शुभोसाठी प्रसाद

धनंजय वैद्य

“सतीश! विनूला घेऊन जा तुझ्याबरोबर शुभोजितच्या घरी,” आई दादाला म्हणाली. दादानी नेहमीसारखं खाडकन् “नको येऊस रे !” म्हटलं नाही.

मी खूप छोटा होतो, तेव्हा खूपदा दादा खेळायला जाताना मला येऊ द्यायचा. दादा, शुभो आणि बाकीच्या मोठ्या मुलांचा क्रिकेट खेळायचा ग्रूप होता. तिकडे मला बॅटिंग-बोलिंग द्यायचे नाहीत, पण फील्डिंग करायला सांगायचे. दादा नाही, तरी शुभो मुद्दामून माझ्याकडे बॉल टाकायचा. तेव्हा मला दादापेक्षा शुभोच जास्त आवडायचा. मग अकरावी-बारावीत गेल्यावर दादा मला यायला नको म्हणायला लागला. मी एकदा दोनदा रडलो, तेव्हा आई दादाला ओरडली – तरी दादानी मला नेलं नाही. “शुभो आणि मी क्रिकेट खेळायला नाही, नुसते गप्पा मारायला जातोय,” म्हणाला. पण म्हणून काय झालं?

मग दादा आणि शुभो दोघंही इंजिनियरिंग करायला दूर त्यांच्या त्यांच्या कॉलेजांना गेले. या वर्षी दादा उन्हाळ्याच्या सुट्टीला आला तेव्हा तो माझ्याशी नीट बोललासुद्धा नाही. सारखं हिडीसफिडीस करत होता. या दिवाळीत तर तो यायचाच नव्हता. पण मग एकदम काल रात्री सुट्टी संपायच्या आधी आला.

“हे बघ सतीश, प्रसादाचा डबा वजनाला कमी आहे, तो विनूला दे. भाजीचा टिफिन आणि पुऱ्यांचं पार्सल जड आहे, दोन्ही तू उचल. मुखर्जींच्या घरी शुभोचे मामा-मामी आणि दादाजी आलेले आहेत. मामीला एकटीला इतका स्वयंपाक जड जात असणार. तेवढाच आधार होईल.”

मुखर्जी आंटी खूप मस्त मिठाई करतात. प्रसादाच्या डब्यात त्या बहुतेक रसगुल्ले परत पाठवतील, असं मला नक्की वाटत होतं.

बाहेर पडल्यावर दादा लांब ढांगा टाकत जायला लागला. मला थोडंथोडं पळायला लागत होतं. मी “दादा, थांब!” म्हणालो, तेव्हा दादा थांबला. हातातली पिशवी कोपराशी ओढून त्यानी हात माझ्या खांद्यावर ठेवला. “चल,” म्हणाला. मग आम्ही दोघं एकत्र शुभोच्या घरी पोचलो.

एक आजोबा अंगणात खुर्चीवर बसलेले होते. त्यांनी दोन्ही हातांची ओंजळ करून त्यात कपाळ धरलं होतं. त्यांनी मान वाकडी करून आमच्याकडे बघितलं, पण दादानी “नमस्ते जी” म्हटलं, तेव्हा त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. शुभोची दीदी दाराशी आली. “ये सतीश, विनय, ये,” म्हणाली. दादा म्हणाला “आईनी शांतिपाठाचा प्रसाद पाठवला आहे.” त्यानी मला पुढं ढकललं, आणि मी प्रसादाचा डबा वर धरला. दीदीनी माझ्या हातातून डबा घेतला – “मी नेते आत. माँ आता भेटेल का माहीत नाही, विचारते.” म्हणाली.

“आणि आईनी ही पुरीभाजी पाठवली आहे,” दादानी टिफिन आणि पिशवी पुढे केली. “मी घेते एक काहीतरी,” म्हणत एक आंटी आतल्या दाराचा पडदा बाजूला करत मागून पुढे आल्या, आणि टिफिन-पिशवी घेऊन आत गेल्या. ही शुभोची मामी असणार आणि एका खुर्चीवर बसलेले ते त्याचे मामा असणार. ते म्हणाले, “ये बेटा, बस इकडे.”

पण मी दाराचा पडदा धरून उभा राहिलो. दादा त्यांच्याशेजारच्या खुर्चीत बसला. “नमस्ते, अंकल. मी सतीश. शाळेत मी शुभोजितचा क्लासमेट होतो. सध्या कऱ्हाडला इंजिनियरिंग करतोय.”

“अच्छा, बेटा. शुभोचे बाबा अजून पटियालामध्येच आहेत. अजून पोलिसांनी बॉडी रिलीझ केलेली नाहीए.”

“अंकल, काय कसं घडलं – पोलीस काही सांगतायत का? शुभो त्याच्या कॉलेजच्या टीमबरोबर मॅचसाठी पाटियाल्याला गेला होता, इतकंच मला माहीत होतं.”

“फार काही सांगत नाहीयेत. त्यांच्या टीमची राहायची सोय हॉस्टेलमध्ये केली होती – एकेका खोलीत तीन-तीन जणं. मुलं उशीरापर्यंत गप्पा मारत होती, नुकतेच झोपण्यासाठी दिवे मालवले होते, म्हणे. कोणी दारांना कड्या लावल्या नव्हत्या. आतंकवादी रात्री साधारणपणे दोन वाजता आले. एकेका खोलीत जाऊन धडाधडा गोळ्या झाडल्या. शुभो तिसऱ्या का चवथ्या खोलीत होता. त्याला जाग आली होती, आणि तो डेस्कखाली लपला होता. पण तरी आडवीतिडवी उडालेली एक गोळी त्याच्या मांडीला लागली. माहीत नाही – हॉस्पिटलमध्ये पोचला असता तर वाचला असता – पण तो बेशुद्ध पडला होता. स्लो ब्लीडिंगनी जागच्या जागी... ही डाईड.” आतून एक किंकाळी आली. तो आवाज इतका विचित्र खरखरीत, म्हैस रेकल्यासारखा होता, की मला काय झालं कळलंच नाही. मला वाटलं की मी हसायला लागीन की काय.

आऽऽऽ सतीऽऽऽश शुभोऽऽऽ.

मग मी दादाकडे बघितलं. त्याचे डोळे रडल्यासारखे झाले होते. आतल्या दाराकडे बघत तो गांगरलेला, भेदरलेला दिसत होता. मी त्याला तसा कधीच बघितलेला नव्हता.
शुभोची दीदी घाईघाईनी बाहेर आली – “सतीश, प्लीज. आत जा, काही नाही, जस्ट माँचा हात धर. ...” मग दीदीनी लगबगीनी मला ढकलत घराबाहेर आणलं. माझ्या डोक्यावर आणि पाठीवर हात फिरवून ती “श्श्श, श्श्श,” म्हणत होती.

मग मला खूप राग आला. दुष्ट आतंकवाद्यांचा, डेस्कखालीसुद्धा गोळ्या गेल्याचा, शुभो हॉस्पिटलमध्ये वेळेत पोचला नाही त्याचा, तो स्लो ब्लीडिंगनी मेल्याचा राग आला. शुभो मॅचसाठी पटियालाला गेला, मुळात तिकडे पंजाबमध्ये शिकायला गेला, त्याआधी त्याच्याशी गप्पा मारायला दादा मला न्यायचा नाही, त्या सगळ्याचा राग आला. मुखर्जी आंटी तशा किंचाळल्याचा, दादा तसा कावराबावरा झाल्याचा, अंगणातले आजोबा तसे गप्प बसल्याचा, आईनी आमच्याबरोबर असा प्रसाद पाठवल्याचा राग आला. मला काय करायचं ते कळत नाही, कोणी काही सांगत नाही, त्याचा भयंकर राग आला. दीदी पाठीवरून हात फिरवत राहिली आणि मी गालांवरचं गरम पाणी पुसत राहिलो.


Comments

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी