संपादकीय


जानेवारी २०२३
अंक १


मैत्र संपादक मंडळ २०२३ 

वरदा वैद्य 

विदुला कोल्हटकर 

रोहित कोल्हटकर 

कपिल धाकड 

मधुर पुरोहित 

 

बाममं कार्यकारिणी २०२३ 

अध्यक्ष 

अनीश पाटील 

उपाध्यक्ष 

वृंदा जोशी  

 उपाध्यक्ष- विपणन 

पंकज शिवपुजे  

चिटणीस 

केतन शहापुरे 

खजिनदार 

योगेश खैरनार 

सह-खजिनदार 

स्मितेश लोकरे

नमस्कार मंडळी,

सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! म्हणता म्हणता २०२२ साल सरले आणि हा अंक तुम्ही वाचायला घ्याल तेव्हा २०२३ चा एक महिनासुद्धा संपला असेल. काळ हा सतत गतिमान असतो हे ह्या अंकातल्या एका लेखात तुम्ही वाचालच, त्याचा प्रत्यय आम्हाला ह्या अंकावर काम करत असताना आला. मैत्रच्या ह्या वर्षीच्या पहिल्या अंकातून तुमच्यासमोर वेगवेगळ्या विषयांवरील लेखन सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. बृहन्बाल्टिमोर परिसरातील मराठी मंडळींनी नवीन वर्षांची सुरुवात अंकाला उत्स्फूर्तपणे भरभरून प्रतिसाद देत केल्यामुळेच हे शक्य झाले आहे.

मागचे वर्ष चालू झाले ते ओमिक्रोन ह्या नवीन प्रकारच्या कोविड विषाणूंच्या आगमनामुळे. मात्र हळूहळू त्याचा प्रभाव कमी झाला असे म्हणा किंवा वाढत्या लसीकरणांमुळे हळूहळू दैनंदिन जीवन परत एकदा पूर्वपदावर यायला लागले. कतारमध्ये झालेला फुटबॉलच्या विश्वकरंडकासाठीचा सामना तुम्ही बघितलात का? अर्जेंटिनाने तब्बल ३६ वर्षांनंतर विश्वाकरंडक जिंकला. १९८६मध्ये अर्जेंटिनाचा कप्तान दिएगो मॅराडोना ह्याचा खेळ भारतात रात्री उशिरा जागून बघितलेला तुमच्यातल्या काहींना आठवत असेल. तुमच्या आवडता खेळ बघतानाच्या काही आठवणी असतील तर त्याबद्दल आम्हाला जरूर कळवा. महिन्याभरापूर्वी संपलेल्या हिवाळी सुट्टीत तुम्ही प्रवास केलात का? भारतात गेलात की इतर देशांत की इथेच आसपास? तुम्ही हिवाळी सुट्टी कशी घालवलीत ते आम्हाला तुमच्या प्रवासवर्णनांतून लिहून कळवा.

ह्या वर्षांची सुरुवात धमाकेदार अंकाने करत आहोत. ह्या अंकासाठी लेखन पाठवणाऱ्या सर्वांचे मन:पूर्वक आभार. ह्या मंडळींनी वेगवेगळे साहित्यप्रकार हाताळले आहेत. ‘जंगल सफारीच्या वाटेवर’ भेटलेल्या वाघाबद्दल ह्या अंकात वाचता येईल. छायाचित्रणाचा छंद जोपासणाऱ्या दोघींकडून आलेल्या वेगवेगळ्या पक्ष्यांच्या छायाचित्रांसोबत ह्या अंकात ‘कलाकार ओळख’ सदरामध्ये अनिरुद्ध गंधेच्या ‘लाकूडकामा’च्या छंदाबद्दल वाचतानाच त्याने केलेल्या विविध लाकडी कलाकृतींची छायाचित्रेही पाहता येतील. एका कविता आणि एका विडंबनासोबतच बा.सी. मर्ढेकरांच्या सुप्रसिद्ध ‘शिशिरागम’ ह्या कवितेचे रसग्रहणही ह्या अंकात वाचता येईल. जागतिक संगीताचा आस्वाद घेताघेता स्वतःच्या संगीत प्रेमाचा धांडोळा ‘संगीत आणि बरंच काही’ ह्या लेखामध्ये वाचा. अष्टवसूंच्या पौराणिक कथेसोबतच मार्जारमालक जोडप्याची आधुनिक कथाही ह्या अंकात आहे. ह्याशिवाय, भाषाविचार सदारांतर्गत आपल्या भाषेतल्या काही क्रियापदांचा ‘धावता’ आढावा घेऊ या.

चित्रसाहित्य सदरामध्ये ‘प्रतिबिंब’ हे सूत्र असलेली चार चित्रे गेल्या अंकामध्ये दिली होती. त्यावरची दोन लिखाणे ह्या अंकात आहेत. ह्या अंकामध्येही ‘चंद्र’ हे सूत्र असलेली चार चित्रे दिली आहेत. चित्रे पाहून तुम्हाला सुचलेले विचार तुम्ही आम्हाला लिहून कळवायचे आहेत, जे आम्ही पुढच्या अंकात प्रकाशित करू.

मैत्रचा पुढचा अंक एप्रिल महिन्याअखेरीस प्रकाशित होईल. त्या अंकासाठी तुम्ही भरभरून साहित्य पाठवाल अशी आशा करतो. अंकासाठीचे साहित्य १५ एप्रिलपर्यंत editor@baltimoremarathimandal.org ह्या पत्त्यावर पाठवायचे आहे. नेहमीप्रमाणे कथा, कविता, लेख, अनुभव, पाककृती, कला/छायाचित्रे, छंद, प्रवासवर्णन, मुलाखत, वगैरे सर्व साहित्यप्रकारांचे स्वागतच आहे. तसेच, मैत्र संपादक मंडळामध्ये सहभागी होण्याची तुमची इच्छा असल्यास आम्हाला नक्की कळवा.

ह्या नवीन वर्षात तुमच्या हातून सातत्याने सकस लेखन घडो, ही सदिच्छा!

कळावे,
संपादक मंडळ

मुखपृष्ठ - सुतार
छायाचित्रकार - सपना औटे

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय