कविता - माझा विठ्ठल

माझा विठ्ठल

माझा विठ्ठल मलाच शोधायचा असतो..
मी धुंडाळत असते अंतरात्मा वगैरे,
आणि तो माळ्यावरून खाली माझी मजा बघत असतो!

तो विठ्ठल सगळ्या जांभळ्या सावळ्याचा साक्षीदार,
तो विठ्ठल त्या प्रत्येक निर्गुणाचा आकार,
अथांग भावनेच्या पसाऱ्याचा अगदी आतला एक पापुद्रा…
माझ्याच हाताने मीच कोरलेला तो नाचरा मोर असतो,

दिंडी जाते दारावरून अन् त्यात हुडकत रहाते मी तुला,
ग्यानबा तुकारामाच्या गजरात फक्त डोलारा हिंदकळत जातो,
उरते जेव्हा एकटी तेव्हा नजर कोपऱ्यातल्या विटेवर पडते,
तू नसतोस तिथे, खालच्या वाळूनेही तळ हलवलेला असतो,

मी धुंडाळत रहाते बाहेरच्या जगात वगैरे,
आणि तू माळ्यावरून खाली माझी मजा बघत असतो!
हा माळा तरी कसा रे, अगदी अडगळीची जागा,
मनाच्याही वरचा मजला आणि अनेक अस्तरी, भुयारी त्या वाटा,

मशाल सख्या हिमतीची घेऊन एका हाती,
हळुवार कराव्या लागतात बाजूला अनेक जाळ्या,
शेकडो खणलेले खड्डे आणि वरवर बुजवलेल्या कहाण्या,

माझंच भुंडं शेत अन् माझीच रंगीबेरंगी माती,
तुला शोधण्याचा ध्यास पण खरी शोधयात्रा माझीच,

त्या माळ्यावर मला सापडते राही माझ्यातली अन् सत्यभामा,
अश्या अनेक मी आणि त्यांत लपलेला अंश तुझा,
माझ्या मनातल्या तुझ्या प्रतिमेचं तू फक्त प्रतिबिंब,
शोधलं माळ्यावर तेव्हा ढवळलं गेलं फक्त ते अंतरंग,

माहित असतं तुला की हे असंच होणार,
चंद्रभागेच्या वाळवंटात पोहोचेपर्यंत सगळं मोकळं होऊन जाणार,
मला हे कळायला तुझा आधार नको असतो,
हे ही माहित असतं तुला! म्हणून तू मलाच शोधायला पाठवतोस,

वारी माझी विठ्ठला, तेव्हाच पुरी होते,
भूवैकुंठी यायच्या आधीच शोधाची जाणीव स्वतःत विरघळून जाते..




मी साधारण वर्षभरापूर्वी (डिसेंबर २०२१) अमेरिकेत आले. सध्या मी व माझा नवरा एलिकॉट सिटीत राहतो. मी पूर्णवेळ आयटीवाली आहे आणि तेवढीच पूर्णवेळ मी वाचन, कधीकधी चुकतमाकत लिखाण आणि एकूणच दुनियाभरातल्या मला भन्नाट वाटणाऱ्या गोष्टींत रमते. मी बरीच वर्षे पुण्याची, पण खरं सांगायचं तर शेवगाव, जिल्हा अहमदनगरची.

मैत्रेयी कुलकर्णीी

Comments

  1. व्वा मैत्रेयी ! झ्यक्कास !
    असाही एक विठ्ठल . जनाई, बहिणाबाई, तुकोबा अशा थोर मांदियाळीशी ओळख सांगणारा . मनस्वी . आणि तू विभक्त . छानच !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय