संपादकीय





जानेवारी २०२२
अंक १


मैत्र संपादक मंडळ २०२ 

वरदा वैद्य 

विदुला कोल्हटकर 

रोहित कोल्हटकर 

कपिल धाकड 

मधुर पुरोहित 

 

बाममं कार्यकारिणी २०२ 

अध्यक्ष 

मोनिका देशपांडे 

उपाध्यक्ष 

रुचिरा महाजन  

 उपाध्यक्ष- विपणन 

मुग्धा मुळे  

चिटणीस 

स्मितेश लोकरे 

खजिनदार 

दीपान्विता काळेले 

सह-खजिनदार 

रमा गंधे

नमस्कार मंडळी,
गेल्या दोन कोविडग्रस्त वर्षांमध्ये आपले घरात असण्याचे प्रमाण वाढले तसा आपला स्क्रिनटाईमही खूप वाढला आहे. टीव्ही, नेटफ्लिक्स, प्राईम वगैरेंवर नवनव्या मालिका, चित्रपट वगैरे पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. बसल्याबसल्या आपल्या मोबाईलशी चाळा करण्याचे, संगणकासमोर बसण्याचे प्रमाण वाढले आहे.

त्याचवेळी पूर्वी ज्या गोष्टी शिकण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थितीची गरज पडायची, त्यातल्या अनेक गोष्टी आता ऑनलाईन करता येतात ह्याचा शोध आपल्याला लागला आहे. त्यामुळे झूमसारखी व्यासपीठे वापरून नृत्य, गायन, चित्रकला, योगासने, व्यायामप्रकार, ध्यानधारणा वगैरे नवनवीन गोष्टी ऑनलाईन शिकण्याची आणि शिकवण्याचीही संधी मिळू लागली आहे. ह्यातल्या काही गोष्टी महामारीपूर्व काळातही ऑनलाईन करता येत असल्या तरी प्रत्यक्ष शिकण्याची सोय असताना त्या ऑनलाईन करण्याचे आपल्याला सुचलेच नसावे का? की प्रत्यक्ष भेटींची बातच और असा विचार आपण करत होतो? महामारीमुळे जास्तीतजास्त वेळ घरात काढताना तुम्ही असे काही नवीन छंद जोपासण्यास वा नवीन विषय शिकण्या-शिकवण्यास सुरुवात केली असेल तर तुमचा हा अनुभव कसा होता त्याबद्दल आम्हाला जरूर लिहून कळवा. २०२२ हे नवीन वर्ष गेल्या दोन वर्षांहून वेगळे असेल अशी आशा करूया. ह्या वर्षाची सुरुवात बाल्टिमोर मराठी मंडळाच्या नवीन कार्यकारिणी समितीने ऑनलाईन प्रस्तुत केलेल्या संक्रांतीच्या गोड कार्यक्रमाने झाली. नवीन कार्यकारिणी समितीच्या सदस्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! ह्या वर्षी होणाऱ्या मंडळाच्या सर्व ऑनलाईन आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांना आपण उपस्थिती लावूया. २०२२ वर्षातील पहिला अंक प्रकाशित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ह्या अंकासाठी लेखन पाठवलेल्या सर्वांचे अनेक आभार. ह्यापुढील अंकांसाठीही तुम्ही लेखन पाठवत राहाल अशी आशा करतो. ह्या अंकामध्ये आठवणी आणि विविध अनुभवांची रेलचेल आहे. कोविडच्या नव्या व्हेरियंटबद्दल, ओमायक्रॉनबद्दल माहिती सांगणारा लेख ह्या अंकात वाचता येईल. त्याशिवाय नाट्यछटा, माहितीपर कथा, कविता आणि इतर लेखांनी अंक सजला आहे. ‘चित्रसाहित्य’ हे नवे सदर ह्या अंकापासून सुरु करत आहोत. अंकामध्ये पुढे एकमेकांशी साधारण संबंधित अशी चार छायाचित्रे दिली आहेत. त्यातील एक वा जास्त चित्रांवरून सुचलेले साहित्य तुम्ही आम्हाला लिहून पाठवायचे आहे. ह्याला साहित्य प्रकाराचे बंधन नाही. कविता, लेख, अनुभव, स्थलवर्णन, स्फुट विचार, कथा वगैरे कोणत्याही साहित्य प्रकाराचे स्वागत आहे. ह्या नव्या उपक्रमाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा करतो. मैत्रचा पुढचा अंक एप्रिलअखेरीस प्रकाशित होईल. तोवर होळी आणि गुढीपाडवा उरकलेला असेल. ह्या सणांसाठी तुम्ही केलेल्या पदार्थांच्या पाककृती आम्हाला पुढच्या अंकासाठी लिहून पाठवा. तुमच्या अनोख्या पाककृती, त्या करतानाच्या आठवणी आणि अर्थातच त्यांचे फोटो आम्हाला जरूर पाठवा. पदार्थ खास होण्यासाठीचे तुमचे नुस्खेही लिहायला विसरू नका. तुम्ही एखादी कला जोपासत असाल तर कलाकार ओळख सदारांतर्गत तुमची माहिती आम्हाला पाठवा. हिवाळी सुट्टीत प्रवास करून आला असाल तर तुमचे प्रवासवर्णन आम्हाला लिहून पाठवा. शिवाय नेहमीप्रमाणे कथा, कविता, अनुभव, लेख आणि चित्रांचेही स्वागतच आहे. पुढील अंकासाठीचे साहित्य १५ एप्रिलपर्यंत editor@baltimoremarathimandal.org ह्या पत्त्यावर पाठवा. संपादक मंडळातर्फे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! कळावे, संपादक मंडळ



मुखपृष्ठ:
कार्डिनल्सची हिमसभा, ८ x १० इंची कॅनव्हासवर ऍक्रिलिक रंगांतील चित्र
(हे ऍक्रिलिक चित्र शैलेश वाईकरांनी काढलेल्या छायाचित्रावर आधारित आहे.)

चित्रकार - वरदा वैद्य

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय