पौराणिक कथा - भाग २ - अष्टवसूंची कथा

अवंती करंदीकर

मैत्रच्या जानेवारी २०२१ च्या अंकामध्ये आपण “पौराणिक कथा भाग १ - पुराणांची माहिती” ह्या लेखामध्ये पुराणे म्हणजे काय हे जाणून घेतले. त्याच सत्रातील दुसरा भाग प्रकाशित करत आहे. ह्या भागापासून पुराणातील गमतीदार, रोचक आणि जादुई कथांची सुरुवात आहे. ह्या भागामध्ये अष्टवसूंची कथा वर्णन केली आहे.

आता वसू कोण होते हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. काही संदर्भांमध्ये वसू सर्व तत्वांचे (जसे जल, वायू, पृथ्वी) प्रतिक आहेत तर काही संदर्भांमध्ये त्यांना आठ दिशांचे प्रतिबिंब व रक्षक संबोधले आहे. काही संदर्भांमध्ये दक्षाची मुलगी वसू आणि धर्म ह्यांची मुले अष्टवसू तर काही संदर्भांमध्ये वसू ही आदिती व कश्यपाची मुले असा उल्लेख आढळतो. वसूंच्या नावांमध्येही तफावत आढळते. महाभारतातील आदिपर्वानुसार वसूंची नावे धर, ध्रुव, सोम, आहास, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभास अशी आहेत. विष्णूपुराणानुसार वसूंची नावे आप, ध्रुव, सोम, धर्म, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभास तर भागवतपुराणानुसार द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नी, दोष, वसू आणि विभासु अशी आहेत. आपण ह्या कथेपुरती विष्णूपुराणामधील नावे ग्राह्य धरणार आहोत.

अष्टवसू इंद्राच्या दरबारात कार्यरत होते. एकदा इंद्रसभेमध्ये वसिष्ठ ऋषींचा आश्रम हा दुसरा स्वर्गच आहे अशी ऋषी, मुनी आणि देवदेवतांची चर्चा चालू असते. ते ऐकून सर्व वसूंना त्यांचा आश्रम बघायची इच्छा होते. म्हणून वसुंमधील ज्येष्ठ प्रभास, वसिष्ठ ऋषींकडे त्यांचा आश्रम बघायची इच्छा व्यक्त करतो. हर्षित होऊन वसिष्ठ त्यांच्या आश्रमाचे दार वसूंसाठी सदैव खुले राहील आणि ते कधीही आश्रमाला भेट देऊ शकतात असे जणू वचनच त्यांना देऊन आपल्या आश्रमी प्रस्थान करतात.

मध्ये बराच काळ लोटतो. एकदा सर्व वसू आपल्या पत्नींसह स्वर्गातून पृथ्वीविहारासाठी येतात. अनेक सुंदर देश, नद्या, तळी, वनराई आणि अनेक वैविध्याने नटलेली पृथ्वी त्यांना मोहित करते. असेच एका सुंदर तळ्यापाशी जलक्रीडेचा आनंद घेत असताना प्रत्युष आणि प्रभास इतर वसुंशी आपण आता पृथ्वीवर आलोच आहोत तर वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाला भेट देण्याची इच्छा प्रकट करतात. त्यावर सगळ्यांचे एकमत होते व जलक्रीडा संपवून सगळेजण ऋषींच्या आश्रमाकडे प्रयाण करतात. सर्व वसूंना बघून वसिष्ठ ऋषी त्यांचे आनंदाने व प्रेमाने स्वागत करतात. सर्वजण जलप्राशन, फलाहार व आदरातिथ्य आटोपून आश्रमविहारासाठी बाहेर पडतात. आश्रमातील स्वच्छता, अनेक छोटे मोठे प्राणी, निरनिराळी फुले, लता, वेली आणि फळझाडांनी संपन्न आश्रम बघून तिकडे राहावेसे वाटले नाही तरच नवल. आश्रमविहार संपवून सर्व जण परत येतात. तेवढ्यात सर्वाना भोजनाचे आमंत्रण येते. थोड्या वेळातच विविध पक्वान्नांची ताटे समोर येतात. ते बघून सर्वजण एकदम अचंबित होतात व त्यांना प्रश्न पडतो की एवढ्या थोड्या अवधीत इतक्या लोकांसाठी भोजन कसे काय तयार झाले? ह्या विचारातच सर्व मंडळी त्या मिष्टान्नांचा यथेच्छ आस्वाद घेतात. मुख आणि हस्तप्रक्षालन झाल्यावर मंडळींची वसिष्ठ ऋषींशी विविध विषयावर चर्चा चालू असते. प्रभास प्रांजळपणे वसिष्ठ मुनींना एवढे सुग्रास जेवण इतक्या थोड्या अवधीत कसे आणि कुणी तयार केले असे विचारतो. त्यावर वसिष्ठ ऋषी आपल्याकडे कामधेनू गाय आहे आणि तिच्यामुळे आश्रम कसा समृद्ध झाला आहे, ती कितीही लोकांना मिष्टान्न कसे पुरवू शकते ह्याची माहिती सांगतात. ती सुंदर कामधेनू पाहाताच वसूंच्या आश्चर्याला पारावार उरत नाही. प्रभासच्या पत्नीला मात्र त्या कामधेनूचा लोभ होतो. ती प्रभासकडे आपल्याकडे ही कामधेनू असेल तर आपल्याला कशाचीच उणीव भासणार नाही, तेव्हा काहीही करून तुम्ही ती कामधेनू मिळवाच, असा तगादा लावते. हे ऐकून प्रभास चकित होतो आणि आपली पत्नी आपल्याकडे सर्व काही असताना अशी काय वेडगळ मागणी करीत आहे म्हणून वारंवार तिला समजावून सांगतो, पण ती काही केल्या आपला हट्ट सोडत नाही.

शेवटी प्रभास आणि त्याच्या पत्नीमधला संवाद इतर वसूंपर्यंत पोहोचतो. न राहवून प्रभास आपल्या पत्नीच्या हट्टापायी सर्व वसूंकडे मदतीची याचना करतो. त्यांच्यातल्या थोड्या विवादानंतर न राहवून सर्व वसू प्रभासच्या साहाय्याने ती कामधेनू चोरून पळून जातात.

थोड्याच वेळात आश्रमातील लोक वसिष्ठ ऋषींना कामधेनू नाहीशी झाल्याचे सांगतात. तेंव्हा ते आपल्या योगसामर्थ्याने कामधेनू वसूंनी पळवली आहे हे ओळखतात. त्यांचा राग अनावर होतो व ते चिडून सर्व वसूंना पृथ्वीवर मानव जन्म मिळेल असा शाप देतात. त्याबरोबर सर्व वसू वसिष्ठ ऋषींची क्षमायाचना करतात. क्षमायाचनांनी वसिष्ठ ऋषींना त्यांची दया येते व ते म्हणतात,” मी माझा शाप मागे घेऊ शकत नाही पण उ:शाप देऊन त्याची मर्यादा कमी करू शकतो, म्हणून तुम्ही मानवजन्म घेतल्याबरोबरच तुमचा मृत्यू होईल.” प्रभासला मात्र उ:शाप देण्याचे ते नाकारतात. तेव्हा अस्वस्थ आणि खजील झालेला प्रभास वसिष्ठ ऋषींची आळवणी करतो. तेव्हा त्यांना त्याची दया येते व ते त्याला उ:शाप देतात. “तुला पृथ्वीवर मानवजन्म घ्यावाच लागेल, परंतु अतिशय प्रसिद्ध योद्धा म्हणून तुझी कीर्ती पसरेल, तुला इच्छामरणाचे वरदान प्राप्त होईल आणि पृथ्वीवरील सर्व उत्तमोत्तम भोग भोगून तुला अंती स्वर्गप्राप्ती होईल. पण तू आपल्या पत्नीचे ऐकून सारासार विचार न करता माझी कामधेनू चोरलीस म्हणून मानव जन्मात तुला विवाहसौख्य मात्र लाभणार नाही, तथास्तु!” असे म्हणून वसिष्ठ ऋषी अंतर्धान पावतात.

झालेल्या प्रकाराने सर्व वसू खिन्न होऊन स्वर्गाकडे प्रयाण करत असताना वाटेत त्यांची भेट गंगेशी (म्हणजे गंगा नदीशी) होते. त्या सगळ्यांना खिन्न बघून गंगा त्यांची विचारपूस करते. झालेला प्रकार समजल्यावर तिला त्या सगळ्यांची खूप दया येते आणि ती त्यांना वचन देते की ती त्यांना मानव जन्मातून मुक्ती मिळवण्यासाठी मदत करेल.

पुढे द्वापारयुगामध्ये कुरुवंशीय राजा शंतनू गंगेच्या प्रेमात पडून तिला लग्नाची मागणी घालतो. पण गंगा त्याला एक अट घालते ती अशी - की त्यांना लग्नानंतर मुले झाली की गंगा त्यांना लगेच पाण्यात सोडून देईल आणि शंतनूने तिला तसे करण्याबद्दल एकही प्रश्न विचारू नये अथवा विरोधही करू नये. जर का त्याने तसे केले तर गंगा त्याला तत्काळ सोडून जाईल. अशा विचित्र मागणीने शंतनू सैरभर झाला नाही तरच नवल. त्याला काय करावे ते कळत नाही. पण शेवटी म्हणतात ना ‘कामातुराणां न भयं न लज्जा’ - म्हणजेच ‘कामातुर झालेल्या आणि प्रेमात पडलेल्या व्यक्तीला ना कशाची भीती वाटते ना त्यांना आपल्या आचरणांची लाज वाटते’, तेच शंतनूचे होते आणि अखेर तो गंगेला वचन देतो. यथावकाश शंतनू आणि गंगेचा विवाह होतो आणि त्यांना पहिले मूल होते. मूल झाल्याबरोबर ती त्याला लगेच पाण्यात सोडून येते. अशी एका पाठोपाठ सात मुले गंगा पाण्यामध्ये सोडते. दिलेल्या वचनामुळे शंतनू दुःखी व व्यथित होण्याशिवाय काहीही करू शकत नाही. असेच त्या दोघांना आठवे मुल होते आणि गंगा त्याला नदीवर घेऊन जाते पण ह्यावेळी मात्र शंतनूचा धीर सुटतो आणि तो तिला त्या मुलाला पाण्यात सोडण्यापासून कडाडून विरोध करतो आणि तिने असे का केले ह्याचा जाब विचारतो.

त्याबरोबर गंगा शंतनूने तिला दिलेल्या वचनाची आठवण करून देत त्या शेवटच्या मुलाला शंतनूकडे सोपवून स्वर्गात परत जाते. गंगेने जी सात मुले पाण्यात सोडली तेच हे सात वसू ज्यांना मानवजन्म मिळाल्यावर लगेचच मृत्यू येईल असा उ:शाप होता आणि शेवटचा वसू ज्याला गंगा पाण्यात सोडत नाही तो प्रभास सर्वांना ‘देवव्रत’ ह्या नावाने परिचित आहे. यथावकाश गंगा देवव्रतला स्वर्गामध्ये धनुर्विद्या आणि इतर शिक्षणासाठी घेऊन जाते आणि तो १६ वर्षांचा झाल्यावर पुढच्या पालनपोषण आणि शिक्षणासाठी परत शंतनूकडे सोडते. देवव्रताचे पुढचे शिक्षण श्री परशुरामांकडे होते आणि तो त्यांचा पट्टशिष्य होतो. हाच देवव्रत पुढे वडिलांच्या मागणीपोटी आजन्म ब्रह्मचारी राहाण्याची (म्हणजेच कधीही लग्न न करण्याची) “भीष्म” प्रतिज्ञा करतो आणि पुढे “भीष्म” ह्या नावानेच तो ओळखला जातो. देवव्रताने घेतलेल्या ह्या प्रतिज्ञेने भारावून जाऊन शंतनू त्याला इच्छामरणाचे वरदान देतो. भीष्म पितामह महाभारतामुळे आपल्या सर्वांना परिचित आहेतच.

असे म्हणतात की पुढे शंतनू स्वर्गवासी झाल्यावर गंगा त्याची मनापासून क्षमा मागते आणि त्याला ही अष्टवसूंची कथा सांगते, ज्यामुळे तो तिला क्षमा करतो. पुढे भीष्म पितामह युद्धभूमीत बाणशय्येवर धारातीर्थी पडल्यानंतर उत्तरायण लागेपर्यंत प्राण सोडण्यासाठी थांबतात. युधिष्ठिर राजा झाल्यावर त्याला (पृथ्वीवर पहिल्यांदाच) विष्णू सहस्रनामाचा जप व त्याचे माहात्म्य सांगून, तसेच राज्यकारभाराचा उपदेश देऊन मगच प्राण सोडतात. असे म्हणतात की विष्णू सहस्त्रनाम हे तेंव्हापासून पृथ्वीवर प्रचलित झाले व पुढे पिढ्यानपिढ्या प्रसारित झाले.

तर अशी ही अष्टवसूंची कथा. तुम्ही पुढच्या कथेची उत्सुकतेने प्रतीक्षा कराल अशी आशा करते.

टीप :- हा लेख आंतरजालावरील असंख्य दुवे, जुनी पुस्तके, भारतीय यू.पी.एस.सी.परीक्षेच्या अभ्यासक्रमातील हाती लागलेली काही माहिती व सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आजीने लहानपणी सांगितलेल्या काही कथांचा आधार घेऊन लिहिलेला आहे, तरी ह्यात त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments

Popular posts from this blog

गाईड

छान