झटापट ते झटपट

वरदा वैद्य

फार फार म्हणजे सात वर्षांपूर्वीची गोष्ट. दिवाळीत लाडू करायला जमले नव्हते, म्हणून थँक्सगिव्हिंगच्या सुट्टीत बेसनाचे लाडू करण्याची दुर्बुद्धी मला सुचली. कढईत दोन कप बेसन थोड्या तुपावर भाजायला घेतले.

कढई चटकन तापावी म्हणून आंच वाढवली आणि तिथेच लाडू फसण्याची नांदी झाली. बेसन जळण्याचा वास आला आणि घाईत आंच कमी केली. शक्य झाले तेवढे जळके बेसन काढून टाकले आणि अगदी मंद आंचेवर बेसन ढवळत राहिले. हा दुखून आला तरी बेसन भाजल्याचा खमंग वास काही येईना. नेटाने ढवळाढवळ सुरूच ठेवली. शेवटी उजव्या हाताने असहकार पुकारल्यावर थांबले. बेसन थोडे गार झाल्यावर मापात साखर घातली आणि थोडे मिश्रण तोंडात टाकले. बेसन अजूनही कच्चेच होते. आता तर साखर घालून झालेली असल्यामुळे पुन्हा भाजणेही शक्य नव्हते. मोठीच पंचाईत झाली. हे प्रकरण लाडू म्हणून खपणे अवघडच होते. आता ह्याचे काय करावे?

एका सुगरण मैत्रिणीला शरण गेले. मला ह्या बेसनप्रकरणातून तूच तारू शकतेस असे म्हणत खुशामतीने तिला प्रसन्न करून वर मागून घेतला. तिनेही सढळ हाताने प्रसन्न होत मला नानकटाईचे व्रत सांगितले. नानकटाईची तिची हातखंडा पाककृती तिने मला पुरवली. बेसन, साखर आणि तूप हे जिन्नस माझ्या फसलेल्या लाड़ूमिश्रणात होतेच. आता त्यातच थोडा रवा आणि मैदा घातला की नानकटाईसाठी लागणाऱ्या जिन्नसांची पूर्तता होणार होती. पण जिन्नसांचे प्रमाण पाहते तर काय! पाव कप बेसनासाठी तेवढाच रवा आणि तिप्पट की चौपट मैदा घ्यायचा होता. मी तर इथे दोन कप बेसन फसवून बसले होते. त्यात आणखी दोन कप रवा आणि सहा-आठ कप मैदा घालून केलेली केलेली नानकटाई संपवण्यासाठी मला गावजेवण घालावे लागले असते. शिवाजी महाराजांनी आग्ऱ्याहून सुटका करून घेताना वापरलेल्या मिठायांच्या पेटाऱ्यांमध्ये मी नानकटाई भरत असल्याचे चित्र माझ्या डोळ्यांपुढे तरळून गेले. पण ठरवले की आता माघार नाही! आधी लगीन बेसनाचे! हर हर महादेव!

नानकटाईचे व्रत मी घेतले. उतणार नाही, मातणार नाही, घेतले बेसन टाकणार नाही म्हणत व्रताच्या तयारीला लागले. सुगरण मैत्रिणीच्या घरी नानकटाईचा भरपूर प्रसाद पाठवून व्रताचे उद्यापन करण्याचा संकल्प सोडला आणि एप्रन कसून कामाला लागले. फसलेल्या लाड़ूमिश्रणात रवा, मैदा, साखर, तूप आणि वेलचीपूड ओतली आणि तो अवाढव्य कारभार ढवळायला अवाढव्य प्रमाणात भांडी वापरावी लागली. पीठ भिजवून झाले, ओव्हनही तापला. कुकी ट्रेवर सुबक नानकटाया ओळीत बसत्या झाल्या. त्यांच्यावर सुरीने तीन आडव्या आणि तीन उभ्या रेषांची नक्षी काढली आणि ट्रे भर्जनीत ढकलले. घरात असलेले दोन ट्रे आलटून पालटून वापरत त्यांना अनेक ओव्हनवाऱ्या घडवल्या. शेवटी एकदाची ट्रेची ढकलाढकली संपली. ओट्यावर नानकटायांची अवाढव्य रास थंडावत असताना मी स्वतःलाच एका नानकटाईचा नैवेद्य दाखवला.

नानकटाईचा तो सुमधुर तुकडा माझ्या तोंडात विरघळला आणि मी सुगरण मैत्रिणीला मनोमन नमस्कार केला. नानकटाई अप्रतिम चवीची झाली होती. ओट्यावर एकीकडे नानकटायांचा डोंगर आणि दुसरीकडे सिंकमध्ये भांड्यांचा पर्वत तयार झालेला असला तरी घेतला वसा पूर्ण केल्याच्या समाधानात मी आणखी दोन कटाया गट्टम केल्या. सुगरण मैत्रिणीला फोन करून तिचे आभार मानले आणि प्रसाद दुसऱ्या दिवशी पोहोचता होईल अशी हमी तिला देऊन मी भांड्यांचा पर्वत घासायला घेतला. त्यावर्षी दोन्ही मुलांच्या शाळा-शिक्षकांना, पोस्टमनला, शेजाऱ्यांना वगैरे नाताळची भेट म्हणून घरगुती नानकटायांचा पुडाच मिळाला हे वेगळे सांगायला नकोच!

ह्या ‘नानकटाई आली पण लाडू गेला’ प्रकरणानंतर मी बेसनाच्या लाडवांचे नाव काढले नाही आणि नानकटाईही पुन्हा कधी केली नाही. बेसन वापरले ते वडे, भजी, पिठले वगैरेंसाठीच. ह्यावर्षी मात्र फेसबुकावरच्या एका समूहात हात न दुखवता होणारी बेसन लाडवांची झटपट मायक्रोवेव्ह कृती पाहिली आणि अनेक वर्षांनी दिवाळीत बेसनाचे लाडू करण्याचे धाडस केले. ह्यावेळी ते उत्तम जमलेही.

जिन्नस-

बेसन - दीड कप
तूप - अर्धा कप
पिठीसाखर - १ कप (गोडाच्या आवडीनुसार कमी-जास्त प्रमाणात घ्या)
वेलचीपूड - १ टीस्पू
बेदाणे/काजू - ऐच्छिक 


कृती - मोठ्या मायक्रोवेव्हयोग्य भांड्यात तूप घालून ते वितळण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हनात अर्धा-पाऊण मिनिट गरम करा. तूप वितळले की त्यात बेसन घालून ते नीट ढवळून मायक्रोवेव्ह ओव्हनात एक मिनिट भाजा. पुन्हा व्यवस्थित ढवळून एक मिनिट भाजा. असे दोन-तीन वेळा केले की ढवळताना भांड्याच्या बुडाशी बेसन तपकिरी होऊ लागल्याचे दिसेल. आता बेसन भाजल्याचा खमंग वास येईपर्यंत प्रत्येक वेळी व्यवस्थित ढवळून मिश्रण अर्ध्या-अर्ध्या मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह ओव्हनात भाजा. जास्त वेळासाठी ठेऊन मिश्रण जळू देऊ नका. भाजलेले मिश्रण थंड झाल्यावर मिश्रणात पिठीसाखर आणि वेलचीपूड घालून व्यवस्थित मिसळून घ्या आणि लाडू वळा. लाडू नीट वळले जात नसतील तर थोडे तूप वितळवून त्यात मिसळा. आवडत असल्यास वर बेदाणा वा काजू टोचा.


Comments

  1. 👌👌👌 छान लिहिले आहेस. पाककृती फसल्यावर टेन्शन येतं आणि बर्याच वेळा बायका ते सगळं फेकून देतात पण " नेटाने " पुढे जाऊन, नुकसान न करता, त्यातूनच चव निमाॅण कशी करायची हा सगळा पेशंन्सचा व्यायाम प्रकार छान उतरवला आहेस...😀😀👏👏👏👏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाईड

परसातले पक्षी