भाषाविचार - पळा, पळा, कोण पुढे पळे तो

वरदा वैद्य

माझी मैत्रीण अपर्णा वाईकर ही इथल्या मराठी शाळेत शिकवते. आम्ही गप्पा मारल्या आणि त्यात मराठी भाषेसंदर्भात काही चर्चा झाली नाही असे होत नाही. असेच एकदा बोलत असताना सकर्मक-अकर्मक क्रियापदांचा विषय निघाला. काही क्रियापदांना कर्माची गरज असते, त्याशिवाय क्रियेचा नेमका अर्थ स्पष्ट होत नसेल तर अशी क्रियापदे सकर्मक असतात.

कर्माची गरज नसेल तर ती अकर्मक क्रियापदे असतात. उदाहरणार्थ, ‘खाणे’. काय खाल्ले? असे विचारले की खाण्याचा नेमका अर्थ कळतो. मग ते भात/फळ वगैरे पदार्थ खाणे असेल, पैसा/लाच खाणे असेल, मार खाणे असेल वा हाय खाणे असेल. काय खाल्ले हे जोवर कळत नाही तोवर अन्नग्रहण, भ्रष्टाचार, शिक्षा, मानसिक/शारीरिक स्थिती ह्यापैकी नेमका कोणता अर्थ अपेक्षित आहे हे समजत नाही. करणे, लावणे, देणे, धरणे वगैरे बरीच क्रियापदे अशी कर्माची अपेक्षा करणारी असतात. वाक्यातल्या क्रियापदाला ‘काय’ असा प्रश्न विचारला की मिळणारे उत्तर म्हणजे कर्म असे आपण शाळेत व्याकरणाच्या तासाला घोकल्याचे तुम्हाला आठवत असेलच.

बसणे, चालणे, झोपणे वगैरे क्रियापदे अकर्मक आहेत, ज्यांना ‘काय?’ हा प्रश्न लागू होत नाही. धावणे क्रियापदालाही कर्माची अपेक्षा नसते. काय धावला? असे विचारण्यात अर्थ नसतो. फार तर कुठे धावला, का धावला, किती (अंतर) धावला असे प्रश्न विचारता येतील. पण मग ‘ती मॅरेथॉन धावली’ ह्या वाक्यात मॅरेथॉन हे कर्म आहे की नाही असा प्रश्न अपर्णाला पडला आणि आम्ही विचारांत पडलो. वरवर पाहता ‘काय धावली?’ तर ‘मॅरेथॉन धावली’, ह्या प्रशोत्तरात कानाला खटकेल असे काहीच वाटले नाही. मात्र अधिक विचार करता लक्षात आले की मॅरेथॉन हा शब्द अंतराचा निदर्शक म्हणून वापरला जातो. फिलिपिडेस ह्या ग्रीक निरोप्याने मॅरेथॉन ते अथेन्स हे २६.२ मैलांचे अंतर न थांबता पायी पार केले त्यावरून मॅरेथॉन हे नाव धावत/चालत तेवढे अंतर पार करण्याच्या स्पर्धेसाठी वापरतात. त्यामुळे ‘काय धावली’पेक्षा ‘किती धावली’ ह्या प्रश्नाला ‘मॅरेथॉन धावली’ हे उत्तर असू शकते. म्हणजे ते कर्म नाहीच तर!

तर भाषेचा विषय निघाला की शब्दकोशाकडे ‘धाव’ घेणे आलेच. मग प्रश्न पडला की मी आत्ता जी शब्दकोशाकडे जात आहे ती धावतधावत की पळतपळत? शिवाय धावतपळत असा शब्दही आपण वापरतोच. शब्दकोश पाहता धावण्याचा अर्थ पळणे आणि पळण्याचा धावणे दिलेला सापडेल. मग धावणे आणि पळणे एकच की त्यात अर्थच्छटेचा काही फरक असेल? काही ठिकाणी धावणे म्हटले काय किंवा पळणे म्हटले काय, काहीच फरक पडत नाही. पण ‘ती मला मदत करण्यासाठी धावत आली’ हे वाक्य आपण ‘ती मला मदत करण्यासाठी पळत आली’ असे सहसा म्हणत नाही. देवाने भक्तांच्या हाकेला ‘धावून’ यावे म्हणून भक्त देवाचा ‘धावा’ करतो तेव्हा देवाने भक्तांच्या हाकेला ‘पळून’ यावे असे आपण म्हणत नाही. रणांगण सोडून जायची वेळ येते तेव्हा सोडणारा पळून जातो, धावून नव्हे. चोरही पळून जातो.

माझे असे निरीक्षण आहे की जेव्हा एखाद्या ठिकाणी, व्यक्तीकडे वा लक्ष्याच्या दिशेने वेगात जायचे असेल तर आपण धावून जातो, पण एखाद्या स्थानापासून, व्यक्ती वा परिस्थितीपासून वेगात दूर जायचे असेल तेव्हा आपण पळून जातो. निश्चित गंतव्य स्थानाच्या वा इष्टस्थानाच्या दिशेने वेगाने जाणे म्हणजे धावणे तर अनिष्टस्थानापासून वेगाने दूर जाणे म्हणजे पळणे. म्हणजे कुठे जायचे आहे हे ठरलेले असेल तर त्याकडे धावायचे आणि कशापासून लांब जायचे आहे हे ठरलेले असेल तर तिथून पळायचे, असे असेल का? उशीरा पोहोचल्यामुळे आपण ‘धावती’ झुकुझुकू अगीनगाडी पकडतो तर गाडीत बसल्यावर ‘पळती’ झाडे पाहू या म्हणतो. ‘धावतपळत’ बस पकडली म्हणण्यामागे बसच्या दिशेने धावण्याबरोबरच घरापासून दूर जाण्याचाही एकत्रित निर्देश होतो. अर्थात हा काही लिखित नियम नव्हे, पण तुम्हाला माझे निरीक्षण योग्य वाटते का?

संस्कृतातल्या धाव् आणि पल् ह्या धातूंपासून अनुक्रमे धावणे आणि पळणे ही मराठी क्रियापदे आली आहेत. धावणे क्रियापदापासून तयार झालेले धावती/धावता (उदा. धावती गाडी), धावरी/धावरा (उदा. धावरा मुंगळा), धावण/धावणी (अर्थ पाठलाग (मराठी शब्दरत्नाकर, दाते शब्दकोश)), तसेच धावदोरा, धाव, धावा, धावपटू, धावाधाव, धावपळ वगैरे शब्द आपण नेहमी वापरतो. पळणे क्रियापदापासून तयार झालेले पलायन, पलायनवाद (escapism), पळपुटा/पळपुटी, पळवाट, पळापळ वगैरे शब्दही आपल्या वापरात आहेत. सळो की पळो करण्यातही पळण्याचा संदर्भ आहे.

कृ. पां. कुलकर्णीकृत मराठी व्युत्पत्ती कोशानुसार धावणे ह्या क्रियापदाचे दोन अर्थ आहेत. एक धांवणे म्हणजे पळणे आणि दुसरा धावणे म्हणजे धुणे, स्वच्छ करणे. ह्या कोशानुसार “धांवणे (=पळणे) आणि धावणे (=धुणे) हे एकाच मूळ धातूपासून आले आहेत. धावण्यामध्ये गतीचा संदर्भ आहे. त्यावरून धार-धो धो ह्यामध्यें प्रवाहाचा म्हणजे गतीचाच संबंध आहे. त्याचा परिणाम धुणे, धावक (परीट), दंतधावन ह्यांतील ‘धुणे’ ही क्रिया.” वाहण्यामध्येही गतीचा संदर्भ आहे. पळपळीत म्हणजे ढिला (शब्दरत्नाकर, वझे, दाते).

धाव हे नाम आपण विविध अर्थांनी वापरतो. ‘सरड्याची धाव कुंपणापर्यंत’ ह्या वाक्प्रचारात धाव म्हणजे पळण्याची मजल, मर्यादा वा आवाका (मराठी शब्दरत्नाकर). (बैल वा घोडा)गाडीच्या चाकांभोवती असणाऱ्या लोखंडी पट्टीला धाव (शब्दरत्नाकर, शुद्ध मराठी कोश) म्हणतात. मोटेच्या बैलाला चालावा लागणारा प्रदेश म्हणजेही धाव (शब्दरत्नाकर). क्रिकेटच्या खेळात जास्त धावा काढणारा चमू जिंकतो.

धावा हे धाव ह्या नामाचे अनेकवचन आहे, तसाच तो स्वतंत्र शब्दही आहे. भक्त देवाचा धावा करतो म्हणजे संकटसमयी मदतीला येण्यासाठी विनवणी (दाते) वा प्रार्थना (शब्दरत्नाकर) करतो. मराठी व्युत्पत्तीकोशानुसार “धांवा! धांवा! असे ओरडूनच मनुष्य दुसऱ्यास साहाय्याला बोलावतो त्यावरून” धावा हा शब्द आला आहे. ह्या कोशात कोशकार लिहितो की हेमचंद्राच्या लेखनानुसार धावा हा देशी शब्द आहे. हेमचंद्राच्या वेळेपर्यंत धाव् हा (प्राकृत) धातू संस्कृत समजला जात नसावा असे अनुमान व्युत्पत्तीकोशकारांनी काढले आहे.

धावण्या आणि पळण्यासोबत आणखी एक क्रियापद वापरले जाते ते म्हणजे भागणे. हिंदीत भागना म्हणजे धावणे हा शब्द जेवढा प्रचलित आहे तेवढा तो मराठीत धावणे ह्या अर्थाने प्रचलित नाही. मराठीत ‘भागणे’ क्रियापदाचे अनेक अर्थ होतात - धावणे वा पळणे (भिऊन पळून जाणाऱ्या व्यक्तीला भित्री भागुबाई म्हणतात), भाग करणे वा विभाजन करणे वा वाटणे (सहाला तिनाने भागल्यास दोन हे उत्तर मिळते), थकणे (दमून-भागून), पुरेसे पडणे (महिन्याच्या पगारात आमचा घरखर्च भागतो) वगैरे. थकणे-भागणे आणि पुरेसे पडणे ह्या ‘विभागण्या’च्याच अर्थच्छटा आहेत. आपण दमतो भागतो म्हणजे आपली शक्ती, लक्ष आणि व्यवधान किंवा आपले शरीर आणि मन विविध कामे आणि कामासंबंधी विचारांमध्ये विभागले जाऊन शिणते. घरखर्च पगारात भागतो म्हणजे मिळालेल्या पगाराची विविध गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चात विभागणी होताना पगार पुरेसा पडतो.

‘चांदोबा चांदोबा भागलास का’ ह्या बडबडगीतात ‘भागलास का’चा अर्थ तुमच्या मते काय आहे? चंद्र आकाशात पूर्वेकडे उगवून पश्चिमेला मावळतो, म्हणजे तो आकाशात ‘धावतो’ असा अर्थ आहे, की तो रोज उगवती-मावळतीला धावपळ करून ‘दमतो’ आणि लिंबोणीच्या झाडामागे विसाव्याला थांबतो, म्हणून लपल्यासारखा वाटतो - असा अर्थ आहे? की कलेकलेने कमी होत जात (‘विभाजन’) अमावस्येला आकाशातून गायब होतो आणि म्हणून लिंबोणीच्या झाडामागे लपल्याची कल्पना ह्या बडबडगीतकाराने केली आहे? कोणताही अर्थ घेतला तरी तो योग्यच वाटतो.

काळ हा सतत गतिमान असतो. काळानुसार जो पुढे पुढे पळत राहातो त्याची प्रगती होते असे काही मानतात, तर काहींना जीवनाची गतिमान स्पर्धा निरर्थक, दमछाक करणारी वाटते.


पळा पळा कोण पुढे पळे तो
आणखी मागुनी थांबूनी कोण नष्ट होतो!

माधव ज्युलियन म्हणतात,

कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला!
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे. भ्रांत तुम्हां कां पडे?

संदर्भ :-
मराठी बृहदकोश - https://bruhadkosh.org/
मराठी व्युत्पत्ति कोश - कृ. पां. कुलकर्णी, शुभदा-सारस्वत प्रकाशन, १९९३.
मराठी शब्दरत्नाकर - कै. वा. गो. आपटे, केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, २००२
महाराष्ट्र शब्दकोश, दाते-कर्वे शब्दकोश, य. रा. दाते आणि चिं. ग. कर्वे, महाराष्ट्र कोशमंडळ लिमिटेड, पुणे
शुद्ध मराठी कोश - वि. रा. बापट आणि बा. वि. पंडित, जगहितेच्छु छापखाना, १८९१


Comments

  1. वरदा खूपच अभ्यासपूर्ण लेख,आवडला ग❤️👍

    ReplyDelete
  2. मस्त लेख वरदा

    ReplyDelete
  3. मस्त! लेख खूप आवडला.

    ReplyDelete
  4. Thank you All! - Varada

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय