संक्रांती आणि उत्तरायण


अभिजित अधिकारी

परिचय

मकर संक्रांतीच्या आगमनाने आपल्या सर्वांच्या मनात एक वेगळी उत्साहाची भावना येते, कारण हा सण वर्षभराच्या सणांची वार्ताच जणू घेऊन येतो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. या तीन दिवसांना भोगी (सामान्यतः १३ जानेवारी), संक्रांत (सामान्यतः १४ जानेवारी) व किंक्रांत (सामान्यतः १५ जानेवारी) अशी नावे आहेत.

हिवाळ्यात येणाऱ्या उत्तरायणाच्या सुमारास असल्याने आणि ह्याच दिवसांत शेतांमध्ये धान्य पिकून तयार असल्यामुळे ह्या सणाला आपल्या धर्मात बरेच महत्त्व मिळाले आहे. प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी ह्या सणाला आपल्या ग्रंथांत स्थान दिले आहे. मकर संक्रांतीचा पहिला उल्लेख मनुस्मृतीसारख्या अतिप्राचीन ग्रंथामध्ये आढळतो. उत्तरायण म्हणजे सूर्याची उत्तरेकडे वाटचाल. हा दिवस एवढा शुभ मानला गेला आहे. महाभारतामध्ये भीष्म पितामहांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग करण्यासाठी ह्याच दिवसाची निवड केली होती. असेही म्हणतात की ह्याच दिवशी भगीरथाच्या प्रयत्नांमुळे गंगा नदी समुद्रापर्यंत पोचली होती.

संक्रांती हा शब्द संस्कृत क्रांती ह्या शब्दापासून आला आहे. क्रांती म्हणजे ‘नक्षत्रमंडळात सूर्याचे भ्रमण’, म्हणजे मकर संक्रांती हा दिवस सूर्याचे मकर राशीमध्ये संक्रमण दर्शवितो. जर सूर्याची मकर राशीमध्ये आगमनाची वेळ आदल्या दिवशी संध्याकाळी असेल तर मुख्य सण हा दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. माघ महिन्यात असल्याने भारतात काही जागी ह्या सणाला माघी संक्रांत असेही म्हणतात. महाराष्ट्रीय लोकांसाठी हा एक मुख्य सण असला तरी संपूर्ण भारतभर ह्या सणाला तेवढेच महत्त्व आहे. तमिळनाडूत ह्या सणाला पोंगल म्हणतात, गुजरात मध्ये उत्तरायण, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामध्ये लोहड़ी, आसाममध्ये भोगली, बिहू, काश्मीरमध्ये शिशिर संक्रांत, आणि कर्नाटकामध्ये मकर संक्रमण म्हणून साजरा केला जातो. सुदूर पूर्व आशियापर्यंत भारतीय संस्कृतीच्या प्रसारामुळे ह्या सणाला त्या देशातही महत्त्व मिळाले आहे. थायलंडमधील सॉन्गक्राण, म्यानमारमधील थिंग्यान, लाओसमधील पाय मा लाओ आणि कंबोडियातील मोहा सॉन्गक्रान हीदेखील संक्रांतीचीच भिन्न रूपे आहेत. सिंध-पाकिस्तानमध्ये हा उत्सव अजूनही तिमुरी म्हणून साजरा केला जातो.

खगोलशास्त्रीय महत्त्व

आपल्या सर्वांना हे ठाऊक आहे की वर्षातील सर्वात लहान दिवस, म्हणजे वास्तविक उत्तरायण सध्या २१ डिसेंबरला असते. तेव्हा मकरसंक्रांतीच्या सणाला एवढे महत्त्व कसे प्राप्त झाले? त्याचे कारण, मकरसंक्रांती म्हणजेच उत्तरायण असा एक सामान्य समज निर्माण झाला आहे.

खरे तर शास्त्रीयदृष्ट्या संक्रांत आणि उत्तरायण ह्या दोन वेगवेगळ्या घटना आहेत. सूर्याचे "मकर राशीमध्ये होणारे संक्रमण" आणि "उत्तर दिशेला सुरु होणारे अयन (वाटचाल)" ह्या दोन खगोलशास्त्रीय घटना एकमेकांवर अवलंबून नाहीत. आपल्याला माहीतच आहे की सध्या संक्रांतीचा सण जरी १४ जानेवारीला असला तरी उत्तरायण हे जवळ जवळ एक महिन्यापूर्वी २१ डिसेंबरला झालेले असते. परंतु इ.स. ३४० च्या सुमाराला उत्तरायण हे मकर संक्रांतीच्या दिवशीच असे.

ह्याचे कारण म्हणजे पृथ्वीच्या अक्षाची वर्तुळाकार गती (परांचन गती). पृथ्वीचा अक्ष जरी साधारणतः साडेतेवीस अंशातून कललेला असला तरी वास्तविक हा अक्ष स्थिर नाही, कारण हा अक्षसुद्धा वर्तुळाकार फिरत असतो. ह्या वर्तुळाकार गतीमुळे, सूर्याचा मकर राशीतील प्रवेश दर वर्षी आधीच्या वर्षापेक्षा सुमारे २० मिनिटांनी पुढे जातो, आणि त्यामुळे मकर संक्रांत सुमारे ७० वर्षांनी एक दिवस पुढे ढकलली जाते. ह्यामुळे मकर संक्रांत इ.स. ३४० ​​मध्ये २१ डिसेंबरच्या दिवशी होती तर इ.स. १००० मध्ये ३१ डिसेंबर रोजी होती आणि आता ती १४ जानेवारीला येते. आजपासून १०,००० वर्षांनंतर मकर संक्रांत जूनमध्ये येईल. मग हाच सण भारतामध्ये दक्षिणायनाचा सण म्हणून साजरा केला जाईल का?

एक गैरसमज असा आहे की, मराठा आणि अब्दाली यांच्यातील पानिपतची तिसरी लढाई संक्रांतीच्या दिवशी सुरू झाली. वर सांगितल्याप्रमाणे, सुमारे २६० वर्षांपूर्वी मकर संक्रांती १० जानेवारीला असे. वास्तविक, मराठ्यांनी संक्रांती पंचांगाप्रमाणे चार दिवसांपूर्वीच हळदीकुंकू आणि तिळगुळासहित साजरी केली होती आणि ते १४ जानेवारी, १७६१ च्या घातक दिवशी अंतिम लढाईसाठी सज्ज होते.

उत्सव

महाराष्ट्रीय लोक या दिवशी एकमेकांना तिळगुळ देतात. काही जागी गुळाची पोळी/ पुरण पोळी सुद्धा करतात. विवाहित स्त्रिया आपल्या मैत्रिणींना/ कुटुंबातील अन्य सदस्यांना आमंत्रित करतात आणि हळदीकुंकू साजरे करतात. सद्भावनांचे प्रतीक म्हणून लोक एकमेकांना “तिळगुळ घ्या गोड गोड बोला” म्हणत अभिवादन करतात. तिळगुळाच्या देवाणघेवाणीतील मूळ विचार भूतकाळातील वाईट भावना व शत्रुत्व विसरून गोड बोलण्याचा आणि मित्रत्वाचा संकल्प करणे हाच आहे.

एका पौराणिक कथेनुसार सूर्यदेवाने आपला मुलगा शनि याला ह्याच दिवशी क्षमा केली आणि आपल्या मुलाच्या भेटीला आला. त्या कारणाने असावे किंवा ह्या दिवसांत थंडी असल्या कारणाने असावे, पण संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रघात पडला, जो अन्य सणांच्या दिवसांत वर्जित असतो.

भारतात बऱ्याच प्रदेशांमध्ये ह्या दिवशी लोक पतंग उडवण्यासाठी बाहेर येतात आणि पतंगांच्या मोठमोठ्या शर्यतीसुद्धा लागतात. त्यामुळे ह्या सणाला काही ठिकाणी पतंगोत्सव असेही म्हणतात.

तिळगुळ

तिळाचे बियाणे हे सहजपणे oxidized होत नाही आणि खराबही होत नाही. बियांमध्ये ५०-६० टक्के उच्च-गुणवत्तेचे तेल असते, जे poly-saturated fatty acidने युक्त असते. यात प्रथिने, ब१ जीवनसत्त्व, फायबर, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, तांबे भरपूर प्रमाणात असते. यात बायोएक्टिव्ह घटकांचे प्रमाणदेखील उच्च आहे, जे आरोग्यदायक असते. गूळ सूक्ष्म पोषक द्रव्यांसह बहुतेक सुक्रोजपासून बनलेला असतो आणि लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज आणि ब जीवनसत्त्वाने युक्त असतो.

प्राचीन काळी चरक आणि सुश्रुत यांनी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये तिळाच्या गुणधर्मांचा उल्लेख केला आहे. आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे तिळाचे गुण असे आहेत - रक्तवाहिन्यांमध्ये त्वरित प्रवेश करतात (सूक्ष्मत्व), पोषक तैल (स्निग्धत्व), उष्णवीर्यत्वाचे सामर्थ्य (वाजीकार), मधुर पचन प्रभाव (मधुर विपाक), बळदायक (बल्य), केसांचे टॉनिक (केश्य) आणि कायाकल्प रसायन. ते वात संतुलित ठेवते आणि वर्ण सुधारते (वर्ण्य), शरीरातले मळ काढते (विषघ्न), बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देते (मेधावर्धक), पचन सुधारते (अग्निवर्धक) आणि हाडांसाठीपण चांगले आहे (भग्नप्रसादक).

या तिळगुळाच्या सुपरफूडमुळे आपल्या मराठा सैन्याला त्यांच्यापेक्षा दुप्पट मोठ्या असणाऱ्या अफगाण सैन्याला सामोरे जाण्यासाठी पुरेसे पोषण आणि सामर्थ्य निश्चितच मिळाले असेल.

चला तर, मग नवीन वर्षाची सुरूवात भारतात हजारो वर्षांपासून साजरा केल्या जाणाऱ्या ह्या शुभ सणाच्या निमित्ताने एकमेकांना गोड पदार्थांच्या रूपात माधुर्य आणि मैत्रीचा आशीर्वाद देऊन होऊ द्या!

संदर्भ: लेखातील सर्व चित्रे विकिपीडियातून साभार घेतली आहेत.


Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी