कलाकार ओळख - माझा छंद

अनिरुद्ध गंधे

"तुझे काय छंद आहेत?" लहान असताना हा प्रश्न हमखास विचारला जायचा. मग चित्रकला, वाचन, गायन इत्यादी छंद उत्तरादाखल सांगितले जायचे.

हळू हळू जसा मोठा झालो तसे एक एक छंद कमी झाले. नंतर नंतर तर तो प्रश्न सुद्धा बंद झाला. छंदाचा वेळ अभ्यासाकरता आणि नंतर ऑफिसच्या भरमसाट कामाकरता वापरला जाऊ लागला. मुलं झाल्यावर तर त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांचे छंद महत्त्वाचे ठरू लागले. अशी बरीच वर्षं छंदाविना काढली, पण गेल्या २-३ वर्षात मला नवा छंद जडला आहे - वुड वर्किंगचा- म्हणजेच लाकूडकामाचा. ह्या माझ्या छंदाची गोष्ट मी तुम्हाला ह्या लेखात सांगणार आहे.

२०१८ मध्ये नवीन घर घेतल्यावर एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक बारीकसारीक कामाकरता हॅण्डीमॅन बोलावणे परवडणार नाही. मग घरातली छोटी मोठी दुरुस्तीची कामं करायला लागलो. स्वयंपाकघरातला नळ बदलणे, खोलीतील दिवे काढून पंखा बसवणे, कपाटांमध्ये नवे कप्पे करणे इत्यादी इत्यादी. माझ्या सासऱ्यांनासुद्धा अशी छोटी-मोठी कामं स्वतः करण्याची आवड आहे. मग ते अमेरिकेत आल्यावर त्यांनी मला स्वयंपाकघरामध्ये फ्लोटिंग फ्लोअर्स, आणि तळघरात सीलिंग टाईल्स लावायला मदत केली. हे सगळं चालू असतांना ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी बोलताना असं जाणवलं की अशी घरातली किरकोळ दुरुस्तीची कामं स्वतः करणं हे त्यांच्याकरता नेहमीचं आहे आणि प्रत्येकजण काही ना काही छंद जोपासतो. पण माझ्याकडे एकही छंद नाही.

आणि मग महामारी (Pandemic) सुरु झाली. सगळी उद्यानं बंद झाली. आता मुलं काय करणार? मग त्यांच्याकरता झोपाळा (swing set) बनवला. जी थोडी हत्यारं घेऊन ठेवली होती त्यांचा उपयोग झाला. गराजमध्ये सामान ठेवायला मांडण्या नव्हत्या, मग त्या तयार केल्या.

आणखी पुढे जाण्यापूर्वी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. पहिली, माझ्या सगळ्या प्रकल्पांमध्ये माझ्या सौचा सिंहाचा, नव्हे सिंहिणीचा वाटा आहे. अगदी होम डीपोमधून प्लायवूड बोर्ड्स गाडीच्या टपावर लादून आणण्यापासून डिझाईनमध्ये सुधारणा सुचवण्यापर्यंत तिचा सहभाग असतो. दुसरी, ह्या संपूर्ण प्रवासात यूट्यूब माझा गुरु आहे. हत्यारं कशी वापरायची ते कपाटं कशी बनवायची, ह्याचे अगदी तपशीलवार व्हिडीओ उपलब्ध असतात. अगदी तसंच्या तसं बनवलं नाही तरी अंदाज येतो की कसं बनवायचं आहे ते.

यूट्यूब वापरण्याचा आणखी एक फायदा म्हणजे ते मला नाजूक लाकूडकामांचे व्हिडीओ सुचवू लागले. मग मी स्क्रोल करवत आणली आणि त्याचे व्हिडीओ बघून नावाच्या पाट्या बनवल्या आणि तशाच आणखी काही नाजूक गोष्टी - बाल्टिमोर रेव्हन्सचं चिन्ह (लोगो), न्यू इंग्लंड पेट्रियट्सचं चिन्ह - बनवल्या. एक गोष्ट मात्र खरी आहे आणि ती म्हणजे यूट्यूबवर लोकं जितक्या सहजतेने एखादी गोष्ट दाखवतात त्यापेक्षा त्याच्या अनेकपटीने ती गोष्ट अवघड असते. पण आपल्याकडे जिद्द असेल तर पहिल्या, दुसऱ्या नाहीतर तिसऱ्या प्रयत्नाला यश नक्की येतं.
गेले काही दिवस मला ‘वुड बर्निंग’चे व्हिडीओ सुचवले जात होते. त्यासाठीचं सामान आणून त्याचे १-२ प्रकल्प केले. त्याला ‘लेझर बर्निंग’ची सर किंवा सफाई येणार नाही, पण करताना खूप मजा येते. आणखी एक गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रकल्पात प्रत्यक्ष कामासाठीचा वेळ कमी आणि तयारीमध्येच जास्त वेळ जातो, आणि हे नाजूक लाकूडकामाला जास्त लागू होतं. माझ्या बऱ्याच प्रकल्पांमध्ये मी कॉम्प्युटर फोटोशॉपवर जास्त वेळ घालवतो.

माझे बरेचसे प्रकल्प मी भेटवस्तू म्हणून बनवतो आणि मी त्यांना एकमेवाद्वितीय आणि व्यक्तिगत (personal) बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. त्यामुळे तशी प्रेरणा मिळाल्याशिवाय ते घडत नाहीत.

बरेच महिने मी ‘रेझिन आर्ट’चे व्हिडीओ बघतोय, पण अजून प्रकल्पाचं धाडस होतं नाहीये. बघू .



Comments

  1. अरे वा, वेगळा आणि उपयोगी तसेच कलात्मक छंद. त्यातच "कचऱ्यातून कला" हा भागही येऊ शकेल. अभिनंदन.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय