डेस्टिनेशन वेडिंग - जोशी मंगल कार्यालय

विदुला कोल्हटकर

नाट्यछटा: सध्याची सामाजिक स्थिती बघता आणखी अनेक वर्षांनी पारंपरिक लग्न ही जुनी/कालबाह्य कल्पना असेल. प्रत्यक्ष भेटी दुर्मिळ होतील आणि नेहमीच्या भेटीगाठी ई-भेटी किंवा मेटफॉर्ममधल्या/ मेटावर्समधल्या मेटाभेटी असतील. हे अजून अनेक दशकांनंतर पुण्यात राहणाऱ्या एका आईचं मनोगत.

छे! छे! छे! आता मात्र अगदी हद्द झाली. कुठे तोंड दाखवायला जागा उरली नाही. पार नाक कापलं पोरांनी. आता तुम्ही म्हणाल काय झालं तरी काय एवढं? सांगते सांगते.

कालचीच गोष्ट कधी नव्हे ते दारावरची बेल वाजली. उघडून बघितलं तर चंदन, म्हणजे माझ्या मैत्रिणीचा मुलगा. अगदी माझ्या मुलासारखाच. नाही नाही, प्रत्यक्ष नाही, मेटाफॉर्मच आला होता त्याचा. त्याने काहीतरी नवीन अपडेट केलंय त्यात हे असं जुन्या पद्धतीनं बेल वाजवून येता येत. बरं ते जाऊ दे, मुद्द्यावर येते. आता कालच चंदन आला होता. गप्पांचा विषय होता तो आणि त्याची ती चिलीमधली मैत्रीण ऑगस्टीना. ब्राझीलमधली इझाबेला, ती आधीची, तिचे रिव्ह्यू चांगले नव्हते म्हणाला. हिचे पण फारसे चांगले नाहीत ही गोष्ट त्याला खटकत होती. त्याला म्हटलं अरे बाबा, ऑगस्टीना आणि तू, तुमच्या इतक्या मेटाभेटी झाल्या. तुला काही खटकलं का? नसेल तर रिव्ह्यूचं सोडून दे आणि १५ दिवस फक्त एकमेकांच्या मेटाफॉर्ममध्ये राहून बघा.

माझा भाचा जयंत आणि त्याचा जॉर्ज आता पुढचे सहा महिने केवळ एकमेकांच्या मेटावर्समध्ये राहणार असं आजच त्यांनी जाहीर केलं. गेले २-४ महिने त्यांच्या मेटाभेटी चालल्या होत्या. त्या शेजारच्या समीराने घानामधल्या मुलाशी एकत्र राहण्याचा करार केला. सध्या सहा महिन्यांचा, म्हणजे कमी मुदतीचाच आहे. वरच्या घरातल्या संदीपने ऑस्ट्रियातल्या मुलीशी ३ वर्षांचा करार केला. पलीकडच्या घरातल्या कोमकलीने जपानमधल्या मुलीशी थेट १० वर्षांचा करार केला. शिवाय त्यात किमान पाच प्रत्यक्ष भेटी!

आणि हा माझा लेक गोपाळ. गोपाळ कसला कपाळ माझं! त्यानं चक्क शेजारच्या गल्लीतल्या राधेशी करार केला! फक्त २-३ मेटाभेटीनंतर लगेच तीन महिन्याचा मेटा करार आणि त्यात एक प्रत्यक्ष भेट. काय आणि कुणाला सांगू? खरंतर कुणालाच सांगायला नको वाटतंय. मी म्हणते अगदी नायजेरिया नाही तरी नागालँडमधली, क्रोएशिया नाही तर काश्मीरमधली तरी एखादी शोधायची. अगदी गेला बाजार इंग्लंड, अमेरिका तरी, पण हे काय? आम्ही नारायण पेठ तर ही राधा सदाशिव पेठेतली. अगदी शेजारच्या गल्लीतच. आणि २-३ वेळा भेटल्यावर चक्क लगेच करार आणि प्रत्यक्ष भेट? छे!

नवीन नवीन म्हणून गोपाळ नाव ठेवलं, पण पणजीच्या फाईल बघताना कळलं हे तर तिच्या वडिलांचं नाव. झालं, तिथेच सगळं चुकलं. नाव जुन्या काळातलं तर वागणंही तसंच जुन्या पद्धतीचंच असणार! काय तर म्हणे गावातलीच मुलगी शोधली आणि लगेच करार? पणजीच्या काळी म्हणायचे तसं घरात पाऊल टाकू देणार नाही सुद्धा म्हणता येत नाही. त्याने इथे पाऊल ठेवल्याला आता किती वर्ष झाली कुणास ठाऊक. मेटाफॉर्ममध्ये येऊन जाऊन असतो म्हणा. आता त्याचा रिसिव्हरच बंद करते. तिच्याच फाईलमध्ये ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ नावाच्या एकपात्री नाटकाची गोष्ट होती. त्यात काय तर म्हणे मराठवाड्यातल्या मुलाने इंग्लंडमधल्या मुलीशी लग्न जमवलं त्यावर अख्ख नाटक. आता हा काय नाटकाचा विषय आहे का? मुलाचं आणि मुलीचं लग्न, त्यातून मुलगी कुठली तर म्हणे इंग्लंडमधली. त्याचा कसला गहजब!

अर्थात तेव्हापेक्षा आता जग खूपच बदललंय. आता जग जरी खेडं झालं असलं तरी खेडंपण जगाएवढं मोठं झालंय. मला प्रत्यक्ष इथे राहणाऱ्यांची माहिती आहे, पण माझ्या शेजाऱ्यांना कुठे आपापल्या शेजाऱ्यांची माहिती आहे? आता त्या शेजारच्या टेलरला टेनसीतल्या ट्रेंटनमधल्या लोकांची खडानखडा माहिती आहे, पण आपल्या टेरेसच्या पलीकडे कोण आहे याची माहिती नाही. परवा घरात आग लागल्यावर बसले होते फोनवर ९११ दाबत. आवाज आल्याने मी जाऊन बघितलं तेव्हा कळलं. मग सांगितलं, आपण पुण्यात आहोत. इथे १०० दाबा. असो.

अर्थात लग्न हाच विषय बघा. हे नुसतं मेटाफॉर्ममध्ये एकत्र राहायचं, करार करून एकत्र राहायचं जुनं झालं. गोपाळ आणि राधाला आता लग्नच करायला सांगते. वा! मग बघते असा धाडसी विचार ऐकून कशी सगळ्यांची बोलती बंद. याला म्हणतात चौकटीबाहेरचा विचार. माझ्या पणजीचं जोशी मंगल कार्यालयात लग्न झालं होत असं तिच्या फाईलमध्ये लिहिलं आहे. अर्थात मंगल म्हणजे काय आणि कार्यालय म्हणजे काय आणि हे कुठे आहे, अजून आहे का जरा शोधाशोध करायला लागेल. नसेल तर करू तयार. आहे काय आणि नाही काय. होऊन जाऊ द्या जोरदार! Destination Wedding: जोशी मंगल कार्यालय!

आताच गोपाळच्या मेटाफॉर्मला बोलावते आणि सांगते!


Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय