भेटी लागी जीवा

            दीपा अनिल नातू

२०२० चे वर्ष कोरोनामुळे सगळ्यांनाच वाईट गेले होते. पण त्यातल्या त्यात वर्ष सरता सरता म्हणजे २९ डिसेंबर २०२० रोजी आमच्या पहिल्या वहिल्या नातवंडाच्या आगमनाची गोड वार्ता आम्हाला कळली आणि मन आनंदून गेले. हल्ली लगेच फोटो काढतात त्यामुळे आणि व्हिडिओ कॅालमुळे आम्हाला त्याला लगेच बघता आले.

आमचा मुलगा, सून आणि मुलगी सगळेच अमेरीकेत असतात. सुनेची आई नोव्हेंबर महिन्यात इकडे आली होती. आम्ही दररोज व्हिडिओ कॅालची आतुरतेने वाट बघत असायचो. झूमवरती सर्व आप्तेष्टांना बोलावून बाळाचे बारसे केले आणि *संविद* नांव ठेवले. नवीन तंत्रज्ञानामुळे हे सगळे सहज शक्य होत होते. रोज त्याच्या बाळलीला बघून खूप छान वाटायचे. ह्या वर्षभरात सगळेच ‘वर्क फ्रॉम होम’ करत असल्याने बाळाकडे बघण्याच्या दृष्टीने खूप सोयीचे झाले.

बघता बघता संविद चार महिन्यांचा झाला. आधी ठरल्याप्रमाणेच सुनेची आई १९ मे पर्यंत राहू शकत होती आणि आम्ही १९ मे ला तिकडे पोहचणार होतो. तसे आमचे तिकीटही काढून झाले होते. कोविडची साथ वाढतच होती. भारतात लसीकरणाला जोरात सुरवात झाली होती. आम्ही पण इकडे यायचे म्हणून लगेचच लसीकरण करुन घेतले. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमचा दुसरा डोसही घेऊन झाला. जाण्याची सर्व तयारी पूर्ण होत आली. बॅगा भरुन झाल्या. आता मनाने तर आम्ही कधीच संविदकडे पोहोचलो होतो. पण आमच्या दुर्दैवाने ४ मे पासून अमेरीकेने भारतातील प्रवाशांना येण्याची बंदी जाहीर केली आणि आमच्या आनंदावर विरजण पडले.

आता बंदी कधी उठणार याची वाट बघणेच फक्त आमच्या हातात होते. रोज सकाळी उठल्यावर मी पहिल्यांदा बंदीविषयी काही बातमी आहे का बघत असे. पण काहीच घडत नव्हते. कोविडबाधितांचे प्रमाण हळूहळू कमी होत होते. आमचे नातेवाईक, मित्रमंडळी सगळेच सतत विचारपूस करत होते, काही बातमी कळली का यासंबधी. मुलाचीपण सारखी चौकशी चालू होतीच. असे करता करता ॲागस्ट महिना उजाडला. आम्ही सगळेच जण आता वाट बघून कंटाळलो होतो. तेवढ्यात एक आशेचा किरण दिसला.

अमेरीकेला भारतातून थेट येण्याची परवानगी नव्हती, पण भारताबाहेर १४ दिवस राहून अमेरीकेला जाणे शक्य होते. ज्या देशांवर बंदी नाही तिथे राहून जाता येत होते. अशा येऊ इच्छिणाऱ्यांचा एक गट होता, ज्यांच्याशी मुलाने संपर्क साधला आणि मग बरीच माहिती कळत गेली. सुनेच्या आईचा व्हिसाच्या मुदतवाढीसाठी अर्ज करुन झाला होता. त्यामुळे आम्ही जाईपर्यंत ती राहणार होती. मग शेवटी बरीच चर्चा करुन दोहामार्गे अमेरीकेत यायचे ठरले. पण दोहामध्ये आम्हाला १० दिवस विलगीकरणात रहावे लागणार होते. त्याचे पॅकेज दोहा विमानतळापासूनच सुरु होणार होते. विमानतळावरुन कॅबमधून थेट हॅाटेलमध्ये व तेथे दहा दिवस पूर्णपणे विलगीकरण. खोलीच्या बाहेर पडायचीही परवानगी नव्हती.

