चित्रसाहित्य - प्रतिबिंब

शारदा ग. सबनीस

माझी ९ वर्षांची भाची आरश्यासमोर उभी राहून स्वतःकडे कौतुकाने पाहात होती. काय चालले असेल तिच्या मनात? एक-दीड वर्षाचे मूलही आरसा समोर धरला की हसते. काय समजत असेल त्या बाळाला?

मोठी माणसेही काही वेगळी नाहीत. आंघोळ झाल्यावर आरश्यासमोर, मग बाहेर जाताना एक नजर आरश्याकडे पाहाणे आणि सर्व ठीकठाक असले की एक मंद स्मित करून सर्व नीट जमल्याची पावती देणे, हे तर प्रत्येक जण लपूनछपून किंवा सर्वांसमोर करतो. खरेच, असे स्वतःचे प्रतिबिंब पाहून मनात कसले विचार येत असतील? काही सुखाचे तर काही दुःखाचे, पण बहुदा स्वतःबद्दलचेच विचार.

माणूस स्वतःवर किती प्रेम करतो ना? कोणी म्हणेल मी असाच आहे - आवडलो तर उत्तमच नाहीतर द्या सोडून! दुसरी एखादी स्वतःची तुलना शेजारच्या घरातील सुमनशी करत असेल. आता कोण ज्यास्त सुंदर हे त्यांचे त्यांनीच ठरवायचे. घराबाहेर, शेजारी उभ्या असलेल्या कारच्या काचेत हळूच आपण स्वतःला पाहतो. कपड्यांच्या दुकानात तर मज्जाच! तिथे आरसेच आरसे! ‘मुगल-ए-आझम’मधील आरसेमहाल आणि त्यात नाचणारी ती मधुबाला म्हणजे डोळ्यांना मेजवानीच. ते आरसे बसवणारा तो कारागीरसुध्दा स्वतःला त्यात पहात असेल काय? आमचा भारतीय सिनेमाही यातून वेगळा नाही. अगदी डोळ्यांत प्रेयसीचे प्रतिबिंब दाखवण्यापर्यंत ह्यांची मजल. “तेरी आँखें” ह्या विषयावर तर किती गाणी आहेत त्याचा हिशोबच नाही. ‘अमर अकबर अँथनी’ मधला अमिताभ बच्चनचा दारू पिऊन आरश्यासमोर स्वतःशीच केलेला संवाद प्रसिद्ध आहे.

खरेच, हे प्रतिबिंब माणसाला अंतर्मुख व्हायला भाग पाडते. नुसता आरसाच नाही तर शांत तलावाच्या पाण्यावर पडलेले आसमंताचे प्रतिबिंब मनातल्या कोपऱ्यांतील आठवणींना उजाळा देते. मला तर त्या फोटोग्राफरचे कौतुक वाटते जो आरश्यासमोर बसलेल्या मॉडेलचे प्रतिबिंब आपल्या कॅमेऱ्यात सामावत असतो. प्रतिबिंबाचे प्रतिबिंब - कमाल आहे नाही?

जवळून पहिले तर ह्या फोटोत माझ्या नातवाच्या डोळ्यांत छायाचित्रकाराचे - माझ्या मुलाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत आहे. आपले गुण हे आपल्या आईवडिलांच्या गुणांचे प्रतिबिंबच नव्हेत का? आता शास्त्रात त्याला अनुवांशिकता किंवा डीएनए म्हणतात. असो. आताच नवे वर्ष सुरु झाले. गेल्या वर्षाचे प्रतिबिंब मनाच्या कोपऱ्यात सारून नवीन वर्षासाठी अशीच प्रतिबिंब तयार करण्याच्या मागे लागूया. सर्वांना नव्या वर्षाच्या आणि संक्रांतीच्या शुभेच्छा.



Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय