संपादकीय


जानेवारी २०२१
अंक १


मैत्र संपादक मंडळ २०२१ 

वरदा वैद्य 

विदुला कोल्हटकर 

रोहित कोल्हटकर 

कपिल धाकड 

मधुर पुरोहित 

 

बाममं कार्यकारिणी २०२१ 

अध्यक्ष 

रोहित कोल्हटकर 

उपाध्यक्ष 

ऋद्धी आठवले वाडदेकर 

 उपाध्यक्ष- विपणन 

समीर अहिरराव पाटील 

चिटणीस 

मधुर पुरोहित 

खजिनदार 

केतन बर्डे 

सह-खजिनदार 

रवी महाजन

सध्या हिवाळा आणि त्यात करोना. त्यामुळे ‘हेमंती तर नुरली हिरवळ, शिशिर करी ह्या शरीरा दुर्बल’ अशी स्थिती झाली आहे. मात्र, सूर्याने उत्तरायणास सुरुवात केली आहे. मकरवृत्ताच्या भोज्याला शिवून सूर्य कर्केकडे चालू पडला आहे. ‘पुन्हा वसंती डोलणाऱ्या पर्णकेतूंची’ अपेक्षा मनाला उभारी देणारी आहे.

मागच्या वर्षी बाममंने संक्रांतीचा कार्यक्रम दोन ठिकाणी धडाक्यात साजरा केला होता. तिळगुळाच्या आणि गूळपोळीच्या गोडीची चव जिभेवर रेंगाळत असतानाच कोव्हिडच्या सावटाने जग आच्छादायाला सुरुवात केली. ह्या सावटात होळी-रंगपंचमीचे रंग तर उडालेच, शिवाय गुढीपाडवा, उन्हाळी सहलही रद्द करावी लागली. गणपती आणि दिवाळीचे सणही आप्त-स्नेह्यांशिवाय आपापल्या घरापुरते मर्यादित ठेवावे लागले. बऱ्याच गोष्टी करण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागले, लागत आहे. शाळा, काम, गणपतीची आरती, दिवाळीनिमित्त कार्यक्रम, अगदी थॅंक्सगिव्हिंग आणि नाताळचे जेवणही अनेकांनी झूमवर केले. ह्यावर्षीही बाममंचा संक्रांतीनिमित्तचा कार्यक्रम झूमवरच झाला, त्याला तुम्ही उपस्थित राहिले असालच. करोनाचे सावट अजूनही असले तरी आता लसीकरणामुळे तो लवकरच आटोक्यात येईल अशी आशा करू.

गेल्या वर्षी मराठी कला मंडळासोबत साहित्य देवाणघेवाणीचा उपक्रम मंडळाने राबवला होता. हितगुजाच्या नव्या संपादिकेशी मैत्र संपादक मंडळाने संपर्क करून ह्या वर्षीही तो उपक्रम सुरू ठेवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार हितगुज मासिकात प्रकाशित झालेला मकर संक्रांतीविषयीचा लेख ह्या अंकात पुनर्प्रकाशित केला आहे. अंकात नेहमीप्रमाणे विविध विषयांवरचे साहित्य आहे. कथा, कविता, अनुभव, आणि ललित लेखांनी अंक सजला आहे.

मागच्या अंकापासून कलाकार-ओळख हे नवे सादर सुरू केले होते. तुम्ही एखादी कला जोपासत असाल तर तुमची कलाकार म्हणून ओळख करून घ्यायला आम्हालाही आवडेल. त्यासाठी आम्हाला जरूर संपर्क करा.

दिवाळीत केलेल्या, हसल्या-फसलेल्या लाडवांच्या पाककृती, त्यासोबतच्या आठवणींसकट पाठविण्यासाठी आम्ही मागच्या अंकात आवाहन केले होते. ह्या आवाहनाला प्रतिसाद देत आलेले तीन लेख ह्या अंकात आहेत. ह्या पाककृतींची लज्जत तिळगुळाच्या लाडवांच्या बरोबरीने चाखता येईल. आवाहनाला प्रतिसाद देऊन लेखन पाठविणाऱ्यांचे आभार! पुढच्या अंकासाठीचे पदार्थ आहेत तिखट वा गोडाचे सारण भरून केलेल्या पोळ्या. संक्रांतीच्या निमित्ताने काही घरी गुळाच्या पोळ्या करून झाल्या असतील. होळीच्या निमित्ताने घराघरांत पुरणपोळ्या होणार असतील. सांज्याच्या वा खव्याच्या गोड पोळ्या करण्यात अनेक पारंगत असतील. शिवाय विविध भाज्यांचे सारण भरून केलेले ‘स्टफ्ड’ पराठे म्हणजे सुद्धा ‘सारण भरलेल्या पोळ्या’च असतात. तेव्हा गोड पोळ्या वा पराठयांच्या पाककृती, त्या करतानाच्या आठवणी आणि अर्थातच त्यांचे फोटो आम्हाला जरूर पाठवा. ह्या पोळ्या/पराठे खुसखुशीत होण्यासाठीचे तुमचे खास नुस्खेही लिहायला विसरू नका.

मैत्र संपादक मंडळातर्फे सर्वांना आरोग्यपूर्ण व कोव्हिडमुक्त नवीन वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा!

Comments

Popular posts from this blog

गाईड

छान