जीवनशैली

बाळकृष्ण पाडळकर

ट्रॉय, मिशिगन

१८९३ सालची गोष्ट आहे ही. त्यावेळी स्वामी विवेकानंद जागतिक धर्मपरिषदेसाठी अमेरिकेत आले होते. शिकागो येथील धर्म परिषदेमध्ये त्यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.

आपल्या अजरामर भाषणाने त्यांनी जगातून आलेल्या धर्मपंडितांची मने जिंकली. धर्मपरिषद संपल्यानंतर त्यांचा अमेरिकेत पाच वर्षे मुक्काम होता. हिंदू धर्माची मूलतत्वे जगाला पटवून देतांना त्यांनी अमेरिकन माणसांची मने जिंकली. हार्वर्ड विद्यापीठातील विभागप्रमुख त्यांच्या भाषणाने प्रभावित झाले. त्यांनी स्वामी विवेकानंदांना भारतात परत न जाण्याविषयी गळ घातली. हार्वर्ड विद्यापीठाच्या धर्मशास्त्र शाखेचे प्रमुख म्हणून काम करण्याची त्यांना विनंती केली. परंतु मातृभूमीच्या प्रेमापायी, भारतीय तरुणांचे पुनरुत्थान करण्याच्या ईर्ष्येपोटी त्यांनी हार्वर्डच्या विभागप्रमुखांना विनम्र नकार कळवला.

एक दिवस स्वामीजी आपल्या खोलीत बसले होते. त्यांना भेटायला एक व्यक्ती आली. ही व्यक्ती असामान्यातील असामान्य व्यक्ती होती. जगात त्यावेळी या व्यक्तीएवढी दुसरी श्रीमंत व्यक्ती नव्हती. प्रचंड पैसा कमावूनही या व्यक्तीची पैशासाठीची लालसा कमी होत नव्हती. सकाळ, संध्याकाळ आपल्याला पैसा कसा मिळू शकेल या विवंचनेशिवाय त्याच्या डोक्यात दुसरे काहीही नसायचे. दुर्दैवाने वयाच्या चोपन्नाव्या वर्षी या व्यक्तीला एका दुर्धर व्याधीने ग्रासले. अन्न धड खाण्याची क्षमता त्याच्यामध्ये उरली नाही. औषधोपचारासाठी प्रचंड पैसा खर्च करूनही त्याच्या तब्बेतीत फरक पडत नव्हता. अन्न खाण्याची क्षमता हरवून बसलेल्या या व्यक्तीला डॉक्टरांनी फळभाज्यांचे सूप पिण्याचा सल्ला दिला. जेमतेम एक वर्षाचे आयुष्य शिल्लक असल्याचेही डॉक्टरांनी सांगून टाकले होते.

कोणाच्या तरी सल्ल्याने ती व्यक्ती स्वामीजींना भेटायला आली. त्यावेळी स्वामीजी आपल्या खोलीत ध्यानसाधना करण्यात मग्न होते. या व्यक्तीने आपण आल्याची चाहूल लागावी अशी हालचाल केली परंतु स्वामीजींनी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी न राहवून ती व्यक्ती स्वामीजी ध्यानस्थ बसले होते त्या ठिकाणी आली आणि स्वामीजींकडे पाहून म्हणाली “स्वामीजी, मी आलो आहे.”
स्वामीजी त्या व्यक्तीला ओळखत नव्हते. ते निर्विकारपणे म्हणाले,”मग? मी काय करू?”
स्वामीजींचे हे उत्तर ऎकून त्या व्यक्तीचा तिळपापड झाला. तो जवळ जवळ ओरडूनच म्हणाला “स्वामीजी! मी अमेरिकन अध्यक्षासमोर गेलो तर ते देखील उठून उभे राहतात आणि माझे स्वागत करतात. तुम्ही माझ्याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही?”
यावर स्वामीजी म्हणाले “तुम्ही माझ्याकडे काय काम घेऊन आलात ?“
यावर ती व्यक्ती म्हणाली “मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. माझ्यापेक्षा श्रीमंत व्यक्ती जगाच्या पाठीवर नाही. परंतु मी अत्यंत अस्वस्थ आहे, मला कसल्यातरी दुर्धर रोगाने पछाडले आहे. माझी अन्नावर वासना होत नाही. डॉक्टरांच्या मते मी फार फार तर वर्षभर जगेन.“

स्वामीजींनी त्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायाविषयी, जीवनशैलीविषयी अनेक प्रश्न विचारले आणि त्याची इत्यंभूत इत्थंभूत माहिती जाणून घेतली. स्वामीजींच्या हे लक्षात आले की या व्यक्तीने पैश्याच्या हव्यासापोटी त्याचे भौतिक, अध्यात्मिक आणि शारीरिक स्वास्थ्य पार बिघडवून टाकले आहे. भौतिक त्रासाबरोबरच ही व्यक्ती शारीरिक अस्वास्थ्यालादेखील बळी पडली आहे, त्यामुळे या व्यक्तीची अन्नावरील वासना उडाली आहे आणि डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे या व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे. स्वामीजी त्या व्यक्तीकडे पाहून म्हणाले, “मी तुमच्या जीवनशैलीचा सखोल अभ्यास केला आहे. माझा तुम्हाला असा सल्ला आहे की उद्यापासून तुम्ही गरजू जनतेला दानधर्म करण्याचा संकल्प सोडा आणि तो अंमलात आणा.”

स्वामीजींच्या सल्ल्याने काही फरक पडणार नाही हे त्या व्यक्तीला माहित होते पण प्रयोग करायला हरकत नाही असा विचार करून ती व्यक्ती स्वामीजींचा निरोप घेऊन आपल्या निवासस्थानी निघून गेली.

स्वामीजींच्या सल्ल्यानुसार त्या व्यक्तीने दुसऱ्या दिवसापासून दानधर्म करायला सुरवात केली. त्यातून हळूहळू त्या व्यक्तीमध्ये समाधानाची भावना निर्माण होऊ लागली. मनावरील दडपणही कमी झाले. त्याला फरक जाणवला. त्याने हे कृत्य चालूच ठेवले आणि काय आश्चर्य, त्या व्यक्तीला आता अन्न खाण्याची प्रबळ इच्छा होऊ लागली. पुढे या व्यक्तीने अमेरिकेत मोठमोठी इस्पितळे बांधली, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता महागड्या स्कॉलरशिप सुरु केल्या. हा हा म्हणता ही व्यक्ती एक दानशूर, उदार व्यक्ती म्हणून प्रसिद्धीस आली.

जॉन रॉकफेलर नावाची प्रसिद्ध व्यक्ती ती हीच. डॉक्टरांनी एक वर्षाची जगण्याची मुदत जॉन रॉकफेलरला दिली होती पण त्याने १०० वर्षे जगण्याची प्रतिज्ञा केली आणि आपले आरोग्य सुदृढ ठेवले. वयाच्या ९६व्या वर्षी रॉकफिलरने ओहायोमध्ये अंतिम श्वास घेतला.

जॉन रॉकफेलरचा पायंडा बऱ्याच अमेरिकेन गर्भश्रीमंत व्यक्तींनी गिरवला. त्यात फुलब्राईटचे नावही पुढे आले. प्रख्यात सॉफ्टवेअरप्रणेता बिल गेट्स प्रांजळपणे कबूल करतात की त्यांचे गुरु जॉन रॉकफेलर आहेत.

Comments

Popular posts from this blog

छान

गाईड