जंगल सफारीच्या वाटेवर

शुभदा जोशी-पारखी

माझा जन्म आणि शिक्षण सांगलीचे. व्यवसायाने आर्किटेक्ट असून सांगलीला प्रॅक्टिस करत होते. नऊ महिन्यांपूर्वी अमेरिकेत आले असून कोलंबिया, मेरीलँडमध्ये वास्तव्य. गायनाची आवड आहे. सांगलीत असताना शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे.

सहल हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय. सुट्टीमधे कुठे फिरायला जायचं, यासाठी अनेक घरात प्रवासाच्या बरेच दिवस आधीपासून बेत आखले जातात. काही नवीन अनुभव निसर्गाच्या कुशीत शिरून घेता यावा यासाठी प्रत्येकजणच इच्छुक असतो.

तसाच एक बेत मागील सुट्टीमधे आम्हीदेखील आखला होता, तो म्हणजे जंगल सफारीचा. त्यासाठी ठिकाण निश्चित केलं, महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्य़ातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प. माझा जंगल सफारीचा हा पहिलाच अनुभव असणार होता, त्यामुळे त्याबाबत खूप उत्सुकता आणि उत्कंठा होती. सुट्टीमध्ये तिथे असणाऱ्या गर्दीमुळे गैरसोय होऊ नये म्हणून हॉटेलबरोबरच सफारीचं बुकिंगही आधीच करून आम्ही प्रवासाला निघालो.

वर्धा रेल्वेस्थानकावर उतरून मग ताडोबा पर्यंतच्या पुढील प्रवासासाठी खाजगी कार भाडेतत्त्वावर घेऊन आम्ही मार्गस्थ झालो. ताडोबाला पोहोचेपर्यंत निसर्गाने काळोखाची चादर पांघरून घेतली होती. त्या काळोखात ताडोबातील हॉटेलच्या दिशेने जाणारा तो रस्ता जास्तच सुनसान भासत होता. ताडोबातील MTDC हॉटेलमध्ये दोन रात्री मुक्काम निश्चित केला होता. हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत रात्रीचे जवळपास नऊ वाजत आले होते. दिवसभराच्या प्रवासानंतर रात्रीचे जेवण करून आम्ही झोपेला आपलसं केलं. दुसर्‍या दिवशी पहाटेच्याच सफारीचं बुकिंग असल्यामुळे, भल्या पहाटे उठून आणि सफारीसाठीची तयारी करून आम्ही निघालो. ताडोबातील सफारीसाठी काही प्रवेशद्वारं आहेत, त्यातील एका प्रवेशद्वारापाशी आम्ही आलो. तिथेच जंगलात सफारीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनांची रांग उभी होती. बुकिंगप्रमाणे त्यातील एका जिप्सी कारमध्ये आम्हाला बसण्यास सांगितलं गेलं; आणि तशा काही कार प्रवासी लोकांनी भरल्यानंतर, एकामागोमाग एक अशी त्या वाहनांची सफारीसाठी जंगलाच्या दिशेने रवानगी करण्यात आली.

पहाटे ६ च्या सुमाराची वेळ असल्यामुळे हवेतील गारवा, जंगलातील दाट झाडीच्या सान्निध्यात जास्तच जाणवत होता. त्याच दाट झाडीतून वाहनांसाठी तयार करण्यात आलेली वाट वळणं घेत होती. रोजच्या शहरी जीवनातील गडबडगोंधळ आणि प्रदूषणापासून दूर, त्या पहाटेच्या वेळेस जंगलातील स्वच्छ हवा आणि शांतता आपसूकच मनाला भुरळ घालत होती. वाहनातून जंगलातील वाटेवरून जाताना सोबत असणारा गाईड आम्हाला वन्यजीवनातील महत्त्वाचे घटक असणाऱ्या प्राणी आणि पक्ष्यांची ओळख करुन देत होता. विविध जातीचे पक्षी आणि काही वन्य प्राणी जसे की हरीण, सांबर, हत्ती, गवा, अस्वल, रानकोंबडा, कोल्हा, यांना जंगलातून मुक्तपणे संचार करताना बघून, प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यात वावरताना त्यांची होणारी घुसमट, स्वातंत्र्यप्रिय म्हणून ओळख निर्माण केलेल्या मनुष्यप्राण्याला नक्कीच जाणवू शकते. हा सगळा अनुभव सफारीतील प्रत्येकजण कॅमेर्‍यात टिपत होता. त्या शांततेत कॅमेर्‍याच्या क्लिक्समुळे होणारा भंग देखील लक्षात येण्याजोगा होता. हे सगळे घडत असताना मुख्य प्रतीक्षा होती ती म्हणजे, आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळख असणाऱ्या रॉयल बंगाल टायगर अर्थात वाघाची. जंगल सफारीसाठी आलेल्या प्रत्येकाला, वाघाला मुक्तपणे संचार करताना पाहण्याची इच्छा असते; आणि ताडोबा तर व्याघ्र प्रकल्पच आहे. त्यामुळे आम्हीदेखील त्या क्षणाचीच वाट पाहात होतो.

सफारीचा वेळ जवळपास अर्धा निघून गेल्यावर, जंगलातील एका वाटेवर अचानक एकानंतर एक वाहने थांबण्यास सुरुवात झाली आणि बघतो तर काय, त्याच वाटेवर मध्यभागी बहुप्रतीक्षित रॉयल बंगाल टायगर ऐटीत बसलेला दिसला. तो क्षण कॅमेर्‍यात टिपण्यासाठी सफारीतील प्रत्येकजण उतावळा झाला होता. कॅमेर्‍याचे क्लिक्स थांबण्यास तयारच नव्हते. वाघाचे दर्शन झाल्याचा आनंद सगळ्यांच्याच चेहर्‍यावर जाणवत होता. सोबत असणाऱ्या गाईडने देखील त्या वाघासंदर्भात आणि व्याघ्र प्रकल्पाची आणखी काही माहीती आम्हाला दिली. अशा वातावरणात ५ ते १० मिनिटे गेल्यावर वाघ आजूबाजूच्या झाडीत दिसेनासा झाला. माझ्या पहिल्याच जंगल सफारीत मला वाघाचे दर्शन झाल्यामुळे मी खूपच खुशीत होते. त्या आनंदात सफारीचा ४ तासांचा वेळ कधी संपला ते कळलंच नाही.

त्याचदिवशी दुपारी ४च्या सुमारास आणखी एका सफारीचं, ताडोबातील दुसर्‍या प्रवेशद्वारापासून आणि वेगळ्या झोनमध्ये बुकिंग केलं होतं. ती सफारीदेखील खूपच छान झाली. संध्याकाळी ७च्या सुमारास ती सफारी संपल्यानंतर, रात्रीचे जेवण करून आम्ही हॉटेलमध्ये परतलो. दिवसभरात झालेल्या दोन्ही सफारीतील, कॅमेर्‍यात टिपलेले क्षण पुन्हा पुन्हा पाहाताना आणि त्या अनुभवाविषयी गप्पा मारताना, मध्यरात्र उलटून गेल्याचंदेखील भान राहिलं नाही. दुसर्‍या दिवशी परतीच्या प्रवासाला निघायचं होतं.

निसर्गाच्या सान्निध्यात घेतलेला हा सफारीचा अनुभव खरंच खूप अनोखा होता. तिथून निघायची इच्छाच होत नव्हती, पण घरदेखील वाट पाहात होतं. जंगल सफारीचा हा अनुभव कॅमेर्‍यात पण त्याहीपेक्षा जास्त मनात साठवून आम्ही परतीची वाट धरली, ती भविष्यात पुन्हा एकदा अशा आणखी एखाद्या अविस्मरणीय अनुभवासाठी परत येण्याची खूणगाठ मनाशी बांधूनच!

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय