त्रिकाल

रवींद्र जोगळेकर,पुणे

आकाशगंगा, सूर्यमाला, ग्रह, नक्षत्र, तारे - अखिल विश्वाचा हा अतिप्रचंड महापसारा. त्यातील फक्त आपल्या पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. स्थूलपणे सजीव, निर्जीव अशी विभागणी.

सजीव प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ, बुद्धिमान, प्रगत, प्रगल्भ विचारशक्ती, कार्यरत पंचेंद्रिये, कृतिशील संशोधक वृत्ती म्हणजे मानव.

भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ असे तीन महत्त्वपूर्ण टप्पे. वर्तमान क्षण म्हणजे मुठीतून निसटलेला वाळूचा कण. पुढच्याच क्षणी भूतकाळाच्या वाळुरूपी महाभांडारात सामावला जाणारा. भविष्यकाळ म्हणजे पुढील नियोजन, अंदाज, कल्पनाचित्र, ध्येयधोरणे. हे अनिश्चित, अधांतरी.

तर भूतकाळ म्हणजे वस्तुतः जगावेगळे, अद्भुत असे काहीच नसते. तुमच्याच गेल्या क्षणापर्यंतचा व येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा वाढत जाणारा घटना, प्रसंग, घडामोडी, अनुभव इत्यादींचा एक लयबद्ध प्रवास, जो संचयित होत राहतो. अथांग, अनंत, अमर्याद. म्हणजेच वर्तमान आणि भविष्य ह्यापेक्षा भूतकाळाचे अस्तित्व शाश्वत, दीर्घकालीन, कधीही न बदलणारे. तुमच्याच व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब, प्रतिकृती, प्रतिरूप. एक वेळ सावली तुमच्यापासून दूर जाईल पण भूतकाळ नाही; कारण तो तुमच्यातच विलीन झालेला असतो.

भूतकालाविषयी सर्वसाधारणपणे गैरसमज, अपुरी माहिती, कमी महत्व देणे, दुर्लक्ष करणे, अनास्था, बेफिकिरी, उदासीनता, दुराग्रह, फाजील आत्मविश्वास, कपोलकल्पित, अशीच बहुसंख्य लोकांची धारणा असते. पण भूतकाळाची महती थोर असते; म्हणून भूतकाळाची आवश्यकता, महत्व ह्याचा गांभीर्याने विचार करणे क्रमप्राप्त.

काळानुसार (जगरीत) परिवर्तन, प्रगती, विकास, नवनवीन शोध, तंत्रज्ञान, अत्याधुनिक साधने, संपर्क यंत्रणा, संगणक, आंतरजाल, इत्यादींचा वाढत जाणारा प्रचंड वेग, गरजा, उच्च राहणीमान, वैभव अशी मानवाची धडपड सुरूच असते. "मी बिझी आहे, मला वेळ नाही." हे जणू ब्रीदवाक्य! लोभीपणा, लालसा, सुखाच्या अवास्तव कल्पना, अगदी दमछाक होईपर्यंत! फक्त वर्तमान. भूतकाळाचा पूर्ण विसर. ह्या सगळ्या उलथापालथींत वर्तमान वेळ वाया जाणे, अतिश्रम, हातामध्ये अपेक्षित फलित न पडणे, त्यामुळे नैराश्य, हतबलता, हे नक्की.

अर्थात ह्या सगळ्यामध्ये भूतकाळाचे महत्त्व, उपयुक्तता कणभरही कमी होत नाही. तो जसाच्या तसा आपल्या जागी स्थिर असतो. ह्यामुळे वर्तमानाचे नियंत्रण तुमच्या हातात राहात नाही. भविष्यकाळच्या योजना आखणे अवघड होत जाते. म्हणून भूतकाळात आपण केलेल्या चुका पुनः न करणे, हुकलेल्या संधी नव्याने मिळाल्यास त्याचे सोने करणे हे भूतकाळातील तपशील, अनुभव ह्याद्वारे तुम्ही करू शकता. त्यामुळे वर्तमान सुखदायक, जीवनमान उंचावणे, प्रगती, सुख, समाधान हे नव्याने मिळवू शकता.

भूतकाळाच्या साहाय्याने भविष्यही नीटपणे योजता येईल. म्हणजे तुमचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे यशस्वी, समृद्ध करण्यामध्ये ‘भूतकाळाची’ अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका असते. भूतकाळाचे महत्त्व, उपयुक्तता तुमची तुम्हीच जाणून घ्या. तुमचे सर्व तुमच्यापाशीच असते. शोधले तर नक्की गवसेल. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा मूळ गाभा आपणच असतो. बाकी इतर हे सहाय्यक, पूरक असतात हे तत्त्व. आणखी म्हणजे तुम्ही असेपर्यंत भूतकाळ अस्तित्वात असतोच, पण तुम्ही गेल्यानंतरही त्या क्षणापर्यंतचा भूतकाळ तसाच राहतो. त्यावेळी तुमचा वर्तमानकाळ व भविष्य काळ हे दोन्हीही अस्तित्वहीन शून्यवत! कारण भूतकाळ अमर असतो!

भूतकाळ या पूर्ण शब्दातील ‘भूत’ ह्या स्वतंत्र शब्दाचा प्रचलित, विपरीत अर्थ न काढता भूतकाळाचे मनन, चिंतन, स्मरण, जतन करा. सखोल शोध अन बोध घ्या. त्याचा उचित आदर, मान ठेवा. तोच तुमचा मार्गदर्शक, सल्लागार, हितचिंतक, आधारस्तंभ, निरपेक्ष सच्चा मित्र, सदैव तुमच्या सोबत. भूतकाळाची तुमच्या वर्तमानाशी सांगड घालून उपयोगात आणा. असे केल्यास तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल, प्रगत, सुनियोजित, यशस्वी, सफल निश्चितपणे असणार.

भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळ हे तिन्ही ‘काळ’ एका समान सूत्रामध्ये गुंफून तुम्ही आयुष्याचा सुयोग्य ‘समतोल’ साधा. त्रिकालाय नमो नमः|

Comments

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय