पुस्तकांचं गाव

बाळकृष्ण पाडळकर
ट्रॉय, मिशिगन
bmpadalkar@gmail.com

....पळती झाडे पाहू या !
मामाच्या गावाला जाऊ या !!

या बालगीताच्या ओळी आता बदलाव्या लागतील आणि म्हणावे लागेल,

गोड गोड स्ट्रॉबेरी खाऊ या !
पुस्तकांच्या गावाला जाऊ या !!

त्याला कारणही तसेच झाले आहे. २०१६ मधे महाराष्ट्र राज्य विकास संस्थेचे काही अधिकारी इंग्लंडच्या अभ्यास दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांना एका अभिनव खेड्याची माहिती मिळाली. त्या खेड्यात घरोघरी पुस्तकेच पुस्तके होती. दरवर्षी त्या खेड्यात मोठे पुस्तक प्रदर्शन भरविण्याची फार जुनी प्रथा होती. हे प्रदर्शन चांगले दोन-तीन आठवडे चाले. केवळ दुसऱ्या महायुद्धाचेवेळी या पुस्तक प्रदर्शनात खंड पडला असावा. कित्येक वर्षांपासून या खेड्यातले ग्रामस्थ सरस्वतीची आराधना करीत आहेत. वेल्स परगण्यातील ‘व्हिलेज ऑफ बुक्स ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेड्याचे नाव आहे ‘हे -ऑन -वाय’. अधिकाऱ्यांनी या खेड्याविषयी ज्यावेळी ऐकले त्यावेळी ते जगातील एकमेव असे पुस्तकांचे खेडे होते. खेड्यात जागतिक स्तरावरील पुस्तक प्रदर्शन भरविण्याची संकल्पना पसंत पडल्यामुळे अधिकाऱ्यांनी यावर हुकूम काढून, योजना आखून महाराष्ट्रातही पुस्तकांच्या गावाची निर्मिती करण्याचे ठरविले, आणि त्याकरता महाराष्ट्रभर योग्य असे गाव निवडण्याची मोहीम सुरु केली. गठन केलेल्या समितीने महाबळेश्वरच्या पायथ्याशी वसलेल्या, निसर्गरम्य, स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात भारतात अग्रेसर असलेल्या लहानशा खेड्याची निवड केली. या खेड्याचे नाव भिलार. पाचगणीपासून अवघे पाच मैलांवर असणारे हे खेडे ‘पुस्तकांचं गाव’ म्हणून निवडले गेले.

केवळ तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या, सहाशे उंबरठ्याच्या या खेड्याचा कायापालट व्हायला सुरवात झाली. खेड्यात असलेला शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभित करण्यात आला, दुसरा पाणी भरणाऱ्या महिलेचा पुतळाही साफ करण्यात आला. पुतळ्याभोवती छानशी हिरवळ, फुलांची झाडे नव्याने लावण्यात आली. शासनाचा प्रकल्प असल्यामुळे कामाला वेग आला. भिलारमध्ये ‘पुस्तकांचं गाव’ प्रकल्प कार्यालय उघडण्यात आले. ग्रामस्थांची उभारी वाखाणण्यासारखी होती. प्रत्येकाने आपआपली घरे रंगरंगोटी करून सुशोभित केली. उघड्या बोडक्या भिंतींवर शिवाजी महाराज, रामदास स्वामी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, नामवंत साहित्यिक, यांची चित्रे रंगविण्यात आली. मनाचे श्लोक, प्रज्ञावंत साहित्यिकांची सुभाषिते, ब्रीदवाक्ये, सुबक अक्षरांमध्ये लिहिण्यात आली. सार्वजनिक ठिकाणांचाही कायापालट करण्यात आला. साध्या चहाच्या टपरीवर ठेवलेली वर्तमानपत्रे घडी करून टापटिपीत ठेवली गेली. शासन गावाचा चेहरामोहरा बदलण्यात व्यग्र असतांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे ‘पुस्तकांचं गांव’ प्रकल्पात सहभाग नोंदवला. ग्रामस्थांचा सहभाग या प्रकल्पात फार मोठी जमेची बाजू होती.

गावात असलेल्या मोठमोठया घरांच्या दर्शनी भागात असणारे जिने, पायऱ्या, खिडक्या विविध रंगात उजळून निघाल्या. गावातल्या एकंदर घरांपैकी पन्नास घरांची ग्रंथालयांसाठी निवड करण्यात आली. या घरात राहणाऱ्या माणसांच्या दैनंदिन दिनचर्येत व्यत्यय न आणता घरातील अतिरिक्त जागेत पुस्तकांची अत्यंत आकर्षक पद्धतीने रचना करण्यात आली. निवडलेल्या घरांत वेगवेगळे साहित्यविषय निवडून त्या त्या विषयांवरील पुस्तके ठेवण्यात आली. मात्र ५०-६० अशा खास पुस्तकांची निवड करण्यात आली की ती पुस्तके प्रत्येक घरात ठेवण्याचा आग्रह प्रकल्प समितीने धरला. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रकाशकांनी नवी कोरी पुस्तके या अभिनव प्रकल्पाला भेट दिली. पन्नास घरांमध्ये पंधरा ते वीस हजार पुस्तकांचे वितरण करण्यात आले. त्यात कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबऱ्या, धार्मिक ग्रंथ, बालसाहित्य, स्त्रीसाहित्य, एकांकिका, नाटक, भाषांतरित पुस्तके, संतसाहित्य, शिवकालीन गड व किल्ल्यांविषयीची माहिती असणारी पुस्तके, इ-बुक्स, ऑडिओ बुक्स, वगैरेंचा समावेश करण्यात आला. बालसाहित्य आणि बोलकी पुस्तके, अभिनव पद्धतीने जोड्या लावण्याचे खेळ, संगीत कोडी, यामुळे तर बालगोपाळ या गावात दंगून गेले.

सर्व तयारी झाल्यानंतर या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणाचे वेळी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. अनेक प्रथितयश कवी, लेखक, विचारवंत या सोहळ्याला उपस्थित होते. सामान्य वाचकांना, ग्रामस्थांना त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारण्याची संधी प्राप्त झाली. साहित्यिकांना आपले मनोगत मांडण्यासाठी आयते व्यासपीठ मिळाले. कित्येक वाचकांनी साहित्यिकांशी तर साहित्यिकांनी वाचकांशी संवाद साधून आपली मने मोकळी करून घेतली.

‘पुस्तकांचं गाव’ या खेड्यात घरोघर पाहुण्यांच्या राहण्याची सोय आहे. माफक दरात नाश्ता, चहा, जेवण आणि राहण्याची व्यवस्था कित्येक घरांमधून उपलब्ध आहे. घरात ग्रंथालय असल्यामुळे पर्यटक वाचन, निसर्गविहार, विरंगुळा म्हणून स्ट्रॉबेरीच्या फळांचा आस्वाद आणि निवांतपणा यांचा पुरेपूर आनंद घेताना दिसतात. ‘पुस्तकांचं गाव’ अस्तित्वात आल्यापासून भिलारमध्ये कायमस्वरूपी कवी कट्टा, अभिवाचन कट्टा सुरू करण्यात आला आहे. भाषणे, व्याख्याने, साहित्यिक चर्चा, साहित्यिकांचा राबता, पुस्तक प्रदर्शन यामुळे ‘पुस्तकांचं गाव’ नेहमीच व्यग्र असते. तरूणांकरता स्पर्धापरीक्षांची माहिती देणारा, तयारी करून घेणारा एक विभागही येथे कार्यरत आहे. ‘पुस्तकांचं गाव’ या प्रकल्पामुळे भिलार आणि आसपासचा परिसर बौद्धिक उन्नती तर साधित आहेच, पण त्याबरोबर येथील ग्रामस्थांना आर्थिक स्थैर्यसुद्धा लाभले आहे.

या गावात कोणत्या घरात कोणत्या विषयांची पुस्तके उपलब्ध आहेत याची ठळक माहिती देणारे मोठमोठे फलक ठिकठिकाणी लावलेले आहेत. असेच फलक पुणे-वाई-महाबळेश्वर आणि सातारा-वाई-महाबळेश्वर या महामार्गांवर लावण्यात आले आहेत. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी भगीरथ प्रयत्न करतांना ग्रामस्थ दिसत आहेत. काही घरांच्या भिंतींवर कुसुमाग्रजांचे विचार लिहिले आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानाची दोनशे पुस्तकांची पेटी पेन ड्राइव्हवर उपलब्ध करून दिली गेली आहे.

‘पुस्तकांचं गाव’ म्हणून फार थोड्या काळात नावारूपास आलेले भिलार हे गाव आता जगाच्या नकाशात पुस्तकांचे दुसरे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. भिलार गावाने देशात इतिहास रचला आहे. महाबळेश्वरला गेलेले पर्यटक कदाचित यापुढे आता असे म्हणतील की “आम्ही पुस्तकांच्या गावाला जाऊन आलो, तसेच महाबळेश्वरला जाऊन आलो.”

जवळच असलेल्या लिंगमळा धबधब्यामुळे ‘पुस्तकांच्या गावा’चे आकर्षण वाढले आहे यात शंका नाही. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या निसर्गरम्य आणि आता साहित्यिकांचे आकर्षण ठरलेल्या पुस्तकांच्या गावाला जायला कोणाला आवडणार नाही?

मार्च २०२० पासून कोरोनामुळे या गावातील वर्दळ कमी झाली होती. तरीही सगळे नियम पाळून पुस्तकांच्या गावाला किमान दोन हजार पर्यटकांनी या काळात भेट दिली. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. शाळा महाविद्यालये, ग्रंथालये जरी अद्याप पूर्णपणे उघडली नसली तरी त्यात सकारात्मक वाढ होत आहे. म्हणूनच इथले ग्रामस्थ पर्यटकांना उद्देशून म्हणतात, “यावे पुस्तकांच्या गावा, आमुचा पाहुणचार घ्यावा.“

तर मग येत्या उन्हाळ्यात येणार ना आमच्या पुस्तकांच्या गावाला, बाळगोपाळांना घेऊन?


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गाईड

छान