जाडू आणि भुत्या यांची गोष्ट

मिलिंद पदकी

न्यू जर्सीस्थित औषध-वैज्ञानिक. आता मेडिकल लेखक. २०१७ मध्ये मराठी काव्यसंग्रह "बदकनामा " प्रसिद्ध (ग्रंथाली, मुंबई). मराठी आणि इंग्रजीतून वैज्ञानिक आणि ललित लेखन. सध्या प्रामुख्याने ‘कोव्हिड’विषयक लेखनावर भर.

"अगं, काय ठरवलंय तुम्ही शेवटी? लग्न करणार आहात की नाही?" तिच्या आईने विचारले.

"अगं, प्रॉब्लेम वेगळाच आहे. आमच्या मांजरांचं अजिबात पटत नाही एकमेकांशी... कसं राहणार ना मग एकत्र?"
"इश्श. एव्हढंच ना! आमच्याकडे आणून ठेव की तुझा बोका!" आई उदारपणे म्हणाली.
आतल्या खोलीत बाबांची मुद्रा हताश झाली. पण त्यांनी "नको, नको!" अशी हलविलेली मान कोणालाच दिसली नाही.
"तुझ्या कुत्र्याशी तरी कुठं जमतंय जाडूचं?" मुलीने नवा आक्षेप काढला.
"अगं, त्यांना वेगवेगळ्या खोलीत कोंडून ठेवीन की मी! तुझी तिशी आली आता..." आई चिंतेच्या स्वरात म्हणाली.
"तो काय तरुण होतोय की काय? चौतीस होईल पुढच्या महिन्यात. पोट सुटत चाललंय नुसतं!"
"तेच म्हणतेय मी. लग्न करा आता- म्हणजे मी सुटले..."
" तुला नक्की कुठे “धरलं”य ग मी?" मुलीने परत उडवाउडवी सुरु केली.
"त्याला करायचंय ना नक्की तुझ्याशी लग्न?"
"हो! हो! हो! दहा वेळा तरी त्यानं विचारलं असेल मला."
"मग प्रॉब्लेम काय आहे तुला?"
"त्याची गाडी पाहिलीस का? दहा वर्षांची जुनी टोयोटा आहे. माझ्या मैत्रिणी हसतील मला!"
"चल, आम्ही घेऊन देऊ तुम्हाला नवीन गाडी लग्नात..."
"नको, त्याचा ना, लगेच अपमान होतो..."
बॉयफ्रेंडची जुनी गाडी, जुनेच मांजर हे प्रश्न न सुटणारे नक्कीच नव्हते. जाडू आणि भुत्या या दोन्ही बोक्यांचे स्वभाव त्रासदायक होते हे खरेच होते, पण तिचे आई-बाबा हे सगळे सहज हाताळू शकणाऱ्यांपैकी होते.
"जाडूला ठेवून घ्यायला आई तयार आहे... " मुलगी त्या संध्याकाळी ‘चक्रम’ला म्हणाली.
चक्रम-आर्यन चा चेहरा आनंदला.
"मग, काय ठरवलंयस तू?"
"अरे रोज चाळीस मैल ड्राइव्ह करावं लागेल मला, कामावर जायला... गाडी जुनी झालीय माझी!"
"मग घेऊ की नवीन एक, इतकं काय?" चक्रम म्हणाला.
"आई लग्नात द्यायची म्हणतेय..पण तुला ते चालेल का?" मुलीने भीत भीत विचारले.
चक्रमचा चेहरा पडला. "हे बघ, तुला काय हवं ते कर. नवी गाडी तुझ्या नावावर ठेव म्हणजे झालं." तो तुटकपणे म्हणाला.
"हे बघ,तू असा ऍटिट्यूड घेणार असशील तर मग आपल्याला प्री-नप करावं लागेल.. नाहीतरी आपण त्याबद्दल बोललो होतोच..."
"चालेल की. करूनच टाकूया.."
xxxxxx

महागड्या वकिलाच्या पॉश ऑफिसमध्ये सगळे जमले होते.
"मला जमलं तेव्हढं लिहून काढलंय मी. पहिला मसुदा समजा..." वकील बिचकत बिचकत म्हणाला.
"वाचा की..." मांडीवर बसलेल्या जाडूला सांभाळीत आई म्हणाली.
"लग्नानंतर जाडू हा बोका, मैत्रेयीच्या आईवडिलांच्या घरी राहील. आईवडिलांना कुठे प्रवासाला जायचे असल्यास त्या काळात तो आर्यन-मैत्रेयीच्या घरी आणला जाईल. तेंव्हा त्या घरातील मूळ बोका भुत्या हा आर्यनच्या आईवडिलांकडे ठेवला जाईल. मैत्रेयीच्या आई-वडिलांनी दिलेल्या गाडीतून फिरण्यास आर्यन नाक मुरडणार नाही. तसेच मैत्रेयीच्या मैत्रिणींकडे जाताना नवीच गाडी वापरली जाईल."
सर्वांनी माना डोलाविल्या.
"हे ठीक आहे? आणखी काही मॅटर आहे?" वकिलाने विचारले.
“आपण माझ्या आईवडिलांना विश्वासात घेतलेलं नाही, पण ते मी मॅनेज करीन .." आर्यन म्हणाला.
प्रिंटआउटवर सर्वांच्या सह्या झाल्या.
वकिलाच्या ऑफिसबाहेर पडल्यावर आई म्हणाली, "अगं आज ना, मी जाडू आणि भुत्या, दोघांसाठीही बो-टाय आणलेत लग्नात घालायला .."
" क्यूट ! " चक्रम- मैत्रेयी एका सुरात म्हणाले!
xxxxxx

ढमढम तर तसे थाटातच झाले. जाडू आणि भुत्या बो टाय लावून भाव खात फिरत होते.
भुत्याला आर्यनच्या आणि जाडूला मैत्रेयीच्या आईवडिलांकडे ठेवून आर्यन-मैत्रेयी इटलीला आठवडाभर हनिमूनला जाऊन आले.
परत आले तेंव्हा जे अद्भुत त्यांना दिसले त्यातून अनेकांचा लग्नसंस्थेवरचा गेलेला विश्वास परत आला.
मैत्रेयीच्या आईच्या घरी जाडू -भुत्या शांतपणे एका सोफ्यावर बसले होते.
आसपास कुठेही रक्त, तोडलेली फर, कानाचे तुकडे, वगैरे काहीही दिसत नव्हते.
आर्यन-मैत्रेयी आ वासून बघत राहिले.
"अगं, आर्यनच्या आईंना अचानक भुत्याच्या केसांची ऍलर्जी सुरु झाली. अगदी इमर्जन्सी केअरमध्ये जावं लागलं.
मग म्हटलं मी की त्याला इकडेच आणून ठेवा.. " मैत्रेयीची आई सांगत होती.


Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय