पुनर्जन्म

अरुंधती सरपटवारी

"आई पुनर्जन्म म्हणजे काय?" मी स्वयंपाकघरात रवा भाजण्यात मग्न असताना हा अनपेक्षित प्रश्न कानांवर पडला. रॉकीच्या मागे पळतापळता माझ्या आठ वर्षाच्या मुलाने- अमितने- हा प्रश्न मला पुनःपुन्हा विचारला.

मी मागे वळून पाहेपर्यंत अमित झर्रकन फॅमिली रूममध्ये पळताना दिसला. इतका गंभीर प्रश्न म्हणजे शाळेकरता काही तरी असेल असं वाटून, मी चटकन हातातला चमचा आणि रवा तसाच बाजूला ठेवून स्टोव्ह बंद केला.
"का रे, काही प्रोजेक्ट आहे का शाळेत"? फॅमिली रूममध्ये येता येता मी विचारलं.
“नाही आई प्रोजेक्ट नाही. काल ना तुला आणि बाबांना बोलतांना मी ऐकलं. आय नो ‘जन्म’ पण ‘पुनर्जन्म’ म्हणजे काय मला माहीत नाही.” रॉकीशी खेळणं थांबवत त्याने गंभीर होत पुन्हा विचारलं, "आई पुनर्जन्म म्हणजे काय सांग ना!" दुसऱ्या मिनिटाला परत त्याचं रॉकीशी खेळण चालू झालं.
मी त्याला जवळ घेत म्हणाले, “हे बघ या रॉकीनी ना गेल्या जन्मी खूप पुण्य केलं असणार म्हणून तो ह्या जन्मी आपल्या घरी आला. गेल्या जन्मी तो कोणीतरी दुसरा होता.”
“दुसरा म्हणजे?”
मी मनात म्हटलं स्वारींचा दुसरा प्रश्न म्हणजे आजचा दिवस प्रश्नांचा दिवस आहे तर! माझी पण उत्तर देण्यासाठी तयारी आहे असं दाखवत मी म्हणाले, "तो ना गेल्या जन्मी मुंगी,पक्षी, किंवा कॅट असा कोणी तरी असेल. त्यानं गेल्या जन्मी काही तरी चांगलं म्हणजे पुण्य केलं आणि नंतर तो डॉग म्हणून जन्माला आला आणि आपल्या घरी आला. इथे आपण त्याचे खूप लाड करतो. पुन्हा जन्म घेणं म्हणजेच ‘पुनर्जन्म’. समजलं का?” “मी कोण होतो ग गेल्या जन्मी?” त्याचा प्रश्न ऐकून मी थक्कच झाले. मी काही म्हणण्यापूर्वीच हसत हसत तोच म्हणाला, "मी ना नक्की डॉग होतो!"

रॉकी आमच्या जीवनात आला आणि त्याने सर्वांना आपलंस केलं. आम्हीही त्याला कुटुंबात सामावून घेतलं. या गोष्टीला जवळजवळ १०-१२ वर्षं झाली असतील. या काळात रॉकीने सर्वांना प्रेम, मैत्री, आज्ञाधारकपणा वगैरे खूप शिकवलं. ह्या १५ वर्षांच्या काळाला ‘अविस्मरणीय’ करत रॉकी एक दिवस आम्हाला सोडून गेला. आम्हा सर्वांवर दुःखाचा पूर लोटला. पण काळाच्या नौकेने दुःखावर मात करून कसाबसा किनारा दाखविला. अमितने रॉकीचा पट्टा, त्याची खेळणी वगैरे अजूनही नीट सांभाळून ठेवली आहेत. सुट्टीत अमित घरी आला म्हणजे रॉकीचे व्हिडिओ, फोटो, त्याची हुशारी, वगैरे आठवणींत आम्ही मनसोक्त बुडतो. लहान असताना विचारत असे तसेच आणखी काही प्रश्न अमितने एकदा विचारले आणि त्या प्रश्नांसोबत विचारांच्या वावटळीने मला घेरलं. "आता रॉकी कुठे असेल ग आई? त्याला कोणता जन्म मिळाला असेल? आपल्याला भेटेल का कुठे? भेटलो तरी तो आपल्याला आणि आपण त्याला ओळखू का? माझ्या ना तो खूपदा स्वप्नात येतो. अगदी तसाच दिसतो. आय मिस हिम अ लॉट आई! वावटळीबरोबर डोळ्यांतील पाण्याने पुराचे रूप घेतले. त्याचं वेळी सेलफोनने वेळेवर घंटी वाजवून माझी सुटका केली. माझ्या मैत्रिणीचा फोन होता. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या ट्रिपचे पैसे भरले की नाही विचारायला तिने फोन केला होता. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडची ट्रिप या गोड शब्दांचे शिंतोडे दुखावलेल्या मनाला सुखावणारे होते. ट्रिपबद्दल आमचं खूप वेळ बोलणं झालं. अमितच्या प्रश्नांना उत्तरासाठी थांबावं लागणार होतं. दुसऱ्याच दिवशी अमित कॉलेजला जाणार असल्यामुळे गडबडीत आमचं बोलणं तसंच अर्धवट राहून गेलं.

भरपूर तयारीनंतर महिन्याभरातच आम्ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला कूच केलं. ऑस्ट्रेलिया कॉस्मोपॉलिटन सिटी, ऑपेरा हाऊस, ब्रिज, वगैरे विविध स्थळं पाहत, तिथे असलेल्या नातेवाईकांना भेटून, शॉपिंग करून, न्यूझीलंडला पोहोचलो. न्यूझीलंडचं निसर्गसौंदर्य मनात साठवत आम्ही एक दिवस सबमरीनमध्ये उतरलो. कोरल रीफ पाहण्याची इच्छा आज पूर्ण होणार या विचाराने आनंदाला भरती आली होती. सबमरीन लहानच होती. डावीकडे एक सीट आणि उजवी कडे एक सीट आणि त्या डावीकडच्या आणि उजवीकडच्या सीट मागे दहा का बारा सीट्स होत्या. म्हणजे एकूण वीस बावीस लोकं बसतील एवढी जागा होती. प्रत्येक सीटजवळ मोठी काचेची खिडकी होती. कुठे बसावं समजत नव्हतेतं. नेहमीप्रमाणे मिस्टरांनी मला दिलेला अधिकार पाळून घेऊन मी पहिली सीट घ्यायची ठरविली. मिस्टरांना खुणावीत मी डावीकडे आणि माझे मिस्टर उजवीकडे स्थानापन्न झालो. सबमरीनाचा बाहेर असलेला मोठा पंखा अगदी जवळ पाहून माझे मिस्टर नाखूष दिसले. दुसरीकडे बसायचं का म्हणेपर्यंत सगळ्या जागा भरल्या गेल्या. मन थोडं चुकचुकलं. आपण चुकीच्या जागेवर बसलो असं वाटलं. सबमरीनच्या बाहेरच्या पंख्याने पाण्यात एकदम बुडबुडे काढायला सुरवात केली आणि स्पीकरवर गाईड माहिती द्यायला लागला.

इतक्यात एक मोठा मासा माझ्या खिडकीजवळ आला. अगदी खिडकीला लागून होता. गाईड आणि सर्व लोकं एकदम शांत झाले. सगळ्याचं लक्ष त्या माशाकडे होतं. गाईडने त्याचं नाव सांगितलं. तो मांसाहारी आहे असही सांगितलं. त्याचे डोळे मोठे होते आणि तो खिडकीतून आत एकटक पाहत होता. सबमरीनने आता थोडी गती घेतली होती. अनेक प्रकारांचे, रंगांचे मासे, कासवं, शार्क, कोरल्स दिसत होते, पण माझ्या खिडकीजवळ असलेला तो मासा मात्र खिडकी सोडून हलत नव्हता. इतर मासेपण खिडकीच्या आसपास यायचे पण लगेच निघून जायचे. हा मासा मात्र माझ्याकडे रोखून पाहत होता. आधी मी मनातल्या मनात त्याला विचारत होते, कोण आहेस रे तू? तुला काही पाहिजे आहे का? माझ्याकडे तुला द्यायला काही नाही, असा का पाहतो आहेस माझ्याकडे? थोड्या वेळाने मी मोठ्याने त्याच्याशी बोलू लागले. सर्व लोक कौतुकाने आमचे संभाषण ऐकत होते. दहा-पंधरा मिनिटांनंतर तो एकदम निघून गेला. मला जरा खटकलं. कुठे गेला असेल? वाटलं, गेला असेल त्याच्या मित्रांबरोबर किंवा त्याच्या कुटुंबाकडे. माझे मिस्टर म्हणाले, "हे बघ, तो इकडे आलाय." माझं कुतूहल वाढलं. मी अधाश्यासारखी त्याच्याकडे पाहू लागले आणि तोही त्या पलीकडल्या खिडकीतून मोठे डोळे रोखून माझ्याकडे पाहत होता. एका मिनिटातच ती खिडकी सोडून तो झट्कन परत माझ्या खिडकी जवळ आला. मलाच काय पण आत बसलेल्या सर्वांना परत त्याला माझ्याजवळ पाहून खूप आश्चर्य वाटलं. सगळे आपली जागा सोडून त्याला पाहायला उठले. पण गाईडने सर्वांना जागेवर पाठवलं आणि आमचं दोघाचं संभाषण परत चालू झालं. सबमरीनची फेरी पंचेचाळीस मिनिटांची होती आणि हा माझा नवा मित्र पूर्ण प्रवासात माझ्या जवळ होता. सबमरीन वळणं घेत होती आणि तोही वळणं घेत घेत खिडकीजवळ रहात होता. त्याच्याशी बोलता बोलता मी त्याला विचारत होते, “कोण होतास रे गेल्या जन्मी? का असा तू माझ्याकडे टक लावून पहात आहेस?”

सर्व लोकं आमचं संभाषणं ऐकून थक्क होत होते. पाहता पाहता राईड संपल्याची घोषणा झाली आणि तो एकदम दिसेनासा झाला. बाहेर सबमरीनच्या पंख्याने बुडबुड्यांचा लोंढा झाडला व आत माझा श्वास गुदमरला. दुःखाच्या लाटेने मला आत ओलंचिंब केलं. सर्व मंडळी बाहेर पडली. माझा पाय मात्र सबमरीनला जणू चिकटून बसला होता. तो पुन्हा परत येईल, मी त्याला पुन्हा एकदा तरी पाहीन, परत त्याच्याशी बोलेन असं वाटत होतं. पण तो पुन्हा दिसलाच नाही. जड पायांनी आणि ओल्या डोळ्यांनी मी कशीबशी बाहेर आले.

तो गेल्याजन्मी कोण होता? तो रॉकी तर नव्हता ना? त्याला काय सांगायचं होतं? मला अगदी मनापासून वाटत होतं की तो रॉकीच होता. त्याचा इथे न्यूझीलंडच्या पाण्यात पुनर्जन्म झाला होता. आम्हाला भेटला, अमितच्या प्रश्नांना सोडवून गेला. तो मला आता पुन्हा कधीच दिसणार नाही, पण त्याचा फोटो व आठवणी मनांत फुलवून गेला. मी आता अमेरिकेत परत जाणार आणि हा इथे लांब समुद्रापलीकडे. कशी होणार आमची भेट? मला मनापासून वाटलं, आज भेटलो ना तसेच पुन्हा कुठे तरी, या जन्मी किंवा पुढच्या जन्मी नक्की भेटू आणि ओळखू. अमितने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. पुनर्जन्म शब्दाची, आनंदाची, भेटीची, प्रेमाची, आठवणींची मोठी लाट अंगावर घेत मी सबमरीनच्या बाहेर आले. कधी एकदा परत जातो आणि अमितशी बोलतो असं झालं. "छान सीट निवडलीस," मिस्टरांचे शब्द कानावर घेत घेत मी म्हंटलं, “हो ना जे होतं ते चांगलंच होतं. आपण दुसरीकडे बसलो असतो तर कदाचित....” नकोच तो विचार. जे होतं ते...

Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी