संगीत आणि बरंच काही

मैत्रेयी कुलकर्णी

लहानपणीची गोष्ट आहे. तेव्हा मला भूप राग वाजवता यायचा. भारी वाटायचं. मी आल्या गेलेल्यांना वाजवून दाखवत असे. बिचारे लोक! कौतुकाने माना डोलवायचे. गोष्ट जुनी आहे. असो.

पुढे काही फार प्रगती झाली नाही, तरी ह्या आरोह अवरोहासकट माहित असलेल्या एकुलत्या एका रागाबद्दलचं प्रेम काही कधी कमी झालं नाही. म्हणूनच जेव्हा पहिल्यांदा ‘सहेला रे’ ऐकलेलं तेव्हा अगदी नैसर्गिकरित्या त्या गाण्याच्या, आवाजाच्या आणि पर्यायाने गायिकेच्या प्रेमात पडणं साहजिक होतं.

एक काळ, जेव्हा मोठमोठ्या घराण्यांच्या ठळक रेषांनी बांधलेली गायकी एकदा ऐकून (Trendy you know! You see…मी फक्त क्लासिकलच ऐकते!), नीरस वाटून सोडून द्यायचा काळ होता तेव्हा त्याच्याच आसपास ‘सहेला रे’तल्या फक्त ‘सा’साठी ते गाणं शेकडो वेळा ऐकल्याच्या आठवणी आहेत. अजूनही तो पहिला सा लागला की ओठावर आपसूक जे 'वाह' येतं ना…तशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या मनात खूपच कमी गाण्यांसाठी येते. असंच आज झालं ते किशोरीताईंचा गौड मल्हार ऐकताना! त्यातल्या ‘सजनिया’तला लडिवाळपणा ज्याच्यापर्यंत खरंच पोहोचला ना, ती गायकी त्याच्यासाठीच! दैवी.

तरी आजच्या लेखप्रपंचाचं कारण म्हणजे कालचा दिवस, जो ह्या ना त्या कारणाने किशोरी आमोणकरमय झालेला. मिया की तोडी ने सुरू झालेल्या दिवसाचा सूर्य मिया की मल्हारच्या वर्षावात भिजत शेवटी भिमपलासीत मावळला, तोपर्यंत अवघा रंग एक होऊन गेलेला. रात्री एका मित्राने गौड मल्हार शेअर केलेला. आज सकाळी तो ऐकताना जी समाधी लागली त्यानंतर मी फक्त “हमिनस्तो हमिनस्तो” एवढचं म्हणू शकले. मला रागदारीतलं कळत वगैरे नाही बरं का! वरचे राग आणि गायकी ही फक्त ”छान वाटतं” ह्या शीर्षकातंर्गत येणारी आणि म्हणून ऐकली जाणारी!

तर ही ”छान वाटतं” ची यादी बदलत असते. त्यात काहीच्या काही भर घातली जाते आणि अगदीच काहीच्या काही असेल तर ते आपसूक कमीपण केलं जातं. त्यात अनाकलीय अरेबिक, इटालियन गाणी असतात, रविंद्र संगीत, कर्नाटकी स्वर असतात, कुठून तरी हुडकलेले बँड, धांगडधिंगा असतो (कोणे एकेकाळी एक अख्खा आठवडा मी अफगाण जलेबी खात होते!! का? अर्रे, आली लहर केला कहर!), जगाच्या पाठीवरचे Acappella Group, सिद श्रीराम, कोक स्टुडिओ, द बीटल्स, सायमन अँड गारफंकल, 70s jazz असतं, ‘रात के ढई बजे’वाले सुरेश वाडकर, गाणारं व्हायोलिन, कुमार गंधर्व, वसंतराव, अरियाना ग्रान्दे, गुलाम अली पण असतात, cello covers, Gibson Les Paul guitar (जे एका गायकाच नाव आहे असा अतिशय वाईट विनोदी गैरसमज माझा सुरुवातीला झालेला) येत जात असतात.. हे मारुतीचं शेपूट! न संपणारं .. त्याचा वावर सगळीकडे.

ह्या आवडण्याची एक व्याख्या नाही. त्या व्याख्येची व्याख्या तशी सर्वव्यापी. नवं ते ऐकत जावं, झिरपू द्यावं. रुचलं तर ऐकत राहावं नाहीतर असो म्हणून सोडून द्यावं. इतकं साधं सोपं ह्यामागचं गणित. त्यातून कधी खजिना सापडतो, आपल्या अक्षय्यपात्रासारख्या पोतडीत अखंड भर घालत राहतो. तर कधी मृगजळाच्या हव्यासात फसल्यासारखं पण वाटतं. कारण कधीतरी त्याचं फारशी मुळं नसलेलं, बिनचेहऱ्याचं पसरलेपण अस्वस्थ करतं. ह्या विखुरलेल्या यादीत आपल्या भारतीय मातीची मुळं कोरडी पडत नाहीयेत ना असं वाटतंच. "मला काय आवडतं?" ह्याचं उत्तर कधीतरी "मला सगळं आवडतं" हे कितीही विलोभनीय वाटत असलं तरी आवडीच्या पलीकडचा वरचा सा आपल्याला कितीतरी दिवसात कशानेच लागला नाहीये, जीव टाकावा असं काही आत्ताच्या आत्ता सुचणार नाहीये; ही जाणीव तितकीशी विलोभनीय नसतेच. तो वरचा सा भैरवीसारखा. त्याची हुरहूर, मैफिल संपताना अस्वस्थ वाटणारी जाणीव खरी असली तरी परतायला आपलं घर आहे कुठेतरी हा विश्वास किती दिवसात अनुभवला नाहीये. ह्याचा हिशोब लावायला मन जुन्या कुठल्यातरी काळात पोहोचायच्या तयारीला लागावं म्हणतं आणि तेवढयात लांबून कुठुनतरी फ्रँक सिनात्रा ‘The way you look tonight’ म्हणतो आणि मृगजळ गायब व्हायला लागतं. नंतर पुन्हापुन्हा ‘call of the valley’ चे सूर लागतात आणि मारुतीची शेपूट अजून वाढायला लागते. भैरवीसाठी मैफिल संपावी लागते म्हणतात ना! आपली गोष्ट त्यातली नाही ह्यावर फक्त खूणगाठ बांधली जाते.

प्रागच्या पुलावर हिमवर्षावात अनुभवलेला स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम
लिंकन मेमोरियलजवळ अनुभवलेला कार्यक्रम

हे फक्त माझचं नाही, सगळ्यांचंच असेल का? सगळं आवडत असतं आणि त्यात घर शोधायची धडपड असते. दुसऱ्यांनी दाखवलेल्या भावनांच्या जंजाळात स्वतःसाठीचा आरसा शोधायचा अट्टहास नवनव्या वाटांवर आणून सोडतो. काही वाटा चालताचालता मधेच गायब होतात तर काही तयार व्हायच्या आधीच मातीमोल होतात. काही अगदी ”हेच की ते!” असा अनुभव देतात तर काही वाटा आपलं घरच बनून जातात. प्रत्येक वाटेचे अनुभव वेगवेगळे पण ते प्रवासाला संपन्न बनवतात आणि आरसा शोधायची गरज कमी होत जाते.

वैश्विक संगीत मनात पोहोचतं आणि विश्वसंचार करताना अगदी हवं ते लहानपणी ऐकलेलं, जुनं गाणं गुणगुणलं जातं तेव्हा नकळत कळतं की आपण आपली मुळं घेऊनच फिरतोय. ते संगीत कुठे विशिष्ट मातीत नाही तर मनात रुजलेलं आहे.

मोझार्टच्या साल्सबर्गमध्ये संध्याकाळी ऐकलेली सिम्फनी, प्रागच्या पुलावर हिमवर्षावात अनुभवलेला स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम, कलाकारांच्या फ्लॉरेन्समध्ये एकलेलं, उत्कटतेची परिसीमा असलेलं व्हायोलिन, अगदी परवा डीसीला लिंकन मेमोरियलजवळ अनुभवलेला सांगीतिक कार्यक्रम आणि असं बरचं काय काय.. कान उघडे असले की मनाची कवाडं उघडायला वेळ लागत नाही.

ह्याच तथाकथित वैश्विक मनाला आयफेल टॉवरवरुन सूर्यास्त पाहाताना "संधीप्रकाशात अजून जो सोने..” आठवतं, बुडापेस्टला नदीकिनारी फेरफटका मारताना भूपेन हजारीकांचं "ओ गंगा बेहती हो क्यूँ..” साद घालतं, कुठल्यातरी इटालियन समुद्रावर किशोरकुमारचं ”सागरकिनारे…” अस्वस्थ करतं.

ऊनपावसाचा खेळ चालू राहतो.. त्यात एकदा भिजलेलं मन कधी कोरडं मात्र होत नाही.

ह्या सगळ्याची सुरुवात झालेली किशोरीताईंच्या गाण्यांनी. त्या गेल्या तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा भारताबाहेर होते आणि मला चांगलं आठवतयं, तो त्या काही अतिशय मोजक्या दिवसांपैकी एक होता; जेव्हा मला खरोखर एकटं वगैरे वाटलं असेल, लांब आहोत आपण ही जाणीव तेव्हा पहिल्यांदा अंगावर आलेली.. उगाच! वैश्विक संगीताला तयार होण्याची माझी सुरुवात माझ्याही नकळत त्यांच्याच तर गाण्यापासून झालेली आणि तरी त्या एका काळात विसरलेले मी त्यांना. कदाचित त्याचं दुःख जास्त असेल.

कदाचित….. कारण कधीकधी काय गमावतोय हे नक्की माहित नसलं की त्या गमावण्याचं दुःख जास्त साजरं केलं जातं. कारण तेव्हा ते दुःख एकटं न रहाता अनेक निद्रिस्त कारणांना जागं करतं. असो!!

तो विषय वेगळा. हे तत्वज्ञान परत कधीतरी (हा हा, आमचे घोडे उधळलेलेच असतात कायम तसे.)

असो. तर आजची ताजी बातमी अशी की ऐकत रहा, नव्या जुन्या वाटा ढुंढाळत रहा. फार सुंदर आहे सगळं! ऐकवत रहा!
तुम्ही काय ऐकताय सध्या? मला नक्की सांगा!


Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय