चित्रसाहित्य - प्रतिभास

विदुला कोल्हटकर

लॅबमधून निघतानाच प्रिया नाराज होती. खरंतर निराश होती. दाराचं कुलूप उघडायला किल्ली काढली तर लक्षात आलं दार नुसतच लोटलेलं आहे. आत आल्या आल्या तळणीच्या वासाने तिचं स्वागत केलं. .

बूट काढून ती आत आली तर संदीप स्वयंपाकघराच्या दारातच उभा होता. त्याचा चेहराही तिच्यासारखाच... निराश. दोघे दोन-पाच सेकंद तसेच एकमेकांकडे बघत उभे राहिले. संदीपने विचारलं, "काय झालं?" तर प्रिया म्हणाली, "प्रयोग फसला." "माझा पण," संदीप म्हणाला.

"अरे किती दिवस मी आजच्या दिवसाची तयारी करत होते,” आधी प्रिया बोलायला लागली. “सामान मागवून, सिनियर लोकांशी बोलून, सगळी मोजमापं दहादा तपासून गेले ५-६ आठवडे तयारी चालू होती. प्रयोगात आपल्याला हवे तसेच किंवा मनासारखेच रिझल्ट येतातच असं नाही, पण काहीच हाती नाही लागलं. निदान काय चुकलं ते तरी कळावं, पण ते पण नाही. छे! अगदी वैताग आलाय बघ. काहीच हाती लागलं नाही." प्रियाची सुटलेली गाडी थांबली. 'उद्या जाऊन, अभ्यास करून, पुन्हा तयारी करावी लागेल' प्रिया मनात म्हणाली.

"तुझं काय झालं? आज तर सुट्टी घेतली होतीस ना?" पडलेल्या चेहऱ्याने तिने संदीपला विचारलं.

“माझं पण तेच. प्रयोग फसला, काहीच हाती लागलं नाही” संदीप म्हणाला.
“किती दिवस तयारी करत होतो. अगदी आईने सांगितले तसे शोधून जुने तांदूळ आणून, धुऊन, भिजवून, वेळच्या वेळी पाणी बदललं, मग वाळवून बारीक करून घेतले, गूळ घालून ३-४ दिवस ते पीठ ठेवून दिलं. या थंडीच्या दिवसांत त्यावर लक्ष ठेवलं की सगळं नीट होतंय ना, पीठ ठेवलेली जागा उबदार आहे ना. आज शेवटी अनरसे तळले. अगदी मनासारखे होतील अशी अपेक्षाच नव्हती, पण काहीच हाती लागलं नाही. काही अगोड झाले, कडक झाले, काही नाहीत. तेलात घातले आणि विरघळले. छे! अगदी वैताग आलाय बघ!" पडलेल्या चेहऱ्याने संदीपने सांगितलं.

“बरं जाऊ दे. चहा केलाय चहा घे,” म्हणत संदीपने कप प्रियाच्या हातात दिला. प्रिया चहाचा कप घेऊन विचारमग्न चेहऱ्याने खुर्चीवर बसली. तिच्याकडे बघून संदीपला लहानपणी खेळून घरी आल्यावर त्याच्या बाबांचा विचारमग्न असणारा चेहरा आठवला. ऑफीसमध्ये मनासारखं काम झालं नाही की ते संध्याकाळी अगदी असेच विचारमग्न दिसायचे.

इतक्यात दार वाजलं आणि शेजारचा मोहन आत आला. "अरे तुझा ‘अनरसे फसले’ मेसेज मगाशीच बघितला पण मीटिंगमध्ये होतो. संपली आणि लगेच आलो. दोन ‘सुगरण श्री’ शेजारी-शेजारी असल्याचा फायदा!" हसत हसत ओट्यापाशी जात मोहन म्हणाला. मग दोघांची आता हे अनरसे कसे वाचवायचे याची चर्चा सुरु झाली. प्रियाला दिवाळीच्या आधी आई आणि आजी अशाच ओट्यापाशी चर्चा करायच्या ते आठवलं. बहुतेक अनरसे हसले, चकल्या विरघळल्या; आता काय करावं याची अगदी अशीच गंभीर चेहऱ्याने गहन चर्चा चालू असायची.

बोलणं झाल्यावर "हे घरून काम करण्याचे फायदे!" असं म्हणत मोहन चहाचा कप घेऊन प्रियासमोर येऊन बसला. "हो ना!" म्हणत संदीपपण कप घेऊन प्रियाशेजारी बसला. संदीप आणि प्रिया दोघंही अजूनही तसेच निराश आणि विचारमग्न.

"अगं प्रिया अशी काय बसली आहेस? आणि संदीप तूपण, दोघ सेम टू सेम दिसत आहात," मोहन म्हणाला.
मनापासून तयारी आणि मेहेनत करूनही प्रयोग फसलेल्या अनेक प्रयोगकर्त्यांचं परावर्तित रूप असा प्रतिभासच त्यांच्यात होता.

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय