साधू संत येति घरा, तोचि दिवाळी दसरा!

श्रीमती चित्रा धाकड

आपल्या पूर्वजांनी किती छान विचार दिले आहेत आपल्याला! म्हणूनच जुने ते सोने आहे. सोन्याची शुद्धता करायलासुद्धा त्याला प्रखर अग्नीतून जावे लागते. दिवाळी हा सण मोठा आहे पण त्यामागची भावना, ते विचार, नात्यातील संबंध, जिव्हाळा, त्या पाच दिवसातील ती पवित्र पूजा, त्यामागचा हेतू, ती दिव्यता, ती परंपरा आपल्या ऋषींनी आपल्याला समजावली व आपल्या पूर्वजांनी ती टिकवून ठेवली.

एक काल्पनिक गोष्ट आहे, सूर्य संपावर जायचे म्हणतो तेव्हा त्याचे काम करायला कोणीच तयार होत नाही. तेव्हा एक पणती पुढे येते व सूर्याला सांगते, "हा अंध:कार दूर करण्याचे काम मी करीन. तू दिवसा ये व रात्री मी उजेड देईन!" मग आम्ही आकाशकंदील लावून दीपोत्सव साजरा करू लागलो. विद्युत रोषणाईपेक्षा पणतीतल्या दिव्यांचा झगमगाट आल्हाददायक वाटतो व मन वेधून घेतो. पणती असा संदेश देते की “जोवर माझ्यात तेल आहे, तोवर मी माझे कर्तव्य करीन. तेल संपले की मी अस्त पावणार, तेलामुळे माझे अस्तित्व आहे.”तेल म्हणते की “कुंभारदादाची कला किती महान आहे ज्यात ज्यात मला सामावून जातात येते आणि वातीला आधार देता येतो. कुंभारदादाने पणती, घडा, तयार करण्यासाठी किती कष्ट घेतले असतील? तेव्हा मी घडवला गेलो.” एक कवी म्हणतो, ‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार,विठ्ठला तू वेडा कुंभार!" खूप अर्थ भरला आहे या गीतात! ही माती मला हेपण शिकवते की “तू सुद्धा मातीच्या गोळ्याप्रमाणे होतास, परमेश्वराने तुला घडविले व या जगात आल्यावर तुला कुणी कुणी संस्कार दिले, ते स्मरणात ठेव व कृतज्ञ राहा. कृतघ्न होऊ नको.” घडा म्हणतो, “माझे आयुष्य किती ते मला माहित नाही, पण मी घराघरात जातो, लोकांची तहान भागवतो. माझे दैव कसे आहे बघा! माझी जागा फ्रीजने घेतली, पणतीची जागा विद्युतदिव्याने घेतली. तरी मी नाराज नाही, दैवाला दोष देत नाही. वर्षातून एकदा तरी लोक माझी आठवण काढतात व पाच तरी पणत्या घेऊन पूजा करतात.” मातीची पणती हे पण सांगते, “तुझा देह नश्वर झाल्यावर मातीतच मिसळणार आहे.” दिवाळीत प्रथम कराष्टमी म्हणजे मातीच्या करांची (लोटा) पूजा करून सुरवात करतात.

पूर्वी दिवाळी आली की मातीची घरे लिंपली जायची, रोज अंगणात शेणाचा सडा पडायचा आणि त्यावर रांगोळी काढायच्या स्पर्धा व्हायच्या. मुले आकाशकंदील घरी तयार करायची, तर लहान मुली घरवंडा तयार करून दुपारच्या वेळी त्यात भातुकली खेळायच्या. पहाटे रेडिओवर भक्तिगीते ऐकायचो, सुवासिक तेल व उटणे लावून अभ्यंगस्नान करायचो. नवे कपडे दिवाळी सणालाच मिळायचे. रात्री फटाके उडवायचो, पोस्ट कार्डवर शुभेच्छा लिहून पाठवायचो. अशा अनेक गोष्टींनी दिवाळी उत्साहात साजरी व्हायची. या सणाला गरिबांकडेसुद्धा गोडाधोडाचे जेवण असायचे. सणाला नवे कापड आणून कुटुंबासहित आनंद साजरा करायचे. पूर्वी आजोळी दिवाळी साजरी व्हायची. चुलतभाऊ, आतेभाऊ, मावसभाऊ, नातू-पणतू, सासुरवाशीणी यायच्या. नातवंडांना एकेक महिना आजोळी राहायला मिळायचे. सगळ्यांचा सहवास, संस्कार, प्रेम मिळायचे. मोठा सण म्हणून मुली माहेरी जास्त दिवस राहायच्या. पाखरांप्रमाणे मनमोकळे आनंद लुटायच्या. मुलगी हीच घराची खरी लक्ष्मी असते. संसार व माहेर ही दोन्ही पारडी ती कुशलतेने सांभाळते व कुणाचे मन दुखवत नाही. असा हा सण -वसुबारस ते भाऊबीज- पाच दिवसांचा असून प्रत्येक दिवसाचा महान संदेश त्यात आहे. त्यात महान अर्थ भरला आहे. भारतीय संस्कृतीने ते टिकवून ठेवले आहे व या सणांचा हेतू पुढच्या पिढीला आपण नक्की सांगू शकतो. इतका मोठा सण, मग गोड, तिखट पक्वाने आलीच. म्हणून लाडू, शंकरपाळे, अनारसे, चकली, शेव, सांजऱ्या, ही यादीच तयार झाली व हे टिकणारे पदार्थ आहेत. शिवाय गृहिणीलापण ते करण्यात आनंद वाटतो. त्यांच्यात जणू स्पर्धाच चालू असते ते करण्यासाठी!

हे संस्कार, हे विचार देण्यासाठी संत येतात, आम्हाला उठवतात. त्यांच्या अचानक येण्याने घरात पवित्रता येते. त्यांचा पदस्पर्श घराला होतो व ‘अतिथी देवो भाव!’ म्हणून त्यांची पूजा होते. घरात पवित्र, मंगलमय, व आनंदी वातावरण तयार होते. जातांना त्यांचा आशीर्वाद मिळतो. तोच आमचा दिवाळी दसरा असतो! म्हणून आमच्या संस्कृतीने संतांना ‘आई’ अशी हाक मारली. ज्ञानोबा माउली, विठाई माउली म्हणतात ती परंपरा भारतातच पाहायला व ऐकायला मिळते. संतांनी आमच्यावर आईच्या मायेने प्रेम केले, अंध:कारातून उजेडाकडे नेले, ज्ञानाचा दिवा पेटवला. आम्हीपण हृदयातला एक तरी दिवा पेटवू व संतचरणी माथा ठेवू. तीच आमची दिवाळी आहे. या संतांचे आशीर्वाद असेच या भारतभूमीवर राहोत व साऱ्या जगाला भारतदेश मार्गदर्शन करो! एकेक हिरा, मोती, रत्न या मातीत जन्मले आहे, सापडले आहे; या मातीने घडविले आहे. या खाणीतून कितीतरी रत्ने बाहेर आली आहेत. म्हणूनच एक कवी म्हणतो:

"भारतमाता आमुची, लावण्याची खाण,
रे लावण्याची खाण!
लावू पणाला प्राण आम्ही
लावू पणाला प्राण!!



Comments

Popular posts from this blog

गाईड

छान