नवीन वर्षाचे स्वागत करीत असतांना.....

शरद पांडुरंग काळे

निवृत्त वैज्ञानिक
भाभा अणुसंशोधन केंद्र sharadkale@gmail.com

नववर्षाचे स्वागत करण्याच्या विविध रीती जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये प्रचलित आहेत. आपण आपल्या नवीन वर्षाचे स्वागत करतांना गुढ्या उभारतो, तोरणे बांधतो, मिष्टान्नाचे भोजन करतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आपले नवीन वर्ष जरी गुढी पाडव्याला सुरू होत असले, तरी व्यावहारिकदृष्ट्या जगात सर्वत्र १ जानेवारी हा दिवस नववर्ष दिन म्हणून साजरा होतो.

पारंपरिक पद्धतीने ह्या उत्सवाच्या दिवशी लोक नव्या वर्षाचे स्वागत नेमके कसे करतात ते पाहणे मनोरंजक तर आहेच, शिवाय मनुष्य स्वभावाविषयी या पारंपरिक रीती आणि रूढी, त्या त्या देशातील सांस्कृतिक वारशाबद्दल बरेच काही सांगून जातात.

आपल्याकडे मीठ सांडू नये असे म्हणतात. कोणत्याही गोष्टीची सांडासांड अपेक्षित नसतेच. म्हणून मीठ सांडू नये, नाहीतर ते पापणीने भरावे लागते असा धाक घातला जातो. त्यात तथ्य काहीच नसते, पण मीठ वापरतांना काळजी घेतली जाते, ती महत्त्वाची असते. तुर्कस्तानात नव्या वर्षाचे स्वागत करतांना बरोबर रात्री बाराचे ठोके पडत असतांना, दरवाजाच्या उंबऱ्यावर मीठ शिंपडतात! शांतता नांदावी, नवीन वर्षात भरभराट होत राहावी, म्हणून हे मीठ शिंपडले जाते! स्पेन देशात लोक ३१ डिसेंबरच्या रात्री बाराचे बारा ठोके घड्याळात पडत असतांना, प्रत्येक ठोक्याबरोबर एक द्राक्ष अशी बारा द्राक्षे खातात! एकोणिसाव्या शतकात सुरुवातीला स्पेनमधील अलीकॅन्टी विभागातील द्राक्ष उत्पादकांनी अधिक द्राक्षे विकली जावीत म्हणून ही शक्कल लढविली होती, आणि ती खूपच लोकप्रिय झाली व तिचीच रूढी झाली! द्राक्षे खाल्ली की नवीन वर्ष सुखाचे जाते अशी भावना त्यामागे असते. माणूस आपल्या मनाला आनंदी ठेवण्यासाठी अशा क्लृप्त्या लढवत असतोच. आपल्याकडे साड्यांची विक्री व्हावी म्हणून नवरात्रीत रोज एक रंग देवीसाठी! अशी जाहिरात पुण्यातील काही हुशार व्यापाऱ्यांनी केली आणि एका प्रसिद्ध दैनिकाने त्याचा फायदा घेऊन आपली विक्री वाढावी म्हणून तिला उचलून धरले! झाले, ती क्लृप्ती इतकी लोकप्रिय झाली की, कदाचित देवीला भगवान श्री विष्णूंनी विचारले असावे, "बायका मनात काय दडवून ठेवतात ते मला अजून समजले नाही! कोट्यवधी वर्षांमध्ये, तुला नवरात्रात रोज नव्या रंगाची साडी लागते हे जे गुपित मला आजपर्यंत माहिती नव्हते, ते पुण्यातील आणि मुंबईतील लोकांना समजले! केवढे मनकवडे आहेत ते लोक!"

आपल्याकडे दसऱ्याला रामलीला करतात तेंव्हा रावणाचा पुतळा जाळून दुष्ट प्रवृत्तींचा प्रतिकात्मक नाश केला जातो. तसाच काहीसा प्रकार दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर या देशात नव्या वर्षाचे स्वागत करतांना केला जातो. नागरिक रात्री अकरा साडे-अकराच्या सुमारास मिरवणूक काढतात, त्यांच्या हातात देशातील राजकीय पुढाऱ्यांची आणि लोकप्रिय व्यक्त्तींची बुजगावणी असतात. बरोबर बारा वाजता ही सर्व बुजगावणी एकत्रितपणे जाळली जातात. ह्या लोकप्रिय व्यक्तींमधील दुर्गुण जाळले जाऊन त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे काम करीत राहावे अशी भावना त्यामागे असते! ब्राझीलमध्ये एका हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन समुद्राला पांढरी फुले अर्पण केली जातात. समुद्राची राणी म्हणून ओळखली जाणारी येमोजादेवी प्रसन्न राहावी, आणि नवीन वर्ष सुखाचे जावे, अशी भावना त्यामागे असते. चिली देशात तर आणखी मनोरंजक प्रकार पहावयास मिळतो! ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री, १ जानेवारी सुरू होत असतांना प्रार्थना करण्यासाठी लोक जिथे जमतात, ते ठिकाण चर्च नसून कब्रस्तान असते! आपले मृत झालेले सगेसोयरे नववर्ष सुरू होत असतांना आपल्याबरोबर असावेत, त्यांना त्या आनंदात सामील करून घ्यावे, हा त्यामागचा उद्देश असतो.

स्कॉटलंडमध्ये नवीन वर्षदिनाला हॉगमॅने (hogmanay) असे संबोधले जाते. स्कॉटिश लोकांचा असा विश्वास आहे की ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री घराच्या रिंगणात येणारी ‘पहिली व्यक्ती', ही काळे केस असलेला पुरुष असावी. तसे झाले तर नवीन वर्षात बरकत येते, भरभराट होते, वगैरे वगैरे! असे काळे केस असलेले लोक हातात कोळसा, मीठ, पाव आणि व्हिस्की घेऊन येतात! जोगव्याचा हा वेगळा प्रकार असावा! इथे जोगवा मागत नाहीत, तर जोगवा घेऊन ते येतात! काळे केस असलेला पुरुष ही संकल्पना कशावरून आली असावी? स्कॉटलंडवर व्हायकिंग लोकांचे आक्रमण झाले होते आणि त्यांनी तो देश जिंकला होता. ह्या व्हायकिंग लोकांचे केस भुरे होते आणि त्यांच्या हातात धारदार कुऱ्हाड असे! त्यामुळे दारात अशी व्यक्ती येणे अशुभ समजले जाऊ लागले, मग त्यावर उतारा म्हणजे काळे केस असलेला पुरुष! ग्रीस देशात ३१ डिसेंबरच्या रात्री म्हणजे १ जानेवारी सुरू होत असतांना, कांद्याची माळ दारावर लावली जाते! कांदे हे ग्रीक संस्कृतीत पुनर्जन्माचे प्रतीक समजले जात असल्यामुळे, ह्या रुढीमागे असा समज आहे की कांद्याची माळ नवीन वर्षात आर्थिक भरभराट घडवून आणेल. कांदे घरात ठेवले की त्यांना मूळे फुटून जशी त्यांची पात वाढू लागते, तशीच आपली वाढ होत राहावी! तथास्तु!!

आपल्याकडे किंवा जगातच सर्वत्र खातांना तोंडाने मचमच करीत खाऊ नये, ती वाईट सवय असते, असे शिकविले जाते. पण जपानमध्ये नववर्षाचे स्वागत करतांना सोबा नूडल्स तोंडाने मचमच आवाज करीत खातात! या कार्यक्रमाला टोशीकोशी सोबा असे म्हणतात! सोबा नूडल्स या पातळ आणि लांब शेवयांप्रमाणे दिसतात. येणारे वर्ष या लांब शेवयांप्रमाणे दीर्घायुष्य देणारे आणि आरोग्यदायी असेल असा जपानी लोकांचा समज आहे. सोबा नूडल्स हिंगोडा (buckwheat) या धान्याच्या पिठापासून बनवितात. आपल्याकडे उत्तरेत हे धान्य पिकते. ताकद देणारे हे धान्य आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच ते खाऊन वर्षभर आपण ताकदवान राहिले पाहिजे, असा त्याचा प्रतिकात्मक अर्थ असतो. नव्या वर्षाचे स्वागत करण्याची जपानमध्ये आणखी एक पद्धत आहे. जपानमध्ये बुद्धमंदिरे बरीच आहेत. ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी या मंदिरांमधील घंटा १०७ वेळा वाजविल्या जातात, आणि बरोबर मध्यरात्री १२ वाजता १०८ व्या वेळेस घंटा वाजवितात. या पद्धतीला जोयानोकान असे म्हणतात. माणसाच्या मनात असलेल्या १०८ वाईट इच्छांचा त्याग करून जुनी पापे धुतली जातात, असा त्यांचा विश्वास आहे!

डेन्मार्कमधील लोकांना ३१ डिसेंबरच्या रात्री, आपल्या घरासमोर तुटलेल्या चिनीमातीच्या थाळ्यांच्या तुकड्यांचा उंच ढीग पाहून धन्यता वाटते. जितका ढीग उंच, तितके नशीब चांगले, आणि नव्या वर्षात सुख अधिक असे त्यांचे गणित आहे! त्यांच्याकडे पद्धत अशी आहे की, ते आपल्या शेजाऱ्यांच्या आणि मित्रांच्या घरासमोर जाऊन या चिनीमातीच्या थाळ्या फेकतात. त्या रूपाने आक्रमकता आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश होऊन पुढचे वर्ष सुखाचे जाते असा त्यांचा विश्वास आहे. चिनी मातीच्या वस्तूंचा व्यापार करणाऱ्यांसाठी ही पर्वणी असते. कदाचित त्यांच्यातील हुशार आणि धूर्त माणसाने पूर्वी कधीतरी ही पद्धत विकसित केली असावी! ट्रक्स भरभरून ह्या थाळ्यांची विक्री होते! ग्रीसमध्ये अशाच प्रकारे पण थाळ्यांच्या ऐवजी डाळिंबे फेकून नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. ग्रीक पुराणात डाळिंबाला अतिशय महत्त्व आहे. डाळिंब हे जीवन, सुपीकता आणि आबादीआबाद (विपुल उपलब्धता) यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे ते उज्ज्वल भविष्याचे प्रतीक मानतात. दुसऱ्याच्या घरासमोर न फेकता, ते स्वतःच्याच दारावर आपटले जाते, आणि त्यातून जितक्या जास्त बिया विखुरल्या जातील, तितके नवे वर्ष अधिक चांगले जाईल, असा ग्रीक लोकांचा विश्वास आहे.

जर्मन लोक नवे वर्ष साजरे करतांना शिसे वितळवितात! याला जर्मन भाषेत ब्लाईगीजीन असे म्हणतात. मेणबत्तीच्या ज्योतीवर शिशाचा किंवा कथलाचा तुकडा वितळवितात आणि तो वितळलेला धातूरस थंड पाण्यात ओततात. त्याचा आकार जसा बनेल, त्यावर त्या व्यक्तीचे नवे वर्ष कसे जाईल याचा अंदाज बांधता येतो, असा जर्मन लोकांचा विश्वास आहे. रशियन संस्कृतीत, नव्या वर्षाचे स्वागत करतांना, आपल्या मनातील इच्छा कागदावर लिहून तो कागद जाळतात, आणि त्या कागदाची राख शॅम्पेनमध्ये मिसळून पितात! असे केले तर त्या इच्छा पूर्ण होतात, असा त्यांचा समज आहे. आपल्याकडील बेवडा संस्कृतीत हा रिवाज चटकन स्वीकारला जाईल! झेक लोक नववर्षाचे स्वागत करीत असतांना आपले नशीब नव्या वर्षात कसे असेल याचा अंदाज बांधण्यासाठी सफरचंदाच्या फळाचा वापर करतात. प्रत्येक जण ३१ डिसेंबरच्या रात्री बारा वाजण्यापूर्वी एक सफरचंद कापतो. त्या सफरचंदाच्या गाभ्याचा आकार नशीब कसे असेल ते ठरवितो असा त्यांचा विश्वास आहे. जर तो गाभा ताऱ्याप्रमाणे असेल तर त्या व्यक्तीचे पुढील वर्ष आनंदाचे आणि सुखाचे जाईल, पण जर तो गाभा क्रॉस किंवा फुलीच्या आकाराचा असेल तर नवीन वर्षात आजारपणाचा सामना करावा लागेल! आर्मेनियन लोक ३१ डिसेंबरच्या रात्री स्वतःसाठी पाव भाजतात. त्यासाठी जी कणिक ते मळतात, त्यात एक विशेष पदार्थ टाकला जातो! त्या पदार्थाचे नाव आहे ‘चांगले नशीब’! ते घालून पीठ मळले जाते आणि पाव बनतो! असे केले तर पुढील वर्ष चांगले जाईल असे त्या भाबड्या लोकांना वाटते!

नवे वर्ष सुरू होताना नवनवीन संकल्प केले जातात! या संकल्पांपैकी किती पुरे होतात हा संशोधनाचा विषय आहे! असे एक संशोधन झाले आहे, आणि त्यात असे दिसले होते की, फक्त आठ टक्के लोकांचे संकल्प पूर्ण होऊ शकले! आपण आपल्याबाबतीत हा अभ्यास नक्की करू शकतो. आपल्याही लक्षात येईल, की सहसा असे संकल्प पहिला महिनाच नाही नव्हे, तर पहिला आठवडा संपण्यापूर्वीच हवेत विरून जातात! माणसे आपणच केलेला संकल्प कसे विसरतात? त्याचे महत्वात्त्वाचे कारण असे आहे की, संकल्प करीत असतांना ते भावनेच्या भरात केले जातात! नववर्षाची सुरुवात करीत असतांना मित्र मंडळात चाललेल्या गप्पाटप्पांमध्ये मनात काहीतरी येते, आणि पुढचा मागचा विचार न करता, आपण त्याला संकल्प म्हणून जाहीर करून टाकतो! पण त्याचा आवाका नंतर जेंव्हा लक्षात येतो, त्यावेळी हे आपल्याला शक्य नाही असे लक्षात येते, आणि संकल्प विसरला जातो. ‘प्राण जाय पर वचन न जाय!’ हे ऐकायला बरे वाटते, पण स्वतःशी जो प्रतारणा करतो, त्याचे दुसऱ्याशी वर्तन कसे असेल, याची कल्पनाच केलेली बरी! काही लोकांना स्वतःमध्ये बदल करण्याची तीव्र इच्छा असते, त्यामुळे ते जे संकल्प करीत असतात, ते त्यांना काय वाटते, त्यावर अवलंबून असतात, पण काय शक्य आहे, याचा अंदाज घेतलेला नसल्यामुळे ते हवेत विरतात. एखादा माणूस सतत सिगारेट ओढत असेल, तर तो सिगारेट सोडण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे, मी एकही सिगारेट ओढणार नाही असा संकल्प करून बसतो, आणि दुसऱ्याच सकाळी त्या संकल्पाला तिलांजली मिळते! आपण संकल्प पुरा करू शकत नाही, या जाणीवेने त्याला नैराश्यदेखील येऊ शकते. या उलट जर त्याने सिगारेटची संख्या कमी करीत जाण्याचा संकल्प केला, तर त्यात यश येण्याची शक्यता अधिक असते. कदाचित वर्षअखेरीस तो त्या व्यसनातून पूर्ण मुक्तही होऊ शकतो! संकल्प करीत असतांना स्वतःच्या मर्यादा समजावून घेणे अधिक गरजेचे असते. मर्यादा ओलांडण्यासाठी मर्यादा माहिती पाहिजे! तीच माहिती नसली, तर ओलांडणार काय आणि कशी? सकारात्मक बदल करण्यासाठी हे सर्व जरुरीचे आहे. जर तुम्ही अजिबात व्यायाम करीत नसाल, तर रोज एक तास व्यायाम करण्याचा संकल्प टिकू शकणार नाही. पण पंधरा मिनिटे व्यायाम करण्याचा संकल्प करून वर्षअखेरीस एक तास व्यायामापर्यंत तुम्ही नक्की पोहोचू शकाल.

प्रत्येकाने करावेत असे काही संकल्प इथे सुचवावेसे वाटतात. हे संकल्प सोपे आहेत की अवघड आहेत, हा प्रश्न नसून, ते आपल्या व्यक्तिगत सुधारणेसाठी आहेत, हे लक्षात घेतले, तर ते पूर्ण होण्याची शक्यता अधिक असेल.

प्रत्येक माणूस साधारणपणे वार्षिक ३०० ते ४०० किलो कचरा निर्माण करतो. ह्या वैयक्तिक चार क्विंटल मधूनच देशात ४० कोटी टन कचरा दर वर्षाला निर्माण होतो. आपण आपला कचरा नवीन वर्षात अर्ध्यावर आणला तर देशाला आणि स्वतःला किती उपयोग होईल, या दृष्टीने संकल्प केला पाहिजे. ताटात अन्न टाकले जाणार नाही याची दक्षता घ्या. वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी त्यांच्या पुनर्चक्रांकनाकडे लक्ष द्या.

नवीन वर्षात आपल्या विषयाशी संबंधित सहा ते दहा पुस्तके आणि अवांतर वाचनाची सहा ते दहा पुस्तके वाचण्याचा संकल्प वर्षअखेरीस आपल्याला मनाने अधिक श्रीमंत करून सोडेल यात शंकाच नाही.

दर महिन्याला किंवा दर दोन महिन्यांनी कोणत्या तरी एका व्यक्तीच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा मनापासून प्रयत्न करा. त्यासाठी अनाथाश्रमात जाऊन तेथील अनाथ मुलांशी संवाद साधणे, रुग्णशय्येवर असहाय्य अवस्थेत असणाऱ्यांना मदत करणे, आपल्या मित्रांची, नातेवाईकांची आस्थेने चौकशी करून त्यांना मदत हवी असल्यास ती करणे, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत करणे, संकटकाळी संकटग्रस्तांना मदतीसाठी धावून जाणे यासारख्या बाबींचा विचार करता येईल.

आठवड्यातून एक दिवस इलेक्ट्रॉनिक माध्यमांपासून दूर राहून तो वेळ आप्तस्वकीयांसाठी खर्च करा किंवा हवापालटासाठी त्याचा उपयोग करा.

दिवसाचे एक तरी जेवण कुटुंबातील सर्वांनी एकत्र घ्या आणि त्यावेळी मोबाईल कसोशीने दूर ठेवा.

आठवड्यातून एक दिवस तरी इंधनबचतीच्या दृष्टीने स्वयंचलित वाहने वापरू नका.

स्वतःच्या शरीराची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने स्वतःच्या शरीरासाठी कमीतकमी अर्धा ते एक तास देऊन योग्य ते व्यायाम करा.

घरातील कामात प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहिजे. घरातील एकाच व्यक्तीने राबायचे आणि बाकी सर्वानी बसून खायचे ही प्रवृत्ती आपल्या घरात नाही याची आवर्जून काळजी घ्या.

नव्या वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.


Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी