कवितेचं पान - शिशिरागम

अनिल मायभाटे

संध्याकाळची थंड चाहूल लागते आहे. मी हा असा हातात वाफाळता चहाचा कप घेऊन घराच्या गच्चीवर बसलो आहे. उतरत्या उन्हाच्या कातर प्रकाशात झाडांच्या वाळलेल्या फांद्या, पानं बघत.

थोड्याशा झुळकेनेही समोरच्या एका वयोवृद्ध दिसणाऱ्या झाडाची काही वाळलेली पानं वाऱ्यावर तरंगत माझ्यापर्यंत पोहचतात. मन आपोआपच एक जुनी जिव्हाळ्याची कविता वाचायला लागतं.

शिशिरर्तुच्या पुनरागमें,
एकेक पान गळावया
कां लागता मज येतसे
न कळे उगाच रडावया.

सूर्यास्त लवकर व्हायला लागलाय आताशा. उत्तरेकडून येणारे थंड बोचरे वारे हिवाळ्याची चाहूल देताहेत, पण अजून पानगळ सुरूच आहे. अशा वेळी एखाद्या उदास रागाची आलापी सुरु व्हावी तशी ही कविता हळूहळू मनात साचत जाते, एक एक उदास सूर उमलवत जाते. मेंदूत अचानक जाग्या झालेल्या आठवणी नकळत डोळ्यांतून गालावर उतरायला लागतात…

कसली कविता आहे ही? हिवाळ्यातल्या पानगळीची, की एखाद्या उदास एकट्या संध्याकाळची? की आणखी काही? कुठली संध्याकाळ? सूर्यास्त होऊन आणखी एक दिवस संपला हे सांगणारी? की वय वाढत गेलं तशी आता आयुष्याला लागलेल्या उतरणीची जाणीव करून देणारी?

पानांत जीं निजलीं इथे
इवलीं सुकोमल पाखरें,
जातील सांग अता कुठे?
निष्पर्ण झाडिंत कांपरे !

आठवणी अनंत आहेत. असतातच. त्यांचं असं हे मोहोळ उठलं की प्रश्न पडतो, काही "सुकोमल पाखरें" मीही कधीतरी मेंदूच्या घरट्यात जमा केली होती, ती आता या घोंगावणाऱ्या, बोचऱ्या वादळात, या पानगळीच्या ऋतूत कुठे उडून जातील? या प्रश्नासरशी झाडांच्या उरल्या सुरल्या वाळल्या फांद्यांमधून एक थंड भीतीचं कापरं भरतं. एक एक करून गळत जाणाऱ्या काही वृद्ध पानांच्या आठवणीने.

ही कविता फक्त निसर्गचक्राची नक्कीच नाही. आयुष्याच्या संध्याकाळचीही नाही. दूर देशी एकट्या पडलेल्या प्रवाशाच्या मनात, आयुष्यात पूर्वी येऊन गेलेल्या साथीदारांच्या आठवणींची आहे? कदाचित, तरुण वयात उमलत जाणाऱ्या भविष्यातल्या महत्त्वाकांक्षा, भावभावना, ज्या आता अपयशाच्या जाणि‍वेखाली हळू हळू मिटत जाताहेत, अशा एक एक बंद होणाऱ्या दरवाजांची? शेवटी या सर्वांतून उरणाऱ्या, थंड बोचऱ्या एकटेपणाची आणि एखाद्या उदास संध्याकाळी त्या एकांताला सुटत जाणाऱ्या अर्थाच्या अनेक पदरांची...

फुलली असेल तुझ्या परी,
बागेंतली बकुलावली;
वाळूंत निर्झर-बासरी;
किति गोड ऊब महीतलीं !

एकांताच्या असल्या बोचऱ्या क्षणी कधीतरी दिलासा देऊन गेलेल्या काही मोजक्या जीवलगांची, कधी ओरखडे उमटवून गेलेल्या आपल्याच काही माणसांची आठवण अटळ आहे. ते सगळेच आता भूतकाळात गेलेल्या हिरव्यागार ऋतूप्रमाणे फार दूर, मागे पडलेत. तरीही त्यांच्या दारात तेंव्हा फुललेला तो बकुळवृक्ष आपल्या मेंदूत अजूनही तसाच हिरवागार आहे. इथे आपल्या अंगणात या थंड वाळलेल्या पाचोळ्याचं राज्य सुरु झालंय तेंव्हा त्यांच्या दारात तो जिवंत रसरसता हिरवागार ऋतू तसाच नांदत असेल कदाचित....

येतील हीं उडुनी तिथे,
इवलीं सुकोमल पाखरें,
पानांत जीं निजलीं इथे.
निष्पर्ण झाडिंत कांपरे !

आपल्या मनात जन्म घेणारी ही आठवणींची 'इवली सुकोमल पाखरं' उबदार घराच्या शोधात दूरवर उडत जाऊन, त्या सतत फुलणाऱ्या बकुळवृक्षाच्या हिरव्या सावलीत नवीन घरटं करतील कदाचित...

अनेक प्रश्नांचं मोहोळ उठत राहातं. आठवणी तशाच गालावर उतरत राहतात. संध्याकाळ अजून थोडी गडद होते. पानगळ सुरूच राहते.

पुसतों सुहास, स्मरूनिया
तुज आसवे, जरि लागलें
एकेक पान गळावया
शिशिरर्तुच्या पुनरागमें.

अचानक हाताला चटका जाणवतो. तो चहाचा कप अजूनही हातात तसाच वाफाळतोय. कसाबसा चहा संपतो. मनात क्षणभरच उघडलेलं कवितेचं पान परत मिटून बंद होतं..

Comments

  1. फारच सुंदर

    ReplyDelete
  2. सरत्या संध्याकाळचा आणि पानगळीचा बोचरेपणा छान दाखवला आहे.

    ReplyDelete
  3. Thanks Shekhar daa. 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाईड

छान