मुंबईची रिक्षा-टॅक्सी - एक अनुभव

शारदा सबनीस

मुंबईची रिक्षा-टॅक्सी - एक अनुभव

रिक्षा ही मुंबईच्या उपनगरांची गरज आहे. त्यांना परवाने कसे मिळतात, वार्षिक किती रिक्षाना कायद्यानुसार परवाने दिले जातात, का दिले जातात, एवढया परवान्यांची गरज आहे का? इत्यादी प्रश्न ह्या लेखाच्या मर्यादेबाहेर आहेत. २००८ च्या मोजणीप्रमाणे मुंबई महानगरपालिका विभागामध्ये (MMR) २४६,४५८ काळ्या-पिवळ्या मीटर असलेल्या रिक्षा धावतात. तसेच साधारण ५८,००० काळ्या-पिवळ्या टॅक्सी आहेत. (संदर्भ: Public transport in Mumbai, From Wikipedia).

आम्ही मुंबईत साधारण पाच महिने असतो तेंव्हा पवईला राहतो. तिथे ‘काली-पिली’ टॅक्सी क्वचितच दिसते. ओला-उबरसारख्या टॅक्सी मिळतात, परंतु रिक्षा हे मुंबईच्या उपनगरात सार्वजनिक जनतेचे वाहन आहे. रिक्षा पकडणे हा एक अनुभव आणि कलाही आहे. प्रथम रस्त्याच्या ज्या दिशेला प्रवास असेल त्या बाजूला उभे राहायचे आणि रिक्षा थांबविण्यासाठी हात कायम हलवीत रहायचे. यामागचे कारण असे की येणारी रिक्षा भरलेली किंवा रिकामी आहे हे कळण्यास मार्ग नसतो, आणि रिक्षा चालकांची अरेरावी तर विचारू नका. चुकून जर रिक्षा थांबली तर चालकांकडून दिवसाच्या वेळेनुसार "जेवायची वेळ झाली", "नाही जाणार", "पेट्रोल घालायचे आहे", "घरी चाललो" अशी उद्धट उत्तरे मिळतात. काही तर न बघितल्यासारखे करून न थांबता निघून जातात. सर्वसाधारणपणे मराठी रिक्षाचालकांची आणि त्यातल्या त्यात विलेपार्ल्यातील मराठी चालकांची गुर्मी तर विचारू नका. जसे काही आमच्यावर उपकारच करत आहेत असे त्यांना वाटते. त्यामानाने बिन-मराठी चालक नम्र आणि मदत करणारे असतात. त्यांना मुंबईत टिकून रहायचे असते ना! असो.

मी रिक्षात बसले की चालकाशी हिंदीत गप्पा मारायला सुरवात करते. मराठी येते का विचारते. बहुदा मराठी समजते पण बोलता येत नाही असे उत्तर मिळते. क्वचित मराठी बोलणारे भेटतात. गप्पांची सुरवात तुमची ही रिक्षा कुठली? तुम्ही कोठे रहाता? स्वतःची आहे का? अशा प्रश्नांनी होते. हळूहळू चालक माणसाळतो आणि गप्पा करायला लागतो. मग मी त्याला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारते. मुले किती? काय शिकतात/करतात असे विचारले की तो खुलतो आणि मोकळेपणे बोलू लागतो. त्यांच्या अश्या गप्पांतून त्यांचे दुःख, काळजी, गरज यांची झलक पहायला मिळते. अश्याच काही गप्पा.

"मॅडम काय सांगू तुम्हाला? माझा फर्निचरचा बिसनेस आहे. शिवाय मी रिक्षा चालवतो. मला दोन मुलगे. धाकटा नीट वागतो आणि फर्निचरच्या कामात लक्ष घालतो, पण मोठयाचे काही सांगू नका! अहो नुसता बेवडा आहे. दारू प्यायला की रात्री धुमाकूळ घालतो. कधी गांजाही पितो आणि मग तर विचारूच नका. वयाने मोठा तेंव्हा हातही उगारता येत नाही. आपलेच मूल म्हणून घराबाहेरही काढता येत नाही. ती दारू सोडिवण्याची केंद्र असतात ना तिथेही त्याला सुधारण्यासाठी नेले होते. उपचारानंतर थोडावेळ सर्व ठीक, पण मग येरे माझ्या मागल्या. घरात सर्वांना त्रास. काय करू समजत नाही. माझा मित्र म्हणाला पोलिसात तक्रार कर. आता तेच करावे असे वाटते. त्यांनी दिलेल्या दमामुळे काही सुधारणा झाली तर देवाची कृपा, मॅडम तुम्हाला काय वाटते?" ऐकून मी सुन्न झाले. मी त्याला काय सांगणार? त्याच्या ह्या प्रश्नाने मला खरेच कोड्यात टाकले.

दुसरा रिक्षाचालक लोकांच्या स्वच्छतेच्या वाईट सवयींबद्दल बोलत होता. आमची रिक्षा ट्राफिक लाईटला थांबली होती. तिथे शेजारी दुसरी रिक्षा येऊन थांबली. त्यातील ड्राइवर पचकन थुंकला. झाले, आमच्या चालकाच्या कपाळावर आठ्या! "बाई एकदा काय झाले, असाच एक चालक थुंकला आणि त्याच्या थुंकीची पिंक माझ्या रिक्षेच्या चाकावर पडली. माझे डोके फिरले. मी उतरून त्याला बखोटीला धरून पुसायला लावले. बाई, आता तो थुंकण्याआधी दहादा विचार करेल." मला ‘लगे रहो मुन्नाभाई’ सिनेमातील दृश्याची आठवण झाली. वाटले असो, सिनेमाचा काहीतरी चांगला परिणाम झाला.

एकदा एका ओला टॅक्सीने घरी चालले होते. ड्राइव्हरशी गप्पा मारताना लक्षात आले की तो उत्तम इंग्लिश शब्द वापरून बोलत होता. त्याला त्याबद्दल विचारले तेंव्हा म्हणाला, "मॅडम मी डिग्रीधारक आहे. सात वर्षे Reliance कंपनीत अनेक कॉलसेंटरचा in-charge होतो. आम्ही मुसलमान आहोत आणि भिवंडीला राहतो. बाबांचा कापड बनविण्याचा धंदा आहे. मी त्यांना मदत करतो आणि टॅक्सीपण चालवतो. वाटले होते की मोदी सरकार स्थानिक बिसनेस वाढविण्यात मदत करतील. पण त्यांचा कल दुसऱ्या देशातून बिसनेस इथे आणून आम्हाला नोकऱ्या देण्याकडे आहे! आम्ही काय म्हणून या परदेशीयांची चाकरी करायची? ब्रिटिशांनी हेच तर केले! जर आम्ही भारतीय स्वतः बिसनेस करू शकतो तर बाहेरच्यांची काय गरज?” मला त्याचे विचार आवडले. थोड्या शांततेनंतर मी माझ्या फोनवर राशीद खानची गाणी लावली. मी त्याला राशीद खान कोण आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत इत्यादींबद्दल थोडक्यात जुजबी माहिती सांगितली. ती ऐकून तो म्हणाला, "मॅडम, रोज पॅसेंजर आमच्या ऑडिओ-व्हिडिओ वर तीच तीच फिल्मी आणि पाश्चात्य गाणी लावून वीट आणतो. मी ती ऐकतच नाही. आज जरा वेगळे ऐकून बरे वाटले. तुम्ही असे समजावून सांगितले म्हणून मला कळले, नाहीतर आवड कशी उत्त्पन्न होणार? आता मी ऐकत जाईन." तेव्हढ्यात घर आले. उतरताना मनात विचार आला, चला थोडी का होईना संगीताची सेवा झाली!

आणखी एक रिक्षाचालक उत्तर प्रदेशातला होता. एकदम भाविक. त्याला धर्माबद्द्ल बोलायचे होते. "बायजी, ये धरम के नामपे गुंडागिरी क्यूँ करते है? हम सब बहोत सालोंसे भाइचारेसे रह रहे है, मगर आजकाल जो नेता देखो वो धरम या जाती का इस्तेमाल करके लोगोंको भडकाते है. उन्हे वोट चाहिये ना? मगर अब लोग समझ गये है. क्योंकी इसमे आम आदमीकाही नुकसान है. बेचारी आम जनता फोकटमे मारी जाती है. ये नेता वोही अंग्रेजवाला divide and rule का फंडा चला रहे है. हम लोग कब सुधरेंगे?" ह्या त्याच्या तत्त्वज्ञानाने भरलेल्या वक्तव्याने मला भरून आले.

मला भेटलेले रिक्षाचालक बहुदा बिगर मराठीच असत. एकदा एक मराठी चालक भेटला. तो लातूरचा होता. आमच्या बिल्डिंगच्या मागे असलेल्या झोपडपट्टीत तो राहतो. त्याला कै. विलासराव देशमुखांबद्दल फार आदर. त्याच्याच शब्दात सांगायचे म्हणजे; "बाई त्यांनी आमच्यासाठी खूप केले. लातूर आणि आसपास लोकांना घरे बांधून दिली. विकास केला. त्यांच्या टॅक्सीच्या बिसिनेस मध्ये दोन लाख लोक कामाला होते. त्यांनी आपला फायदा तर केलाच पण दोन लाख लोकांना कामही दिले." एखाद्या मंत्र्याबद्दल काहीतरी सकारात्मक ऐकून बरे वाटले. "अहो ह्या ओला, ऊबरचे मालकही ह्याच पंक्तीतले. इथे लागेबांधे असल्याशिवाय काम होत नाही. महानगरपालिकेत नोकरी मिळवायला एक लाख रुपये, आणि पोलिसात नोकरीसाठी दोन लाख मोजावे लागतात. मोक्याच्या जागी पोलिसाची पोस्टिंग हवी असल्यास ती दक्षिणा आणखी. ह्या जीएसटी टॅक्समुळे आम्हा भाडेकरू रिक्षावाल्यांचे हाल झाले आहेत. स्वतःची रिक्षा असली तर फायद्याचे पडते पण आमच्यासारख्याने इतके पैसे आणायचे कोठून?" खरेच होते त्याचे.

असे अनेक किस्से मला दरवेळी ऐकायला मिळतात. शेवटी माणूस तो माणूसच! त्याला गरजा आहेत, दुःख आहे, राग आहे, सहानुभूती आहे आणि जगण्याची ईर्ष्यापण आहे. तो आपल्या घरासाठी राबत असतो. आहे त्यापेक्षा जास्त मिळविण्याच्या प्रयत्नात असतो पण आहे त्यातही आनंदी राहतो. मुंबईच्या ‘धावेल त्याचा फायदा आणि करेल त्याचा कायदा’ या चक्रात फिरत असतो. पण हा मुंबईकर नेहमी हसत असतो, संकटाच्या वेळी धावून जातो आणि म्हणूनच आम्ही म्हणतो ‘ये है बॉम्बे मेरी जान!


Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी