जागतं घर

श्वेता चक्रदेव

परवा घरी कुणीतरी राहायला आलं होतं आणि मी उठायच्या आधी ते लोक उठून गप्पा मारत बसले होते. मला बोलणं स्पष्ट ऐकू येत नव्हतं आणि ते गरजेचंही नव्हतं. ती घरातली जाग मात्र घड्याळाचे काटे गरगर मागे फिरवावे तशी कित्येक वर्षं मागे घेऊन गेली.

लहानपणी कधी अर्धवट जाग आली की, पहाटे घरात आईवडील चहा पीत बोलत असलेले ऐकू यायचे. ते स्वयंपाकघरात काय बोलत आहेत हे आतल्या खोल्यांमधे स्पष्ट ऐकू येत नसे, पण भरपहाटे घरात जाग आहे ह्याची ऊबच पुरेशी असायची.

घरी पाहुणे येणं जाणं तर नेहमीचंच असायचं. अशा वेळी तर रात्री झोपतानासुद्धा मोठ्यांच्या आजूबाजूला पडी टाकून त्या जागत्या उबेत, त्यांच्या आठवणींच्या गप्पांत, कुणाकुणाच्या लग्ना-मुंजीत काय काय झालं होतं, किंवा अशाच काही गप्पा ऐकत गाढ झोप कधी लागायची ते कळायचंच नाही. सकाळी जाग यावी तर ही मंडळी रात्री झोपली होती की नाही असं वाटावं इतकी ताजीतवानी होऊन त्यांचे गप्पांचे फड चालू झालेले असत. त्यात कुठे काही कार्य-समारंभ असेल तर घरातली ही जाग, जाग न राहता गजबज व्हायची.

पुढे किशोरवयांत किंवा तरूण वयांतही गावच्या वार्षिक जत्रा-उत्सवात सगळा गोतावळा जमला की, रात्र रात्र भुतांच्या गोष्टी, भेंड्या, पहाटे नदीवर कोण न घाबरता जाईल अशा पैजा, हे सगळे उद्योग करून झाले आणि रात्रभरात दहा वेळा “पोरांनो, आवाज कमी!!” किंवा “झोपा रे आता!” हे ऐकून मग कधीतरी अवेळी साडेतीन-चारला झोपलं की, सकाळ व्हायची ती “बंब तापलाय”, किंवा “आता उठला नाहीत तर दुपारपर्यंत जेवायला काही मिळणार नाही” ह्या आवाजांनी व्हायची किंवा कुणीतरी बारकी पोरं पिरपिर करायची आजूबाजूला आणि मग त्या जागत्या-गाजत्या घरात जाग यायची. परवाच एक मैत्रीण म्हणत होती की, कुठे खुट्ट वाजलं तरी आजकाल जाग येते, तर तेव्हा घोडे विकून कसे काय झोपायचो? त्यावर पटकन मनात आलं की, थोरामोठ्यांनी जागतं ठेवलेलं घर असायचं ते, तिथे कसली भिती वाटणार!

आपण गोष्टी किती ग्राह्य धरून चालतो याचं मूर्तीमंत उदाहरण आहे हे जागतं घर! तसं घर सोडून आता खूप वर्षं झाली आणि ही सगळी वर्षं परदेशात घनघोर शांततेत गेली. त्या शांततेचीही मग सवय झाली. तसंही विद्यार्थी असताना रात्र रात्र पार्टी करून अकरा बाराला उठले की कसलं जागतं घर आणि कसलं काय? किंवा आदल्या दिवशी खूप अभ्यास करून झोपले असेन तर चटकन उठून आवरून परीक्षेला, नोकरीला पळायचे. वह समय का दौर ही कुछ अलग होता है..ज़मीन से उपर चलने के दिन..

मग पुढे पोरंबाळं झाली की, त्यांच्या मागेच दिवस, आठवडे, महिने आणि वर्षं जातात. अशा वेळी, मुलं जागी व्हायच्या आधीची शांतता सोनेरी असते. Golden silence म्हणते मी त्याला. सगळं घर जागं व्हायच्या आधीची ही शांतता हवीहवीशी वाटते. तसंही एकदा घरातून बाहेर पडून आपलं बस्तान बसवलं की, ही जाग आणायची जबाबदारी नकळत आपली होऊन जाते. कुणाच्यातरी जाग असलेल्या उबदार घरात झोपणारे आपण आता कुणासाठी तरी घर जागतं करत असतो. पण हे कालचक्र उलटत असताना आता घरांत जाग आणणारे आपण आहोत हे रोजच्या रोज चटकन जाणवेलच असं नाही.

Deja Vu आणि Nostalgia यांचं अजब रसायन जबरदस्त असतं. टकीलाचा शॉट उपाशी पोटी घेतला तर तो जसा सटकन् किक देईल, तसंच हे अजब रसायन गोष्टी, सिनेमे, पुस्तकांसारखं रोजरोज नाही पण आपल्या नकळत आपल्याला बरोब्बर खिंडीत गाठतं. सगळ्या जुन्या आठवणींच्या छोट्या छोट्या होड्या होऊन कुठल्यातरी, त्या आपल्याला खूप पूर्वी लांब सोडलेल्या किनाऱ्यांवर पुन्हा घेऊन जातात, आणि मग नकळत हात सुटलेली माणसं, झाडं, आवाज, गंध हे सगळे धावून धावून तिथे येऊन भेटून जातात.

ह्या आठवणींची, जागत्या घराची लाट जेव्हा व जशी येईल तशी येऊ द्यायची असते. आपल्याला त्यात बुडवून टाकून, नाकातोंडात पाणी जाईतो जाऊ द्यायची असते. ना तिला थोपवायचं असतं, ना त्याच्यातच गटांगळ्या खात बसायचं असतं. ती जशी येते, तिची ती तशी ओसरतेही आणि पुन्हा एकदा आपल्याला आपल्या लख्ख वर्तमानात घेऊन येते.

आणि ह्यातच खरी मजा आहे, कारण the reward of getting through life is getting life itself!

हे जागतं घर तुम्हा-आम्हाला अधूनमधून का होईना भेटत राहो हीच इच्छा!


Comments

Popular posts from this blog

गाईड

छान