पनाताईंनी टीव्ही चालू केला. गायकवाड वाडा परत बातम्यांत होता. ‘दादासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र अद्याप नक्की काय झालं ते कळलं नाही.’ ‘कुटुंबीयांनी व्यक्त केला घातपाताचा संशय.’ 'अरे देवा हे आता किती दिवस चालू राहील? ... नवीन बातमी मिळेपर्यंत? नेहमीचंच झालंय हल्ली!' मनातल्या मनात म्हणत त्यांनी दुसरा चॅनल लावला.
‘कोण आहेत संजय गायकवाड?’
‘जाणून घ्या संजयजींची कथा’
'अरे देवा! इथे पण तेच!'
‘संजय आणि त्याचा निघतानाचा चेहरा... काहीतरी खटकतंय ....’ कल्पनाताईंना आठवलं.
“नमस्कार आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत केरळ राज्यातल्या कत्तुर नावाच्या गावाला. केरळच्या राजघराण्यातील राणी गायत्रीबाईंच्या वंशज कावेरीबाई इथे राहतात. इथल्या मातृसत्ताक पद्धतीनुसार त्या राजघराण्यातील पुढच्या राणीसाहेब आहेत. दादासाहेब गायकवाडांचे दुसरे पुत्र संजयजी कावेरीबाईंशी अठरा वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाले. त्यांचे चिरंजीव अक्षय, कावेरीबाई आणि संजयजी याच गावात राहतात. तर आता जाणून घेऊया या गावाबद्दल.”
‘अरे देवा कुठे चाललंय हे सगळं? आता उद्या या गावातल्या प्रसिद्ध चहावाल्याबद्दल जाणून घेऊ या म्हणून त्याच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करतील. कठीण आहे!’ असं म्हणत कल्पनाताईंनी टीव्ही बंद केला. 'राजघराणं आणि राणीसाहेबांचं हे आकर्षण जगभरातच आहे म्हणायचं. पण आता मातृसत्ताक पद्धतीत या संजयच्या मुलाला काही राजा म्हणवून घेता येणार नाही,' असं मनातल्या मनात म्हणत कल्पनाताई पेपरमधल्या अग्रलेखाकडे वळल्या.

दादासाहेब गायकवाडांच्या बातम्या येतच होत्या. प्रकृती स्थिर, प्रकृतीत सुधारणा, अखेर दोन दिवसांनी शुद्धीवर आल्याची बातमी आली. "वा वा! दादासाहेब बरे होऊ दे आणि आतातरी या बातम्यांपासून सुटका होऊ दे," शिल्पा हसून म्हणाली. इतक्यात टीव्हीवर पुन्हा संजयचा चेहरा झळकला. "दादासाहेब शुद्धीवर आले आहेत. माझी अद्याप भेट झाली नाही, पण डॉक्टर म्हणाले त्यांना २-३ दिवसात घरी जाता येईल. ही सारी भवानीमातेची कृपा!" संजय म्हणाला. 'याच्या चेहऱ्यावर काळजी दिसते आहे का? पण दादासाहेब तर आता बरे आहेत म्हणतोय, का काहीतरी नीट सांगत नाहीये? अरे देवा, बातम्या पुन्हा सुरु व्हायच्या!' कल्पनाताईंच्या मनात आलं.

दोन दिवसांनी जयूचा फोन आला. "अगं आज तुला वेळ आहे ना? मी तुला घ्यायला येते."
इतक्या वर्षांनी जयूची भेट होणार म्हणून कल्पनाताई खूष झाल्या. बरोबर १० वाजता जयूचा “मी बाहेर आहे, तयार असशील तर ये पटकन” म्हणून फोन आला आणि कल्पनाताई लगेच निघाल्या. जयू बाहेरच उभी होती. कल्पनाताई बाहेर पडल्यापडल्या "अगं किती वर्षांनी!" म्हणत दोघी हातात हात गुंफून मनापासून हसल्या. जयूने तिच्या भल्यामोठ्या गाडीचे मागचे दार उघडले आणि चल निघूया म्हणाली. आत बसल्यावर ड्रायवरने "आता घरी जायचं आहे ना?" विचारल्यावर जयूने मानेनंच हो सांगितलं. "सासरे बरे आहेत. शुद्धीवर आलेत पण अजून बोलत नाहीयेत. पण आता काळजीच कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. उद्या परवा घरी सोडतील. मग काही आपली भेट होणार नाही, म्हणून हे म्हणाले आजच बोलाव" जयूच्या पहिल्याच उत्तराने कल्पनाताईंना हलके वाटले. समोर गाडी सुरु झाली आणि मागे दोघींच्या गप्पा. मग सध्या काय चालू आहे, मुलं काय करतात, कुठे असतात, बाकी शाळेतल कुणी भेटलं होत का, वगैरे नेहमीच्या गप्पा चालू झाल्या. त्यातून कल्पनाताईंना त्यांची एक चूक लक्षात आली. आपल्या डोक्यात आणि फोनमध्ये जरी ही जयश्री पाटील असली तरी आता ती जयश्री गायकवाड आहे! आणि तिचे सासरे म्हणजे दादासाहेब गायकवाड!

गप्पांचा पहिला पूर ओसरेपर्यंत घर आलंच. बंगला प्रशस्त होता. आत आल्यावर कल्पनाताईंनी विचारलं, "काय गं, पण दादासाहेब पडले कशाने? काही त्रास होता का? आणि तुझ्या दिराने तर पडले का पाडण्यात आलं असा नवा सस्पेन्स तयार केला.” "हो ना, सध्या तो एक ताप झालाय डोक्याला. दादांना अजून बोलता येत नाहीये. तिथे कॅमेरे आहेत पण इतरत्र होत तसं नेमक्यावेळी वीज नसल्याने कोणी आलं होत का कळत नाहीये. लोक काय दहा तोंडानी दहा गोष्टी बोलतात!" जयू म्हणाली. “अगं आम्हीपण त्याच दिवशी तिथे होतो. तुझे दीर, संजय, ते भेटले होते.” कल्पनाताईंनी सांगितलं. "हं . आज पण भेट होईलच परत तुझी. दोन- तीन दिवसातच निघणार आहेत ते त्यांच्या खोलीत राजा रविवर्मानी काढलेल्या चित्राची कॉपी आहे ती आमच्या जाऊबाईंना भेट म्हणून द्यायची आहे. ती घ्यायला यायचे आहेत." जयूने माहिती पुरवली. मग पुढे राजघराणं, संजयच त्याबद्दलच आकर्षण, त्यावरून आधुनिक विचारांच्या दादासाहेबांशी उडालेले खटके, मग रागावून नाहीसा झालेला संजय, पुढे त्याचा केरळमधल्या कावेरीबाईंबरोबर झालेला विवाह, अशी बरीच माहिती जयूने सांगितली. "किती दिवस मनात होत हे सगळं, पण इथे कुणाशी या विषयावर बोलायची चोरी. त्यातून भावोजींनी तयार केलेला सस्पेन्स आणि त्याची डोकेदुखी. आता नवाच ताप आहे. पोलिसांना सांगावं का तपास करायला? दादांना नीट बोलता यायला लागलं तर प्रश्न लवकर सुटेल. तुझ्याशी सगळं बोलून बरं वाटलं बघ!”

गप्पा चालूच होत्या. जेवायची तयारी होईपर्यंत दोघी बाग बघायला म्हणून बाहेर पडल्या. त्या बाहेर फिरत असतानाच संजय आला. आणि दोघींना बघून त्यांच्याशी बोलायला आला. "या भावोजी. ही माझी मैत्रीण कल्पना. मुंबईला असते आता. नुकतीच आपला वाडा बघायला गेली होती तेव्हा तिथे तुमची भेट झाली म्हणाली," जयूने एका दमात सांगून टाकलं. "अं, हो भेटल्या होत्या मला वाटतं, मोठा ग्रुप आला होता," संजय चाचरत म्हणाला आणि जायला निघाला. कल्पनाताई त्याच्याकडेच बघत होत्या 'काहीतरी खटकतंय...' त्या दिवसाची आठवण आल्यावर त्यांना आठवलं. इतक्यात वाऱ्याच्या झुळकीने झाडाची पानं हलून उन्हाचा कवडसा संजयच्या कानावर पडला आणि त्यातल्या माणकाची प्रभा कानापाशी पडली. 'भिकबाळी!' युरेका युरेका मोमेन्ट म्हणतात तो हाच!

संजय कधी जातोय आणि जयूशी कधी बोलते असं कल्पनाताईंना झालं. तो गेल्या गेल्या त्या म्हणाल्या "अगं हा संजय हाच त्यादिवशी दादासाहेबांना भेटायला आला होता. आल्यावर त्याने सगळ्यांबरोबर फोटो काढून घेतले आणि माझा अंदाज आहे तो दादासाहेबांना भेटायला गेला. तिथे नक्की काहीतरी झटापट झाली आणि त्यात दादासाहेब पडले. तू विचारशील कशावरून तर जाताना आम्ही परत भेटलो तर याची भिकबाळी वाकलेली होती. गालावर जरा काहीतरी लागलं आहे असं वाटत होतं आणि चेहऱ्यावर ताणही दिसत होता. त्यादिवशीच मला जाणवलं की काहीतरी खटकतंय, पण काय ते आत्ता लक्षात आलं. भिकबाळी. त्यातले मोती आणि माणिक इतके सुरेख आहेत की आल्याआल्या फोटोसेशन चालू होतं तेव्हा अगदी लक्ष वेधून घेत होती ती भिकबाळी. नंतर आम्ही निघताना भेट झाली तेव्हा वाकलेली होती पण आता परत नीट व्यवस्थित आहे."

पुढच्या आठवड्यात कल्पनाताई मुंबईला परतल्या आणि दोन दिवसातच जयूचा फोन आला. "तुझे आभार मानायला फोन केला. तू म्हणालीस ते सगळं तंतोतंत खरं निघालं. भावोजींचं राजघराण्याचं आकर्षण त्यावरून दादांशी झालेला वाद आणि झटापट. उगीचच काहीतरी बोलायचं म्हणून त्यांनीच तयार केलेला सस्पेन्स, सगळं कबूल केलं. आता राजा आणि राजघराणं या विषयावर पुन्हा बोलणार नाही असं वचन दिलं त्यांनी आणि आम्ही झाल्या प्रकरणावर पडदा टाकला. न्यूज चॅनलवाल्यांना काहीतरी नवी गोष्ट मिळाल्याने त्यांनी पण हा विषय सोडला. खरंच तुझ्या मदतीशिवाय हे झालं नसतं." आपली मदत झाल्याचं ऐकून कल्पनाताईंना बरं वाटलं आणि त्या खिडकीतून खाली काय आवाज येतोय ते बघायला गेल्या.

Comments

Popular posts from this blog

गाईड

कोविड विषाणू : नवा ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंट