हेचि फूल होय मम तपाला

वरदा वैद्य

सहा-सात वर्षांपूर्वीची गोष्ट. नोकरीनिमित्ताने पेन्सिल्वेनियातून मेरीलँडमध्ये राहायला येण्याचं नक्की झालं आणि आम्ही मेरीलँडात घर शोधण्याच्या मोहिमेला सुरुवात केली.

मेरीलँडच्या तीन-चार खेपा झाल्या, पण हवं तसं घर लवकर सापडेना. मग सुरुवातीला एक वर्ष भाड्याने राहून त्यादरम्यान घरं बघावीत असं ठरवलं. त्यावेळी दर खेपेला इथे आलो तेव्हा माझं लक्ष वेधून घेतलं ते रस्त्याच्या कडेने जागोजागी वाढलेल्या रानटी रोपट्यांवरच्या फिक्या जांभळ्या, नाजूक फुलांनी. थोडी एस्टरसारखी, थोडी डायांथससारखी दिसणारी ही फुलं मोहक होती, पण मला अनोळखी होती. रोपांना जमिनीलगत डॅण्डीलायनला असतात त्या आकाराची थोडी पानं, मग त्यातून लांब वाढलेल्या काड्यांसारख्या बारीक फांद्या आणि फांद्यांवर दर दोन इंचांवर फुललेली ही नाजूक फुलं. फांद्यांवर पान अगदीच एखाददुसरं. पाहावं तिथे रस्त्याच्या कडेला ही फुलं दिसत होती. काही ठिकाणी रस्त्यालगत नगरपालिकेने इमानेइतबारे गवताची कापणी केलेली असली तरी ही खुरटी रोपं आणि त्यावर ही फुलं त्यातून तगलेली दिसत होती. म्हणजे चांगली चिवट जात असणार.

ही कोणती रानफुलं असावीत हे शोधावं म्हणून नेहमीप्रमाणे गूगलला शरण गेले, पण नेमकं काय गुगलावं कळेना. व्हायोलेट कलर्ड वाइल्ड फ्लॉवर्स, पर्पल फ्लॉवर्स, वाइल्ड फ्लॉवर्स इन मेरीलँड वगैरे सुचेल ते शोधून झालं, पण त्यात ही फुलं सापडेनात. तेव्हा झाडाझुडपांच्या फोटोंवरून त्यांची ओळख पटवणाऱ्या फोनवरच्या ऍप्सशी माझा परिचय झालेला नव्हता. आता भाड्याने घर मिळालं होतं. सामान आलं होतं. कुठे कधी बाहेर पडलं की हमखास ही फुलं रस्त्याच्या कडेला दिसायची, त्यांचं नाव मात्र हुलकावणी देत राहिलं. अनेक वर्षांपासून इथे राहणाऱ्या ओळखीच्या कुणाला विचारलं की “हो, दर उन्हाळ्यात ही फुलं दिसतात, पण नाव नाही बुवा माहीत,” हे उत्तर मिळणार हे ठरलेलंच.

पुढच्या वर्षी स्वतःचं घर झालं तेव्हा घराभोवती बाग फुलवणं आलंच. भाज्या, फुलझाडं लावणं हे माझ्या अगदी आवडीचं काम. ही जांभळी फुलं इतर कुणाच्याही बागेत मला कधी दिसली नाहीत, तरी माझ्या बागेत मात्र मला ती हवीशी झाली. बिया आणायच्या तर रोपाचं नावच माहीत नाही! रस्त्याच्या कडेला एवढी शेकड्यांनी उगवताहेत, तर एखादं रोपच उपटून आणावं का? कुठेही वाढणाऱ्या ह्या रानटी रोपातलं एखादं मी उपटलं तर कोणाला काही त्रास होण्याचं कारण दिसत नव्हतं. पण तरी रस्त्यात थांबून एखाद रोपटं उपटायला लाज वाटत होती.

एव्हाना इथे येऊन २-३ वर्षं सरली होती. घराभोवतालची बाग चांगली फुलली होती. दर वर्षी त्यात वेगवेगळ्या फुलझाडांची भरही पडत होती. पण ह्या नाजूक जांभळ्या फुलांचा विचार मनातून जाईना. आधीची नोकरी सोडून नव्या नोकरीत आता मी रुजू झाले होते. नासा गॉडर्डच्या विस्तीर्ण परिसराची, त्यात अस्ताव्यस्त विखुरलेल्या इमारतींची हळूहळू ओळख होत होती. केंद्रशासनाच्या मालकीच्या ह्या जमिनीवर जिथेतिथे भरपूर झाडं आहेत. नव्याने बांधलेल्या काही इमारतींचे अपवाद सोडले तर नासाच्या परिसरात सुशोभीकरण वगैरे नावालाही नाही. इमारतींच्या भोवती काही झाडं-झुडपं असतील तर तिची निगा राखतात, नियमित गवतकापणी होते, पण ठरवून केलेली बाग, फुलझाडांचे वाफे अगदीच तुरळक. नासातल्या लोकांना वर आकाशात बघताना जमिनीवरच्या गोष्टी दिसतच नाहीत की काय कुणास ठाऊक! तर अशाच एका उन्हाळ्यात दुसऱ्या इमारतीमध्ये जाताना मला ते सुप्रसिद्ध जांभळं फूल गवतात डोलताना दिसलं. मी जवळ जाऊन त्याची पाहणी केली, त्याला कुरवाळलं. हे न्यावं का उपटून? पण पुन्हा कोणी पाहील म्हणून लाज वाटली. कोणी काही म्हणालं, काही नियमबियम मोडले वगैरे तर? मग त्या फुलाला तिथेच टाटा केलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे जाऊन पाहाते तर फूल, रोप गायब. नुकतंच कोणी गवतकापणीमध्ये त्या रोपांची कत्तल करून गेलं होतं. अरेरे! कालच मी ते उपटायला हवं होतं का? तो उन्हाळा तसाच गेला.

नंतरच्या वर्षी नासाच्या परिसरात आमच्या इमारतीसमोर गवतकापणी करताना एक जण दिसला तेव्हा मी त्याला विचारलं की जांभळ्या फुलांची रानटी रोपं गवतात अधूनमधून दिसतात, ती तुम्ही गवत कापता त्यात सफाचट होतात. त्यातलं एखादं मी उपटलं तर चालेल का? तर तो माणूस म्हणे उपटा की! आम्ही तसाही त्यावरून मोवर फिरवणार. मग पुन्हा गवतात कुठे हे फूल दिसतंय का शोधात राहिले. काही दिवसात एक दिसलं. उपटायला गेले तर कसलं चिवट, अजिबात दाद देईना. जोर लावला तर काडी मोडून हातात आली. मुळं मात्र घट्ट जमिनीतच राहिली. मुळांशिवाय हे रोप लागणार नाही हे माहीत असलं तरी मी ते घरी आणून कुंडीत लावलं. पाणी घातलं. दुसऱ्या दिवशी त्यावर आधीच असलेली कळी उमलली होती, पण रोप नंतर तगलं नाही. पुन्हा शोधात राहिले. दुसरं रोप दिसलं तरी ते नुसतं हाताने उपटून उपयोग नाही तर रोप मुळांसकट मिळावं म्हणून आजुबाजुची जमीन उकरण्यासाठी धारदार/टोकदार काही हवं हे लक्षात आलं. मग स्टीलची एक बटर नाईफ ऑफिसात होती ती बाहेर पडताना खिशात घेऊनच बाहेर जायचं ठरवलं. एक रोप सापडल्यावर बटर नाईफने आजूबाजूची माती मोकळी करून मुळांसकट ते रोप मी अलगद काढलं. ऑफिसातून घरी आल्याआल्या आधी ते रोप कुंडीत लावलं. नंतरचे काही दिवस ते रोप तगलं. पण काही दिवसांनी कोमेजून गेलं. मुळांसकट रोप आणूनही तसा विशेष काही उपयोग झाला नाही. निदान तेव्हा तरी तसंच वाटलं.

दरम्यान कोण्या संकेतस्थळावर दुसऱ्याच कोणत्या फुलझाडाबद्दल माहिती वाचत असताना अचानक ह्या जांभळ्या फुलझाडाबद्दलही माहिती सापडली. इतके दिवस ह्याचं नाव शोधायच्या प्रयत्नात होते, ते असं अचानक सापडलं. ह्याचं नाव होतं चिकोरी! चिकोरी हा शब्द ह्याआधी कॉफीच्या संदर्भातच ऐकला/पाहिला होता. भारतात ब्रू कॉफीच्या डब्यावर त्यातल्या चिकोरीचं प्रमाण लिहिलेलं वाचल्याचं आठवलं. चिकोरीचं रोप हे असं असेल ह्याची कधी कल्पनाच केली नव्हती. कॉफीत घालतात म्हणजे चिकोरीच्या बियाच वापरत असावेत असा उगीच गैरसमज करून घेतला होता, तोही दूर झाला. चिकोरीची मुळं दळून, भाजून ती पूड कॉफीत मिसळतात. त्याने कॉफीचा करकरीतपणा कमी होतो, कॉफीला दाटपणा येतो, कडवटपणाही कमी होतो. चिकोरीमध्ये कॅफिन नसतं. त्यामुळे कॉफीत मिसळून कॅफिनचं प्रमाण नियंत्रित करता येतं. चिकोरी कॉफीच्या तुलनेत अगदीच स्वस्त. प्राचीन इजिप्तमध्ये चिकोरीची लागवड होत असे. एकोणिसाव्या शतकामध्ये फ्रान्समध्ये कॉफीत चिकोरी मिसळली जाई असे उल्लेख साहित्यात सापडतात, मात्र कॉफीत चिकोरीची पूड मिसळण्याचा पहिला प्रयोग हॉलंडमध्ये झाला असावा (संदर्भ - https://www.smithsonianmag.com/arts-culture/chicory-coffee-mix-new-orleans-made-own-comes-180949950/). शिवाय कावीळ, यकृताचे आजार, गाऊट, वगैरेंवर गुणकारी म्हणून चिकोरीच्या मुळांचा काढा करून पीत असत. अमेरिकेत यादवी युद्धाच्या काळात युरोपातून होणारी कॉफीची आयात घटल्यावर कॉफीत चिकोरी मिसळण्याचे प्रयोग होऊन न्यु ऑर्लिन्सची सुप्रसिद्ध ‘कॅफे डु मॉ’ (Cafe du Monde) निर्माण झाली. मात्र अमेरिकेत चिकोरीची लागवड व्यावसायिक तत्त्वावर केली जात नाही. कॉफीत मिसळण्यासाठीची चिकोरी युरोपातून आयात होते.

दोन वर्षांपूर्वीच्या उन्हाळ्यात एकदा होम डीपोतून काही आणण्यासाठी म्हणून संध्याकाळची बाहेर पडले होते. रस्त्याच्या कडेला चिकोरीची फुलं नेहमीप्रमाणे दिसत होतीच. रोपं तशी बरीच वाढलेली होती. तीनेक फूट तरी उंच असावीत. आजूबाजूचं गवत, ब्लॅक आईड सुझन्स आणि इतर रानटी रोपंही बऱ्यापैकी उंच झाली होती; ह्याचा अर्थ लवकरच गवतकापणीची चिन्हं होती. मग मनाचा हिय्या केला. ठरवलं की घरी आधीच एक असलं तरी होम डिपोतून आणखी एक छोटं खुरपं घ्यायचं आणि येताना ह्यातलं एक तरी रोप घरी न्यायचंच. कोणी बघेल वगैरे काही लाज-बीज वाटून घ्यायची नाही. तसंच केलं. नवं छोटं खुरपं विकत घेतलं. येताना रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि एक नाही तर चांगली दोन रोपं मुळांसकट उपटून घरी आणली. लगेच एक रोप कुंडीत आणि एक जमिनीत लावून टाकलं. चांगली दोन-तीन फूट उंचीची रोपं होती, त्यावर बऱ्याच कळ्याही होत्या. काही आधीच उमलून सुकलेली फुलंही होती. नंतर ही दोन्ही रोपं चांगली तगली. कळ्या उमलल्या, आणखी कळ्या लागल्या. गेल्या उन्हाळ्यात ही दोन्ही रोपं आपलीआपण पुन्हा उगवली. आधी लावलेलं आणि तेव्हा जगलं नाही असं वाटलेलं नासातलं रोपही नव्या मौसमात नव्या उमेदीने उगवलं तेव्हा खूप आनंद झाला. बाकी कोणी लावत नसेना का, पण माझ्या बागेत ही चिकोरीची फुलं आता दरवर्षी डोलतील.

Comments

  1. रंजक लेख. असली रानटी रोपं जगवण्यात मजा असते. हे रोप चिकोरीचे आहे हे कळाल्यावर अधिक गंमत वाटली

    ReplyDelete
  2. छान लिहिलंयस.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गृहलक्ष्मी

संपादकीय