दिवाळीचे लाडू

मुग्धा मुळे

दिवाळीचे लाडू 

दिवाळी म्हटली की फराळ आलाच. दिवाळी लाडवांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मी दरवर्षी बेसनाचे लाडू करते. म्हटलं तर सोपे, म्हटलं तर तारेवरची कसरत. ह्या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे मी दिवाळीआधी १५ दिवसांपासून व्हीगन झाले. आरोग्य, पर्यावरण जपणे ही त्यामागची कारणे. असो.

तर आता आली का पंचाईत! लाडू, करंजी इत्यादी ठेवणीतले पदार्थ तूप आणि दुधाशिवाय पूर्णच होत नाहीत. मग मी विचार केला व्हीगन लोणी (vegan butter) वापरले तर कोणाला कळणार आहे? पण माझ्या घरच्यांनी (त्यात माझा नवरा सगळ्यात पुढे!) हा बेत उधळून लावला. मी ठरवले की दरवर्षीप्रमाणे साजूक तुपातले बेसनलाडूच करायचे, पण मी ते चाखणार नाही! ‘यूट्यूब’ ही माझी गुरु आहे. मग मी ‘ऑन-डिमांड’ गुरूंचा सल्ला घेतला (म्हणजे व्हिडीओ पहिला) आणि सुरुवात केली. 

        •  ३.५ कप बेसन 
        •  १.५ कप तूप 
        •  १.५ कप साखर 
        •  स्वादानुसार वेलचीपूड
        • काजू काप, बेदाणे

पहिले बेसन भाजायला घेतले, तेव्हा संयमाची परीक्षा सुरु झाली. ‘गुरु’ म्हणाले की तांबूस रंग येईपर्यंत भाजा, पण तांबूस रंग यायला तयार नव्हता. सासूबाई बाजूला उभे राहून देखरेख करत होत्या, त्यामुळे गॅस मोठा करता येईना, आणि मी व्हीगन झाल्यामुळे मला चाखून बघता येईना! मग हुकुमाचा एक्का काढला, नवरा आला मदतीला! चांगले पाऊण तास ढवळल्यावर तांबूस रंग दिसायला लागला. मग सासूबाईंनी त्यांचा खास ठेवणीतला जिन्नस सांगितला - तो म्हणजे दूध. मग त्यात पाव कप दूध घालून गॅस बंद केला (दुधामुळे मिश्रण रवाळ होते), व मिश्रण थंड करायला ठेवले.

हे सगळे करत असताना एक छोटा जीव आनंदाने उड्या मारायला लागला होता - ती म्हणजे आमची पाळीव कुत्री ‘बर्फी’! तिला तुपाचा वास आला होता. ती मग लाडवांच्या आसपास घोटाळायला लागली होती. थंड झाल्यावर त्यात साखर, वेलचीपूड घातली आणि लाडू वळायला घेतले. प्रत्येक लाडवावर काजू आणि बेदाणा लावला.

हे करत असताना आमची बर्फी लाडवांकडेच बघत होती. लाडू वळून झाल्यावर देवापुढे ठेवले व त्यातला अर्धा लाडू बर्फीला दिला. तिने चाटून, ताटली लख्ख करून पोचपावती दिली!


Comments

Popular posts from this blog

गाईड

छान