मुलगा, सून, मुलगी आणि आम्ही सर्वांनी विचाराअंती हाच पर्याय योग्य वाटतोय असा निर्णय घेतला आणि १६ ॲागस्टचे पुणे-दिल्ली-दोहा असे इंडिगो एअरलाईन्सचे तिकिट काढले. पुण्यातली आवराआवर करुन आम्ही एकदाचे आता निघणार होतो. टीव्हीवर वारंवार RT-PCR चाचणी करतानाच्या बातम्या बघितल्या होत्या. ते दृश्य बघून मला चाचणी करायची खूप भीती वाटत होती. पण नंतर एकूण चार वेळा ह्या चाचण्या आम्हाला कराव्या लागल्या. निघायच्या आधी ४८ तास चाचणी करुन अहवाल मिळाल्यावर तो अहवाल आणि हॅाटेल बुकिंग वगैरे बाकीची माहिती त्यांच्या ‘Ehteraj App’वर भरायची होती. नंतर त्यांच्याकडून मंजुरी मिळणार होती. ती सगळी माहिती भरुन झाली व त्यांची मंजुरीची ईमेलपण लगेच आली. एक टप्पा पूर्ण झाला होता.

पुण्याहून सर्व आवश्यक ती कागदपत्रे, RT-PCR चा निगेटिव्ह अहवाल घेऊन पुणे-दिल्ली प्रवास मास्क, प्लॅस्टिक शिल्ड व प्लॅस्टिक किट घालून पूर्ण केला. दिल्ली-दोहा विमानात मधली सीट मोकळीच ठेवलेली होती त्यामुळे तिथे किट घालावे लागले नाही. १६ तारखेलाच रात्री ११.३० वाजता आम्ही दोह्यात पोहोचलो. इमिग्रेशनचे सोपस्कार आटोपून कॅबमधून हॉटेलवर पोहोचायला आम्हाला पहाटेचे ३ वाजले. दोहा विमानतळावर सगळीकडे बरीच गर्दी होती आणि आमच्यासारखे बरेच भारतीय सहप्रवासीदेखील होते. पण विमानतळावरील कर्मचारी सर्वांना उत्तम मार्गदर्शन करत होते, त्यामुळे कोणतीच अडचण आली नाही.

आमचे हिल्टन हॅाटेलमधे बुकिंग होते. योगायोगाने तिथली स्वागतकक्षातली मुलगी मुंबईची होती. मराठी बोलणारे कुणी भेटले म्हणून ती खूपच खूष झाली होती. तिथून १७ व्या मजल्यावर आम्ही १७ तारखेला पहाटे जे आत गेलो ते २७ तारखेला सकाळी ११ वाजता बाहेर आलो.

हॅाटेलमध्ये जेवण उत्तम होते. सकाळी ७ वाजता भरपूर नाष्टा, १२ वाजता जेवण आणि परत संध्याकाळी ७ वाजता जेवण. खोलीच्या बाहेर बास्केट ठेवून बेल वाजवून जात असत. दार उघडून बास्केट आत घेऊन यायची आणि खाणे झाल्यावर बाहेर ठेवून द्यायची. तेवढ्यापुरतेच फक्त खोलीचे दार उघडले जायचे. नाष्टा व दोन्ही वेळचे जेवण एवढे भरपूर असायचे की ते उरायचेच. शिवाय ज्यूस, फळे, सूप, सॅलड हे पण असायचे.

आम्ही दोघांनी मनाची पूर्ण तयारी केली होती त्यामुळे ह्या दहा दिवसांच्या विजनवासाचा आम्हाला फार त्रास झाला नाही. सकाळी योगासने, खोलीतल्या खोलीत ४ किलोमीटर चालणे हे कधीच चुकविले नाही. वेगवेगळ्या विषयांवरची भाषणे यू ट्यूबवर आम्ही ऐकत होतो. १-२ मराठी मालिका, नातेवाईक आणि मैत्रिणींशी गप्पा, मुलांशी तर दररोज व्हिडीओ कॉल असायचाच.

पुण्याहून दोह्याला आलेले बरेच लोक होते. Whats app वर आमचा एकमेकांशी संपर्क होताच. त्यातल्याच एकांकडून कळले की आम्हाला तिकडचे मोबाईल सिम कार्ड घ्यावेच लागणार आहे. भारतात ज्याप्रमाणे आरोग्यसेतू ॲप आहे तसेच दोह्यामध्ये Ehteraj app चालते. जे आम्ही download केलेले होते पण आमच्याकडे सिमकार्ड नव्हते आणि हॅाटेलमधून निघायच्या आदल्या दिवशीचा RT-PCR अहवाल त्या app वर येणार होता. दोह्यामध्ये कुठेही सार्वजनिक ठिकाणी गेल्यास तो अहवाल दाखवणे अनिवार्य होते त्या शिवाय कुठेच प्रवेश नव्हता. हॅाटेलमध्ये चौकशी केली तर ते म्हणाले जवळच एक मोठा मॅाल आहे तिथे सिमकार्ड मिळेल.

विलगीकरण संपल्यावर आमचे चार दिवसांकरिता दुसरे हॅाटेल होते. मॅरियट एक्झेक्युटिव्ह अपार्टमेंटमध्ये आम्ही उरलेले चार दिवस राहणार होतो. २७ तारखेला दुपारी १२ च्या सुमारास आम्ही हिल्टनहून मॅरियटला जायला उबर नोंदवली. बाहेर नुसते भट्टीत आल्यासारखे वाटत होते. दोहामध्ये ४०-४२ डिग्री सेल्सियसच्या दरम्यान दिवसभर तापमान असायचे. संध्याकाळी ६.३० नंतर जरा कमी म्हणजे ३५-३८ च्या दरम्यान. हवा खूप दमात असल्यामुळे खूप घाम यायचा आणि थोडे बाहेर जाऊन चालून आले की एकदम थकल्यासारखे व्हायचे. याचा अनुभव आम्हाला नंतर चार दिवस आला.

मॅरियटमध्ये गेल्यावर रिसेप्शनवरच्या मुलीला सिम कार्ड बद्दल विचारले, तर तिने ‘कशाला सिमकार्ड घेताय मी माझ्या मोबाईलवरुन तुम्हाला ॲप कनेक्ट करुन देते’ असे म्हणत दोन मिनिटात सर्व करुन दिले. आमच्या मोबाईलवर आम्ही निगेटिव्ह असल्याच्या अहवाल आणि हिरवा कंदील लगेच आला आणि आमचा एक मोठा प्रश्न झटक्यात सुटला. आता आम्हाला कुठेही जायला काही अडचण येणार नव्हती. त्या मुलीचे आम्ही विशेष आभार मानले.

मॅरियटमध्ये किचन अपार्टमेंट होते. त्यामुळे तिथे चहा, नाष्टा वगैरे आम्ही बनवत होतो. दोन्ही वेळेच जेवण बाहेरुन मागवत होतो. या पंधरा दिवसांच्या कालावधीत आम्ही बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या. तसे आम्ही दोघेही टेक्नोसॅव्ही होतो, पण पुण्यात कोथरुड सारख्या मध्यवर्ती भागात आमचे घर होते, जिथे बाहेर पाऊल टाकताक्षणी खाण्याचे विविध पर्याय, स्वतःचे वाहन वापरणे किंवा बस, रिक्षा या सगळ्या सुविधा होत्या. त्यामुळे ऑनलाईन खाणे मागवणे, उबर बुक करणे या गोष्टी फारशा कधी कराव्या लागल्या नव्हत्या. त्या आणि दोह्यामधली निरनिराळी ॲप डाऊनलोड करुन त्याचा लिलया वापर परदेशातही करायला आम्ही शिकलो. एरवी इकडे आल्यावर मुलंच सगळं करत असतात आपल्याला काही कराव लागत नाही.

बघता बघता चार दिवस संपले. परत एकदा RT-PCR टेस्ट केली. निगेटिव्ह अहवाल त्या ॲपमध्ये आलाच शिवाय लॅब मधून प्रिंटाऊट पण घेतली. सामान परत नीट बांधले आणि आता आमच्या ‘फायनल डेस्टिनेशन’ला जाण्यासाठी आम्ही पूर्ण तयार होतो. सर्व कसोट्या पार करुन झाल्या होत्या. आता एकदा अमेरीकेत पोहचून इमिग्रेशन नीट पार पडले की केलेल्या सर्व कष्टांचे सार्थक होणार होते.

दोहा विमानतळावर थोडा बॅगांच्या वजनाचा प्रॅाब्लेम आला त्या मुळे एका केबिन बॅगेमध्ये सामान बसवावे लागले आणि आम्ही अमेरीकेच्या प्रवासासाठी विमानात बसलो. १६ तासांचा प्रवास होता. बघता बघता तोही संपला. इमिग्रेशनच्या खिडकीत ह्यावेळी बरेच प्रश्न विचारले, पासपोर्टवर स्टॅम्प मारला आणि आम्हाला हायसे वाटले. बॅगा घेऊन बाहेर आलो. मुलगा आणि मुलगी दोघेही आम्हाला घ्यायला आले होते. त्यांना बघितल्यावर, भेटल्यावर सर्व शीण कुठल्याकुठे पळाला. अमेरीकेच्या या आगळ्या वेगळ्या प्रवासाची सांगता झाली.

घरी गेल्यावर ताजेतवाने होऊन संविदला प्रत्यक्ष बघितले आणि हातात घेतले तेंव्हा काय वाटले हे शब्दात सांगणे कठीण आहे. तरीही माझ्या भावना व्यक्त करते

भेटी लागी जीवा लागलीसे आस
संविद, तुला भेटण्यासाठी खास
केला सारा अट्टाहास
सोसला दहा दिवसांचा विजनवास
तुला पाहिले प्रत्यक्ष अन् घेतले कुशीत
काय वर्णू तो क्षण, न्हाऊन निघाले आनंदात!

Comments

Popular posts from this blog

गाईड