पौराणिक कथा : भाग १ - पुराणांची माहिती

अवंती करंदीकर

भारतीय प्राचीन साहित्यामध्ये वेद, उपनिषदे आणि पुराणे ह्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते कळण्यासाठी आपल्याला 'श्रुती' आणि 'स्मृती' म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल. परंपरेनुसार अनंत काळापासून ऐकण्याचे व सूचित करण्याचे साधन म्हणजे 'श्रुती' तर साहित्यिकांनी लिहिलेले किंवा आठवून लिहिलेले ते 'स्मृती'.

श्रुतीची उदाहरणे म्हणजे ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, आणि यजुर्वेद हे चार वेद. प्रत्येक वेदाचे चार संहितेत उपविभाजन होते १. संहिता (मंत्र) २. आरण्यक (यज्ञ व अन्य विधींची संहिता) ३. ब्राह्मण (यज्ञ व अन्य विधींवर केलेले भाष्य) आणि ४. उपनिषद (अध्यात्मिक तत्वज्ञान सांगणारी संहिता).

स्मृतीची उदाहरणे म्हणजे इतिहास, धर्मशास्त्र, उपवेद व पुराणे. रामायण, महाभारत,भगवद्गीता इतिहास वर्गात मोडतात. मनुस्मृती, विष्णूस्मृती, नारदस्मृती ह्या धर्मशास्त्रामध्ये मोडतात. आयुर्वेद, धनुर्वेद, अर्थशास्त्र, स्थापत्यशास्त्र उपवेदामध्ये मोडतात.

आता पुराणांकडे वळूया. पुराण म्हणजे प्राचीन, जुने. विश्वाची उत्पत्ती, तिचा निर्माता, तिचा तारणकर्ता आणि तिच्या नाशकर्त्याचे वर्णन; त्या अनुषंगाने येणाऱ्या कथा, उपकथा, मानवी जीवनाचा उत्कर्ष व अधोगती ह्यांनी अधोरेखित केलेल्या कथांनी ही पुराणे समृद्ध झाली आहेत.

भारतीय पुराण साहित्यामध्ये एकूण १८ पुराणे आहेत. त्या १८ पुराणांची नावे : १. ब्रह्म २. पद्म ३. शिव ४. विष्णू ५. भागवत ६. नारद ७. मार्केंडेय ८.अग्नि ९. भविष्य १०. ब्रह्मवैवर्त ११. लिंग १२. वराह १३. स्कंद १४. वामन १५. कूर्म १६. मस्त्य १७. गरुड आणि १८. ब्रह्मांड. पुराणे कुणी लिहिली ह्या माहितीत तफावत आढळते. काही ठिकाणी श्री वेदव्यास तर काही ठिकाणी व्यासांचे शिष्य लोमहर्षण ऋषी व त्यांच्या शिष्यांनी पुराणे लिहिल्याचे उल्लेख आढळतात. मूळ पुराणे संस्कृतमध्ये लिहिली गेली. त्यांचा अनुवाद प्राकृत, मराठी, हिंदी, तमिळ, बंगाली व इतर अनेक भारतीय आणि अभारतीय भाषांमध्ये झाला.

बहुतेक पुराणे पूर्व व उत्तर अशा दोन भागांमध्ये विभागलेली आहेत (अपवाद गरूडपुराण व भविष्यपुराण. ही पुराणे अनुक्रमे तीन व चार भागांमध्ये विभागलेली आहेत.) पूर्व आणि उत्तर भागांची उपविभागणी खंड आणि उपखंडांमध्ये होते. सगळी पुराणे ही ढोबळमानाने २५०० ते १००,००० श्लोक व लघुकथास्वरूपात लिहिलेली आहेत. बऱ्याच संदर्भांमध्ये ह्याबद्दल तफावत आढळते. काही संदर्भांमध्ये सर्वात मोठे पुराण आणि सर्वात छोटे पुराण कोणते ह्याबाबतही तफावत आढळते. काही ठिकाणी शिवपुराण (१००,००० श्लोक) हे मोठे तर काही ठिकाणी स्कंदपुराण (८१००० श्लोक) हे मोठे असे उल्लेख आढळतात. तर सर्वात लहान पुराण म्हणजे मार्केंडेयपुराण असे संदर्भ सापडतात. प्रत्येक पुराणामध्ये आपल्या इष्ट देवतेप्रमाणे (विष्णू, शिव, कृष्ण) अनेक कथा, संदर्भ, माहिती, उदाहरणार्थ, विश्वनिर्मिती, भौगोलिक रचना, वंशशास्त्र इत्यादींची पुनरावृत्ती झालेली दिसून येते. बहुतांश पुराणांमध्ये कमीअधिक प्रमाणात रामायण (त्रेता युग) आणि महाभारतातील (द्वापार युग) कथा, उपकथा किंवा त्यातील पात्रांचा उल्लेख आढळतो.

ब्रह्मपुराण हे पहिले महापुराण मानतात. त्याला आदिपुराण असेही म्हणतात. ब्रह्मपुराणामध्ये विश्वाची उत्पत्ती व रचना, देवांचे वंशशास्त्र, भौगोलिक रचना, ऋतुबदल इत्यादी माहिती आहे.

पद्मपुराणाला सत्त्वपुराण असेही म्हणतात. पद्मपुराणामध्ये विश्वाची उत्पत्ती व रचना, देवांचे वंश, योग, द्वैत-अद्वैत, आत्मा, मोक्ष ह्यांच्याबद्दल चर्चा व त्या अनुषंगाने येणाऱ्या रामायणातील कथा व विष्णूच्या कथांचे सादरीकरण आहे.

शिवपुराणामध्ये शिवस्तुती, योग, तीर्थ, भक्ती इत्यादी माहिती आढळते. विष्णूपुराणामध्ये विष्णुस्तुती, विश्वाची उत्पत्ती, वर्णशास्त्र, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमाचे वर्णन आहे.

भागवत आणि नारद पुराणांमध्ये विष्णूचे अवतार, वैष्णव विचारसरणी, धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या संकल्पना मांडल्या आहेत.

मार्केंडेयपुराणामध्ये प्रामुख्याने मार्केंडेय ऋषी व त्यांचा शिष्य जैमिनी ह्यांच्यामधील संवाद आहे. ह्या संवादातून मार्केंडेय ऋषी, त्यांनी केलेल्या क्षेत्रप्रवासात अनुभवलेल्या कर्म, धर्म, संसार आणि श्रद्धांचे सिद्धांत जैमिनी वर्णन करतात. देवीमहात्म्याचा पहिला उल्लेख ह्या पुराणामध्ये आढळतो.

अग्निपुराणामध्ये रामायण महाभारतातल्या कथा व संदर्भ, वास्तूशास्त्र, आयुर्वेद, शैक्षणिक उन्नती, कृषीक्षेत्र, योग, समाधी, भगवद्गीतेचे सार लिहिले आहे.

भविष्यपुराणामध्ये भविष्य ह्या विषयावरील कथन आहे.

ब्रह्मवैवर्तपुराणामध्ये कृष्ण-राधेच्या कथा, ब्रह्मा, विष्णू, शिव आणि गणेश ह्या देवतांपेक्षा कृष्ण हीच सर्वोच्च देवता व वास्तव असे सूचित करण्याऱ्या कथांचा समावेश आहे. त्याचबरोबर राधा, दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीच्या कथाही आहेत.

लिंगपुराणामध्ये बऱ्याच प्रमाणात शिवपुराणातील गोष्टींची पुनरावृत्ती, शिवाने केलेल्या असुरमर्दनाच्या कथा व उपकथा, तसेच मानसिक व शारीरिक त्रास, अतिथीसत्काराचे महत्त्व, पंचमहाभूते आणि सृष्टीची उत्पत्तीकथा, शिवभक्ती, योगाभ्यास, ध्यानधारणा, समाधी ह्या विषयावरील कथन दिसते.

स्कंदपुराणामध्ये स्कंद हा शिवाचा पुत्र मानल्यामुळे त्याने वर्णन केलेल्या शिव-पार्वतीच्या कथा व भक्तिगाथा आहेत.

वराह, वामन, मत्स्य आणि कूर्म ह्या पुराणांमध्ये विष्णूच्या ह्या चारही अवतारातील कथा आणि उपकथा आहेत. ब्रह्मांडपुराणामध्ये धर्म, योग, संस्कार व अध्यात्म रामायणाचा उल्लेख केलेला आहे.

गरुडपुराणामध्ये सृष्टीची उत्पत्ती, ध्रुवचरित्र, ग्रह व देवता उपासना, भक्ती, ज्ञान, वैराग्य, ‘जन्म-मृत्यू-जन्म’ साखळी व सदाचार ह्याचे महत्त्व सांगणाऱ्या कथा, विष्णू आणि लक्ष्मीचे विविध अवतार, शेष व रुद्राचे अवतार व श्रीकृष्णाच्या विवाहकथांचा समावेश दिसतो.

लहानपणी आपण आपल्या आजी-आजोबांकडून अनेक पौराणिक कथा ऐकत असू. ह्या कथा अनेकदा लहान मुलांच्या गोष्टी म्हणून आपल्याला सांगितल्या जात आणि बहुतेक वेळा त्या शंकर, विष्णू, राम आणि कृष्णाच्याच असत. ह्या सर्व पौराणिक कथा वरील उल्लेख केलेल्या ह्या पुराणांमधूनच आलेल्या आहेत व त्या पिढ्यानपिढ्या अगदी अलीकडे घराघरातून ऐकल्याचे आठवते. काळ जसा बदलतो तश्या गोष्टी आणि गोष्टींचे माध्यमही बदलते. त्यामुळे साहजिकच जुन्या गोष्टी मागे पडतात. जुन्या गोष्टींना उजाळा मिळावा आणि आपल्या बालगोपाळांनाही ह्या गोष्टींचा आनंद घेता यावा म्हणून पौराणिक कथा क्रमशः प्रकाशित करण्याचा मानस आहे. त्याच सत्रातील पहिल्या भागात पुराणांची माहिती प्रकाशित केली आहे. दुसऱ्या भागापासून कथांची सुरुवात होईल, त्यात अष्टवसूंची कथा ऐकूया.

टीप :- हा लेख आंतरजालावरील असंख्य दुवे, जुनी पुस्तके, भारतीय यू.पी.एस.सी. परीक्षेच्या अभ्यासक्रमातील हाती लागलेली काही माहिती व सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आजीने लहानपणी सांगितलेल्या काही कथांचा आधार घेऊन लिहिलेला आहे, तरी त्यात त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी